उंबर किंवा औदुंबर :
उंबर किंवा औदुंबर (शास्त्रीय नाव: Ficus racemosa, फायकस रेसिमोझा ; कुळ: मोरेसी;) हा मुख्यतः भारत, श्रीलंका, म्यानमार, ऑस्ट्रेलिया या देशांत आढळणारा सदापर्णी वृक्ष आहे
उंबराच्या दोन प्रकारच्या जाती आहेत. उंबर व काकोदुम्बर. हिंदीमध्ये गुलर असे उंबराला म्हणतात. भारतात व महाराष्ट्रात हा वृक्ष मोढ्या प्रमाणात जंगलात,शेताच्या बांधावर,गड किल्यात, नदीच्या काठावर आढळतो.
याला संस्कृतमध्ये ‘औदुंबर’ हे नाव आहे. आहे. उंबर वृक्षाची उंची १५-१८ मी. असते. पाने गडद हिरवी, मोठी, एकाआड एक आणि अंडाकृती किंवा आयताकृती असतात. तसेच या झाडांच्या पानांवर फोड असतात. साल पिंगट करडी, गुळगुळीत आणि जाड असते. झाडाच्या वयाप्रमाणे बुंध्याच्या व फांदीच्या सालीची जाडी ०.५ ते २ सेंमी. असू शकते. तसेच खोडाच्या पृष्ठभागावर पांढर्या ऊतींचे पापुद्रे वेगळे होताना दिसतात. फळे २ ते ५ सेंमी. व्यासाची असून जांभळट व मोठ्या फांद्यांवर घोसांनी लटकलेली असतात. या झाडाला खोडाच्या जवळ झुपक्यांनी गोल फळे येतात. ही फळे कच्ची असताना हिरवी, तर पिकल्यावर लाल रंगाची होतात. त्यांना सामान्यपणे उंबर म्हणतात. पक्षी ही फळे खातात, त्यांच्या विष्ठेतून उंबराच्या बीजांचा प्रसार होतो. उंबराला फूल नसते, असा एक गैरसमज आहे. ते द्विलिंगी असून त्याला वर्षातून दोनदा फुले येतात. फळ कापल्यास ही फुले दिसतात. ब्लास्टोफॅगा सेनेस हा चिलटाएवढा कीटक आणि उंबर एकमेकांशिवाय राहू शकत नाहीत, त्यांच्या सहजीवनातून या कीटकाचे प्रजनन आणि उंबर या वनस्पतीचे परागण ही दोन्ही उद्दिष्टे साध्य होतात. निसर्गामधील भिन्न प्रकारच्या सजीवांच्या परस्परांवरील अवलंबनाचे हे एक ठळक उदाहरण आहे. वड, पिंपळ, उंबर व अंजीर या फळांची रचना ही फळात फुले’ अशी आहे.यातील नर जातीची फुले ही फळांच्या पुढच्या भागात असतात, तर स्त्री जातीची फुले ही देठाकडील भागात असतात. या दोन्हीच्या मधल्या भागातील फुले मात्र नपुंसक असतात. उंबराचे झाड म्हणजेच औदुंबर. उंबराच्या झाडाला पार बांधला तर, त्या झाडाला औदुंबर म्हणतात.
पौराणिक महत्व :
विष्णूने नृसिंहावतारात हिरण्यकश्यपूचा वध उंबऱ्यावर बसून केला.त्याच्याशी झालेल्या लढाईत नृसिंहाला जखमा झाल्या व नखांना विषबाधा झाली. हिरण्यकश्यपूचा वध करताना त्याच्या पोटातून निघालेल्या कालकूट नावाच्या विषामुळे नरसिंहाच्या नखाला व जखमांना दाह झाला. तो त्याला सहन होईना. देवांचे वैद्य अश्विनीकुमारांनी सांगितल्याप्रमाणे श्री लक्ष्मीने त्याची बोटे व जखमांना उंबराची फळे वाटून त्याचा लेप नृसिंहाला लावल्यामुळे त्या जखमांमुळे होणारा दाह थांबला अशी आख्यायिका आहे. हा कृत्तिका नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे.
धार्मिक महत्व :
नेहमी हिरवागार राहून थंडगार छाया देणारा औदुंबर वृक्ष अनेक दैवी गुणांनी युक्त आहे. भारतात सर्वत्र हा महावृक्ष आढळतो. उंबराच्या झाडाच्या आसपास जमिनीत पाणी आढळते, किंबहुना जिथे पाणी मुबलक असते अशा जमिनीत हा वृक्ष वाढतो.
उंबर आणि श्री दत्त गुरूंचे नाते मात्र खूप घट्ट आहे भगवान दत्तात्रय प्रभूंचा हा प्रिय वृक्ष आहे. उंबराचे फूल अर्थात फळ याला श्री दत्तात्रेया प्रमाणे तीन तोंडे असतात. श्री दत्तात्रेयांच्या सर्व तीर्थस्थानांच्या ठिकाणी त्यांची मंदिरे औदुंबराच्या छायेत किंवा मंदिराजवळ हा वृक्ष असतोच. श्री दत्तात्रयांचे अवतार श्री स्वामी समर्थ, व नवनाथ मंदिराजवळ ही हा वृक्ष असतोच.
उंबराखालीं दत्ताचें वास्तव्य असतें असा समज असल्यानें त्याची पूजा करण्यांत येते. व झाड तोडणें हेंहि गर्ह्य मानलें जातें.इतर झाडांप्रमाणें उंबराला प्रथम फूल व नंतर फळ असा प्रकार होत नसून एकदम आपणांला फळच दृष्टीस पडतें. तेव्हां सशाच्या शिंगाप्रमाणें तें अशक्य व दुर्लभ असा समज होऊन ‘उंबराचें फूल’ (दुर्मिळ वस्तु) ही म्हण पडली आहे. आदिवासी लोग जेव्हां झाडा खालून जातात तेव्हां झाड पिकलेले असेल तर एक तरी फळ खावे नाहीतर झाडाला राग येतो असे म्हणता. म्हणजे झाडावर त्यांचे किती प्रेम आहे हे कळते. वड, पिंपळ, उंबर यांना त्रिमूर्ती म्हणतात. श्री दत्तात्रेयांचेही नांव त्रिमूर्ती आहे.
जैववैविध्यतेतील महत्व :
वटवृक्षाप्रमाणे, पिंपळ, उंबर, नांद्रुक, पिंपरन ही भारताची जैवविविधता सांभाळणारी देशी झाड. शिवाय वडाप्रमाणे विशाल असतात. फक्त वडासारख्या या वृक्षांना पारंब्या नसतात. हे झाड सर्वात जास्त भूजल पातळी वाढविण्यासाठी मदत करते, काहीजण तर सांगतात, दररोज एक उंबराच झाड जवळपास १२०० लिटर आपल्या मुळामार्फत पाणी भुजलात सोडते. जर सर्व मुळ्या कापून मोजल्या तर याच्या मुळांची लांबी मोजली तर ४८ किमी लांब असते,. एवढे महान जलसंधारण चे काम करीत असतो उंबर म्हणून त्याला दत्त गुरूंचे स्थान मिळाले आहे, त्याचे संवर्धनासाठी ही बाब पूर्वजांनी आपल्याला सांगितली आहे.
निसर्ग तज्ञ श्री मारुती चितमपल्ली, आवर्जून सांगतात प्रत्येक शेतकऱ्याने एक एकर शेतीमध्ये चारही बाजूला चार उंबराची झाडं लावली पाहिजेत जेणेकरून जवळपास पंचवीस ते पस्तीस टक्के पाणी बचत होईल. शिवाय जगातील सर्वात श्रीमंत म्हणजे सुपीक माती उंबराच्या झाडाखालीच असते, असंख्य जिवाणू नी तयार झालेली ही माती, आपण आजही घटस्थापना करताना घटात टाकून त्यावर अनेक प्रकारची बीजे लावतो.
पर्यावरणातील मह्त्व :
या कुळातील बहुतेक झाडांवर अनेकदा आग्या मोहोळ ची पोळी दिसून येतात कारण याच्या फांद्या मजबूत असतात यामुळे आगीमाश्या आपली पोळी बांधतात. वानर, माकड या झाडांवर रात्रभर विश्रांती घेण्यासाठी आढळून येतात. या झाडांवर अनेक पक्षांची घरटी ही आढळून येतात, यात कावळा, घारी गरुड अशी मोठ्या पक्षांची घरटी असतात. वटवाघळे ही आपल्या वसाहती या कुळातील झाडांवर करताना दिसून येतात.
