बेल वृक्ष (बिल्व वृक्ष) :
बेल हा पानझडी वृक्ष रूटेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव ईगल मार्मेलॉस आहे. लिंबू व संत्रे या वनस्पतीही रूटेसी कुलातील आहेत. बेल हा वृक्ष मूळचा उत्तर भारतातील असून नेपाळ, श्रीलंका, म्यानमार, पाकिस्तान, बांगला देश, कंबोडिया, थायलंड इ. देशांत निसर्गत: वाढलेला आढळतो. भारत, श्रीलंका, जावा, फिलिपीन्स व फिजी या देशांत बेलाची लागवड करतात. याला बिल्व वृक्ष असेही नाव आहे. ईगल प्रजातीत बेलाची ईगल मार्मेलॉस ही एकमेव जाती आहे. भारतात तो रुक्ष ठिकाणी, जेथे अन्य वृक्ष वाढत नाहीत अशा जागी, कमी पावसाच्या प्रदेशात वाढलेला दिसतो.
बेल वृक्ष ८–१४ मी. उंच वाढत असून त्यावर काटे असतात. खोडाचा घेर १–१•५ मी. असून राखाडी रंगाचा असतो. साल मऊ असून तिचे खवले निघतात. पाने संयुक्त, हिरवी, त्रिपर्णी व एकाआड एक असून पानांच्या बगलेत सरळ व मोठे काटे असतात. पानांवर तेलाचे ठिपके दिसतात. मार्च–एप्रिल महिन्यांत पाने गळून पडतात आणि उन्हाळ्याच्या शेवटी पुन्हा पालवी येते. फुले लहान, हिरवट-पांढरी व सुगंधी असून ती गुच्छात येतात. मृदुफळ जाड सालीचे, गोलसर, पिवळे व कठीण असून पावसाळ्यात येते. फळ पिकायला साधारणपणे ११ महिने लागतात. त्यात घट्ट, गोड, सुवासिक, नारिंगी व श्लेष्मल गर असतो. गरामध्ये लोकरीसारखी लव असलेल्या चपट्या बिया असतात. फळाचे कवच एवढे कठीण असते की, ते हातोडीने फोडावे लागते. फळे येण्यासाठी कोरडे हवामान लागते. फळे कठीण आणि जाड असल्यामुळे झाडाला लागलेली फळे अंगावर पडून एखाद्याला इजा होण्याचा धोका असतो.
सांस्कृतिक महत्त्व :
भारतीय संस्कृतीत बेल किंवा बिल्ववृक्षाला फार महत्त्व आहे. प्रत्येक शुभकार्याच्या प्रसंगी पूजनात बिल्व पत्रांचा उपयोग केला जातो. वैज्ञानिक दृष्टीकोन लक्षात घेऊनच ही परंपरा सुरु करण्यात आली. बिल्वपत्र शिवलिंगावर वाहतांना बोटांच्या आणि तळहाताच्या पृष्टभागावर, विषाणूंना मारक तत्व आणि सुगंध पसरला जातो. वेळोवेळी अंगाला स्पर्श करण्यामुळे शरीरावर आक्रमण करणारे विषाणू मरण पावतात तसेच बिल्व सुगंधाने पळून जातात. ही पाने शंकरास फार आवडतात म्हणून शंकराच्या पिंडीवर बेलाची पाने वाहण्याचा प्रघात आहे. श्रावण महिन्यात दर सोमवारी बेलपत्र वाहण्यात येते. हा चित्रा नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे.
बेल वृक्षाचे पौराणिक महत्व:
बिल्ववृक्षाला, संस्कृतमध्ये अर्थपूर्ण अशी विविध नावे आहेत. अमरकोशात बिल्वाची नावे :- ‘बिल्वः, शाण्डिल्यः, शैलूषः, मालूरः, श्रीफलः इति ५ बिल्वस्य.’ शिवाय ‘त्रीपत्रक’ असेही. त्यांपैकी मालूरः या नावाची व्युत्पत्ति ‘मां परेषां वृक्षान्तराणां श्रियं प्रभवं लुनाति इति’- अशी आहे. या व्युत्पत्तीचा अर्थ, ‘अन्य वृक्षांचे वैभव, प्रभाव नष्ट करणारा’ असा होतो. यावरून बिल्ववृक्षाचे श्रेष्ठत्व सिद्ध होते.
बिल्ववृक्ष हा यज्ञीय वृक्ष आहे. यज्ञातील धूप याच्या काष्ठाचा करीत असत. ऐतरेय व शतपथ ब्राह्मणातही याचा उल्लेख आहे. तसेच बिल्ववृक्षाचे काष्ठ विशिष्ट मंत्राने मंत्रून ते ताईतासारखे दंडात बांधित असल्याचा उल्लेख शाङ्खायन आरण्यकात आहे. लक्ष्मीने आश्रय घेतल्यामुळे या वृक्षाला श्री वृक्ष हे नाव मिळाले.
हिंदू धर्मा मध्ये बेल किंवा बिल्वाचे विशेष महत्व आहे. धार्मिक दृष्टि ने महत्त्वपूर्ण आणि शंकरास प्रिय असल्याने हा वृक्ष शिवमंदिर व आसपास लावतात. हा धर्म अर्थ व मोक्ष प्रदान करणारा मानला जातो. शिव व भगवती च्या पूजेत ह्याची पाने व फळे अर्पण केली जातात. बिल्व पानाच्या उत्पत्तीच्या संदर्भात स्कंद पुराणात असे नमूद आहे की एकदा देवी पार्वतीने आपला कपाळावरचा घाम पुसून फेकला त्याचे कांही थेम्ब मंदार पार्वतीवर पडले व त्यातून बेल वृक्ष निर्माण झाला. हाच्या मुळा मध्ये गिरीजा, खोडामध्ये महेश्वरी, फांद्यामध्ये दक्षयामिनी, पानामध्ये पार्वती, आणी फळे व फुलात कात्यायनी वास करतात.
बिल्वाचा वृक्ष संपन्नतेचे प्रतीक, खूप पवित्र आणी समृद्धी देणारा आहे. बेलाची पाने भगवान शंकराचा आहार मानतात म्हणून भक्त मोठ्या श्रद्धेने ती देवाला वाहतात. असे मानतात कि जे भक्त ही पाने शंकराला वाहतात ते कधीही दुःखी होत नाहीत. त्यांना सर्व प्रकारची सिद्धी प्राप्त होते व जन्मोजन्मीचा पापापासून मुक्त होऊन मोक्षास प्राप्त होतात. बिल्व पत्रे चार प्रकारची असतात. अखंड बिल्व पत्र, तीन पानाचे बिल्व पत्र, ६-२१ पानांचे बिल्व पत्र व श्वेत बिल्व पत्र.
अखंड बिल्व पत्र हे लक्ष्मी सिद्ध मानली जाते. तीन पानांचे बिल्व भगवान शंकराला प्रिय आहे. बाकीचे श्वेत व ६-२१ पानांचे बिल्व अत्यंत दुर्मिळ आहे. त्यातील कांही नेपाळमद्धे सापडतात व श्वेत पत्र हे हिमालयात मिळतात अशी धारणा आहे. शिवाला प्रिय असणाऱ्या बिल्ववृक्षाच्या त्रिदलाला विविध अर्थ प्राप्त झाले असून, हे त्रिदल म्हणजे शिवाचे जणू तीन नेत्रच आहेत. शिवाचे त्रिशूलही यातून सूचित होते.
भारतीय संस्कृतीत बेल किंवा बेल वृक्षाला फार महत्व असल्यामुळे प्रत्येक शुभकार्याच्या प्रसंगी पूजनात बेल पत्रांचा उपयोग केला जातो. वैज्ञानिक दृष्टीकोन लक्षात घेऊनच ही परंपरा सुरू करण्यात आली आहे. शेकडो रोगांना नष्ट करण्याची क्षमता असणाऱ्या ह्या दिव्य वृक्षाची प्रजाती नष्ट होऊ नये म्हणून, त्याला पुजेतही स्थान देऊन त्याचे अस्तित्व टिकविण्याचा प्रयत्न प्राचीन काळापासून केला गेला.
उपयोग :
१. बेलाचे फळ पोटाच्या विकारावर फार औषधी आहे. फळाचा मुरंबा करतात.
२. भावप्रकाश, सुश्रुत साहिंता, भैषज्य रत्नावली आदी आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये बेलाच्या उपयोगाबाबत माहिती दिलेली आहे.
३. उष्णताहरक, वात कफ शामक, रेचक, दीपनकारी, हृदयास उपकारक, स्तन्भक, शरीरातील मुत्र व शर्करा कमी करणारा अशी बिल्व फळाची ओळख आहे.
