१९८१ सालातील गोष्ट आहे. ‘एक दुजे के लिये’ चित्रपटाचं शुटींग मद्रासमध्ये चालू होतं. त्यातील एका कामासाठी मुंबईहून मराठीतील एका कला दिग्दर्शकाला तीन दिवसांसाठी बोलावलं गेलं..
दक्षिणेकडील सिनेजगतात चित्रपटातील कलाकारांइतकच तंत्रज्ञांना देखील आपलेपणानं वागवलं जातं.. हे कला दिग्दर्शक मद्रासला गेले. त्यांची राहण्याची व इतर व्यवस्था निर्मात्याने चोख ठेवली होती. त्यांच्याकडे कामासाठी आलेल्या व्यक्तीची बडदास्त ठेवण्याची त्यांची एक खास पद्धत आहे. कामासाठी आलेल्या व्यक्तीच्या आवडी निवडी, सवयी यांची ते आधीच माहिती काढून ठेवतात. विमानतळावर उतरल्यापासून एक माणूस व गाडी त्या व्यक्तीच्या दिमतीला ठेवलेली असते.
या कला दिग्दर्शकाला विमानतळावरुन मुक्कामाच्या ठिकाणी गाडी घेऊन गेली. रुममध्ये गेल्यानंतर त्या दिवशी त्याला विश्रांती घ्यायला सांगितली. रात्री त्यांच्या खास आवडीच्या जेवणाची व्यवस्था, निर्मात्याने केलेली होती.
दुसरा दिवस हा कामाचा दिवस होता. त्यांना ती रुम दाखवली. ज्या रुममध्ये शुटींग होणार होते.. त्या रुममध्ये त्यांना ‘वासु सपना’ एवढीच अक्षरे चारही भिंती व छतावरही कुठेही कोरी जागा न सोडता, वेगवेगळ्या रंगांत लिहायची होती. त्यांनी ते काम वेळेत पूर्ण केले.
तिसरे दिवशी त्यांना मुंबईला परतायचे होते. सकाळीच निर्मात्याने भेटण्यासाठी कला दिग्दर्शकाला निरोप पाठवला. ऑफिसमध्ये जाऊन बसल्यावर निर्माते, कला दिग्दर्शकाला म्हणाले, ‘तुमच्यासोबत असलेल्या माणसाबरोबर तुम्ही आता गाडीने मार्केटमध्ये शाॅपिंगसाठी जाऊन या. तुम्हाला जे काही हवं असेल ते निःसंकोचपणे खरेदी करा. त्या वस्तूंची किंमत, बरोबर असलेला आमचा माणूस पेड करेल. आपण निवांतपणे खरेदी झाल्यावर मला पुन्हा येऊन भेटा..
कला दिग्दर्शक भारावून गेले. आजपर्यंतच्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये कोणत्याही निर्मात्याने त्यांना एवढी आपुलकी कधीही दाखवलेली नव्हती. ते मार्केटमध्ये गेले, काही कलात्मक वस्तू खरेदी करुन परतले.
आता निघायची वेळ झाली होती. कला दिग्दर्शक, खुर्चीवर बसल्यानंतर निर्मात्यांनी विचारले, ‘आमच्याकडे काम करुन आपण समाधानी आहात ना? काही त्रास झाला असेल तर निःसंकोचपणे सांगू शकता..’ एवढे बोलून त्यांनी कामाच्या मानधनाचं पाकीट, त्यांच्या हातात दिलं. कला दिग्दर्शकानं पाहिलं, तर दिलेलं ‘मानधन’ हे अपेक्षेपेक्षा बरंच अधिक होतं. त्यानंतर निर्मात्याने एक गिफ्टचा बाॅक्स कला दिग्दर्शकाच्या हातात दिल्यावर, त्याला काय बोलावे हे सुचेनासं झालं. कला दिग्दर्शकाच्या चेहऱ्यावरील आश्र्चर्याचे भाव पाहून निर्मातेच हिंदीत म्हणाले, ‘आपके घरमें हमारी जो बेटी है ना, उसी के लिये एक बाप ने ये गिफ्ट दी है..’ कला दिग्दर्शक भारावून गेला. त्यांना नमस्कार करुन तो मुंबईला परतला.
घरी गेल्यावर त्याने आपल्या पत्नीच्या हातात तो बाॅक्स दिला. तिने उघडून पाहिलं तर त्यामध्ये एका प्रेमळ वडिलांनी लाडक्या लेकीसाठी दिलेली, रुंद सोनेरी काठाची, किंमती सिल्कची साडी होती..!
ते कला दिग्दर्शक म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतील सुवर्णकाळाचे एकमेव साक्षीदार, सुबोध गुरूजी!! आणि ते निर्माते म्हणजे दक्षिणेकडील चित्रपटसृष्टीचे पितामह, एल. व्ही. प्रसाद!!
एल. व्ही. प्रल्हाद यांनी मूकपटांपासून चित्रपटात अभिनय केलेला आहे. नंतर पहिला बोलपट, ‘आलमआरा’ मध्येही काम केले आहे. नंतर त्यांनी सहायक दिग्दर्शक म्हणून अनेक चित्रपट केले.
१९६१ च्या ‘ससुराल’ या हिंदी चित्रपटापासून त्यांची यशस्वी चित्रपटांची कारकिर्द सुरु झाली. त्यानंतर मिलन, खिलौना, जिने की राह, बिदाई, एक दुजे के लिये अशा अनेक चित्रपटांनी त्यांना यशाच्या शिखरावर नेले.
तेलगु, तामिळ, कन्नड, मल्याळम, बंगाली व हिंदी भाषेत त्यांनी अनेक चित्रपटांची निर्मिती व दिग्दर्शन केलेले आहे. त्यांना ‘खिलौना’ चित्रपटासाठी मिळालेल्या सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा फिल्मफेअर पुरस्कारा बरोबरच अनेक नामवंत चित्रसंस्थांचे असंख्य पुरस्कार, जीवनगौरव पुरस्कार मिळाले आहेतच शिवाय चित्रपटसृष्टीतील भरीव योगदानाबद्दल, सर्वोच्च असा दादासाहेब फाळके पुरस्कार १९८२ साली मिळालेला आहे..
१९९४ साली एल. व्ही. प्रसाद गेले. मात्र त्यांनी लावलेल्या ‘प्रसाद फिल्म्स’ या रोपाचा त्यांच्या मुलांनी देशात व परदेशात चित्रपटासंबंधी अकरा कंपन्या चालू करुन, वटवृक्ष निर्माण केलेला आहे. भारत सरकारने त्यांच्या सन्मानार्थ टपालाचे तिकीट काढून त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केलेली आहे..
भारतीय चित्रपटाच्या शंभर वर्षांच्या इतिहासात, वडिलकीच्या नात्यानं आपल्या कलाकार, तंत्रज्ञांना प्रेम देणाऱ्या एल. व्ही. प्रसाद यांचं नाव सुवर्णाक्षरांत कोरलं जाईल…
© सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
१८-८-२१.
Leave a Reply