वटवृक्षाचे शास्त्रीय नाव (फायकस बेंगालेन्सिस; कुल-मोरेसी) आहे. या सुपरिचित प्रचंड वृक्षाचा अंतर्भाव आवृतबीज वनस्पतींच्या द्विदल वर्गात होतो. हिमालयाच्या पायथ्याचा प्रदेश, व्दिपकल्पाचा पश्चिम भाग व दक्षिणेकडील टेकड्यांचा भाग या ठिकाणी हा जंगलात आढळतो. रस्त्यांच्या दुतर्फा, शेताच्या कडेला, बागांत, मंदिराच्या परिसरांत, समाधिस्थानांलगत सावलीसाठी हा वृक्ष लावतात. पक्ष्यांच्या विष्ठेद्वारे याचा बीजप्रसार होऊन खेड्यांच्या आसपासच्या मोकळ्या जागा, पडक्या इमारती, भिंतीमधील भेगा इ. अनेक ठिकाणी तो वाढताना दिसतो. कडक ऊन, थंडी व पाऊस यांचा त्यावर प्रतिकुल परिणाम होत नाही.
वटवृक्षाची उंची सुमारे तीस मीटर पर्यंत असते. हा वृक्ष सदापर्णी आहे. वटवृक्षात दुधी रंगाचा चीक असतो वृक्षाचे खोड जाड व घट्ट असते. फांद्या जाड व जमिनीत समांतर वाढतात.तसेच फुलोरे गोलाकार, काहीसे पोकळ असे असतात. मार्च ते जूनच्या काळात ही फळे झाडावर विपुल प्रमाणात दिसतात. अनेक पक्षी, वटवाघळे, खारी व माकडे इ. प्राणी ती खातात. फळे त्यात असणाऱ्या कीटकांमुळे माणसांना खाण्यास योग्य नसतात.
ह्याला हिंदीत बरगद असेही म्हणतात. ह्या वृक्षाची पूजा केल्यास मोक्ष प्राप्त होतो अशी धारणा आहे.
आर्यांना हा वृक्ष प्राचीन काळापासून परिचित असल्याचे दिसते. वेदांमध्ये याचा ‘न्यग्रोध’ नावाने उल्लेख आहे. रामायण, महाभारत, चरकसंहिता, बृहत्संहिता, कौटिलीय अर्थशास्त्र, रघुवंश इ. अनेक संस्कृत ग्रंथातून भिन्न भिन्न संदर्भात वडाचा निर्देश आहे. प्लिनी यांनी ‘इंडियन किग ट्री’ असा याचा उल्लेख केला आहे. हिंदूधर्माय वडाला पवित्र मानतात. सुवासिनी ज्येष्ठ पौर्णिमेस याची पूजा करतात. वटपौर्णिमा आली की सुवासिनी बायकांची सकाळीच वडाची पूजा करण्याची तयारी सुरू होते. सजून सवरून तयार होतात आणी वडाची पूजा करून त्याच्या बुंध्याला दोर्याने गुंडाळत प्रदक्षिणा
घालतात आणि मला अखंड सौभाग्य लाभू दे, अशी प्रार्थना करतात. सतीसावित्रीने याच वृक्षाखाली आपल्या पतीचे प्राण यमराजा कडून परत आणले. त्याला जिवंत केले. आपल्या सौभाग्याचे रक्षण याच वृक्षाच्या साक्षीने केले, ही अख्यायिका पुराणात आढळते. म्हणूनच सौभाग्यवती स्त्रिया वटपौर्णिमेला वडाचे पूजन करतात.
भारतीय संस्कृती, शास्त्र, परंपरा, रुढी यांत वृक्षांना अनन्यसारधारण महत्त्व आहे. सीता देवीने प्रयागाच्या प्रसिद्ध वटवृक्षाची प्रार्थना केल्याचा उल्लेख रामायणात आहे. वडाच्या काटक्यांचा उपयोग होमहवनात व यज्ञात समिधा म्हणून करतात. बौद्ध धर्मीयही या वृक्षाला पवित्र मानतात. त्यांच्या सात बोधीवृक्षांपैकी हा एक आहे.
वटवृक्ष हा पवित्र महावृक्ष आहे. भगवान शिवाचे हे निवासस्थान मानले असून मानवी संसाराप्रमाणेच वटवृक्षाचा विस्तार सदोदित होत असतो. त्याचा पारंब्या पुन्हा पुन्हा मूळ धरताता आणि आपले अस्तित्व कायम ठेवतात म्हणून वटवृक्षाला संसारातील सौभाग्याचे पावित्र्याचे प्रतीक मानतात.
