नवीन लेखन...

आणि अचानक त्या वळणावर (रोमांचक भयकथा) – भाग १

भाग एक

निशा, 22 वर्षाची, गहूवर्णाची, कुरळ्या केसांची, रेखीव बांधा, हसरा चेहेरा, डोळ्यावर चष्मा असलेली, थोडीशी मितभाषी मुलगी, घरातून बाहेर पडण्यासाठी आवरत होती. तिनं लाल रंगाचा टॉप, निळ्या रंगाची जीन्स घातली होती. त्यावर लेमन कलरचा, फुलांची सुंदर प्रिंट असलेला मोठ्ठा स्टोल घेतला होता. तिची सॅक तिनं पाठीवर अडकवली होती. तिच्या स्कूटरची चावी तिला मिळत नव्हती त्यामुळे तिची गडबड चालली होती. तिची चावी ठेवण्याची नेहमीची सगळी ठिकाणं शोधून झाल्यावर तिनं आईला आवाज दिला…

“आऽऽऽई….. माझ्या गाडीची चावी कुठाय?”

“अग टेवबलवर असेल, नाहीतर की-स्टँन्डला बघ ना…” आईनं आतून आवाज दिला.

“सगळीकडं बघून झालंय माझं….. कुठंच मिळत नाहीये….. प्लीज मला हुडकून दे ना….. आधीच उशीर झालाय. वैदु तिकडं माझ्या नावानं शंख करत असेल.”

“अग हो…. माझी पण आत गडबड चाललीय….. आणि हो … आज शेखरचा वाढदिवस आहे ते लक्षात आहे ना तुझ्या? वेळेत घरी ये…… मी सगळ्यांना साडेआठ पर्यंत घरी या सांगितलंय…… येताना हायवेवरच्या केक शॉपमध्ये केकची ऑर्डर दिलीय…. तो केक घेवून ये….. सगळे पैसे अ‍ॅडव्हान्स दिलेत…..”

बोलत बोलत आई बाहेर आली. तिच्या हातात पावती होती….. “ही पावती ठेव तुझ्याकडं….. पावती दाखवल्याशिवाय द्यायचा नाही तो केक…… थोडी लवकर आलीस तर मलाही मदत होईल तुझी….”

“मम्मे….. सगळं लक्षात आहे ग माझ्या. पण आधी माझी चावी बघ…. मी लवकर गेले तरच लवकर परत येईन ना?”

“लाडात आली आणि आईकडून काही काम करून घ्यायचं असलं की आईची लगेच मम्मे काय?”

“मम्मे….. प्लीज…. चावी बघ गं लवकर….”

“हो गं बाई …. बघते….. हं ही बघं…. इथंच तर आहे. हे एक वर्तमानपत्र उचलून बघितलं असतंस तर लगेच मिळाली असती…. घे ….. आणि नीघ लवकर…. आणि ती उर्मिला आहे ना तुझ्याबरोबर?”

“नाही ग आई…. आज मी एकटीच जातेय…. काल दुपारपासून उर्मि तापानं फणफणलीय… त्यामुळे दोघींच्याही प्रोजेक्टचं सगळं मलाच बघायला लागणार आहे….”

“ठीक आहे, जा आता, आणि काळजी घे. प्रोजेक्ट लवकर झाला तर लवकर आलीस तरी चालेल. नाहीतर बसाल गप्पा मारत.”

‘नाही गं आई मी गप्पा मारत बसणार. वाढदिवस आहे आणि इतकीजणं घरी येणारेत हे माहितेय ना मला, मी वेळेतच येण्याचा प्रयत्न करते…. चल निघते मी….बाऽऽय.”

निशानं तिचा लांबलचक स्टोल गळ्याभोवती गुंडाळला, डोक्यावर हेल्मेट घातलं, गाडी चालू केली आणि ती, तिची मैत्रीण वैदेहीच्या घरी जाण्यासाठी निघाली.

निशा उपनगरात राहात होती. त्यांच्या घरापासून दहा मिनिटांवर हायवे लागत होता. हायवेवरून डायरेक्ट सिटीमध्ये जाता येत होतं. पाऊण तासाचा रस्ता पार केल्यावर, सिटीमध्ये गेल्यावर, वैदेहीची अपार्टमेंट होती. तिथून पंधरा मिनीटांच्या अंतरावर त्यांचं कॉलेज होतं. त्यामुळे रोजच निशा आणि उर्मि गाडीवरून आधी वैदेहीच्या घरी येत असत, तिथं वैदेही आणि अंजू अशा चौघीजणी मिळून कॉलेजला जात असत.

हायवेवर कायम ट्रॅफिक असे. फार ट्रॅफिक असेल आणि खूप गडबड असेल, अशावेळी हायवेच्या पलीकडे दोन मोठ्ठ्या टेकड्या होत्या. त्या टेकड्यांवर जंगल होतं आणि त्या जंगलातून एक रस्ता जात होता. या रस्त्यावरून कमी वेळात, सिटीत जाणं सोपं होतं, बर्‍याचदा निशा याच मार्गाचा वापर करत असे, पण आत्ता निशा हायवेनंच वैदेहीकडे गेली.

दुपारभर निशा, वैदेही आणि त्यांच्या दोन मैत्रीणी लॅपटॉपवर त्यांंनी तयार केलेलं प्रॉजेक्ट आणि त्याचं प्रेझेंटेशन यावर काम करत होत्या. वैदेहीची आई अधून मधून मुलींना चहा, कॉफी, चटरपटर खायला पुरवठा करत होती. मुली काम करून कंटाळल्या की थोडा वेळ गप्पा-टप्पा करून परत प्रोजेक्टवर काम चालू ठेवत होत्या. कुठल्याही परिस्थितीत आज हे काम पूर्ण करणं गरजेचं होतं. एकदा काम पूर्ण झालं की नंतर, वैदेही त्याच्या प्रिंटआऊटस् काढून, त्याचं बाईंडिंग वगैरे कामं करणार होती.

या कामाच्या नादात संध्याकाळचे सात कधी वाजले याचा त्यांना पत्ताच लागला नाही. सात वाजता निशाच्या आईचा फोन आला तेव्हा निशा भानावर आली.

आई निशाला “निघाली का?” विचारत होती. “15 मिनिटांत निघते” म्हणून निशाने फोन बंद केला.

“अग वैदेही, मी तुला सांगायलाच विसरले. अग, आज शेखरचा वाढदिवस आहे, त्याचे सगळे मित्र साडेआठ वाजता घरी येणारेत त्यामुळे मला जरा लवकर जावं लागेल, कारण जाताना मला हायवे वरच्या दुकानातून केक कलेक्ट करायचाय.”

“ओके निशा, नो प्रोब्लेम. आता थोडसं फिनिशींग करायचं राहिलंय, ते आम्ही पूर्ण करतो आणि फायनल झालं की तुला मेल करतो. तू जा बिनधास्त.”

“थॅक्स वैदू, मी निघते आता”, असं म्हणून निशा गाडी चालू करून बिल्डींगच्या बाहेर पडत असताना, तिला वैदेहीचा भाऊ चेतन समोरून येताना दिसला.

चेतन म्हणाला, “निशा तू घरी निघालीस का?”

“हो, घरीच निघालेय”

“कुठल्या रस्त्याने जाणार आहेस?”

“मी हायवेनेच जाणारेय, का रे?”

“अगं, तासाभरापूर्वी हायवे वर मोठ्ठा अपघात झालाय. दोन्ही बाजूंनी ट्रॅफिक जाम आहे. चार पाच तास तरी जातील रस्ता मोकळा व्हायला. तुला टेकडीच्या रस्त्याने जावं लागेल. पण मला असं वाटतंय की, अंधार पडायला लागलाय. इतक्या रात्री एकटीने त्या रस्त्याने जाण्यापेक्षा, तू घरी फोन करून सांग की, तू इथंच राहतेस म्हणून, सकाळी लवकर जा पाहिजे तर.”

“सॉरी चेतन. बरं झालं हायवेवर प्रॉब्लेम झालाय हे मला सांगितलंस ते. इतरवेळी इतका उशीर झाला असता आणि ट्रॅफिकचा प्रॉब्लेम असता, तर माझी आईच मला इथंच रहा म्हणाली असती, पण आज शेखरचा वाढदिवस आहे, त्याचे मित्र घरी जमायला सुरूवात झाली असेल आणि जाताना मला केकपण कलेक्ट करायचाय. त्यामुळे मला राहाता नाही येणार. मला जावंच लागेल.”

“निशा, पाच मिनिटं थांबतेस का? मी घरात आईला सांगून येतो. यावेळी तू एकटीनं त्या रस्त्यानं जाणं मला तरी सेफ वाटत नाही. तुझ्यासोबत मी येतो तुला घरी सोडायला. तुला घरी सोडून मग परत येईन मी.”

“अरे नको चेतन. थॅक्स, पण अर्धा तासाचा तर प्रश्न आहे. माझ्या सवयीचा रस्ता आहे तो. डोन्ट वरी. तुला उगीच डबल जा-ये होईल. मी जाईन नीट. पण बरं झालं तू सांगितलंस ते. आता अजून बोलत बसले तर खूप उशीर होईल. बाय… निघते मी.” असं म्हणून निशानं गाडी चालू केली.

