२ मार्च १८५७ रोजी मुंबईतील जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सची स्थापना झाली.
भारतातल्या नामवंत आर्ट्स स्कूल्सपैकी विद्यार्थ्यांच्या सर्वात आवडीचं आणि प्रथम पसंतीचं आर्ट कॉलेज म्हणजे ‘जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स’. ड्रॉइंग, पेंटिंग, शिल्पकला अशा विविध प्रकारच्या कलांची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांचं एकच स्वप्न असतं ते म्हणजे जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये ऍडमिशन मिळवणं. इथे ऍडमिशन घेण्यासाठी जगभरातून विद्यार्थी येत असतात. जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सनं आजपर्यंत अनेक मोठे कलाकार भारताला दिले आहेत. या कलाकारांच्या अगदी सुरुवातीपासून तर प्रसिद्ध कलाकार होण्यापर्यन्तच्या प्रवासाचं साक्षीदार जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स आहे. फक्त कलाकारच नाही तर काही राजकारणी व्यक्ति, व्यंगचित्रकार, अभिनेते हे देखील जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्येच शिकले आहेत. आज जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स तब्बल १६४ वर्ष पूर्ण करत आहे.
सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टची १८५७ मध्ये मुंबईत स्थापना झाली. सर जमशेटजी जीजीभॉय (१७८३-१८५९) यांनी या स्थापनेसाठी पुढाकार घेतल्यामुळे त्यांचे नाव या संस्थेला दिले गेले. सर जमशेटजी हे ‘बोर्ड ऑफ एज्युकेशन’ (१८४०) व लंडनच्या हाइड पार्कमधील कला प्रदर्शन (१८५१) या दोन्हींचे सन्माननीय सदस्य होते. त्यांनी लंडनमध्ये जगभरातून आलेल्या कलाकृतींचे प्रदर्शन पाहिले. व्यापाराच्या निमित्ताने ते चीनमध्येही जात होते. तेथील कारागिरी, व्यवसाय व व्यापार पाहून त्यांच्या मनात कलाशिक्षण देणारे कलाविदयालय मुंबईतही असावे, ही कल्पना दृढमूल झाली. तिला चेन्नई येथील तंत्र-निकेतनच्या विदयार्थ्यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन साहाय्यभूत ठरले (१८५२). त्याचे प्रवर्तक डॉ. हंटर यांनी द टेलिगाफ अँड कुरिअर ऑफ बॉम्बे या वृत्तपत्रात (१८५२) लेख लिहून अशी कलाशाळा मुंबईतही असावी, त्यासाठी सर जमशेटजी जीजीभॉय व जगन्नाथ ऊर्फ नाना शंकरशेट (१८०३-१८६५) यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. परिणामतः सर जमशेटजी जीजीभॉय यांनी एक लाख रूपयांच्या देणगीसोबत ही कल्पना तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड फॉकलंड यांच्यापुढे ९ मे १८५३ च्या पत्राव्दारे मांडली. त्यानंतर मुंबईचे काही प्रतिष्ठित नागरिक व काही ब्रिटिश अधिकारी यांनी २२ ऑगस्ट १८५४ रोजी जमशेटजींच्या पत्रावर विचार करून योजना सादर करण्यासाठी सर डब्ल्यू. यार्डले (तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती, मुंबई) यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. सर जमशेटजी जीजीभॉय व सर सी. आर्. एम्. जॅक्सन हे या समितीचे उपाध्यक्ष होते. याशिवाय या समितीत दहा सदस्य असून त्यांतील हिंदी नागरिकांत विनायक वासुदेव, जगन्नाथ शंकरशेट, मागबा (महंमद इबाहीम), फामजी कासवजी, विनायक गंगाधर शास्त्री यांचा समावेश होता. या समितीने नऊ महिने विचारविनिमय करून ८ जून १८५५ रोजी आपला अहवाल सादर केला. अखेर ‘सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट अँन्ड इंडस्ट्री’ ही संस्था २ मार्च १८५७ रोजी स्थापन झाली. या कलाशाळेचा उद्देश ‘चित्रकला, रेखन व अलंकरण, कलात्मक पॉटरी, धातुकाम व लाकडी कोरीवकाम शिकविणे ’ असा निश्चित करण्यात आला होता. यासाठी कारागिरी व तंत्रज्ञान यांत कुशल असलेले तज्ज्ञ कारागीर शिक्षक म्हणून नेमावेत, असाही उल्लेख होता.
सुरूवातीला या संस्थेचे कार्य एल्फिन्स्टन इन्स्टिटयूटमध्ये सुरू झाले व तेथील पेटन हे चित्रकार मुलांना शिकवू लागले. नियोजित योजनेनुसार २५ विदयार्थ्यांनाच प्रवेश देण्याचे ठरले असूनही अर्ज केलेल्या ४९ विदयार्थ्यांना समितीतील भारतीय सदस्यांच्या आगहामुळे प्रवेश देण्यात आला. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने जी. विल्कीन्स टेरी नावाच्या लंडनवासी अभिकल्पक व काष्ठशिल्पकाराला शाळेचा प्रमुख नेमून मुंबईला पाठविले. मुंबईला आल्यावर टेरी यांनी कला-महाविदयालयाच्या स्वरूपाविषयी (रेखन-शाळा, सजावट व अलंकरण विभाग, वास्तुविभाग इत्यादींचा) स्थूल आराखडा तयार करून १८६० मध्ये चित्रकलेचे पूर्ण वेळ वर्ग सुरू केले. हे शिक्षण इंग्लंडमधील साउथ केन्झिंग्टन येथील कलाशाळेच्या शिक्षणपद्धतीवर आधारित होते. या अभ्यासकमाचे भारतातील व विशेषत: ‘बाँबे स्कूल’ परंपरेतील कला-शिक्षणावर दूरगामी परिणाम झाले. परिणामी वास्तववादी शैलीत व शारीर-रचनाशास्त्रावर आधारित अशा चौकटीतच येथील कलावंत कलानिर्मिती करीत राहिले. सुरूवातीच्या काळात सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट अँड इंडस्ट्री ही कलाशाळा विदयार्थ्यांच्या वाढत्या संख्येमुळे सध्याच्या जे. जे. हॉस्पिटल जवळील बाबुला टँक परिसरातील इमारतीत भरू लागली. पुढे ती जागाही अपुरी पडू लागल्यावर इंग्रज सरकारकडे जागेची मागणी करण्यात आली. १८६३ च्या दरम्यान इंग्रज सरकारने या मागणीचा विचार करण्याचे आश्वासन दिले. १७ जून १८६५ या दिवशी ‘सर जे. जे. स्कूल’ सध्या ज्या जागेवर आहे, त्या जागी तात्पुरत्या छपऱ्या (शेड) उभारून त्यात वर्ग सुरू करण्यात आले. पुढे १८६९ मध्ये ही जागा सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट या संस्थेस कायमस्वरूपी देण्यात आली आणि त्याच जागेवर १८७८ मध्ये मोठी वास्तू बांधण्यात आली.
संस्थेतील विदयार्थ्यांची वाढती संख्या, अपुरी जागा व अपुरा शिक्षक-वर्ग या समस्येतून मार्ग काढण्यासाठी सर जमशेटजी जीजीभॉय यांचे चिरंजीव रूस्तुमजी जमशेटजी यांनी १८६५ च्या जानेवारी महिन्यात रूपये १,५०,००० एवढी देणगी संस्थेसाठी दिली याशिवाय साउथ केन्झिंग्टन येथील विभागप्रमुख मि. मूडी यांनी १,१०० पौंड एवढी रक्कम देऊन इंग्लंडहून भारतात येऊन शिकविण्यास तयार असणारे तीन शिक्षक शोधण्यास सांगितले. त्या नुसार मि.मूडीयांनी लॉक वुड किपलिंग (वास्तुशिल्पकार), मायकेल जॉन हिगीन्स (धातुकलाकार) व जॉन ग्रिफीथ्स (सजावट-चित्रकार) अशा तीन शिक्षकांची नेमणूक केली (१८६५). या तिन्ही शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेतील विदयार्थ्यांनी मोठाच नावलौकिक मिळविला. या कलाशाळेतील विदयार्थ्यांच्या कलाकृतींचे १८६८ मध्ये मुंबईत प्रदर्शन भरविण्यात आले. धातुकला, शिल्पकला व अलंकरणात्मक चित्रकला (डेकोरेटिव्ह पेंटिंग) या कलाप्रकारांतील कौशल्यपूर्ण कामांमुळे हे प्रदर्शन चांगलेच गाजले.
