नवीन लेखन...

वारणेचा वाघ : अण्णाभाऊ साठे

१९८२ मधील ऑगष्टचा महिना. त्यावेळी मी मुंबईच्या जे.जे. इन्स्टिट्युट ऑफ अप्लाईड आर्ट मध्ये तिसऱ्या वर्षात शिकत होतो. अचानक मुंबई पोलिसांचा स्ट्राईक सुरू झाला. मुंबईतील सर्व दळवळण बंद झाले. लोकल, बेस्ट गाड्या, टॅक्सीज. कॉलेजमध्ये आम्हाला सांगितले की-ज्यानां शक्य आहे त्यानां लगेच घरी जावे. रस्त्यावर मिलट्रीच्या व्हॅन फिरू लागल्या. आमचे होस्टेल बांद्र्याला होते. हार्बर किंवा पश्चिम रेल्वे लोकलने आम्ही ये जा करत असू. त्यामुळे आमच्या समोर दोनच पर्याय होते.एक कॉलेजला थांबणे किंवा पायी होस्टेल गाठणे. होस्टेलची भरपूर मूले असल्यामुळे आम्ही सर्वांनी पायी जायचे ठरवले आणि हार्बर लाईनच्या रेल्वे ट्रॅकने चालत निघालो. मधले काही स्टेशन वगळता दोन्ही बाजूला अगदी ट्रॅकला लागूनच मोठी झोपडपट्टी आहे. लोकलने जाता येता रोज प्रवास करतानां अनेकांच्या चेहऱ्यावर या झोपडपट्टीवासियां बद्दलच्या तुच्छतेच्या भावना स्पष्ट दिसत. गंमत म्हणजे झोपडपट्टीतील हेच रहिवाशी आम्हा पायी जाणाऱ्या सर्वांना चहा,नाश्ता, बिस्किटे देत होते. मनात कुठे तरी अपराधी भाव प्रकटले. तेव्हांचे बोरीबंदर (आताचे सिएसटी) ते बांद्रा हे अंतर १४ कि.मी. दुपारी १२ च्या आसपास निघालेलो आम्ही बांद्र्याला सातच्या आसपास पोहचलो. पायाची पार ऐशीतैशी झाली होती.
आज मला हे सर्व आठवण्याचे कारणही तसेच महत्वाचे आहे. सध्याच्या सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात वाटेगाव नावाचे गाव आहे. पूर्वी हे गाव कुरूंदवाड नावाच्या संस्थानात होते. भाऊराव आणि वालूबाई साठे हे याच गावात आपल्या तुकाराम नावाच्या मुलां बरोबर रहात. घरात अठरा विश्वे दारिदय त्यात गावकुसा बाहेरचं वेदनादायी जगणं. क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या क्रांतीकारी भाषणाने सर्व परीसर ढवळून निघालेला काळ होता तो. तुकाराम तेव्हा ११ वर्षांचा होता आणि गावाकडे दुष्काळ पडला. आता खायचं काय आणि जगायचं कसं? त्यावेळी सर्वांनाच मुंबईचा आधार वाटत असे. पोटाला नक्की काही तरी काम मिळत असे. पण मुंबईला पोहचायचं कसं? खिशात तर दमडी नाही !!!! शेवटी भाऊराव आपल्या बायको मुलाला घेऊन पायीच निघाले. २२७ मैलांचा पायी प्रवास करून हे कुटूंब मुंबईल पोहचले….१४ कि.मी.च्या बोरीबंदर- बांद्रा प्रवासाने आमची वाट लावली मग एवढा मोठा प्रवास या कोवळ्या तुकारामाने कसा केला असेल? तो कदाचित यासाठी केला असेल की पूढे त्याला रशियाचे आमंत्रण मिळणार होते.

भायखळ्याच्या चाँदबिबी चाळीत या कुटूंबाला निवारा मिळाला. वडिलांच्या आग्रहामुळे तुकारामचे शिक्षण सुरू झाले होते खरे पण मागासवर्गीय मुलांना शाळेच्या आत बसायची परवानगी नव्हती त्यामुळे तुकाराम शाळेत रमला नाही. मुंबईत फिरताना दोन गोष्टींकडे तो आकर्षिला गेले, एक म्हणजे विविध राजकीय संघटना आणि दुसरे म्हणजे मूक चित्रपट. भविष्यात हाच किरकोळ देहयष्टी लाभलेला मुलगा आपल्या साहित्याने सर्व सारस्वतांची दखल घेण्यास भाग पाडणार होता. आणि तसेच घडले देखिल. वाटेगावातल्या गावकुसा बाहेरचा तुकाराम साठे स्वत:च्या प्रचंड कर्तृत्वाने अण्णाभाऊ साठे बनला. अण्णा अंर्तबाहय कम्युनिस्ट होते. पक्षाच्या सभांचे आयोजन करणे, वॉलपेंटिंग करणे, हॅण्डबिले वाटणे, मोर्चे काढणे, छोट्या-मोठ्या सभेसमोर गोष्टी सांगणे, पोवाडे, लोकगीते म्हणून दाखविणे या सर्व गोष्टींमुळे कम्युनिस्ट वर्तुळात ते सर्वांना एकदम हवेहवेसे झाले. याच काळात ते सर्वाचे आवडते “अण्णाभाऊ” झाले. अण्णाभाऊचा अवाका प्रचंड मोठा. महाराष्ट्राला ते सर्वाघिक शाहिर म्हणून जरी परिचित असले तरी त्यांचे अनेक पैलू होते. त्यांच्या प्रत्येक पैलूवर स्वतंत्र लेख होऊ शकतील. पण मला त्यांचा भावलेला सर्वात मोठा पैलू म्हणजे त्यांच्या कादंबऱ्या आणि कादंबऱ्यावर निर्मित् झालेले मराठी चित्रपट.
अण्णाभाऊनी ग्रामीण व्यवस्थेचे अतिशय सुक्ष्मपणे निरिक्षण केले होते. तेथील व्यवस्थेचे चटकेही अनुभवले होते. त्यामुळे त्यांच्या कथा व कादंबरी लेखनात एक सहजता होती. कल्पनेने पात्र निर्माण करायची गरज त्यानां कधीच पडली नाही. १९६१ मध्ये रेखा फिल्मस ने सर्वप्रथम त्यांच्या “वैजयंता” या कादंबरीवर याच नावाचा चित्रपट काढला. याचे मूख्य निर्माते गजानन जहागिरदार हे चित्रपटसृष्टीतले मोठे नाव होते. ते निर्माते आणि दिग्दर्शक होते. पटकथा-संवाद व्यकंटेश माडगुळकर तर संगीत वसंत पवार यांचे होते. म्हणजे सर्वच दिग्गज मंडळी होती. कलाकारात अधिक शिरोडकर, अरुण सरनाईक, गजानन जागीरदार, जयश्री गडकर, दत्तोपंत आंग्रे, प्रभाकर मुजुमदार, रत्नमाला., लीला गांधी, शरद तळवलकर असा ताफा होता. ‘वैजयंता’ ही गजरा कलावंतीणीची मुलगी. एका उपेक्षित पण तितक्याच तडफदार स्त्रीची ही व्यक्तरेखा अण्णाभाऊनी अत्यंत ताकदीने रेखाटली होती. चित्रपट गाजला आणि चालला देखिल. मराठी चित्रपटसृष्टीला एक दमदार लेखक मिळाला. १९६९ मध्ये त्यांच्या तिन कादंबऱ्यावर आधारीत तिन चित्रपट आले. आवडी (टीळा लाविते मी रक्ताचा), माकडीचा माळ (डोंगरची मैना),चिखलातले कमळ (मुरळी मल्हारी रायाची). हे तिनही चित्रपट तुफान चालले. “डोंगरची मैना” अनंत माने यांनी दिग्दर्शीत केला होता. पटकथा-संवाद शंकर पाटील, गीते जगदिश खेबुडकर, संगीत राम कदम आणि अरुण सरनाईक, गुलाब मोकाशी, चित्रा, जयश्री गडकर, दादा साळवी, निळू फुले, बर्ची बहाद्दर, राम नगरकर अशी तगडी कलावंत मंडळी. मला स्वत:लाही हा चित्रपट खूप आवडला होता. अण्णाभाऊ स्वत: तमाशात होते, स्वत: उत्तम शाहीर होते, स्वत:ची अशी ठाम विचारसरणी होती, वाचनाचा आणि निरीक्षणाचा अनुभव होता त्यामुळे त्यांच्या कादबंरीतली सर्व पात्रे रसरशीत होती. खोटेपणाचा कसलाच आव नव्हता की बेगडी कृत्रीमपणा नव्हता. त्यामुळे त्यांचे साहित्य चित्रपटांचा विषय होऊ शकले……
अण्णाभाऊची “फकिरा” ही सर्वाधिक गाजलेली कादंबरी होय. या कादंबरीच्या १६ आवृत्तया प्रकाशीत झाल्या. १९६३ मध्ये चित्रनिकेतन या संस्थेने ही कादंबरी रूपेरी पडद्यावर आणली. अण्णा भाऊ साठे जेव्हा मुंबईच्या ‘माटुंगा लेबर कॅम्प’ या दलित-शोषितांच्या वस्तीत कम्युनिस्ट चळवळीत कार्य करू लागले तेव्हा खर्‍या अर्थाने त्यांचे विचार क्रांतिकारक होऊ लागले. त्यावेळी लेबर कॅम्पमधील प्रमुख कम्युनिस्ट नेते/कार्यकर्ते होते आर.बी. मोरे, के.एम. साळवी, शंकर नारायण पगारे. मार्क्‍सवादी विचारांने अण्णाभाऊ प्रभवित झाले ते याच काळात. ईथेच त्यांनी पहिले गाणे लेबर कॅम्पमधील मच्छरावर लिहिले. याच लेबर कॅम्पमध्ये अण्णा भाऊ साठे, शाहीर अमर शेख व शाहीर द.ना. गव्हाणकर या त्रयींनी कम्युनिस्ट पक्षाच्या मार्गदर्शनाखाली लाल बावटा कलापथकाची १९४४ साली स्थापना केली होती. या ठिकाणी त्याची लेखणी खऱ्या अर्थाने फुलत गेली आणि धारदार पण होत गेली. अण्णा भाऊंच्या ‘इमानदार’या नाटकाचा हिंदी प्रयोग करण्यात सुप्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेते कॉ. बलराज साहनी यांनी पुढाकार घेतला होता. त्यावेळी कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित ‘इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन’(इप्टा) या संस्थेतील ते महत्वाचे अभिनेते होते. त्या नाटकात अभिनेते ए.के. हंगल यांनी महत्त्वाची भूमिका केली होती. पूढे अण्णाभाऊच्या साहित्य समर्पित वृत्तीने ‘इप्टा’चे अखिल भारतीय अध्यक्षपदही मिळाले. यापूर्वी एकाही मराठी माणसाला हा मान मिळाला नव्हता. याच ठिकाणी त्यांची ओळख ख्वाजा अहमद अब्बास या लेखक निर्माता दिग्दर्शकांशी झाली. फकिराची पटकथा ज्या तिघांनी लिहीली होती त्यात के.ए. अब्बास हे ही एक होते. कुमार चंद्रशेखर यांनी हा चित्रपट दिग्दर्शीत केला होता. १९१० मधील दुष्काळाचे चित्रण यात आले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांनी अपराधी जमाती कायदा (१८७१) आणून त्यात १९८ जमातींचा समावेश केला होता. या जाती जन्मजात अपराधी असल्याचे जाहीर केले होते. ब्रिटिशांनी निर्माण केलेल्या या कायद्या विरोधात फकिरा आपल्या मांग जातीच्या सहकाऱ्यानां सोबत घेऊन् लढला होता. मात्र आजही विषण्ण करणारी गोष्ट म्हणजे स्वातंत्र्यानंतर अपराधी जमाती कायद्याचे नाव बदलून भारत सरकारने ३१ आगस्ट १९५२ मध्ये ‘सराईत गुन्हेगारी कायदा’ असा बदल केला खरा परंतु नाव बदल करूनही कायद्यातील तरतुदी कायम आहेत. आजही या जमातीच्या बहुतांश बाया-माणसांवर गुन्हे दाखल होत असतात. फकिरात स्वत: अण्णाभाऊनी देखिल काम केले आहे व संवाद लेखनही केले आहे.

१९७० मध्ये “वारणेचा वाघ” आला. ब्रिटिश सैन्यात नेमबाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सत्तूने नंतर ब्रिटिश सत्तेला सळो की पळो करून सोडले. नतंर हाच सत्तू वारणेचा वाघ म्हणून ओळखला गेला. हा सत्तू बघतानां मला नेहमी बिरसा मुंडा आठवत असे. ज्याला सत्तूनं त्याच्या आईच्या पोटात वाढवला,त्यानेच सत्तूचा खून केला. बिरसाला देखिल त्याच्याच भाईबंदाने पकडून ब्रिटिशाच्या हवाली केले होते. परकिय शत्रूपेक्षा असे घरभेदी लोक हे नेहमीच देशाचे महाभयंकर शत्रू असतात. यांचे वशंज आजही आम्हाला बघावयास मिळतात. ‘अलगूज’ कादंबरीवर आधारीत “अशी ही साताऱ्याची तऱ्हा” १९७४ मध्ये प्रदर्शीत झाला होता. अण्णाभाऊंच्या निधना नंतर बऱ्याच वर्षांनी म्हणजे २०१० मध्ये त्यांच्या “चित्रा” या कादंबरीवर आधारीत याच नावाचा चित्रपट आला. पटकथा-संवाद राज काझी यांचे तर दिग्दर्शन राज कुबेर यांचे होते. निर्माता एम.अली शेख यांच्या या चित्रपटात अंकुश चौधरी, अंजली उजवणे, अतुल इंगळे, कुलदिप पवार, डॉ.विलास उजवणे, मधु कांबीकर इत्यादी कलावंताच्या भूमिका होत्या. अण्णाभाऊंच्या एकूण आठ कादंबऱ्यावर चित्रपट निर्माण झाले. मराठी चित्रपटातील हा एक विक्रमच म्हटला पाहिजे की एकाच लेखकाच्या इतक्या कादंबऱ्या चित्रपटाच्या विषय होऊ शकल्या.
चित्रपटांसाठी नाटयमय घटनां फार आवश्यक असतात. अण्णाभाऊंच्या कादंबऱ्यातील प्रत्येक घटना आपल्या समोर एक चित्र उभे करतात. पटकथा म्हणजे असे छोटे प्रसंगच असतात. ज्याला चित्रपट भाषेत scene असे म्हटले जाते तर अनेक छोटे छोटे shot मिळून एक scene तयार होतो. अण्णाभाऊच्यां कांदबरीत असे नाट्यमय सिन असत ज्यामुळे दिग्दर्शाकांचे निम्मे काम आगोदरच पूर्ण होई. घटना वास्तवादी असत आणि या प्रत्येक प्रसंगातुन ते आपली भूमिका स्पष्टपणे मांडत. त्यात कसलाही दिखावूपणा वा नाटकीपणा नसल्यामुळे ते सर्वसामान्य प्रेक्षकांच्या थेट मनाला भिडत असत. भारतीय संस्कृतीतील “जात” हे वास्तव त्यांच्या इतके त्यांच्या काळात प्रभावीपणे मोजक्याच साहित्यकारानां मांडता आले. ते जर अधिक जगले असते तर चित्रपट कथानां कदाचित वेगळे आयामही मिळाले असते.  अण्णाभाऊंचा धारदार आवाज, त्यांचे पाठांतर, पेटी, तबला, ढोलकी, बुलबुल ही वाद्ये वाजवण्याची कला या गुणांमुळे जनमानसात शाहीर म्हणून ते प्रचंड लोकप्रिय होते. बंगालचा दुष्काळ, तेलंगण संग्राम, पंजाब-दिल्लीचा पोवाडा, अंमळनेरचे हुतात्मे, काळ्या बाजाराचा पोवाडा, ’माझी मैना’ हा संयुक्त महाराष्ट्र चळवळीवरील छक्कड, कामगार चळवळीवरील ‘एकजुटीचा नेता’ ते हिटलरच्या फॅसिझम विरोधात स्टॅलिनग्राडचा पोवाडा, बर्लिनचा पोवाडा, चिनी क्रांतीवरील ‘चिनी जनांची मुक्तिसेना’ हे गौरवगान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील गाजलेले ‘जग बदल घालुनी घाव-सांगुनी गेले भीमराव’ अशी अनेक गाणी, कवने, पोवाडे अण्णा भाऊ साठे यांनी रचले. वाटेगाव ते मुंबई असा चालत पायी प्रवास करणारे अण्णाभाऊ नंतर आत्मविश्वासाने एकटेच विमान प्रवास करुन रशियाला गेले तत्पूर्वीच त्यांची `चित्रा’ ही कादंबरी रशियन भाषेत प्रकाशित झाली होती. तेथे त्यांनी ‘शिवचरित्र’ पोवाड्यातून सांगितले त्याचे रशियन भाषेत भाषांतर झाले. रशियात गेल्यानंतर अण्णांचं चांगलं स्वागत झालं. भारतात परत आल्यावर त्यावर आधारित ‘माझा रशियाचा प्रवास’ हे प्रवासवर्णनही त्यांनी लिहिलं.

तर असा हा बहुमूखी प्रतिभावंत फार कमी काळ जगला. आताच्या काळा प्रमाणे आपल्या आयुष्याचे जर २५ वर्षे या प्रमाणे तीन टप्पे केले तर आपले सुरूवातीची २५ वर्षे पदवी/पदविका प्राप्त करण्यातच जातात. अण्णाभाऊ गेले तेव्हा ते फक्त ४९ वर्षांचे होते. म्हणजे त्यांची किशोर अवस्थेतील १४ वर्षे वजा केली तर ३५ वर्षे शिल्लक राहातात ज्याकाळात त्यांनी ३५ कादंबर्‍या, ८ पटकथा, ३ नाटके, एक प्रवासवर्णन, १३ कथासंग्रह, १४ लोकनाट्ये, १० प्रसिद्ध पोवाडे व १२ उपहासात्मक लेख लिहित चळवळीही केल्या. हे सर्व करतानां एकांत, निवांत, टेबल खूर्ची, गादी,लोड तक्के, कपाटं अशा कुठल्याच गोष्टी त्यांच्या जवळ नव्हत्या, होती ती फक्त प्रतिभा !!!!

या लोक विलक्षण कलावंताला मानाचा मूजरा.

-दासू भगत (१८ जुलै २०१७)

Avatar
About दासू भगत 34 Articles
मी मुळ नांदेड या श्हराचा असून सध्या औरंगाबादला स्थयिक आहे. मुंबईतील सर जे.जे. इन्स्टीट्यूट ऑफ अप्लाईड आर्ट येथून उपयोजित कलेतील डिप्लोमा. चित्रपट हे माझ्या आवडीचा विषय. काही काळ चित्रपटासाठी टायटल्स, कला दिग्दर्शन म्हणून काही चित्रपट केले आहेत. ….सध्या औरंगाबाद येथे दिव्य मराठी या दैनिकात मुलांसाठीच्या पानाचे संपादन करतो..

12 Comments on वारणेचा वाघ : अण्णाभाऊ साठे

  1. फकीरा वाचली,ऐकली आता बघण्याची इच्छा आहे, जर आपल्याकडे link असेल तर कृपया शेअर करावी??

  2. अण्णा खालील चित्रपट कुठे पहाता येतील “Youtube ” वर उपलब्ध आहेत का ?
    १ वैजयंता ‘ या कादंबरी वरून निघालेला चित्रपट ‘ वैजयंता ‘ साल – १९६१ कंपनी – रेखा फिल्म्स
    २ ‘ आवडी’ या कादंबरी वरून निघालेला चित्रपट ‘टिळा लावते मी रक्ताचा’ साल –१९६९ कंपनी-चित्र ज्योत
    ३ ‘माकडीचा माळ’ या कादंबरी वरून निघालेला चित्रपट ‘डोंगरची मेना’ साल – १९६९ कंपनी – विलास चित्र
    ४ ’ फकिरा’ या कादंबरी वरून निघालेला चित्रपट ‘फकिरा’ कंपनी – चित्रनिकेतन

  3. Great…
    आण्णाभाऊं बद्दल भरपूर गोष्टी तुमच्या या लेखातून समजल्या…

      • अतिशय महत्वपूर्ण माहीती मिळाली अण्णा भाऊंचा संघर्ष मय प्रवास आपल्या माध्यमातून वाचनास मिळाला धन्य झालो
        मी पण नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्याचा आहे
        सिद्धार्थ कांबळे बेळीकर

      • प्रिय दासूजी,
        आज फार दिवसांनी आपली सदरील लेखाच्या माध्यमातून आपली आठवण झाली. मला तुमच्या बद्दल कुठेही समजून न आल्याने कारण शशीची काही वैयक्तिक कारणाने भेट होणे नाही. परंतु आज अचानक हा लेख वाचण्यात आला आणि पूर्वीचा काळ भराभर डोळ्यासमोरून सरकला आनंदहि झाला व दु:खही झाले. पण लेख वाचून फारच बरे वाटले. मी ठाण्यातच रहात आहे. कधी तिकडे आलास तर नक्की ये, टाळू नकोस.आणि हो दिव्य मराठी याचे संपादक श्री. संजयजी आवटे सर, यांचा ‘साम मराठी’ या वाहिनी वरील”आवाज महाराष्ट्राचा” हा कार्यक्रम आमच्या सर्व परिवाराला फारच आवडत असे. पण तो काही कारणाने बंद झाला, असो.
        सध्या तुझा नंबर दिलास तर आवर्जून फोन करेन.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..