४. बेलात साखर कमी करणारा घटक, टॅनिक असिड, उडनशील तेल, टॅनीन तसेच मारशेलीनीस आदी घटक असतात
५. रातांधळेपणा, डोकेदुखी, डोक्यातील उ नाशक, क्षय, बहिरेपणा, हृदयविकार, पोटाचे दुखणे, अजीर्ण, आम्लपित्त, मंदाग्नी, संग्रहणी, रक्तविकार, मधुमेह, जलोदर, त्वचाविकार, वात ज्वर, कमजोरी, अग्निदग्ध, व्रण गलगंड, तृषाविकार, रक्तातीसार, पित्त अतिसार आदी विकारांमध्ये बेल विशेष गुणकारी आहे.
६. गराच्या फोडी त्यांच्या वजनाच्या चोपटी इतक्या साखरेच्या घट्टपाकात टाकाव्यात व त्यात जायफळाची पूड,जायपत्री व केशर योग्य प्रमाणात मिसळून ते मिश्रण आठ आठवडे चांगली मुरवल्यास बेलाचा मुरंबा तयार होतो.
७. बेलाची पाने औषधी असून खोकल्यावर व नेत्रविकारावर उपयुक्त आहेत. फुलांपासून अत्तर बनवितात. कच्चे फळ पाचक व भूक वाढविणारे असल्याने अतिसारावर ते गुणकारी असते. कच्च्या फळाच्या सालीपासून काढलेला रंग कापड रंगविण्यासाठी वापरतात.
८. फळांच्या कवचापासून पिवळे रंगद्रव्य मिळते. कवचापासून `मार्मेलेन ‘ हे बाष्पनशील तेल काढतात. कोवळ्या फळांत मगजाबरोबर श्लेष्मल द्रव्य असते. त्याचा उपयोग डिंकासारखा होतो. पाण्यात बनविलेल्या रंगांत हे द्रव्य मिसळून चकाकी आणता येते. इमारतीच्या चुन्यात मगज मिसळून तो चिकट व चिवट करतात आणि विहीर बांधतांना याचा वापर करतात. खोडापासून उत्तम डिंक मिळतो. फांद्या व पाने गुरांना खाऊ घालतात. फुलांपासून सुगंधी द्रव्य मिळते.
बेलाच्या फळामधी 100 ग्रॅम रसाळ भागात 61.5 टक्के आर्द्रता, चरबी 3 टक्के, प्रोटीन 1.8 टक्के, फायबर 2.9 टक्के, कार्बोहायड्रेट 31.8 टक्के, कॅल्शिअम 85 मिलीग्रॅम, फॉस्फोरस 50 मिलीग्रॅम, आयर्न 2.6 मिलीग्रॅम, व्हिटॅमिन सी 2 मिलीग्रॅम, शिवाय बेलामध्ये 137 कॅलरी उर्जी आणि काही प्रमाणात व्हिटॅमिन बीसुध्दा आढळते.
९. बेलाच्या फळाचे सरबत तुम्हाला थंडाई आणि ताजेतवाने वाटण्यासाठी फायदेशीर आहेच, मात्र आरोग्याशी संबंधित समस्यासुध्दा दूर करते. परंतु गर्भावस्थेत याचे सेवन करणे नुकसानदायक ठरू शकते.
बेलाचे औषधी गुणधर्म :
१. बेलाची पाने औषधी असून खोकल्यावर व नेत्रविकारावर उपयुक्त आहेत. फुलांपासून अत्तर बनवितात. कच्चे फळ पाचक व भूक वाढविणारे असल्याने अतिसारावर ते गुणकारी असते.
२. बेलाच्या पिकलेल्या फळातील गर सुगंधी, शीतल व सारक असतो. त्यात मार्मेलोसीन हा घटक असून तो सारक व मूत्रल आहे. फळांपासून सरबत करतात. मलावरोध व बद्धकोष्ठता यावर हे सरबत उपयोगी आहे. बेलाच्या झाडाचा डिंक उपयुक्त असतो.
३. फळातील मगज सुगंधी, शीतकर (थंडावा देणारा) व सारक असतो; त्याचे सरबत जुनाट मलावरोध व अग्निमांद्य यावर देतात. अपक्व फळ स्तंभक (आकुंचन पावणारे), पाचक, दीपक, (भूक वाढविणारे) असल्याने अतिसार व आमांशात गुणकारी असते. बेलफळाचा मुरंबा त्यादृष्टीने उपयुक्त असतो.
