नवीन लेखन...

अनिल, लिखते रहो !

प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांच्या ‘सृष्टीत गोष्टीत’ या पुस्तकाला साहित्य अकादमीचा उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार जाहीर झाला. बालसाहित्याच्या दृष्टीने ही बाब महत्त्वाची आहेच, पण अनिल अवचटांसारख्या समाजकार्यात रमलेल्या लेखकाच्या वेगळ्या प्रयत्नाला मिळालेली दाद म्हणूनही या पुरस्काराचे

मोल आहे. गेल्या काही वर्षांमध्ये बालसाहित्याकडे वळलेल्या आणि कसदार साहित्य निर्मिती करणार्‍या डॉ. अवचटांचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी केलेले कौतुक. (शब्दांकनः अद्वैत फिचर्सच्या मंगेश पाठक यांचे)

 




रविवारच्या सकाळीच ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाल्याची बातमी ऐकून मनस्वी आनंद झाला. आम्ही दोघं चांगले मित्र आहोत. अनिलच्या लेखनकौशल्याशी मी जवळून परिचित आहे. त्याचे सामाजिक कार्य आणि विविधांगी लेखन मी जवळून पाहिले आहे. त्यामुळे जवळच्या मित्राला साहित्य क्षेत्रातला एवढा मोठा पुरस्कार प्राप्त होणं ही माझ्या आणि समस्त मित्रपरिवाराच्या दृष्टिने अभिमानाची बाब आहे. अनिलच्या ‘सृष्टीत गोष्टीत’ या बालसाहित्याला, अर्थात बाल वाचकांसाठी लिहिलेल्या पुस्तकाला पुरस्कार मिळाल्यामुळे विशेष आनंद झाला. वास्तविक पाहता अनिलची बालसाहित्यकार ही ओळख नवी आहे. गेली ४५ वर्षे अनिल लिहित आहे, पण बालसाहित्यात त्याचा हात लिहिता झाला गेल्या तीन-चार वर्षांमध्येच. तसेही अनिलला मराठी वाचक ओळखतो तो सामाजिक प्रश्नांवरील लेखनामुळे. त्यामुळे त्याच्या लेखनातील हा बदल आणि त्यातही त्याने निर्माण केलेले कसदार साहित्य अनेकांसाठी कुतुहलाचा विषय ठरणारा. कदाचित त्यामुळेच या लेखनप्रांतातील त्याची मुशाफिरी पटकन लक्षात न येणारी. पण तरीही बालसाहित्यात अनिलने केलेला शिरकाव आणि त्याला मिळालेली देशातल्या साहित्यविषयक सर्वोच्च पुरस्काराची पावती हा दुग्धशर्करा योग म्हणायला हवा. अनिलच्या लेखनाला नेहमीच सामाजिक हिताचं भान लाभलं. मात्र हे हित जपताना बालमनाची मशागत आवश्यक आहे. हे त्याने आयुष्याच्या योग्य टप्प्यात ओळखलं. त्याचा बालमानस घडवायला चांगला उपयोग झाला.