“निशा, जपून जा. काही मदत लागली तर मला कॉल कर. मी घरीच आहे. आणि हो, शेखरला माझ्यातर्फे वाढदिवसाच्या शुभेच्छा सांग.”

‘हो…सांगते, बाय.”

ती थोडं अंतर पुढं गेली आणि तिच्या लक्षात आलं, की सॅकमधून कागदपत्रं काढताना केक शॉपची पावती बहुतेक बेडवर पडली असावी. तिनं गाडी बाजूला थांबवून एकदा सॅक चेक केली. सॅकमध्ये पावती नव्हती. मग तिनं वैदेहीला कॉल करून सांगितलं की,”वैदू, अग मी केक शॉपची पावती तिथं बेडवरच विसरलेय, जरा आहे का बघतेस का?”

“थांब हं. बघते….. हा…. सापडली…. पण तू कुठपर्यंत पोचलीस आत्ता?”

“अग जवळच आहे. तू पावती घेवून बिल्डींगच्या खाली येतेस का प्लीज, आणि हो तू गेटबाहेर येऊन थांब. मी लगेच येते.”

परत गाडी वळवून निशा पावती घ्यायला मागे गेली. तरी बरं, थोड्या अंतरावरच तिच्या लक्षात आलं होतं. गडबडीत पावती घेवून तिनं सॅकमध्ये ठेवली आणि ती लगेच निघाली. यात तिची 15 मिनीटं गेली. टेकडीच्या रस्त्याला लागताना परत तिच्या आईचा फोन आला.

“अग निशा…. तू निघालीस की नाही अजून?”

“हो आई…. मी वाटेतच आहे. येताना केक घेवून येतेय मी. फक्त आता परत परत मला फोन करू नकोस. हायवेवर अ‍ॅक्सीडेंट झालाय, ट्रॅफिक जाम आहे, म्हणून मी टेकडीच्या रस्त्याने येतेय. तिथं रेंज मिळत नाही बर्‍याचदा, त्यामुळं फोन लागला नाही तर काळजी करू नकोस. मी पोहोचतेच वेळेत….”

आता मात्र निशालाही उशीर झाल्याचं टेन्शन यायला लागलं. तिनं गाडी चालू केली. थोडी वेगात ती टेकडीच्या रस्त्याच्या दिशेने गाडी चालवू लागली.

हा रस्ता दोन टेकड्यांच्या मधून जात होता. मुख्य शहर आणि उपनगरांच्या मध्ये या दोन टेकड्या होत्या. बाकी सर्व बाजूंनी सिमेंटचे जंगल होते, पण या दोन टेकड्या वनविभागाकडून संरक्षित करण्यात आलेल्या होत्या, त्यामुळे बर्‍याच वर्षांपासून वाढलेली दाट झाडी इथे शाबूत होती. त्यापैकी एका टेकडीवर एक जुने देवस्थान होते. त्याला बराच प्राचीन इतिहास असल्यामुळे आणि आजूबाजूला भरपूर नैसर्गिक संपन्नता असल्यामुळे तो एक पिकनिक स्पॉट झाला होता. दोन्ही टेकड्यांवरून वाहणारे ओढे आणि त्यातून निर्माण झालेले धबधबे, हे ही पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र होते.

आता डिसेंबर महिना असल्यामुळे धबधबे दिसत नव्हते, पण विकएंडला इथे पर्यटकांची गर्दी असे. त्यामुळे टेकडीच्या मधून जाणारे रस्ते एकदम सुंदर, सुबक बनविण्यात आले होते. सिटी पासून ते मुख्य रस्त्याला लागेपर्यंत झाडांच्या दाटीवाटीतून पाच सहा मोठी वळणे घेत रस्ता जात होता. दाट झाडीमुळे बर्‍याचदा वळणावर प्रत्यक्ष दुसरी गाडी समोर येईपर्यंत कळत नसे, त्यामुळे प्रत्येक वळणावर धोक्याच्या इशार्‍याच्या पाट्या लावलेल्या होत्या. रस्त्याच्या दुतर्फा थोड्या थोड्या अंतरावर पर्यटकांसाठी बसायला सिमेंटची बाकडी ठेवलेली होती. ओढ्यांवर पूल बांधलेले होते. त्याला कठडे बांधण्यात आलेले होते. एकंदर कुणाही निसर्गाची आणि पर्यटनाची आवड असलेल्या व्यक्तीला आवडेल असाच हा रस्ता आणि त्याचा परिसर होता.