वड हा मंजिराच्या जातीचा वृक्ष. त्याचा भव्य विस्तार, डौलदारपणा, दाट पानांमुळे मिळणारी दाट सावली यामुळे पूर्वीच्या काळी हा वृक्ष वाटसरूचे आश्रयस्थान असे. म्हणूनच याला आधारवडही संबोधल्या जाते. याच्या लोंबणार्या पारंब्या वरून खाली येतात. आणि या पारंब्या पुन्हा जमिनीत मुळं धरतात आणि या प्रकारे या वृक्षाचा विस्तार कायम वाढत असतो.
सावित्रीची कथा आणि वटपौर्णिमेचे व्रत यामुळे वटवृक्षाकडे अध्यात्मिक दृष्टीने पाहिले जात असले, तरी अन्य झाडांच्या तुलनेत सर्वाधिक प्राणवायू हवेत सोडणाऱ्या वडाचे आणि माणसाचे नाते जन्मोजन्मीचे असते. जन्मोजन्मीचे यासाठी की इतके आयुष्य ना माणसाचे असते ना अन्य कुठल्या वृक्षाचे. त्यामुळे भूतलावरील अनेक घटनांचा व हजारो वर्षांच्या इतिहासाचा हा साक्षीदार आहे. प्रत्येक गावात वडाच्या पाराशी अनेकांच्या आठवणी जुळलेल्या असतात. वडाचे धार्मिक महत्त्व कोणी मान्य करो की न करो, मात्र त्याची आधार वाटणारी गर्द सावली आणि त्याचे औषधी उपयोग व पर्यावरणाच्यादृष्टीने असलेली उपयुक्तता यामुळे माणूस अणि वटवृक्ष याचे घट्ट नाते झाले आहे. आधुनिक भाषेत वटवृक्ष नैसर्गिक व्हेंटिलेटरचे काम करतो.
वड, पिंपळ, औदुंबर आणि शमी हे पवित्र अन् यज्ञवृक्ष म्हणून सांगितले आहेत. या वृक्षांत वटवृक्षाचे आयुष्य अधिक असून पारंब्यांनी त्याचा विस्तारही पुष्कळ होतो. त्याच्या प्रत्येक फांदी, पारंबी व पानातूनसुद्धा नवीन वटवृक्ष जन्म घेतो. म्हणून त्याला अनादि-अनंत असा अक्षयवट म्हटले गेले आहे. वटवृक्षाचे आयुर्मान साधारणपणे एक हजार वर्षे आहे.
सुभाषचंद्र बोस वनस्पती उद्यान (हावडा, कोलकाता) येथे भारतातील सर्वात जुना चारशे वर्षा पूर्वीचा वटवृक्ष आहे. त्याचा विस्तार जवळपास तीन हेक्टर क्षेत्रावर पसरला आहे.
धत्ते भारं कुसुमपत्रफलावलीना, घर्मव्यथां वहति शीतभवं रुजं च ।
यो देहमर्पयति चान्यसुखस्य हेतोः, तस्मै वदान्य गुरवे तरवे नमोऽस्तु।।
फुले, पाने, फळांचे ओझे आपल्या अंगावर वाहणाऱ्या, कडक उन्हाचा ताप व थंडीचा कडाका सहन करणाऱ्या, दुसऱ्यांच्या सुखासाठी आपला देह अर्पण करणाऱ्या गुरुरूपी वृक्षाला माझा नमस्कार असो.
आयुर्वेद शास्त्रात वटवृक्षाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याची मूळे, पाने, फुले, फळे, साल, पारंब्या, चिक ह्या सगळ्यांचा औषधी उपयोग होतो व त्यामधून असंख्य आजारांवर उपचार करता येतो.वीर्य वाढवण्यासाठी व गर्भाशयाच्या शुद्धीसाठी वडापासून रामबाण औषध मिळते. म्हणूनच ह्याला संसारवृक्ष असेही म्हटले गेले आहे.
१. झाडाचा चीक दातदुखी, संधिवात, कटिशूल इ. व्याधींवर उपयोगी आहे. तळपायांच्या भेगांवर याचा लेप देतात.