या झाडांवर भोरड्या पक्षांचे थवे येत असतात. अगदी सकाळी मोठी पार्टी असते अशा झाडांवर. शिवाय उंबराला उंबरे आल्यानंतर यावर मोठी पार्टी सगळे करताना दिसतात अगदी रात्रभर वटवाघुळ आपली पार्टी करतात. या कुळातील झाडांवर तांबट, धनेश, बुलबुल, पोपट, चष्मेवाला, सुभग, चष्मेवाला, भोरड्या, कोकिळा, शिकारी पक्षी असे नानाविध पक्षी आढळून येतात. शिवाय यावर बगळ्यांच्या वसाहती, पानकावळे, राखी बगळे, कावळे यांची घरटी आढळून येतात. परिसरात आढळणाऱ्या पक्षी, सस्तन प्राणी यांची भूक भागविण्यासाठी ही झाड मोलाची मदत करत असतात.
पर्यावरणीय महत्त्व लक्षात घेता पिंपळ, वड, उंबर या झाडांची उपयुक्तता अतिशय महत्त्वाची असून अगदी त्याचे महत्त्व, धार्मिक भावना त्यामुळे या झाडांना मिळणार सामाजिक संरक्षण, याचा विचार करता, समाजात अनेक ठिकाणी ही झाडे लावणे अत्यंत महत्त्वाचं असेल कारण प्रत्येक धर्माला प्रिय असणारी या कुळातील झाड आहेत. या झाडांची सावली आपल्याला आयुष्य देते अर्थात हे सगळे जीवनदायी वृक्ष आहेत, यांचे वृक्षारोपण मोठ्या प्रमाणात गाव व शहर पातळीवर झाले पाहिजे, तरच पर्यावरण संरक्षण चळवळ जागृत होईल. अलीकडे रोड शेजारी असणारी जुनी झाड तोडली जातायेत आणि छोटी परदेशी झाड लावण्याचा प्रयत्न आपलं सरकार करीत आहे. ही बाब चिंताजनक आहे. आपण सर्वांनी मिळून एकत्रित येऊन सरकारला देशी झाडे लावण्यासाठी दबाव गट निर्माण केले पाहिजेत
इतर उपयोग :
उंबराची फळे खाता येतात. याची पाने शेळी बकरी आवडीने खातात. पक्षी या झाडाची फळे खातात. या झाडाच्या सावलीत बसून पवित्र ग्रंथ पोथ्या वाचन करतात. उंबराचे लाकूड पांढरट किंवा लालसर, मऊ व हलके असते. त्यामुळे घराचा उंबरा तयार करण्यासाठी याचे लाकूड वापरतात. त्यात धार्मिकतेलाही महत्व असते. या वृक्षाप्रमाणेच आपला वंशवृक्ष सतत वाढावा अशी लोकांची धारणा असते. अनेक सामान्य वस्तू, घरबांधणी, शेतीच्या उपयोगाच्या वस्तू इ. बनविण्यासाठी या लाकडाचा वापर करतात. सालीचा उपयोग उत्तम काळा रंग बनविण्यास होतो. या झाडाच्या सर्व भागांपासून चीक निघतो व त्यापासून पक्षी पकडण्यासाठी गोंद बनवितात. याची लहान लाकडे यज्ञामध्ये समिधा म्हणून वापरतात.
औषधी उपयोग :
उंबराची साल व फळे आणि काही प्रमाणात पाने यांचा औषधी उपयोग आहे. जमिनीत खोलवर असलेल्या उंबराच्या मुळांचे पाणी युक्तीने काढावे. त्याला विविध हट्टी विकारांवर तात्काळ आराम देण्याचा विशेष गुण आहे. या वनस्पतीत साबणासारखा एक पदार्थ आहे. त्यामुळे रिठा व शिकेकाई यांना पर्याय म्हणून आंतरसालीच्या चूर्णाचा वापर केला जातो. उंबराची साल स्तंभन आहे. पक्व फळे शीतल, स्तंभक व रक्तसंग्राहक आहेत. उंबराच्या चीकात वरील गुणांबरोबरच चटकन सूज कमी करणे आणि शरीर पुष्ट करण्याचे गुण आहेत. उंबराचा चीक अल्प प्रमाणात दूध साखरेतून त्याकरिता दिला जातो. उंबर फळांचा उपयोग ज्या रोगात रक्त वाहते, सूज येते किंवा लघवीतून रक्त येणे, रक्ती आव, अत्यार्तव, गोवर, कांजिण्या अशा लहान-मोठय़ा रोगांत होतो. उंबराचा चीक रक्ती आव तसेच अतिकृश लहान मुले वाढीस लागावी म्हणून देण्याचा प्रघात एककाळ असे. त्याकरिता चीकाचे दहा थेंब दुधाबरोबर द्यावे. गालगुंड, गंडमाळा, खूप पू असणाऱ्या जखमा आणि हट्टी सूज यावर उंबराचा चीक लावला असता वेदना व सूज लवकर कमी होते. उंबराच्या पानावर लहान फोड येत असतात. ते फोड दुधात वाटून दिल्यास गोवर कांजिण्या विकारात सत्वर आराम मिळतो.