अनिलचे लेखन हे सर्जनशीलतेचं उत्तम उदाहरण मानायला हवं. आयुष्यातील वेगवेगळ्या अनुभवांमधून त्याच्या ठायी लेखनविषयक जी प्रगल्भता निर्माण झाली तिचा प्रत्यय आता येतो आहे. आजच्या वळणावर मला अनिलने साधना साप्ताहिकात केलेलं लेखन आठवतं. लेखनात
णि विचारांमध्ये बरीचशी परिपक्वता आल्यानंतर तो बालसाहित्याकडे वळला. त्याच्या लेखनछंदाला मिळालेलं हे वळण बरचकाही सांगून जाणारं आहे. मला विचाराल तर अनिलच्या व्यक्तिमत्वातच एक निष्पाप बालक दडलं आहे. त्याची चुणूक त्याच्या जवळच्यांनाच दिसते. अनिलचं वावरणंही असंच निष्पाप. त्याच्या साहित्याची अनेकविध वैशिष्ट्यं सांगता येतात. त्यातून त्याचं प्रगल्भ मन पाहायला मिळतं. ज्या ‘सृष्टीत गोष्टीत’साठी अनिलला हा पुरस्कार प्राप्त झाला त्या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ माझ्या अध्यक्षतेखाली झाला होता. आजही मला तो कार्यक्रम चांगलाच आठवतो. या कार्यक्रमाप्रसंगी अनिलचं बालसाहित्यात येणं नेमकं का आणि कसं घडलं हे मला जवळून पाहायला मिळालं होतं. त्यामुळे या पुस्तकाच्या निमित्ताने बालसाहित्यात नेमकी कोणती आणि कशी भर पडली याविषयी मला बोलायला आवडेल. बहुतेक लेखकांच्या लेखणीवर कोणाचा ना कोणाचा प्रभाव जाणवतो. लेखनाची ठराविक जातकुळी हे अनेक लेखकांचे ठळक वैशिष्ट्य. या पार्श्वभूमीवर अनिलच्या साहित्यावरील प्रभाव शोधता येतो. जवळचे लेखक अनिलच्या कथांवर साने गुरुजींसारख्या पूर्वसुरींचा प्रभाव असल्याचे सांगतात. कदाचित हे खरे असेलही, पण मला या कथा इसापनीतीशी नातं सांगणार्‍या वाटतात. अनिलच्या बालसाहित्यात निसर्गाशी नातं जपलेलं दिसून येतं. त्याच्या लेखनातून पक्षी-फुलं बोलतात, पानंही बोलतात. अनिलच्या दृष्टीने हा सृष्टीशी साधलेला संवाद आहे. निसर्गाची विविध रुपं अनिलने जवळून पाहिली आणि सोप्या भाषेत उलगडण्याचा प्रयत्न केला. निसर्गाशी संवाद साधत अनिल बालवाचकांना समजेल आणि उमजेल अशा पद्धतीने कथा फुलवतो. वास्तविक पाहता अनिलने असं कधी लिहिलं नाही, पण जेव्हा त्यानं असं काही लिहिलं तेव्हा त्यातून अस्सल संस्कारक्षम साहित्य जन्माला आलं. अनिलचं हे साहित्य वाचताना माझं मन थोडं मागे जातं. त्याच्या लेखनाचा संबंध इतर साहित्यिकांशी जोडावा वाटतो. त्यातल्या त्यात ना. ग. गोरे यांचं ‘बेडूकवाडी’ मला आठवतं. म्हणजेच हे बालमनाला हुशारीने साद घालणारं कसदार साहित्य ठरतं. त्या अर्थाने हे मराठीतलं अप्रतिम पुस्तक आहे. बालसाहित्याची रचना बाळबोध असली तरी हे बालिश साहित्य नव्हे. मुळात बालकांसाठी लिहिणं जास्त कठीण असतं. हे लेखन बालकवर्गाची मानसिकता लक्षात घेऊन करावं लागतं ते केवळ उपदेशात्मक किवा चितनशील राहणार नाही याकडेही लक्ष द्यावं लागतं. ही सर्व व्यवधानं अनिलने ‘सृष्टीत गोष्टीत’मध्ये पाळली आहेत. या पुस्तकाद्वारे त्याने समस्त बाल वाचकांशी मनमोकळा संवाद साधला आहे. हे कौशल्याने आणि काळजीपूर्वक केलेलं लेखन आहे. या लेखनातून अनिलची मानसिकताही जवळून समजून घेता आली. मला तर वाटतं, अनिल शांत असो वा झोपेत, त्याचा निसर्गाशी संवाद सुरू असतो. तो फुलांशी, फांदीशी, झाडांशी बोलत राहतो. त्याच्या पुस्तकातले प्राणी, पक्षी जसे बोलतात तसेच त्याच्या मनातही काही प्राणी, पक्षी बोलत असतात. म्हणूनच त्याचे साहित्य अधिक जवळचे वाटते आणि ते बाल वाचकांनाही पटकन आपलेसे करते. अनिलच्या प्रतिभेला बालसाहित्याचा कोंब फुटला याचा मला आज मनस्वी आनंद होतो. गेल्या काही वर्षांत अनिलचं बालसाहित्य बहरलं असलं तरी त्याची चित्रकला, शिल्पकला, छायाचित्रकला सर्वांनाच माहित आहे. त्याच्या लेखनाचाही वाचकांना जवळून परिचय आहे. अशा परिस्थितीत अनिलने निर्मिलेल्या बालसाहित्याला राजमान्यता मिळणे ही एक नवी सुरुवात आहे. ही एक नवी शैली आहे. मराठी साहित्याला यापुढील काळात या क्षेत्रात आणखी बरंच काही पाहायला मिळेल. त्यातून अनिलची सर्जनशिलता नाविन्याचं लेणं लेवून चमकेल. बालवाचकाचं मन ओळखून लिहिणे अपेक्षित असलेल्या साहित्याची आज बालवाचकांना या क्षेत्रात खरी गरज आहे.

या लेखनाला नवे संदर्भ लाभणेही गरजेचे आहे. अनिलसारख्या लेखकांमुळे मराठी बालसाहित्यातील ही गरज पूर्ण व्हावी असे वाटते. तसे झाल्यास बदलत्या काळातील बदलत्या गरजांशी बालमानस जोडले जाईल. गेल्या काही दिवसांमध्ये जगापुढील ग्लोबल वॉर्मिंगचे संकट बुलंद झाले आहे. अवघ्या मानव जातीला भेडसावणार्‍या समस्यांमध्ये ग्लोबल वॉर्मिंगची भर पडली असली तरी आपण जागे होत नाही. माणूस नावाचा चंगळवादी भस्मासूर वाढत आहे. या पार्श्वभूमीवर अनिलने लिहिलेल्या या सहजसुंदर पुस्तकाचे महत्त्व आणखी वाढते. हे पुस्तक बालकवर्गाला निसर्गासोबत मैत्री कशी करावी हे सांगते. त्यातून समस्त बालवाचकाला निसर्गावर प्रेम करण्याची किमया अलगद साधता येईल. सभोवतालची सृष्टी टिकायची तर नव्या पिढीमध्ये निसर्गाप्रती जवळीक निर्माण व्हायला हवी. त्या दृष्टिकोनातून ‘सृष्टीत गोष्टीत’चे महत्त्व मोलाचे ठरेल. निसर्गाला, पर्यावरणाला साद घालत अनिलने बालसाहित्याला वर्तमान प्राप्त करून दिले आहे. त्याचा हा प्रयत्न आणि त्यातून वृद्धिगत होणारी बालवाचक-निसर्गाची मैत्री समाज हिताची आहे. म्हणूनच आजच्या प्रसंगी दिलखुलासपणे म्हणावे वाटते की, ‘अनिल, लिहिते रहो !’

(शब्दांकनः मंगेश पाठक – अद्वैत फिचर्स)

— डॉ. अभय बंग

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..