नवीन लेखन...

किल्ले अंकाई टंकाई

Ankai Tankai Forts Near Ahmednagar

अहमदनगर कडून शिर्डी-येवला मार्गे मनमाडला राज्यमार्ग जातो. या मार्गावर येवला आणि मनमाडच्या मधे अंकाई – टंकाई चे जोडकिल्ले उठावलेले आहेत. अहमदनगर मनमाड या रेल्वे मार्गावर अंकाई हे लहानसे रेल्वे स्टेशनही आहे. या रेल्वे स्टेशन पासून दोन-तीन किलोमीटर अंतरावर अंकाई गाव आहे.

अंकाई-टंकाई चा उल्लेख काही ठिकाणी अणकाई – टणकाई असाही केला जातो. हे जोडकिल्ले अजिंठा-सातमाळ रांगेत वसलेले आहेत. अंकाई जवळ ही रांग काहीशी तुटलेली आहे. या तुटलेल्या भागामधूनच गाडीरस्ता आणि रेल्वे मार्ग जातो.

एस.टी.बस रेल्वे तसेच खाजगी वाहनानेही इथपर्यंत पोहोचता येते. रेल्वे स्थानकापासून गावापर्यंत जाण्यासाठी भाडय़ाची वाहने उपलब्ध होतात. अंकाई गावातून हे जोडकिल्ले एकदम दृष्टीस पडतात. या किल्ल्याच्या मधे एक खिंड आहे. दोन्ही किल्ल्यांना जोडणारी ही खिंड दोन्ही कडून भक्कम तटबंदी घालून बंदिस्त करण्यात आली आहे. किल्ल्यांच्या मधील खिंड बंदिस्त करुन गडाचा मार्ग दुर्गम आणि संरक्षित केलेला आहे. अशा प्रकारचे बांधकाम महाराष्ट्रामधे आढळत नाही. असं हे एकमेव बांधकाम आहे.

टंकाईच्या किल्ल्याला एक लेणी आहे. ती गावातून दिसते. या जोड किल्ल्यामधील डावीकडील अंकाई तर उजवी कडील टंकाईचा किल्ला आहे. लेणीकडे जाणार्‍या पायवाटेवर पायर्‍याही केलेल्या आहेत. टंकाईच्या डोंगराला ही लेणी आहे. लेणी प्रथम पाहून नंतर किल्ल्यावर चढाई करणे सोयीचे आहे. लेणी ही जैन धर्मियांची आहे. या लेणीमधे इंद्रदेव, शांतीनाथ, पार्श्वनाथ अशा काही मुर्ती पहाण्यालायक असून कोरीव स्तंभही पहायला मिळतात. या लेणीमधे गणेशाचीही मुर्ती पहायला मिळते. लेणी पाहून किल्ल्याच्या वाटेवर निघावे. साधारण २० मिनिटांमधे आपण अंकाई -टंकाईच्या खिंडीजवळ पोहोचतो. खिंडीतील मार्ग तटबंदीने बंदिस्त केलेला आहे. त्या तटबंदीमधे देखण्या बांधणीचा भक्कम दरवाजा आहे. या दरवाजातून आत आल्यावर आपण तटबंदीने बंदिस्त केलेल्या मोकळ्या जागेत येतो.

अंकाई – टंकाई या जोडदुर्गामधील अंकाईचा दुर्ग महत्त्वाचा आहे. तसा टंकाई हा दुय्यम दुर्ग आहे. मुख्य किल्ल्या जवळ असलेला दुसरा डोंगर हा मुख्य किल्ल्याला बाधक ठरु शकतो. म्हणून तो डोंगर शत्रूच्या ताब्यात जाता कामा नये. म्हणून तो दुर्गम करण्यात येतो अथवा त्यालाही तटबंदीचे शेलापागोटे चढवण्यात येऊन मुख्य किल्ल्यामध्ये समाविष्ठ करण्यात येतो. त्यामुळे टंकाई हा अंकाईचा जोडदुर्ग झालेला आहे. या जोडदुर्गांना जोडणार्‍या खिंडीलाच बंदिस्त केल्यामुळे टंकाईचा प्रवेशमार्ग अंकाईच्या कह्यात आलेला आहे.

अंकाईच्या माथ्यावरुन खिंडीपर्यंत येणार्‍या धारेवरच अंकाईचा चढाईचा मार्ग आहे. या मार्गावर एका पाठोपाठ एक असे पाच दरवाजे बांधलेले आहेत. या दरवाजांमुळे गडावर जाणारा मार्ग सुरक्षीत करण्यात आलेला असून शत्रुसाठी मात्र दुर्धर झालेला आहे. या मार्गाच्या बाजुला डोंगरांमधे काही लेणी कोरलेली आहेत. पाण्याची टाकी ही कोरलेली आहे.ही लेणी अर्धवट कोरलेली दिसतात तर काहींची तोडफोडही झालेली दिसते. या लेणी पाण्याची टाकी मोक्यावरील बुरुज त्यावरील मागगिरीच्या जागा पाहून आपण माथ्यावर येतो. इथून टंकाईच्या मार्गाचे आणि टंकाईचे दर्शन उत्तमप्रकारे होते.

अंकाई माथ्यावर एक टेकडी आहे. या टेकडीला गुहा आहेत. या गुहांना स्थानिक लोक सितागुंफा म्हणतात यातील एका गुहेत अगस्ति ऋषींचे मंदिर आहे. बाजुची गुहा मुक्कामासाठी चांगली आहे. या परिसरात भाविकांचा ओघही खूप असतो. तळे आहे. पश्चिम भागात पठार आहे. या पठारावर मोठे तळे आहे. पश्चिम टोकावर मोठय़ा वाडय़ाचे अवशेष आहेत. वाडय़ाच्या चारही बाजुला असलेल्या तटबंदीमधे कमानी आहेत.

हा परिसर पाहून आपण पुन्हा परतीला लागतो. गडाच्या पठारावर असलेल्या टेकडीवरुन चौफेर न्याहाळता येते. येथून रेल्वे लाईनच्या पलिकडील गोरखनाथाचा डोंगर उत्तम दिसतो. त्याच रांगेमधील कात्रागडाचे टोक दिसते. हडबीची शेंडी म्हणजे हडबीचा थम्सअप च्या आकाराचा सुळका लक्षवेधक आहे.

पुन्हा पायर्‍याउतरुन आपण खिंडीत येतो. येथून टंकाईवर चढाई करुन आपण दरवाजातून माथ्यावर पोहोचतो. येथून अंकाईचे आणि खिंडीतून बांधलेल्या तटबंदी दरवाजाचे होणारे दर्शन आपल्याला खिळवून ठेवते. टंकाईच्या विस्तृत पठारावर पाण्याचे टाके शिवलिंग, नंदी, पाण्याचा तलाव असे तुरळक अवशेष पहायला मिळतात. गडफेरी करुन आपण पुन्हा खिंडीतून परतीच्या मार्गाला लागतो.

— प्रमोद मांडे
(महान्यूज वरुन साभार)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..