४. धातू पडत असल्यास पुष्कळशी पाने पाण्यात वाटून त्यात जिरे, खडीसाखर टाकून घेतात. बहिरेपणावर गोमूत्रात बेलफळ वाटून घेतात कढवितात व कानात घालतात. फळांमध्ये `मार्मेलोसीन’ हे क्रियाशील घटकद्रव्य असून त्यामुळे थोडा निद्रानाश होतो व घाम कमी येतो; अधिक प्रमाणात घेतल्यास हृदयक्रिया मंदावते. बेलफळात ४-६ टक्के साखर; मगजात ९ टक्के व सालीत २० टक्के टॅनीन असते. बियातून ११.९ टक्के कडूतेल मिळते, ते रेचक असते. मुळाची साल व कधी खोडावरचीही साल पाळीच्या तापात देतात, तिच्या `अंबेलिफेरॉन’ हे द्रव्य असते. मुळाची साल मत्स्य विष आहे. पानांत बाष्पनशील तेल असते. फळातील मगज काढून टाकून कवचाचा उपयोग डबीप्रमाणे करतात. कोवळी लहान फळे रूद्राक्षाबरोबर माळांमध्ये घालतात.
५. बेलाच्या पानामध्ये परिणामकारक असे औषधी गुणधर्म आहेत. बेलाच्या पानाचा रस पिल्याने आपले शरीर आहारामधील अधिकाधिक पोषक तत्व शोषून घेऊन मनाची एकाग्रता वाढते, ध्यान केंद्रित राहते, बेलाच्या पानाचा रस सकाळी रिकाम्या पोटी पिल्याने हृदय मजबूत राहते, स्वथ राहते, तसेच रक्त प्रवाह वाढतो, हृदयाची कार्यक्षमता वाढते व त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. यासाठी बेलाची पाने बारीक वाटून घ्यावी त्याची चटणी बनवावी ही चटणी बनवून पाण्यामधून अथवा त्याचा काढा बनवून तो नेहमी सेवन केल्याने हृदय ठणठणीत राहते हृदयाशी संबंधीत सगळे प्रॉब्लेम दुर राहतात. बेलाचा पानाचा काढा पण औषधी आहे. डायबेटीस असलेल्या लोकांनी 20 बेलाची पाने, 20 कडूलिंबाची पाने, आणि 10 तुळशीची पाने एकत्रित वाटून घ्यावी व त्याच्या लहान लहान गोळ्या बनवून सुकवून ठेवाव्यात व नंतर ती गोळी रोज सकाळी एक घ्यावी ही डायबेटीस कंट्रोलसाठी फायदेशीर आहे. संधिवात, गुडघ्याचे दुखणे जास्त असेल, हात पाय सुजले असल्यास अश्यावेळी बेलाची पाने गरम करून दुखणाऱ्या जागेवर रोज बांधा, बेलाची पाने वाफ, पित्तशामक अशी आहेत. आरोग्यासाठी बेलाची पाने खूपच उपयुक्त असतात. बेलाच्या पानांचा काढा विविध जुनाट आजारांवर अतिशय प्रभावी ठरतो. एवढेच नव्हे तर बेलाची पाने, फळ आणि खोड यांचे आरोग्यासाठी वेगवेगळे फायदेही आहेत. बिल्वपत्रांमध्ये खूप जास्त प्रमाणात ॲण्टी ऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे कॅन्सरचा धोकाही बिल्वपत्रामुळे कमी होतो. तसेच ॲण्टी ऑक्सिडंट्सचे प्रमाण खूप जास्त असल्यामुळे सौंदर्य खुलविण्यासाठी आणि एजिंग इफेक्ट कमी करण्यासाठी बेलपत्र उपयोगी ठरते.
अशा ह्या बेलाचे वृक्ष सद्ध्या फारच कमी प्रमाणात दिसतात. त्याच्या संवर्धनाचे प्रयत्न बऱ्याच सामाजिक व धार्मिक संस्था करत आहेत. तसेच उतिसंवर्धन द्वारे प्रवर्धनासाठी (multiplication) टेक्नोलोंजि सुद्धा उपलब्ध आहे. त्यामुळे या झाडांची संख्या पुढील कांही वर्षात वाढेल अशी आशा आहे
संदर्भ:
१ मराठी विश्वकोश २. Panda, H (2002). Medicinal Plants Cultivation & Their Uses. Asia Pacific Business Press Inc. p. 159. ३. इंटरनेट वरील अन्य लेख
Leave a Reply