सुरूवातीच्या काळातील या विदयार्थ्यांना स्टायपेंड मिळत असे व त्यांना शिकाऊ उमेदवार (ॲप्रेंटिस) समजले जाई. परंतु उपजीविकेपुरते कौशल्य मिळताच, हे विदयार्थी शाळा सोडून जात असत. देणगीदार सर जमशेटजी जीजीभॉय व सर्व यूरोपीय शिक्षकांच्या कल्पनेतील शिक्षण या प्रकारचे नव्हते. परिणामी यावर उपाययोजना करण्यात आली व कारागिरांसाठी असणाऱ्या या शिक्षणकमाचे रूपांतर मुख्यत्वे चित्रकला व शिल्पकला या विषयांचे प्रशिक्षण देणाऱ्या अभ्यासकमात झाले. या बदलाला १८७३ मध्ये रीतसर मान्यता देण्यात येऊन ‘सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट अँड इंडस्ट्री’ या नावातून ‘इंडस्ट्री’ हा शब्द वगळण्यात आला. इंग्रज सरकारने ग्रिफीथ्स यांच्या मार्गदर्शनाखाली १८७२ पासून अजिंठयाच्या गुंफांमधील भित्तिचित्रांच्या प्रतिकृती करण्याचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू केला. हे काम १२ वर्षे सुरू होते. कलाशाळेत शिकून तयार झालेल्या व शिकणाऱ्या निष्णात विदयार्थ्यांची या योजनेसाठी निवड करण्यात आली. सुरूवातीस सात विदयार्थी या योजने- अंतर्गत काम करू लागले व त्यांचे नेतृत्व ग्रिफीथ्स यांच्या गैरहजेरीत पेस्तनजी बमनजी मिस्त्री (१८५१-१९३८) या निष्णात तरूण कलावंताकडे सोपविण्यात आले. हे सर्व काम या तरूण कलावंतांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मोठया जिद्दीने पूर्ण केले. पुढे या सर्व प्रतिकृती लंडन येथे पाठविल्या गेल्या व ‘क्रीस्टल पॅलेस’मध्ये प्रदर्शित करण्यात आल्या. अजिंठयाच्या या प्रतिकृतींचे दुर्दैव असे की, त्याच दरम्यान लागलेल्या आगीत या प्रतिकृती जळून गेल्या परंतु १८८५ मध्ये ग्रिफीथ्स यांनी प्रयत्नपूर्वक प्रसिद्घ केलेले द पेंटिंग्ज इन द बुद्धीस्ट केव्ह टेंपल ऑफ अजंठा चे दोन खंड सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या महत्त्वपूर्ण योगदानाचा पुरावा म्हणून आजही उपलब्ध आहेत. सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या शिक्षक व विदयार्थ्यांनी प्रयत्नपूर्वक प्रत्यक्ष कृतीत आणलेल्या या प्रकल्पामुळे यूरोपचे कलाजगत भारतीय कलापरंपरेकडे अधिक लक्षपूर्वक व आस्थेने पाहू लागले. याच काळात मुंबईतील तत्कालीन इंग्रज सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने त्या काळात बांधल्या जाणाऱ्या इमारतींवरील वास्तुशोभनाचे (आर्किटेक्चरल डेकोरेशन) काम ग्रिफीथ्स व किपलिंग या दोन शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली जे. जे. स्कूलमधील विदयार्थ्यांना दिले. मुंबईत त्या काळात बांधल्या गेलेल्या महात्मा फुले मंडई, मुंबई हायकोर्ट, मुंबई विदयापीठ, छ. शिवाजी टर्मिनस, गोकुळदास तेजपाल हॉस्पिटल अशा अनेक इमारतींवरील वास्तुशिल्पांचे