नवीन लेखन...

अंदमान – ‘रॉस’ व ‘नॉर्थ बे’ आयलंडस

एके काळी काळ्या पाण्याच्या शिक्षेसाठी जाणले जाणारे  ‘अंदमान’ आता एक टुरिस्ट प्लेस म्हणून पण वेगाने प्रकाशात आलंय. पोर्ट ब्लेअर सेल्युलर जेल या बरोबरच अंदमानचे सुंदर समुद्र किनारे व छोटी छोटी बेटे या बेटावरील अनोखा निसर्ग, प्राणी पक्षी जीवन तसेच पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या “स्कूबा डायविंग” “Sea walk” ‘कोरल सफारी’ इत्यादी आकर्षणे यामुळे आज पर्यटक  मोठ्या संख्येने अंदमानला भेट देतायत.

आमच्या अंदमान सहलीच्या दुसऱ्या दिवशी आम्ही “रॉस आयलंड  आणि नॉर्थ बे आयलंड” या दोन बेटांना भेट दिली. सेल्लुलर जेलच्या ‘Central Tower’ वरून या दोन्ही बेटांचे आम्हाला ओझरते दर्शन झाले होते. त्यामुळे ती बेटे पहाण्याची खूप उत्सुकता होती. या बेटांवर जाण्यासाठी पोर्ट ब्लेअर किनाऱ्यावरील ‘अबरडीन जेट्टी’ पासून छोट्या इंजिन लौंचेस आहेत. पोर्ट ब्लेअरलाच आपणाला  बेटांवर जाण्यासाठी इंजिन बोटीची तिकीटे खरेदी करावी लागतात तसेच बेटावर आपणाला ज्या activities करायच्या आहेत उदा. स्कूबा डायविंग, Sea walk, कोरल सफारी इत्यादि (या सर्व activities ‘नॉर्थ बे आयलंड’ वर आहेत) त्याचे पण बुकिंग पोर्ट ब्लेअर किनाऱ्यावर होते. त्यासाठी आवश्यक ते फॉर्म भरून पैसे भरावे लागतात. मगच बेटावर पोचल्यावर आपणाला त्या activities करता येतात. ‘रॉस’  किंवा ‘नॉर्थ बे’ बेटावर जाण्यासाठी  हवामानाचा अंदाज घेऊनच बोटी निघतात. कारण अनेकदा खराब हवामानामुळे समुद्र खवळलेला असतो. अशावेळी  बोटी सुटत पण नाहीत. आम्हाला पण खराब हवामानामुळे पोर्ट ब्लेअरच्या किनाऱ्यावर सकाळी ८.३० ते १०.३० अशी दोन तास मार्ग प्रतीक्षा करावी लागली. हवामान ठीक असल्याचा संकेत मिळाल्यावर एक एक बोटी सुटु लागल्या. मात्र पर्यटकांची बरीच गर्दी झाली होती. आमचा नंबर लागल्यावर आम्ही  रॉस आयलंडवर जाणाऱ्या छोट्या इंजिन बोटीत बसलो. समुद्र तसा शांत नव्हता कारण लाटांचे तडाखे बोटीला बसून आम्हाला बोटीचे हेलकावे जाणवत होते. रॉस जेट्टीला बोट लागली आणि आम्ही बेटावर प्रवेश केला. या बेटावरच अनोखा निसर्ग, नारळाची झाडे, आल्हाददायक वाहणारे वारे आणि त्या वातावरणात सहजपणे वावरणारे मोर, ससे, हरणे, खारी, आदि प्राणी यांनी आमचे स्वागत केले. या बेटाचा शोध मरीन सर्वेअर डेनियल रॉस याने लावला. इंग्रजांच्या काळात सन १९४१ पर्यंत हे बेट अंदमानचे “Head Quarter” होते. १९४१मध्ये आलेल्या भुकंपा मध्ये या बेटाची वाट अतोनात लागली आणि त्यामुळे १९४१ सालानंतर “Head Quarter” पोर्ट ब्लेअरला हलवण्यात झाले. पण आजही रॉस बेटावर पूर्वीच्या “Head Quarter”  चे अस्तित्व अवशेष रूपाने पाहायला मिळते. २००४ साली आलेल्या सुनामीने देखील या बेटाचे अतोनात नुकसान केले तरी पण आजही याचे सौंदर्य कायम आहे. १९४२ ते १९४५ या काळात अंदमान बेटांवर जपानची सत्ता होती. त्याच्या खुणा पण या बेटावर आढळतात. आज या बेटाची व्यवस्था ‘इंडिअन नेव्ही’ कडे आहे. भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी अंदमानला भेट दिल्यानंतर ३० डिसेंबर २०१८ ला या बेटाला नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नाव दिले आणि त्यामुळे हे बेट आता “नेताजी सुभाषचंद्र बोस आयलंड”  असे ओळखले जातेय.

आपण बेटावर प्रवेश करताच बेटाची माहिती देणाऱ्या पाट्या दिसतात. त्याच ठिकाणी संपूर्ण बेटाला फेरी मारण्यासाठी छोट्या ओपन गाड्या आहेत. त्यासाठी लोकांची खूप गर्दी जमली होती. आम्ही मात्र बेट पायीच फिरून बघायचे ठरवले. संपूर्ण बेट नारळाच्या झाडांनी वेढले आहे. तसेच इतर अनेक झाडांच्या अस्तित्वामुळे संपूर्ण बेटावर छान  गारवा जाणवतो. नारळ पाणी विक्रेते पण बरेच आहेत. खूप मधुर नारळ पाणी आपली तहान भगवते. या बेटावरचे मुख्य आकर्षण म्हणजे हे बेट दाखवणारी या बेटावर वाढलेली आणि प्राणी पक्षांची भाषा जाणून त्यांच्याबरोबर संवाद साधणारी गाईड अनुराधा राव. २००४ साली सुनामीचा तडाखा अंदमान बेटांना बसला व खूप नुकसान झाले अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. अनुराधा राव यातून वाचली. आज ती या बेटावर पर्यटकांना मार्गदर्शन करते. सकाळी पहिल्या फेरीने ती या बेटावर येते. गेले अनेक वर्षे ती या बेटावर ‘गाईड’ चे काम करतेय. तिला प्राण्यांची, पक्षांची भाषा समजते, त्यांच्याशी ती संवाद साधते. ती प्राण्यांना देण्यासाठी स्पेशल ब्रेड घेऊन येते. लोकांना पण प्राण्यांशी कसे वागावे, त्यांना काय खायला द्यावे यांचे मार्गदर्शन करते. तिने हाक मारताच मोर, हरीण आदि प्राणी प्रतिसाद देतात. तिच्यामुळे आम्हाला पण मोर, हरीण यांना जवळून बघता आली. हे प्राणी माणसाना न बुजता आरामात सर्व परिसरात स्वच्छंदी पणे वावरत असतात. आम्हाला पिसारा फुलवून नाचणारा मोर अगदी जवळून पाहता आला. अनुराधा राव याने आम्हाला सर्व बेट व्यवस्थित दाखवले. त्याबाबतीतील इतिहास आठवणी सांगितल्या. त्यातली एक आठवण म्हणजे वीर सावरकर आणि त्यांना त्यांच्या कोठडीत भेटायला येणारा बुल बुल पक्षी. स्वातंत्र्यवीर सावरकरांना त्यांच्या कोठडीत रोज रात्री  एक बुलबुल पक्षी भेटायला येई व ते त्याच्या साठी आपल्या जेवणातले अन्न कोठडीतील भिंतीवर ठेवायचे. त्यांना पण पक्षांशी संवाद साधता येत होता.पक्षी प्राणीमात्रांवर प्रेम करणऱ्या वीर सावरकरांबाद्दलचा आदर तिच्या बोलण्यात जाणवत होता.अशा अनेक आठवणी सांगता सांगता अनुराधा राव यानी आम्हाला सर्व बेट व्यवस्थित दाखवले. प्राचीन भग्नावस्थेत असणाऱ्या पॉवर हाउस,बाजार, बेकरी, चर्च, टेनिस कोर्ट, सेक्रेटरीइट, प्रिंटींग प्रेस, हॉस्पिटल या इमारतींचा इतिहास सांगितला. एकेकाळी खूप वैभवात असलेल्या या  बेटाच्या आजच्या स्थितीमुळे अनुराधा राव थोड्या भारावून गेल्या होत्या. बेट दाखवताना एकीकडे मोर, हरणे यांना त्यांच्या नावाने हाक मारणे, त्यांना मायेने जवळ घेणे, खायला देणे चालू होते. अनुराधा राव  यांचेबरोबर हे बेट पाहणे हा खूप वेगळा असा हा अनुभव होता.

‘रॉस आयलंड’  बघून आम्ही परत छोट्या इंजीन बोटीत बसलो आणि ‘नॉर्थ बे आयलंड’ ला जायला निघालो. समुद्र शांत नव्हता. लाटा खूप उंच व वेगात येत होत्या. त्यामुळे अनेकदा आमच्या बोटीत पण पण शिरत होते.बोटीत  मी पुढे बसलो होतो त्यामुळे बोटीला बसणारे हेलकावे थोडे ज्यास्तच जाणवत होते आणि थोडी भीती पण वाटत होती. लाइफ जकेट आहे ह्याचा दिलासा होता पण “नॉर्थ बे ला पोचेपर्यंत आम्ही सर्वच जीव मुठीत घेऊन बसलो होते. बोट चालवणारा पहिला चालक थोडा नवखा असावा कारण बोटीला बसणारे लाटांचे तडाखे व आत शिरणारे पाणी पाहून दुसऱ्या चालकाने बोटीचा ताबा घेतला आणि त्याने खरोखरच लाटांचा चांगल्या तऱ्हेने प्रतिकार करत कौशल्याने बोट चालवली. बोटीवर बसणाऱ्या समुद्राच्या लाटांच्या  फटकारयानी  मी “नॉर्थ बे ला पोचेपर्यंत चिंब भिजून गेलो होतो.

‘नॉर्थ बे’ किनार्याला बोट लागताच आम्हाला  किनाऱ्यावर छोट्या मोठ्या बोटींची खूप गर्दी दिसली. किनारा पण पर्यटकांनी गजबजलेला होता. ‘नॉर्थ बे’चा किनारा खूप आकर्षक आहे. समुद्राच्या तळाशी आढळणाऱ्या ‘कोरल’ निरीक्ष्ण्यासाठी हा किनारा प्रसिद्ध आहे. पांढरी शुभ्र वाळू, स्वच्छ पाणी आणि अनोखा निसर्ग या मुळे हे बेट ‘स्कूबा डायविंग’,  Sea walk, ‘कोरल सफारी’ या साठी आदर्श मानले जाते. या सर्व activities साठी पर्यटकांना मार्ग दर्शन करायला, काळजी घ्यायला या क्षेत्रातील अनुभवी ट्रेनर आहेत ते तुम्हाला व्यवस्थित काळजीपूर्वक समुद्राच्या तळाशी नेऊन आणतात. प्रत्येकाबरोबर एक मार्गदर्शक दिलेला असतो. या activities साठी झालेल्या पर्यटकांच्या ज्यास्त संख्येमुळे अनेकदा बराच वेळ मोडू शकतो. आमच्या ग्रुप मधील काही जणांनी स्कूबा डायविंग केले. बाकीच्यांनी एका पाणबुडी सदृश्य बोटीत बसून कोरल सफारीचा अनुभव घेतला. नंतर बेटावर एक छोटी फेरी मारली. वारे जोरात वाहत होते त्यामुळे उन्हाचा कडाका जाणवत नव्हता. मात्र पर्यटकांच्या ज्यास्त संख्येमुळे किनाऱ्यावर गजबजाट जाणवत होता.  समुद्र किनाऱ्यावर जेवणाची, खाण्याची  छोटी छोटी हॉटेल्स आहेत. समुद्रात  भिजून आल्यावर किंवा स्कूबा, Sea walk केल्यावर अंघोळ करण्यासाठी, कपडे बदलण्यासाठी  सोय  आहे त्यासाठी माणशी १० ते २० रुपये असा चार्र्ज आहे. ही बाथरूम म्हणजे नुसता झापांचा आडोसा. खरे तर ज्या संख्येने पर्यटक या बेटाना भेट देताहेत त्यासाठी थोडी चांगली सोय केली तर पर्यटकांची गैरसोय होणार नाही. रॉस बेटाच्या तुलनेत या बेटावर मला थोडी अस्वच्छता वाटली.

बेटावर  विविध सागरी वस्तू, शंख शिपले, इतर अनेक आकर्षक गोष्टी विकण्यासाठी छोटे stall आहेत. तिथे खरेदी करण्यासाठी लोकांची गर्दी होती. आमच्या ग्रुप मधील सर्वांच्या व्यक्तिगत activities, खरेदी आदि गोष्टी आटपल्यावर आम्ही एका ठिकाणी पोट पूजा उरकली. वाफाळलेला डाळ भात आणि त्याभागात पिकणारी एक भाजी तसेच जोडीला पापड लोणचे असे साधेच जेवण त्या समुद्र तीरावर जेवताना खूप मजा आली. त्यानंतर परत इंजिन बोटीत बसून संध्याकाळी परत पोर्ट ब्लेअरला आलो. आम्ही एका दिवसात दोन बेटे उरकली असली तरी प्रत्येक बेटावर पूर्ण दिवस घालवावा अशी ही बेटे आहेत……….

(लेखासाठी संबधित वेब साईटचा आधार घेतला आहे).

— विलास गोरे

 

Avatar
About विलास गोरे 22 Articles
मी आय डी बी आय बँकेत एन पी ए विभागात (कर्ज वसुली) व्यवस्थापक पदावर काम करतो, मला ३५ वर्षाहून अधिक काळ बँकेच्या विविध विभागात काम करण्याचा अनुभव आहे, मी कॉमर्स पदवीधर असून कायद्याचा अभ्यास पण पूर्ण केला आहे (B, COM , L L B). मी शेअर मार्केट मध्ये नियमित गुंतवणूक करतो व शेअर मार्केट व इतर investment चा मला २५ वर्षाहून अधिक अनुभव आहे. मला हिंदी चित्रपट संगीत, मराठी साहित्य, किल्ल्यांवर भटकंती तसेच इतर पर्यटन याची आवड आहे.मी काही कथा , लेख,व्यक्तिचित्रण लिहू इच्छितो.
Contact: YouTube

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..