२. वृक्षाच्या सालीचा काढा मधुमेहावर गुणकारी आहे. मुळांची साल परम्यावर उपयुक्त आहे.
३. पानांचे पोटीस गळवांवर बांधतात. वडाचे बी पौष्टिक व शीतकर (थंडावा देणारे) असते.
४. या वृक्षाची पाने तोड्ल्यावर जो चीक निघतो त्याचा औषध मध्ये मलामा सारखा उपयोग होतो.
५. विंचवाचे विष कमी होण्यासाठी किंवा पायाच्या भेगा, चिखल्या ठिक होण्याासाठी पण चीक गुणकारी आहे.
६. कोणत्याही अवयवात लचक भरणे किंवा संधिवातामुळे सांधे दुखणे यावर वडाची पाने तेल लावून थोडी गरम करून दुखर्या भागावर बांधल्यास सांधे मोकळे होतात.
७. ताप कमी होण्यास ह्याचा पारंब्यांचा रस देतात. त्यामुळे लगेच घाम येऊन शरीराचा दाह काम होतो
८. पोटात जंत झाल्यास पारंब्यांचे कोवळे अंकुर वाटून त्याचा रस देतात. आव, अतिसार यावर पारंब्या तांदुळाच्या धुवनात वाटून त्यात ताक घालून देतात.
९. वडाचे पान – अंगावरून पांढरे जाणे, गर्भाशयाला सूज येणे इ. विकारांवर औषध म्हणून उपयोगी पडते. तोंड आले असता याच्या काढ्याने गुळळ्या कराव्या. गर्भ टिकून रहाण्यासाठी तसेच इच्छित संतती साठी वडाच्या कोंबाचा उपयोग होतो.
१० गर्भधारणा होण्यासाठी आणि गर्भधारणा झाल्यानंतर वडाचा आयुर्वेद शास्त्राप्रमाणे औषधोपचार करता येतो.
११ गर्भधारणा झाल्यानंतर आधीच्या काळी बाळ सुदृढ असावे ह्यासाठी ठराविक नक्षत्रावर “पुसंवन”हा विधी केला जायचा. वडाच्या कोवळ्या कोंबाला गायीच्या कच्च्या दुधात वाटून ठरावीक नक्षत्रावर, ठरावीक नासिकेत त्याचा रस आयुर्वेदाचार्यांकडून घेतला जायचा.
१२. वडाच्या सालीचा काढा स्त्रियांच्या प्रजनन संस्थेशी निगडीत समस्येत उपयोगी ठरतो.
१३. वड हा मुळात शीत असल्याने पित्तावर गुणकारी आहे.
१४. उन्हाळ्यात त्वचाविकारांचा प्रादुर्भाव असतो. तेंव्हा वडाच्या झाडाच्या चिकाचा उपयोग होतो.
१५ यकृताच्या समस्यांवर वडाच्या झाडाचे आयुर्वेदात महत्त्व सांगितले आहे.
वटवृक्षाचे पर्यावरणातील महत्व : –
१) वडाचे झाड एका तासाला साधारणपणे सातशेबारा किलो ह्या प्रमाणात “ऑक्सिजन” वातावरणात सोडत असते. वडाच्या झाडाखाली वेळ व्यतीत करणे; म्हणजे शरीराला आवश्यक असणाऱ्या प्राणवायूची पूर्तता भरून काढणे.
२) भरपूर पाने असल्यामुळे विषारी वायू शोषला जाऊन हवा शुद्ध ठेवण्याचे काम वडाचे झाड करते.
३) वड उन्हाळ्यात दिवसाला २ टन इतके पाणी, बाष्प स्वरूपात वातावरणात सोडत असतात.
४) वडाच्या झाडामध्ये ढगातून पाऊस खेचून आणण्याची ताकद आहे असे म्हंटले जाते. जिथे वडाची झाडे जास्त तिथे पाऊस चांगला पडतो.
वटवृक्षाच्या या गुणधर्मामुळे तो सर्वांसाठी अत्यंत उपयोगी आहे.
— डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
आभार: डॉ. प्रकाश दिवाकर, माजी संचालक, वनस्पती सर्वेक्षण संस्था, पुणे ऑफिस (BSI, Pune)
संदर्भ : विकिपेडिया, गूगल इंटर नेट विविध लेख
सद्य स्थितीच्या संदर्भात हिंदू धर्मातील प्राचीन व पौराणिक वृक्ष – भाग १- वटवृक्ष
Leave a Reply