काम या कलाशाळेत शिकणाऱ्या व शिकून तयार झालेल्या एतद्देशीय कलावंतांनी केले. याच दरम्यान प्राचार्य टेरी यांनी कला महाविदयालयाच्या आवारात मृदापात्र-विभाग सुरू करून किपलिंगच्या मदतीने भट्टी बांधली, तसेच व्यावसायिक तत्त्वावर कलात्मक मृत्पात्रीची (आर्टिस्टिक पॉटरी) निर्मिती करण्यास सुरूवात केली. पुढील काळात या मृत्पात्रीची संकल्पना अजिंठयाच्या चित्रांवर आधारित अशी केली गेली. या उपकमाला अत्यंत उत्तम प्रतिसाद मिळून, त्याची उत्तम विक्री देशात व देशाबाहेर झाली. यांतील काही दर्जेदार मृत्पात्रे ‘साउथ केन्झिंग्टन म्यूझीयम’ने विकत घेतली. तसेच ब्रिटिश सरकारतर्फे जगभरात विविध प्रदर्शनांमध्ये पाठविण्यात आली व ती प्रशंसेस पात्र ठरली. या मृत्पात्री व मृत्तिकाशिल्पे (सिरॅमिक्स) यांचा एक संच इंग्रज सरकारने रशियाच्या झारला भेट म्हणून पाठविला.
विल्किन्स टेरी निवृत्त झाल्यावर १८८० मध्ये ग्रीनवुड हे रेखन-शिक्षक म्हणून लंडनहून आले व ग्रिफीथ्स पाचार्य झाले. स्कूल ऑफ आर्टच्या शिक्षणकमात नवीन बदल करण्यात येऊन प्रथम, द्वितीय, तृतीय श्रेणी वर्ग सुरू करून त्यांच्या परीक्षा दरवर्षी घेण्यात येऊ लागल्या. हे सर्व लंडन येथील साउथ केन्झिंग्टनमधील अभ्यास-क्रमानुसार होऊ लागले. शेवटच्या दोन परीक्षा ‘ब्लॅकबोर्ड’सहित उत्तीर्ण झालेल्या विदयार्थ्यांना मुंबई इलाख्यातील सर्व शाळांत चित्रकला-शिक्षक म्हणून मान्यता मिळाली.
देशातील हस्तकला व कारागिरीच्या क्षेत्रांतील उपयोजित कलेच्या दुर्दशेकडे १८८९-९० च्या दरम्यान इंग्रज सरकारचे लक्ष वेधण्यात आले. तत्कालीन मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड रे यांनी या विषयात लक्ष घातले व परिणामी या कलांचे शिक्षण देण्यासाठी कार्यशाळेची उभारणी रूपये ४५,००० खर्च करून करण्यात आली. या कार्यशाळेत खणी-कपाटनिर्मिती (कॅबिनेट मेकिंग) व काष्ठतक्षण (वुड कार्व्हिंग), गालिचा-विणकाम (कार्पेट वीव्हिंग), आलंकारिक लोहकाम (ऑर्न्मेंटल आयर्न वर्किंग), जडजवाहीर व धातुकाम (ज्वेलरी व मेटल वर्क) या विषयांचे शिक्षण देण्यात येऊ लागले. गव्हर्नर लॉर्ड रे यांनी या विषयात घातलेले लक्ष व ही कार्यशाळा प्रत्यक्षात येण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची जाणीव ठेवण्याच्या तत्कालीन मनोवृत्तीतून या कार्यशाळेला ‘लॉर्ड रे आर्ट वर्कशॉप’ असे नाव देण्यात आले. त्यामध्ये शिकविण्यास कसबी कारागीर नेमल्यामुळे या कार्यशाळेतून एकापेक्षा एक सरस धातूच्या वस्तू व गालिचे निर्माण होऊ लागले. १८९५ मध्ये मृत्पात्री-कार्यशाळा (पॉटरी वर्कशॉप) निर्माण होऊन सुंदर मृत्तिकापात्रे तयार होऊ लागली. १९१० मध्ये जे. जे. स्कूलच्या आवारात स्थापन झालेल्या‘सर जॉर्ज क्लार्क स्टुडिओज अँड टेक्निकल