भद्रकाली प्रॉडक्शन ही मच्छिंद्र कांबळी यांची संस्था.
भद्रकाली प्रॉडक्शन च्या सुरुवातीपासूनच्या प्रवासाविषयी मच्छिंद्र कांबळी यांचे चिरंजीव प्रसाद कांबळी सांगतात, वस्त्रहरण या नाटकात बाबा मुख्य भूमिका साकारत होते. एवढेच नव्हे तर या नाटकाचे मॅनेजर देखील तेच होते. पण या नाटकाचे ६०० प्रयोग झाल्यानंतर या नाटकातून त्यांना अचानक काढण्यात आले. आता काय करायचे त्यांना काहीच सुचत नव्हते. त्याच दरम्यान त्यांच्या एका चित्रपटाचे चित्रीकरण मालवण मध्ये सुरू होते. त्यावेळी त्यांच्या चित्रपटात अभिनेते मोहन गोखले त्यांच्यासोबत काम करत होते. मोहन गोखले यांनी त्यांना नाटकांची निर्मिती करण्यासाठी प्रॉडक्शन हाऊस काढण्याचे सुचवले. पण त्यावेळी त्यांच्याकडे पैसा नसल्याने त्यांच्यासाठी हे शक्य नव्हते. त्यानंतर काहीच दिवसांत सतीश दुभाषी यांनीदेखील बाबांना हीच गोष्ट सांगितली. बाबा सतीश दुभाषी यांना खूपच मानत असत. त्यामुळे त्यांच्या सांगण्यावरून त्यांनी हे पाऊल उचलायचे ठरवले. २९ मे १९८२ या साली भद्रकाली प्रॉडक्शन ची दिमाखात व तितकीच साध्या स्वरूपात मुहूर्तमेढ रचली गेली. आपल्या प्रॉडक्शनला भद्रकाली आणि साईनाथ यापैकी नेमकं कोणतं नाव असावं ? ह्या विचारात असताना मच्छिंद्र कांबळी यांनी दोन चिठया बनवल्या. त्यातली एक आपले चिरंजीव प्रसाद यांना उचलायला सांगितली. त्यांनी उचललेल्या चिट्ठीत नाव होतं ते भद्रकाली.
‘चाकरमानी’ हे ‘भद्रकाली प्रॉडक्शनचं’ पहिलं नाटक होते. त्यानंतर त्यांनी ‘केला तुका झाला माका’, ‘वस्त्रहरण’, ‘घास रे रामा’, ‘पांडगो इलो रे बा इलो’, ‘अफलातून’ ‘रातराणी’ ‘भैया हातपाय पसरी’ यांसारखी ३८ नाटकं केली. ‘भैया हात पाय पसरी’ चे १०१ प्रयोग केले….
३० सप्टेंबर २००७ मच्छिंद्र कांबळी यांच्या निधनानंतर “भद्रकाली” चं पुढे काय होणार असे वाटले असता प्रसाद कांबळी यांनी २० डिसेंबर २००७ रोजी “भैया हातपाय पसरी” चा १०२ वा प्रयोग सादर केला. व “भद्रकाली” ने पुन्हा एकदा भरारी घेतली. २००८ मध्ये ‘म्हातारे जमीन पर’, २००९ मध्ये ‘वस्त्रहरण’ चा न भूतो न भविष्यती असा ५००० वा प्रयोग त्यांनी केला २०१० मध्ये कॉमन वेल्थ गेम्स CWG दिल्ली येथे ‘वस्त्रहरण’ चा मानाचा प्रयोग केला.
भद्रकाली प्रॉडक्शन ने भारत भाग्यविधाता, झोलबच्चन, बेचकी, नांदी, पांडगो इलो रे बा इलो, आम्ही सौ. कुमुद प्रभाकर आपटे, हलकं फुलकं, बीपी,समुद्र’, हा शेखर खोसला कोण आहे?
संशयकल्लोळ, सुखाशी भांडतो आम्ही, चाकरमानी, केला तुका झाला माका, अग्निदिव्य, वस्त्रहरण, अफलातून, मालवणी सौभद्र, घास रे रामा, राम तुझी सीता माऊली, पांडगो इलो रे बा इलो, रातराणी, चालगती, पद्मश्री धुंडीराज, लाज वाटते, बंद करा, सावळोगोंधळ, आली ती बेस्ट, तुमचं ते आमचं, करतलो तो भोगतलो, वाजले किती?, पोलीस तपास सुरू आहे, उजाडतलाच, पप्पा सांगा कुणाचे, विमानहरण, येवा, कोकण आपलाच आसा, चला, घेतला खांद्यावर, पाहू कशाला कुणाकडे, माझं छान चाललंय ना, मॅड फॉर इच अदर, हलकं फुलकं, वय वर्षे पंचावन्न, सदाचा बाप ४२०, माझे पती छत्रपती, आता होऊनच जाऊ द्या, फादर माझा गॉड फादर, अनधिकृत, लग्नकर्ता विघ्नहर्ता, जाऊ तिथे खाऊ, मागणी तसो पुरवठो, भैया हातपाय पसरी, म्हातारे जमीन पर, भारत भाग्य विधाता अशी एकाहून एक सरस नाटकं केली आहेत.
भद्रकाली प्रॉडक्शन चे ‘संगीत देवबाभळी’ हे नाटक सध्या गाजत आहे. प्रसाद कांबळी हे अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष म्हणूनही काम बघत आहेत. प्रसाद कांबळी यांना भद्रकाली प्रॉडक्शन द्वारे अजून नवीन दर्जेदार नाटकांसोबत वेगवेगळ्या रंगभूमीवरची जुनी क्लासिक नाटकं सुद्धा रंगमंचावर आणायची आहेत.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply