नवीन लेखन...

अन्नपूर्णा देवीची गोष्ट

(जपानची पुराणकथा)

फार फार वर्षांपूर्वी आकाशाच्याही वर तोका आमाहारा येथे विश्व निर्मात्याचे घर होते. त्याकाळी ‘अमेनो मिनाकानुसि’ नावाच्या देवाचा सर्वत्र संचार होता.

‘अमेनो मिनाकानुसि’ या देवाने अनेक देव-देवता निर्माण केल्या. या देवी-देवतांमध्ये ‘इजानागि’ आणि ‘इजानामि’ या दोन देवी देवतांचाही समावेश होता.

एके दिवशी अमेनोमिनाकानुसिने इजानागि आणि इजानामि यांना ‘अमेनोहोको’ नावाचे शस्त्र दिले आणि सांगितले, ‘मी आता या जगातील सर्व वस्तू, प्राणिमात्र बनवण्यास तयार आहे. तुम्ही फक्त एका नव्या देशाची निर्मिती करा आणि त्याला व्यवस्थित आकार द्या!’ परमेश्वराच्या आज्ञेनुसार दोघांनीही शस्त्रं उचलली आणि ढगांवर बसून प्रवासाला निघाले. काही अंतरावरच एका विशाल पक्षाने त्यांना अडवले; इजानागीने हातातील शस्त्र गोल गोल फिरवले आणि ढग बाजूला झाले. एक सुंदर पूल दिसू लागला. इजानागिने इजानामिचा हात धरला. दोघेही पुलावर उतरले. त्यांनी पुलाखाली पाहिले परंतु त्यांना काहीच दिसत नव्हते. इजानागिने पुन्हा शस्त्र गोल गोल फिरवले आणि खालून मधुर आवाज ऐकू आला. इजानागिने शस्त्र वर उचलले तर शस्त्र खारट पण्यात भिजले होते. पाण्याचे थेंबही टपकत होते. आणि क्षणार्धात धुकं विरलं ! इजानागि आणि इजानामिने पाहिलं तर जिथे खारट पाण्याचे थेंब टपकले होते तिथे एक प्रदेश निर्माण झाला होता. दोघेही त्या प्रदेशावर उतरले. तिथे ‘आमेनो मिहा सिरा’ नावाचा एक खांब होता. या खांबाच्या डाव्या बाजूला इजानागि आणि उजव्या बाजूला इजानामि उभे राहिले. दोघांनी प्रेमाने एकमेकांचे हात हातात घेतले. थोड्याच वेळात तिथेच झोपी गेले.

सूर्योदयाबरोबर दोघे उठले. सृष्टी-सौंदर्याने नटलेला प्रदेश पाहून दोघांनाही खूप आनंद झाला. या आनंदातच ते चालत राहिले. चालता चालता त्या प्रदेशाला त्यांनी ‘आवाज’ असे नावही दिले. या प्रदेशाच्या एका पर्वतावर चढले. चोहिकडे नजर फि रवताच दूरवर समुद्राच्या लाटा उसळत होत्या. काही क्षणातच चार नव्या प्रदेशांची निर्मिती झाली. हे सर्व प्रदेश पहिल्या प्रवासापेक्षा मोठे होते. त्यांना ‘सिकोकु’ नाव दिले. इजानागि आणि इजानामि ‘सिकोकु’ च्या एका उंच पहाडावर चढून पुन्हा चोहोकडे पाहू लागले. काही क्षणातच ‘ओकिक्यूम्यू’ या नव्या प्रदेशांची निर्मिती झाली. अशा रितीने एका मागोमग एक असे ‘इकि’, ‘त्सुसिमा’ आणि ‘सादो’ नावाच्या प्रदेशांची निर्मिती झाली. सगळ्यात शेवटी ‘होश्यू’ नावाच्या प्रदेशाची निर्मिती झाली. अशा या सर्व आठ प्रदेशांनी मिळून ‘ओओयासिमा’ नावाचा देश बनला. ‘ओओयासिमा’ म्हणजेच आजचा ‘जपान’ देश !

‘जपान’ देशाच्या निर्मितीनंतर या देशाच्या शासन व्यवस्थेसाठी पस्तीस देव-देवतांची निर्मिती करण्यात आली. या सगळ्यांच्या पालन पोषणासाठी दजानामिने इतर अनेक वस्तूंचीही निर्मिती केली.

एके दिवशी इजानामिचा मृत्यू झाला. इजानागि शोकाकुल झाला. इजानामि या दुःखातच इजानामिचा पाठलाग करीत देवी जगतात शिरला. या मृत्यूलोकात इजानागिला बरेचसे मृतदेह दिसले. तिथे अनेक राक्षसिणी बसल्या होत्या. भयभीत झालेल्या इजानागिने इजानामिचा अखेरचा निरोप घेतला आणि ओओयासिमाला (जपानला) परत आला. नदी किनाऱ्यावर हातातील काठी उभी केली. अंगावरील कपडे एकेक करून फेकले. या कपड्यांमधून, छडीतून एकेक देवता निर्माण झाली. नदीत स्नान केले. त्यानंतर समुद्रावर गेला.तिथेही स्नान करताच समुद्ररक्षक देवाची निर्मिती झाली. यानंतर त्याला गाढ झोप लागली.

दुसऱ्या दिवशी आंघोळ करताच तो शरीराने आणि मनानेही पवित्र झाला.आमेनोमिनाकानुसि म्हणजे सत्यदेव. या सत्यदेवाच्या आज्ञेनुसार पवित्र देशाची निर्मिती करणाऱ्या इजानागिने उजव्या हाताने उजवा डोळा धुताच ‘आमानेरासु’ नावाच्या महादेवीचा जन्म झाला. आमोनेमिना प्रमाणेच अंधःकाराचा नाश करणारी सुर्यासारखीच ही ‘कानुशि’ पवित्र देवी आहे. त्याचवेळी आकाशवाणी झाली ‘हे देवी तू सूर्याचा अवतार आहेस.’ ‘नाकामा गाहारा’चं तू शासन करशील!

यानंतर इजानागिने डावा डोळा धुतला आणि ‘त्सुकियोमि’ नावाची देवता निर्माण झाली. हाच चंद्राचा अवतार मानला जातो. त्यामुळे रात्र प्रकाशमान होऊ लागली. अखेरीस इजानागिने नाक साफ करताच सुसानोओ हा बलशाली आणि वीर देव निर्माण झाला. या देवाकडे समुद्राचे पर्यायाने सृष्टीचे शासन कार्य सोपवले. परंतु ‘सुसानोओ कुठलं ही काम न करता फक्त रडतच राहिला.

इजानागिने रडण्याचे कारण विचारले. सुसानोओ म्हणाला, ‘ मला यमलोकात आईला भेटायला जायचे आहे. ‘ इजानागि सुसानेओला समजावित म्हणाला, यमलोक अंधःकार आणि मृत्यूचा देश आहे. त्यामुळे तिथे जाणे योग्य नाही परंतु सुसानोओने आपला हट्ट सोडला नाही. तो रडतच होता. इजानागिला सुसानोओचा खूप राग आला. रागातच इजानागि म्हणाला, ‘तुझ्यासारख्या हट्टी लोकांचं इथं काही काम नाही. तू इथून चालता हो ! पुन्हा कधीच परत येऊ नकोस!

रडत रडत सुसानेओ आपल्या आईला भेटायला निघाला. परंतु आपले पितृदेव आपल्याला परत भेटणार नाहीत याचंही दुःख वाटत होतं ! त्यामुळे सुसानोओने आमानेरासु या आपल्या मोठ्या बहिणीकडे जायचे ठरवले. आणि आकाश मार्गाकडे चालू लागला. सुसानोओ आमातेरासु’वर आक्रमण करेल या भीतीने ताकामागाहारा देवतेने आमानेरासुचे केस-वस्त्र बदलून रत्नांनी पुरुषरुपात सजवले. परंतु सुसानोओने आमातेरासुला विनम्रपणे अभिवादन केले. आकाशात कां आलास? असे आमातेरासुने विचारताच सुसानोओ म्हणाला, ‘आईच्या भेटीसाठी रडत होतो. म्हणून पितृदेवांनी निर्वासित केलं.

त्यामुळे मोठ्या बहिणीची आठवण झाली. भावाच्या भेटीचा आनंद व्यक्त करीत महादेवी आमातेरासु म्हणाली, ‘तुझ्या मनात कुठलाही वाईट विचार नाही.

किंवा तू कुठल्याही दुष्ट भावनेने इथे आलेला नाहीस याची कबुली या सगळ्यांना दे. त्यानंतरच तू इथे राहू शकतोस! सुसानोओ आपली कबुली देतांना म्हणाला, ‘मी मनाने निर्मळ आणि पवित्र आहे. हे सिद्ध करण्यासाठी देवात्म्यांना बोलावून बालकांना जन्म देण्याचं आश्वासन देतो.

महादेवी आमातेरासु आणि सुसानोओ आकाश गंगेच्या दोन्ही किनाऱ्यांना उभे राहिले. महादेवी आमातेरासु सुसानोओला म्हणाली, ‘तू माझा लाडका भाऊ आहेस. त्यामुळे तुझी सगळ्यात मौल्यवान अशी तलवार तू मला दे.’ भावाचेही बहिणीवर प्रेम असल्यामुळे भावाने आपली प्राणप्रिय तलवार बहिणीला दिली. महादेवीने तलवारीचे तीन तुकडे केले. शुद्ध पाण्याने स्वच्छ केले आणि तोंडात टाकले. चावून चावून फेकले. काही क्षणातच देवीच्या तोंडातून पांढराशुभ्र धूर निघाला. या धुरातून तीन देवी प्रकट झाल्या.

यानंतर सुसानोओम्हणाला, ‘ताई, तुझ्या केसातील रत्न मला दे. महादेवीने क्षणाचाही विलंब न करता आपल्या केसातील रत्न सुसानोआला दिले. सुसानोओने शुद्ध पाण्याने रत्न स्वच्छ केले. रत्न घासायला सुरुवात करताच मधुर स्वर निनादू लागले. त्यानंतर सुसानोओने रत्न तोंडात टाकले. खूप वेळ चावत राहिला. आणि जोरात फुंकर मारली. चारी दिशांत पांढरेशुभ्र के पसरले. हळूहळू धुके विरले. या धुक्यांतूनच पाच सुंदर देवता प्रकट झाल्या. महादेवी आमातेरासु सुसानोआला म्हणाली, ‘दादा, मी निर्माण केलेल्या तीन देवी तुझ्या आहेत आणि तू निर्माण केलेल्या पाच देवी माझ्या आहेत.’ आपण अतिसुंदर देवतांची निर्मिती केली याचा सुसानोओला गर्व झाला. मोठ्या आनंदात गर्वाच्या भाषेत सुसानोओ म्हणाला, ‘ताई, देवतांची निर्मिती करत असतांना माझ्या मनात कुठलाही वाईट विचार नव्हता. त्यामुळेच सुंदर देवतांची निर्मिती झाली. त्यामुळे मी जिंकलो.’ असे म्हणत सुसानोओ घोड्यावर स्वार झाला. डोक्यात आनंदाचे वारे घुमत होते. घोडाही सैरभैर होत पळत होता. पळता पळता घोडेस्वाराने शेतीवाडीचे प्रचंड नुकसान केले. घोडा सैरभैरपणे धावत असल्यामुळे ठिकठिकाणी घोड्याची लीद पसरत होती.

महादेवीचे पवित्र पुजाघरही खराब झाले. तरीही आमातेरासु भावावर रागावली नाही. ताईला वाटले आनंदाचे वारे ओसरले की सर्व ठीक होईल ! परंतु आमातेरासुचा अंदाज चुकला. सतत धावल्यामुळे सुसानोओचा घोडा मृत झाला. तरीही सुसानोओचा खोडकरपणा वाढतच होता.

महादेवीकडे एक चरखा होता. देवी-देवतांना भेट देण्यासाठी या चरख्यावर कपडे विणण्याचे काम करून घेत होती. या चरख्यावरच सुसानोओने घोड्याचे शव टाकले. त्यामुळे विणकाम करणाऱ्या स्त्रिया घाबरल्या. हातातील काम सोडून पळाल्या.

आपल्या लाडक्या भावाच्या पापाचे ओझे महादेवीने स्वतःकडे घेतले. या पापाचं प्रायश्चित्त म्हणून महादेवी ‘आमानोइवाया’ नावाच्या गुहेत तपश्चर्येसाठी गेली. सूर्याचा अवतार असलेली महादेवी आमातेरासु गुहेत शिरताच सगळीकडे अंधःकार पसरला. राक्षस-राक्षसिणी आनंदाने नाचू लागले. सूर्यप्रकाश नसल्यामुळे थंडगार वारे वाहू लागले. शेतातील पिके, फुलझाडे सुकू लागली. सूर्य प्रकाशाअभावी सारी चराचर सृष्टी नष्ट होईल या विचाराने देवी-देवता चिंतीत झाल्या. आमातेरासु महादेवीला गुहेतून कसे बाहेर काढावे याची चर्चा सुरु झाली. सर्वानुमते निर्भेळ, निरपेक्ष आनंद-महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या निर्हेतुक सद्भावामुळे कल्याणकारी महादेवीने कुऽऽचऽकू अशी जोरदार बांग देणारे कोंबडे एकत्र केले. त्याचबरोबर रत्नांच्या घर्षणाने तीव्र ध्वनि उत्पन्न होईल व आरशांच्या प्रकाशाने उजेड पसरेल या उद्देशाने रत्नजडित आरसे बनवणारे कलाकारही बोलावले. एका देवाने पर्वतावरून पवित्र वृक्ष उपटून आणला. या वृक्षाच्या फांदीच्या टोकाला रत्नांचे गुच्छ बांधले. फाद्यांना आरसे टांगले. झाडाच्या बुंध्यापासूनचा भाग पांढऱ्या शुभ्र कापडाने सजवला आणि सर्व देवी-देवता महोत्सवात सहभागी झाले. सर्वशक्तीमान सर्वश्रेष्ठ देवता ‘अमेनेताचिकारा ओनोकामि गुहेच्या प्रवेशव्दाराजवळ लपले. मंत्रपाठासह यज्ञात आहुती देण्यास सुरुवात झाली. ढोल-बासरीच्या तालावर नृत्यांगना उलटे नृत्य करू लागल्या. आणि देवी-देवतांची हसून हसून पुरेवाट झाली. गुहेतील अमितोरासु महादेवीने हा हास्य कल्लोळ ऐकातच गुहेचं दार किलकिलं केलं. आणि नृत्यांगनांना विचारले, मी गुहेत आल्यामुळे सारी सृष्टी अंधारात बुडाली असतांनाही इतका आनंदोत्सवाचा आवाज का येत आहे? नृत्यांगना म्हणाली, ‘देवी, आपल्यापेक्षाही तेजस्वी देवीचे आगमन झाले आहे. म्हणूनच सर्व देवी-देवता आनंदोत्सव साजरा करीत आहेत. आपण स्वतः एकदा त्या देवीला बघता का?’ आनंदोत्सवाचा गोंगाट ऐकून महादेवींना तेजस्वी देवीला पहाण्याची इच्छा झाली. सूर्यकिरणांचा प्रकाश दिसू लागताच देवी-देवतांनी झाडावर लावलेले आरसे अमितोरासुच्या दिशेला फिरवले. देवीने गुहे बाहेर डोकावून पाहताच गुहेच्या प्रवेशद्वाराजवळील सर्वश्रेष्ठ देवाने महादेवीचा हात धरून बाहेर ओढले. क्षणार्धात गुहेचे दार बंद झाले. जपान देशासह सर्वत्र प्रकाशाचे साम्राज्य पसरले. सुसानेओने केलेल्या पापाची शिक्षा म्हणून त्याच्या दाढीमिशा आणि हातापायाची नखे कापावी तसेच त्याला देव लोकांतून घालवून द्यावे असे सर्व देवी-देवतांनी एकमताने ठरवले. परंतु अजूनही सुसानेओचा पापाचा घडा भरलाच नव्हता. एके दिवशी भूक लागली म्हणून सुसानोओने अन्नपूर्णा देवीकडे जेवण मागितले. देवीने आपल्या नाका-तोंडाच्या माध्यमातून रुचकर जेवण बनवले. सुसानोओने ते पाहिले. देवीने रुचकर जेवणाची थाळी त्याच्यासमोर ठेवताच सुसानोओ क्रोधित स्वरात म्हणाला, ‘मला इतके घाणेरडे जेवण कां देत आहे? ‘ देवीच्या प्रति उत्तराची वाट न पाहताच सुसानोओने अन्नपूर्णा देवीला मारून टाकले. मानवजातीची तारणहार अन्नपूर्णा देवीच्या मृत शरीराच्या डोक्यातून रेशीम किडे निर्माण झाले. डोळ्यांतून अन्नधान्याची रोपे निर्माण झाली. अशा या अन्नपर्णा देवीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आजही शेती पिकवून मानव आपली कृतज्ञता व्यक्त करीत आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..