टिळक,आगरकर वगैरे प्रभृतींनी २४ ऑक्टोबर १८८४ रोजी विद्यार्थ्यांना एतद्देशीय पध्दतीने शिक्षण देता यावे म्हणून पुण्यात डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. कोल्हापूरचे महाराज डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे पदसिध्द अध्यक्ष होते. तर सोसायटीच्या कौन्सिलमध्ये लोकमान्य टिळक, आगरकर, न्यायमूर्ती रानडे, भांडारकर, वामन शिवराम आपटेंसारखी दिग्गज मंडळी होती.
जहाल – मवाळ किंवा सनातन – सुधारक वगैरे आपापसातले वैचारीक मतभेद दूर ठेऊन हे सगळे ह्या राष्ट्रकार्यासाठी एकत्र आलेले होते.
सोसायटीच्या आश्रयदात्यांमध्येही सर्वात वरचे नाव होते कोल्हापूरच्या महाराजांचे! मिरजकर, सांगलीकर, मुधोळकर, रामदुर्गकर, इचलकरंजीकर, जामखिंडीकर, विशाळगडकर वगैरे महाराष्ट्रातल्या जवळपास सगळ्या संस्थानिकांनी (अगदी जंजिऱ्याचा सिद्दी धरून!) डेक्कन एज्युकेशन सोसायटीला देणग्या दिलेल्या होत्या. ह्या सोसायटीचा पहिला आश्रयदाता (patron) होता मुंबईचा गव्हर्नर सर जेम्स फर्ग्युसन. प्रत्यक्ष गव्हर्नराच्याच नावाने कॉलेज काढल्यास सरकारी ससेमिराही थोड्या प्रमाणावर का होईना पण कमी होणार होता – हा सूज्ञ विचार करून डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या चालकांनी कॉलेजचे नाव ‘फर्ग्युसन कॉलेज’ ठेवायचे ठरवले आणि सर जेम्स फर्ग्युसनलाच ह्या इमारतीच्या कोनशिला समारंभासाठी प्रमुख पाहुणा म्हणून निमंत्रण देण्याचे ठरवण्यात आले.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या काही शैक्षणिक संस्था:
फर्ग्युसन कॉलेज, पुणे १८८५
विलिंग्डन कॉलेज, सांगली १९१९
बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स, पुणे१९४३
कीर्ती एम. डूंगरसी कॉलेज, मुंबई १९५४
चिंतामणराव कॉलेज ऑफ कॉमर्स, सांगली १९६०
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply