प्रभात हे वृत्तपत्र पांडुरंग महादेव भागवत यांनी २१ नोव्हेंबर १९२९ रोजी सुरु केले. आपले वृत्तपत्र बहुजन समाजाचे असावे, अशी भागवत यांची इच्छा होती. त्यांच्या इच्छेनुसार हे वृत्तपत्र चालविण्याचा आणि लोकप्रिय करण्याचा प्रयत्न श्रीपाद शंकर नवरे यांनी केला. आकर्षक मथळा, चटपटीत मजकूर, खुलवून लिहिलेली बातमी हे प्रभातचे वैशिष्टय होते.
१९३४ मध्ये श्रीपाद शंकर नवरे या वृत्तपत्राचे संपादक झाले; परंतु प्रत्यक्षात १९३८ पासून त्यांचे नाव छापले जाऊ लागले. प्रभातने कामगार भागात जम बसविला. त्याचे क्षेत्र मुंबईपुरते मर्यादित होते. परंतु भागवत व नवरे यांनी काटकसरीने वृत्तपत्र चालवून अत्यल्प किंमतीत वाचकांना अंक देण्याचा प्रयत्न केला. १९४१-४२ साली हे वृत्तपत्र आर्थिक अडचणीत सापडले. त्या काळात राजा बहादूर नारायण बन्सीलाल पित्ती यांच्याकडे त्याची मालकी गेली. पित्ती यांनी धोरण न बदलता वृत्तपत्र चालविले. १ ऑक्टोबर १९४७ मध्ये पुन्हा ते मूळ मालकांकडे परत आले. २६ नोव्हेंबर १९५० रोजी अखेरचा अंक प्रसिध्द होऊन प्रभात बंद पडले. १९३७ मध्ये प्रभातची पुणे आवृत्ती प्रसिद्ध होऊ लागली होती. या आवृत्तीची मालकी वा. रा. कोठारी यांनी १९३८ साली घेतली. ते त्याचे संपादक होते.
कोठारी हे कार्यकर्ता- संपादक होते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला कोठारी यांच्या प्रभातने मनःपूर्वक पाठिंबा दिला. चळवळीचे विस्तृत वार्तांकन आणि चळवळीच्या समर्थनार्थ अग्रलेख लिहिण्यात कोठारी आघाडीवर होते.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply