नवीन लेखन...

Different waves New Waves

‘करिअर’ म्हणजे नेमकं काय? ज्या विषयाचा आपण सखोल अभ्यास केला आहे आणि ज्या विषयात आपल्याला गती व रुची दोन्ही आहे, अशा विषयामध्ये घेतलेलं शिक्षण आणि त्या विषयाशी निगडित केलेलं काम म्हणजेच करियर. हे काम आपल्याला बहुतेक वेळी कायम स्वरूपी करायचं असतं आणि म्हणूनच करियरची निवड म्हणजे बहुतेक वेळी आयुष्यभराचा निर्णय असतो. साहजिकच हा निर्णय महत्त्वाचा असतो आणि तो अचूकपणे होणं आवश्यक असतं.

‘करियर’ हा विषय जेवढा विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा असतो तेवढाच तो त्यांच्या पालकांसाठीही जिव्हाळ्याचा असतो. मात्र विद्यार्थी आणि पालक ह्यांच्यात एका पिढीचं अंतर असल्यामुळे त्यांची मानसिकता, त्यांचा दृष्टिकोण आणि त्यांचा अनुभव हे वेगवेगळे असतात. आपल्या कुटुंबातील परिचित शिक्षण किंवा व्यवसाय निवडणं पालकांना सुरक्षित वाटतं तर, विद्यार्थ्यांना धोपट मार्ग सोडून काही तरी हटके करायचं असतं. अशा ‘हटके’ क्षेत्राबद्दल माहितीचा तुटवडा असल्यामुळे पालकांना ते खूप धोक्याचं वाटतं. मात्र विद्यार्थी आणि पालक ह्यांच्या एक गोष्ट लक्षात येत नाही की, दृष्टिकोणाचा वेगळेपणा असला तरी दोघांचाही हेतू आणि ध्येय एकच असतं. हे साम्य लक्षात घेऊन मनमोकळी चर्चा आणि विचारांची देवाणघेवाण केली आणि हवी ती सर्व माहिती मिळवली तर ‘करिअर’ विषयक मार्ग ठरवणं नक्कीच सुलभ होईल.

‘करिअर’ निवडीच्या मार्गामध्ये अजूनही खूप अडथळे असतात. अजूनही अनेक कुटुंबांमध्ये मुला-मुलींमध्ये भेदभाव करून मुलांचे व्यवसाय आणि मुलींचे व्यवसाय अशी विभागणी केली जाते. बऱ्याच लोकांना असं अजूनही वाटतं की, ‘विज्ञान’ ही शाखा सर्वात वरचढ आहे. नंतर ‘वाणिज्य’ आणि मग शेवटी ‘कला’. ह्या सगळ्या गोंधळामधील सोपा मार्ग म्हणून विद्यार्थी आणि पालक परीक्षेतील गुण तसंच शालान्त परीक्षेतील टक्केवारी हे दिशादर्शक निकष मानतात. परंतु हे मार्क्स विद्यार्थ्यांची अध्ययनक्षमता आणि स्मरणशक्ती तपासून बघतात. त्याविषयातील गती किंवा अभिक्षमता (Aptitude) तपासत नाहीत. त्यामुळे एखाद्या विषयामध्ये चांगले गुण मिळाले म्हणजे आपल्याला तो चांगला समजला असा त्याचा अर्थ होतोच, असं नाही. टक्केवारीचा निकष म्हणजे खूप चांगले टक्के मिळाले तर ‘विज्ञान’ शाखेत, सर्वसाधारण मिळाले तर ‘वाणिज्य’ शाखेत आणि खूप कमी मिळाले तर ‘कला’ शाखेमध्ये. ह्या संदर्भात तर अतिशय बदललेलं चित्र आपण सध्या बघत आहोत. कला शाखेच्या कोणत्याही चांगल्या महाविद्यालयामधील प्रवेशासाठी cutoffs ९० टक्के गाठू लागले आहेत.

असेही काही विद्यार्थी असतात ज्यांना सोपा, सुटसुटीत मार्ग आणि कमीत कमी कष्ट करून जास्तीत जास्त पैसा हवा असतो. इथे हे लक्षात घेणं आवश्यक आहे की, कष्टाला पर्याय नाही. कोणत्याही शाखेचा, कुठलाही अभ्यासक्रम असला तरी कष्टाशिवाय फळ मिळणार नाही. पण जर आपल्या आवडीचा विषय आणि व्यवसाय असेल तर ते कष्ट ‘कष्ट’ वाटतच नाहीत आणि आपण ते मजेत करतो. तसंच कोणत्याही व्यवसायात शेवटी तोचतोचपणा येतोच. त्यामुळे ते काम अगदी निरस होऊन जातं. पण पुन्हा आपल्या आवडीचं काम असेल तर त्याच ‘तोच तोचपणा’मध्ये ‘वेगळेपणा’ शोधण्याची आणि निर्माण करण्याची सर्जनशीलता त्या कामातील ‘ध्यास’ आपल्याला देतो.

कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळवण्यासाठी दोन घटक अनिवार्य आहेत – अभिक्षमता (Aptitude – आपल्याला ते जमलं पाहिजे) आणि आवड (Interest – आपल्याला ते आवडलं पाहिजे.) अभिक्षमता आपल्याला कर्तृत्व व यश देते तर, आवड आपल्याला आनंद आणि सुख देते. यश आणि सुख दोन्ही गोष्टी प्रभावी करिअरसाठी अपरिहार्य आहेत.

कर्तृत्व आणि आवड दोन्ही घटक पारखण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक, पालक ह्यांचं निरीक्षण नक्कीच उपयोगी पडू शकतं. पण हे निरीक्षण डोळस आणि निरपेक्ष असलं पाहिजे. हे निरीक्षण परीक्षेतील गुण, लोकप्रिय व्यवसाय, कुटुंबातील व्यवसाय असे निकष चुकीचे, व्यक्तिपरत्वे आणि म्हणूनच दिशाभूल करणारे ठरू शकतात. करिअरची अचूक निवड करायची असेल तर निकष हा अतिशय शास्त्रशुद्ध, प्रमाणित आणि सविस्तर हवा. असा निकष म्हणजे व्यवसायमार्गदर्शन. व्यवसायमार्गदर्शनाच्या प्रक्रियेचे दोन भाग असतात.

१ व्यवसाय मूल्यांकन (Career assessment )

ह्या भागामध्ये Psychometric चाचण्यांच्या दोन सत्रांचा समावेश असतो. ह्या चाचण्यांद्वारे बुद्धिमत्ता (Intelligence), अभिक्षमता (Aptitude), आवड (Interest) आणि व्यक्तिमत्त्व (Personality) अशा चार महत्त्वाच्या निकषांचं मूल्यांकन होतं. 

२ व्यवसाय समुपदेशन (Career Counselling)

ह्या भागामध्ये विद्यार्थी आणि त्याच्या पालकांबरोबर एक सविस्तर सत्र होतं. ह्या सत्रामध्ये विद्यार्थ्यांची संपूर्ण प्रोफाईल समजावली जाते. आणि दहावीनंतर कोणत्या शाखेत प्रवेश घ्यायचा इथपासून तर शेवटपर्यंत सर्व शैक्षणिक पर्यायी अभ्यासक्रम तसेच अनुरूप व्यावसायिक क्षेत्र ह्याबद्दल चर्चा होते.

बदलता समाज आणि विविध क्षेत्रांतील प्रगती ह्यामुळे शिक्षणाची दालनं अधिक मोकळी झाली आहेत. नेहमीच्या साच्यातल्या व्यवसायांमध्ये अनेक नवीन कक्षा, शाखा आणि त्यांच्या पोटशाखा-स्पेशलायझेशन्स व सुपर स्पेशलायझेशन्स आणि ह्या सगळ्यांमधले निरनिराळे अभ्यासक्रम…इतकं व्यापक आणि सर्वसमावेशक झालं आहे करिअरचं दालन! पर्याय जितके जास्त तेवढा गोंधळ जास्त! त्यामुळे करिअरची निवड करणं अधिक कठीण व गुंतागुंतीचं झालं आहे. शिवाय अमर्यादित पर्याय असल्यामुळे योग्य व अचूक पर्याय हेरण्याची आपली जबाबदारी नक्कीच वाढते आणि म्हणूनच ह्या बदलत्या क्षितिजावर व्यवसायमार्गदर्शनाची गरज आणि महत्त्व समर्पकच आहे, नाही काय?

व्यवसायमार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना अनुकूल व्यवसायाची निवड करण्यास मदत होते. त्याचप्रमाणे अपयश व निराशेची शक्यता कमी करून एक सुखी यशस्वी, सुरळीत शिक्षण व करिअर मार्गाची दिशा मिळते.

करिअर समुपदेशनाच्या प्रक्रियेमधून प्रत्येकाच्या प्रोफाईल प्रमाणे कुणाला एक-दोन पर्याय मिळतात तर, कुणाला चार-पाच. काहींना तर ८-१० सुद्धा मिळू शकतात. अंतिम निवडीचा निर्णय हा विद्यार्थ्याचाच असतो. आता शिक्षण व व्यवसाय क्षेत्रांमध्ये संख्येने आणि वैविध्यतेने विपुल अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. शिवाय प्रत्येक करिअर क्षेत्रामध्ये खालपासून तर वरपर्यंत सर्व स्तरांवरचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. त्यामुळे प्रत्येक क्षमतेच्या, मानसिकतेच्या, सामाजिक व आर्थिक परिस्थितीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि विद्यार्थिनींसाठी कुठला ना कुठला पर्याय आहेच. ह्या जाणिवेतून विद्यार्थिवर्गाला व पालकवर्गाला निश्चिंत व्हायला काहीच हरकत नाही.

सुदैवाने निरनिराळ्या करिअर क्षेत्रांबद्दलची अनेकांगी माहिती आता पुस्तकं, वर्तमानपत्रं, दूरदर्शन, कार्यशाळा अशा अनेक माध्यमांतून उपलब्ध असते. ह्या माहितीचा नक्कीच फायदा करून घेता येईल. तसंच वेगवेगळ्या क्षेत्रांतील यशस्वी व्यक्तींच्या मुलाखती ऐकून त्यांच्याकडून प्रेरणा घेता येईल. प्रत्येक व्यवसायाची चांगली-वाईट बाजू असते. ती समजून घेऊन आपल्याला तो व्यवसाय आवडेल की नाही ह्याची नीट पारख करणं सोपं जाईल. करिअर समुपदेशनाच्या नंतर केलेला हा गृहपाठ नक्कीच विद्यार्थी पालकवर्गाला करिअरविषयक ठळक चित्र स्पष्ट करील.

तेव्हा मित्रांनो आणि मैत्रिणींनो, गैरसमज बाजूला सारण्याची वेळ कधीच आली आहे. आपल्या व्यक्तिसापेक्ष कल्पना बाजूला ठेवून करिअर समुपदेशनाचा शास्त्रशुद्ध मार्ग प्रत्येकाने अवलंबला पाहिजे. खरं म्हणजे दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेप्रमाणे करिअर मूल्यांकनाच्या प्रमाणित चाचण्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अनिवार्यच असायला हव्यात. आणि मग करिअर समुपदेशनातून अनुरूप दिशा मिळवण्यासाठी कष्ट करायची तयारी हवी व ते यश समाधानकारक आणि सुखावह वाटण्यासाठी आपल्या कामाबद्दल व व्यवसायाबद्दल अभिमान हवा.

सर्व तरुण-तरुणींना त्यांच्या पुढील करिअरसाठी मन:पूर्वक शुभेच्छा.

-शर्मिला लोंढे

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..