पण आमच्या आवारातील पारिजातकाचं झाड मनापासून कधी बहरलंच नाही .
झाडाला फुटवा यायचा पण तो घाबरल्यासारखा .
पानं मोठी व्हायची , पण ती शरमेनं काळीठिक्कर पडायची आणि मग तेलकट , मातकट रंगात तोंड लपवायची .
फुलं सुद्धा अगदी , नाईलाजाने एखाद्यानं हसावं आणि केविलवाण्या नजरेनं पाहावं , तशी फुलायची आणि गलितगात्र होऊन धरतीवरती पडायची .
कारणही तसंच होतं .
आमच्या आवाराशेजारून जाणारा रस्ता , मुख्य रस्त्याला जाण्यासाठी अनेकांना शॉर्टकट वाटतो . त्यामुळे पहाटे साडेपाच ते रात्री अकरा पर्यंत वाहनांची वर्दळ असायची . कसलाच धरबंद नसल्यासारखी .
परिणामी प्रचंड प्रदूषण ! हवेचं ! ध्वनीचं ! आणि वाहनांच्या गतीनं उडणाऱ्या धुळीचंसुद्धा !!
मग आमचा पारिजातक हिरमुसला व्हायचा . दुखीकष्टी व्हायचा . पण निसर्गदत्त कर्तव्य मात्र बजावायचा .
यावर्षी मात्र तो मनापासून खुलला . पानांच्या हिरव्यागार स्मितहास्यानं त्यानं संकेत दिले .
छायाचित्र जरा झूम करून बघा …
(हां , आता काही जुनी पानं अजून आहेत तशीच झाडाला . पण त्या दुःखद आठवणीमुळे हिरवाई जास्तच प्रसन्न वाटते. खरं की नाही ?)
त्याचं स्मितहास्य तुम्हालाही जाणवेल .
पण त्या वेड्या पारिजातकाला हे माहीत नाही की , लॉक डाऊन मुळे त्याचं हे रूप त्याला पुन्हा प्राप्त झालंय .
डॉ.श्रीकृष्ण जोशी यांचे प्रकाशित साहित्य
कादंबरी :
1 शेम्बी, 2 घसरण, 3 महाराज, 4 घर दोघांचे, 5 अगतिक, 6 नंतर , 7 शल्य, 8 शापित, 9 तुझ्याशिवाय, 10 काटशह, 11 कातळ, 12 अथांग, 13 मार्शीलन, 14 समांतर, 15 वादळ वेणा, 16 भोवरा, 17 ब्रेकिंग न्यूज, 18 कापूस आणि फॅनची गोष्ट(आगामी), 19 सापशिडी,फासे आणि काही सोंगट्या (आगामी )
दीर्घकथा संग्रह:
1 रानोमाळ, 2 रानवा
संगीत नाटक :
1 सं. शांतिब्रह्म, 2 घन अमृताचा, 3 राधामानस, 4 ऎश्वर्यावती, 5 ऋणानुबंध, 6 स्वरयात्री, 7 चोखा मेळा
गद्य नाटक:
1 चिनुचं घर, 2 स्वप्नपक्षी, 3 अरे, चल उचल
काव्यसंग्रह:
1 खडूचे अभंग, 2 क्रांतिज्वाला
ललित लेख: (आगामी)
1 रौद्रलेणी, 2 पडघम, 3 शब्दांच्या पलीकडे
कथासंग्रह:(आगामी )
1 ड्रॉवर, 2 चंद्रखुणा
बाल वाङ्मय:
1 अपूर्वा, 2 गोष्टीरूप चाणक्य, 3 सरदार वल्लभभाई पटेल(आगामी )
संपादन :
1 मुद्रा (प्रातिनिधिक कथासंग्रह) 2 व्हिजिट बॅग, 3 पॅनोरमा
पारितोषिके:
1 डेथ ऑफ कॉमन सेन्स या नभोनाट्याला अखिल भारतीय आकाशवाणीच्या नभोनाट्य लेखन स्पर्धेत संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक, नभोनाट्याचे 14 भारतीय भाषांमध्ये भाषांतर,
2 दिल्ली येथील स्पर्धेत 'सं. घन अमृताचा ' या नाटकाला लेखनाचे प्रथम पारितोषिक
3 सं. ऎश्वर्यावती आणि सं.ऋणानुबंध या नाटकांना अनुक्रमे द्वितीय आणि विशेष पारितोषिक
उल्लेखनीय :
* पावस येथील स्वामी स्वरूपानंद तीर्थराज विधी आणि स्वामी स्वरूपानंद जन्मसोहळा या सीडींसाठी पटकथा लेखन
* सं. घन अमृताचा, सं. शांतिब्रह्म, सं. ऎश्वर्यवती या तीन संगीत नाटकांचे आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रावरून प्रसारण
* क्रांतिसूर्य सावरकर आणि कातळ या मालिकांचे आकाशवाणीवरून प्रत्येकी 13 भागांचे लेखन आणि प्रसारण
*आकाशवाणी वरून 20 श्रुतिका प्रसारित
* समांतर कादंबरी, नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड या संस्थेमार्फत अंध बांधवांसाठी कॅसेट च्या माध्यमातून प्रकाशित
* अंध बांधवांसाठी , स्वामी स्वरूपानंद यांचे ब्रेल लिपीतील चरित्र लेखन
पुरस्कार
1 'शापित ' कादंबरीला कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार
2 'शल्य ' कादंबरीला कुसुमताई अभ्यंकर पुरस्कार
3 'शल्य ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार
4 'कातळ ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार
5 अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई यांचा 1998 साठी , स्वरराज छोटा गंधर्व पुरस्कार
6 सं. घन अमृताचा हे नाटक , राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम
7 सन 2000 मध्ये सर्वोत्कृष्ट संगीत नाटककार आणि सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून नाट्यपरिषदेचा गुणगौरव पुरस्कार
8 सन 2002 मध्ये सं. शांतिब्रह्म हे नाटक राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम
9 मुंबई येथील साहित्य संघ मंदिराचा , कै. अ. ना.भालेराव पुरस्कार
10 संगीत नाट्यलेखानासाठी , कै. पु.भ.भावे पुरस्कार
11 समांतर कादंबरीला रोटरी पुणे यांचा सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणून पुरस्कार
12 सन 2006 मध्ये राधा मानस , राज्य नाट्य स्पर्धेत राज्यात द्वितीय तर दिल्लीत प्रथम
13 त्रिदल या संगीत नाटकाच्या पुस्तकासाठी 2007-08 चा महाराष्ट्र शासनाचा कुसुमाग्रज पुरस्कार
14 आदर्श शिक्षक पुरस्कार
15 पुणे येथील बाल गंधर्व संगीत मंडळाचा कै. अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार
16 वुमेन्स फाउंडेशन कोल्हापूर या संस्थेचा साहित्य भूषण पुरस्कार....
हा माझा अल्प असा परिचय ...!!!
Good Article, Well Done