काही मंडळींना मद्यपान, धूम्रपान, तंबाखू यांचे व्यसन असते. या व्यसनांमुळे यकृतवृद्धी होते, जलोदराची धास्ती असते. काहींना बाहेरील वारंवारच्या खाण्यापिण्यामुळे काविळचा संसर्ग पुन:पुन्हा होत असतो. अशांनी बकरीच्या दुधात फळे उकडून ती खाल्ल्यास पंधरवडय़ात खूप आराम मिळतो. जळवात, टाचांना फोड येणे, रक्त वाहणे या विकारांत उंबराची फळे वाटून त्याचा लेप करून रात्रभर स्वच्छ फडक्याने बांधून ठेवावे. सत्वर गुण येतो. मलेरिया किंवा हिवताप विकारात उंबराच्या सालीचे चूर्ण दुधातून घ्यावे. सालीचा काढा कदापि करू नये, कारण उष्णतेने त्यातील ज्वरघ्न गुण जातो.
दिवसेंदिवस मधुमेह या विकाराचे आक्रमण खूप मोठय़ा संख्येने ग्रामीण व शहरातील मंडळींना भोगावे लागत आहे. मधुमेहाची खूप औषधे घेऊन रुग्ण मित्र कंटाळलेले असतात. अशा अवस्थेत उंबराच्या आंतरसालीचे चूर्ण नियमितपणे घेतल्यास मधुमेहाला प्रतिबंध होतो. औदुंबर झाडाची पाने वाटून विंचू चावल्यावर लावल्यास वेदना कमी होतात. उंबराच्या सालीचा काढा करून तो थंड करावा . त्यात खडीसाखर-वेलची टाकून गुलाबी रंगाचे सरबत करावे . कॅन्सर झाल्यावर जी केमोथेरपी देतात त्यात शरीराची भयानक आग होते. त्यात हे सरबत उत्तम आहे. दिवसातून तीनदा घ्यावे.
गर्भाशयाची सूज कमी करण्यासाठी , रक्तप्रदर , श्वेतप्रदर, मासिक पाळीच्या अति प्रमाणात रक्तस्त्राव होत असेल तर सालीचा काढा पोटात घ्यायला देतात सोबत योनिमार्गाद्वारे त्याच काढ्याचा उत्तरबस्ती दिला तर उत्तम गुण येतो.
लहान मुलांना दात येताना जुलाब होतात त्यावेळी उंबराचा चिक बत्ताशासोबत देतात.
भस्मक नावाचा एक व्याधी आहे ज्यात व्यक्ती सारखे काही न काही खात असते . पण त्या व्यक्तीचे पोट भरत नाही काही वेळाने परत भूक लागते. या आजारात उंबराची साल स्त्रीच्या दुधात वाटून दिली असता ही विचित्र लक्षणे कमी होतात. उचकी थांबत नसेल तर उंबराच्या फळाचा रस प्यावा. काविळीत उंबराचे पिकलेले अर्धे पान विड्यातून देतात. तापात अंगाची आग होत असेल तर पिकलेले उंबराचे फळ खायला द्यावे.
भगवान श्री दत्तगुरूंना देखील ज्याच्या शीतल छायेत साधनेचा मोह आवरला नाही अशा उंबराची अशी ही परिपूर्ण कहाणी.
— डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
संदर्भ :
१. विकिपीड़िया
२. वैद्य खडीवाले यांचा जानेवरी २१ चा लेख
३. इंटरनेट वरील लेख
Leave a Reply