डिसेंबर महिना असल्यामुळे दिवस लहान होते त्यामुळे आतापर्यंत चांगलंच अंधारून आलं होतं. दिवसा या टेकडीच्या रस्त्याला बर्‍यापैकी वाहनांची वर्दळ असे. बहुतेक वेळा निशा आणि उर्मि याच रस्त्याने जा-ये करत असत, त्यामुळे या वाटेचा कणनकण निशाला पाठ होता. डोळ्यावर पट्टी बांधली असती तरी ती या रस्त्याने बिनचूक गाडी चालवत गेली असती…. पण दिवसा…..

आज पहिल्यांदाच ती अशी रात्रीच्या वेळी आणि एकटीच या रस्त्याने निघाली होती. नॉर्मल स्पीडनं गेलं तर अर्धा तास आणि वेगात गेली तर वीस मिनीटांत ती मुख्य रस्त्याला लागणार होती. त्यामुळे कांही मिनिटांचा तर प्रश्न होता. निशाने गाडीचा वेग वाढवला.

मधून मधून काही दुचाकी, चार चाकी वाहने तिला क्रॉस होत होती, त्यामुळे सोबतीचा प्रश्न नव्हता. तसं या रस्त्यावरून रात्रीचं कोणी फारसं जात नसे. या टेकडीच्या रस्त्याबद्दल अनेक भुताखेताच्या, अपघाताच्या, चकवा लागल्याच्या कहाण्या सांगितल्या जात असत. अनेकांना तसे अनुभवही आलेले होते. त्यामुळे अगदीच नाईलाज झाल्याशिवाय रात्रीच्या वेळी मुद्दामहून कुणी या रस्त्याने जात नसत. पण बहुतेक हायवे ब्लॉक झाल्याने या रस्त्याने आज यावेळीही तुरळक वर्दळ चालू झाली असावी असं निशाला वाटलं.

तरीही रात्रीची वेळ असल्याने निशाला मनातून थोडी भिती वाटायला लागली होती. आपल्याला कसंही करून लवकरात लवकर हा रस्ता पार करायचा आहे, असा विचार करून निशाने गाडीचा वेग अजून वाढवला. थंडीचे दिवस असल्यानं गार वाराही वहात होता.

थोड्याच वेळात तिनं पहिलं वळण पार केलं. अजून काही अंतर पार करताच ओढ्यावरचा पुल आणि दुसरं वळण लागणार होतं. दाट झाडीमुळं गाडीचा उजेड तसा कमीच वाटत होता. तरी सवयीनं निशा पुढे जातच होती आणि अचानक तिला गाडीला धक्का बसल्याचं जाणवलं …………….

(क्रमशः)

 © संध्या प्रकाश बापट

 

सौ. संध्या प्रकाश बापट
About सौ. संध्या प्रकाश बापट 50 Articles
नमस्कार वाचकहो, मी, सौ. संध्या प्रकाश बापट (माहेरची पद्मश्री विष्णू फाटक), सातारा. मी, सातार्‍यातील विविध कंपन्यांमध्ये/ऑफिसमध्ये अनेक वर्षे विविध पदांवर काम केले. तसेच काही वर्षे स्वतःचा व्यवसायही केला. 2018 मध्ये मी, नोकरी आणि व्यवसायातून स्वेच्छा निवृत्ती घेतली. या सगळ्या वर्षांत, इच्छा असूनही मनासारखे लिहिण्यास वेळ उपलब्ध होत नव्हता. मला लहानपणापासून संगीत, नाटक, सिनेमा, अभिनय आाणि वाचन या सगळ्याची प्रचंड आवड आहे. मी हौशी नाटकांत, एकांकिका, पथनाट्य यांत अभिनय करत होते. युट्यूब वरील वेब सिरीजमध्ये अभिनय करत आहे. नुकतेच झी टीव्ही वरील 'लागीर झालं जी' आणि 'मिसेस मुख्यमंत्री' या मालिकेत मी भूमिका केल्या आहेत. मी लघुकथा, कविता, प्रासंगिक लेख, वेब सिरीजसाठी मराठी आणि हिंदीतून कथा-पटकथा लिहीत आहे. काही लघुकथा ई-दिवाळीअंकात प्रसिद्ध झाल्या आहेत. माझ्यातील सुप्तगुणांना प्रेरणा आणि वाव देण्यामध्ये फेसबुक आणि व्हाटस्अ‍ॅप या सोशल मिडीयाचा आणि मला कायम प्रोत्साहन देण्यार्‍या तुम्हा सर्व वाचकांचा फार मोठा वाटा आहे.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..