लॅबोरेटरी’ विभागामुळे उत्कृष्ट तंत्रज्ञानाची जोड मिळू लागली. त्यातून वस्तू अधिक दर्जेदार तसेच आकार आणि रंगसंगती यांबाबतीत निर्दोष बनू लागल्या. १८९९-१९०० मध्ये पॅरिस येथील आंतरराष्ट्रीय कलाप्रदर्शनात स्कूल ऑफ आर्टने भाग घ्यावा, असे मुंबई सरकारने ठरविले. त्यानुसार चित्रकला (पेंटिंग), नमुनाकृती (मॉडेल) आणि रे आर्ट वर्कशॉपच्या सर्व वर्गांतून तयार झालेले कलाकौशल्याचे नमुने पॅरिसमधील प्रदर्शनासाठी पाठविण्यात आले व त्यांची वाहवा झाली. शालेय कलाशिक्षणाचे प्रशिक्षण देणारा वर्ग १८८७ मध्ये सुरू करण्यात आला. मुंबई विभागात शालेय पातळीवरील परीक्षांची इंग्लंडमधील ‘सायन्स अँड आर्ट डिपार्टमेंट’च्या धर्तीवर आखणी करण्यात येऊन, त्यासाठी प्रोत्साहन म्हणून शाळांना आर्थिक मदत करण्यात आली. १९१५ साली या परीक्षा बंद होऊन त्याऐवजी एलिमेंटरी (प्राथमिक) व इंटरमीडिअट (माध्यमिक) अशा चित्रकलेच्या दोन परीक्षा शालेय पातळीवर घेण्यात येऊ लागल्या व आजही त्या घेतल्या जातात.
सेसिल बर्न्स हे चित्रकार १८९७ ते १९१८ या काळात प्राचार्य होते. त्यांच्या काळात शिक्षणकमात बदल होऊन मुक्त हस्तआरेखन (फी हँड ड्रॉइंग), यथादर्शन (पर्स्पेक्टिव्ह) आणि भूमिती (जिऑमिट्नी) या विषयांऐवजी निसर्ग आरेखन (नेचर ड्रॉइंग), भौमितिक रचनाबंध (जिऑमिट्रिकल पॅटर्न) व स्मरण आरेखन (मेमरी ड्रॉइंग) या विषयांचा अंतर्भाव करण्यात आला. तसेच या काळात जलरंग-माध्यमात दर्जेदार काम करणारे चित्रकार निर्माण झाले. १९०२ मध्ये दिल्लीत भरलेल्या दरबारानिमित्त एक अखिल भारतीय औदयोगिक प्रदर्शन भरविण्यात आले. या प्रदर्शनात सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या कलावंतांनी एक भारतीय कलादालन तयार केले होते. त्यात मांडण्यासाठी चित्रे, प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे पुतळे, तऱ्हेतऱ्हेच्या धातूंच्या कलाकुसरींच्या वस्तू, लाकडी कोरीव कामाचे फर्निचर, चांदीच्या अत्तरदाण्या, गुलाबदाण्या, पितळेची नक्षीदार मेजे, तैलरंग चित्रांचे कोरीव फर्माने (स्टेन्सिल) छापून तयार केलेले पडदे इ. वस्तू ठेवल्या होत्या. या ‘भारतीय कलादालना’तील सर्व कलाकृती विकल्या गेल्या. विदयार्थ्यांनी तयार केलेल्या या कलाकृती पाहून तत्कालीन संस्थानिक अत्यंत प्रभावित झाले. अनेक विदयार्थी-कलावंतांना ते आपल्या संस्थानांत व्यावसायिक कामासाठी पाचारण करू लागले. ही परंपरा पुढेही कायम राहिली. याच दरम्यान ‘रॉयल कॉलेज ऑफ आर्ट’चे चित्रकार रोबाथम हे उपप्राचार्य पदावर रूजू झाले. त्यांनी सजीव-चित्रणाचे (लाइफ पेंटिंग) शिक्षण रॉयल कॉलेज ऑफ आर्टमधील शिक्षणकमाप्रमाणे देण्यास सुरूवात करून चित्रकलेचा अभ्यासक्रम प्रथम, द्वितीय, तृतीय व चतुर्थ असा चार वर्षांचा आखला (१९०७).
कॅप्टन ग्लॅडस्टन सॉलोमन यांची जे. जे. मधील प्राचार्य-संचालक पदाची कारकीर्द (१९१९-३६) विशेष संस्मरणीय ठरली. त्यांच्या काळात जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या व त्यामुळे या कलाशाळेचे नाव भारतभर गाजू लागले. १९२० च्या दरम्यान चौथ्या वर्षाच्या विदयार्थ्यांसाठी सॉलोमन यांनी प्रत्यक्ष नग्न व्यक्तिप्रतिमानावरून (न्यूड मॉडेल) अभ्यास करण्यासाठी ‘न्यूड लाइफ-क्लास’ सुरू केला. त्यामुळे विदयार्थ्यांस शरीरशास्त्राचा प्रत्यक्ष मानवी शरीरावरून अभ्यास करण्याची संधी मिळाली. नग्न व्यक्तिप्रतिमान व त्याच्या अभ्यासामुळे प्राप्त झालेल्या अभ्यासाला दिशा व उत्तेजन देण्यासाठी सॉलोमन यांनी भित्तिचित्र-सजावटीचा (म्यूरल डेकोरेशन) वर्ग सुरू केला (१९२०). त्या वर्गाच्या विदयार्थ्यांकडून त्यांनी कलादेव्या: प्रतिष्ठा हे भित्तिचित्र जे. जे. स्कूलच्या मध्यवर्ती दालनाच्या भिंतीवर ३३’ X २२’ ( सु. १०•०५ मी. X ६•७० मी.) या आकाराचे करून घेतले. त्याचे उद्धाटन गव्हर्नर लॉर्ड लॉइड यांनी केले. गव्हर्नरला ते अत्यंत आवडले व त्यांनी रूपये ५,००० मंजूर करून ‘गव्हर्नमेंट हाउस’मधील कौन्सिल हॉलमध्ये याच विदयार्थ्याकडून एक भित्तिचित्र तयार करून घेतले. याशिवाय त्यांच्या काळात ‘भारतीय शैलीच्या पुनरूज्जीवनाची’ चळवळ सुरू करण्यात येऊन त्याव्दारे विदयार्थ्यांना भारतीय संस्कृती व कलाशैली यांच्याकडे जाणीवपूर्वक पाहण्यास उद्युक्त केले गेले. भारतीय शैलीच्या पुनरूज्जीवनाच्या प्रयत्नांतून ‘बाँबे रिव्हायव्हलिस्ट स्कूल’ संप्रदायाच्या वैशिष्टयपूर्ण शैलीत सर जे. जे. स्कूलच्या विदयार्थ्यांनी चित्रे काढण्यास सुरूवात केली. पाश्चिमात्य शैलीतील मानवकृती, भारतीय शैलीतील लयदार रेषा व जलरंगांचा वैशिष्टयपूर्ण वापर, ही या शैलीची वैशिष्टये होत. परिणामी या संस्थेतून तयार होणारे विदयार्थी पाश्चिमात्य, तसेच भारतीय शैलीतही दर्जेदार काम करण्यात निष्णात होऊ लागले. १९२२ पासून सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टतर्फे ‘जी. डी. आर्ट’ ही पदविका प्रदान करण्यात येऊ लागली. दिल्लीच्या सेक्रेटेअरिएटमधील (सचिवमंडळ) प्रतिष्ठेचे काम १९२९ च्या सुमारास या संस्थेस मिळाले. तत्कालीन निवडक विदयार्थी व शिक्षकांनी ते यशस्वी रीत्या पूर्ण केले. यात विविध ललित कलांवरील भित्तिचित्रे व घुमटांत भारतातील आठ वेगवेगळ्या कालखंडांतील भारतीय शैलींच्या प्रतीकात्मक देवतांच्या आकृती रंगविल्या होत्या. या चित्रांच्या संकल्पना स्पष्ट करणारे म्यूरल पेंटिंग्ज ऑफ बाँबे स्कूल हे पुस्तक सॉलोमन यांनी लिहिले. १९२९ मध्ये सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट या संस्थेस स्वतंत्र कलाविभाग म्हणून मान्यता मिळाली व तिचे प्रमुख प्राचार्यच (प्रिन्सिपॉल) संचालक (डायरेक्टर) या पदाचे मानकरी ठरले परंतु १९३२ साली ‘टॉमस कमिटी’ अहवालाच्या आधारे ‘स्कूल ऑफ आर्ट’ बंद करावे, असा ठराव झाला तथापि समाजाच्या सर्व थरांतून या ठरावाला विरोध होऊन अखेर तो रद्द करावा लागला. मात्र १८७२ पासून सुरू असलेला व प्रसिद्धीस आलेला मृत्पात्री विभाग मुंबई कायदे मंडळामध्ये ठराव होऊन १९२८ साली बंद करण्यात आला.
सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट या संस्थेत १९२४ मध्ये प्रो. बॅटले यांच्या काळात वास्तुकलेचा (आर्किटेक्चर) तीन वर्षांचा पूर्णवेळ अभ्यासक्रम सुरू करण्यात आला व १९३५ मध्ये उपसंचालक (डेप्युटी डायरेक्टर) चार्ल्स जेरार्ड यांच्या काळात ‘उपयोजित कला विभागा’चा वर्ग सुरू झाला.
कॅप्टन सॉलोमननंतर चार्ल्स जेरार्ड (कार. १९३७-४६) संचालक झाले. पाश्चिमात्य जगातील आधुनिक कलाचळवळींची व कलाप्रवाहांची ओळख त्यांनी येथे जाणीवपूर्वक करून दिली. त्यामुळे येथील कला विदयार्थ्यांना एक नवीन दृष्टी लाभली व यानंतरचा काळ हा कलाशिक्षण-प्रांतातील प्रयोगशील कालखंड ठरला. परिणामी वास्तववादी शैलीत चित्र-शिल्प करण्याच्या परंपरेसोबतच चित्र-शिल्प या दृक् माध्यमांकडे अभिव्यक्तीचे एक साधन म्हणून पाहिले जाऊ लागले.
कलाशिक्षण घेताना कौशल्य हे मिळवावेच लागते पण कौशल्य म्हणजे कला नव्हे, ही जाणीव विकसित झाली. यातूनच पुढील काळात कलाप्रांतात विविध प्रयोग होऊ लागले व चित्र-शिल्पकारांच्या गटाने एकत्र येऊन ‘ग्रूप’ स्थापन करून आपली अभिव्यक्ती व त्याबाबतचे स्पष्टीकरण देण्याची परंपरा सुरू झाली. पुढील काळात झालेल्या अनेक प्रयोगांची व आधुनिक स्थित्यंतरांची पार्श्वभूमीच या काळात तयार झाली, असे म्हणता येईल. सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या शिक्षणपद्धतीत १९४० मध्ये हस्तमुद्रणकलेचा प्रवेश झाला. इटलीमध्ये शिकून आलेल्या यज्ञेश्वर (वाय्. के.) शुक्ल यांच्यामुळे प्रथम हस्तमुद्रणकलेचा सायंवर्ग सुरू झाला. त्यात अम्लकोरण (एचिंग) व जलच्छटा (ॲक्वाटिंट) ही दोन तंत्रे शिकविली जात. यात प्रथम तयार झालेले विदयार्थी म्हणजे रसिकलाल पारीख व वसंत परब. पुढील काळात यात लिनोकट, काष्ठ ठसा (वुडकट), काष्ठकोरीवकाम (वुडएन्गेव्हिंग), सेरीगाफ (रेशमी जाळीमुद्रणाच्या साहाय्याने निर्मिलेला मुद्रित आकृतिबंध), शिलामुद्रण (लिथोगाफी), उत्कीर्ण मुद्रण (इंटॅग्लिओ) इ. तंत्रांच्या अध्यापनाची भर घातली. त्यामुळे हा विभाग समृद्ध झाला असून सध्या तेथे पदव्युत्तर परीक्षेपर्यंत शिक्षण दिले जाते.
स्वातंत्र्योत्तर काळात व्ही. एस्. अडुरकर हे पहिले भारतीय कला-संचालक सर जे. जे. स्कूलच्या प्रमुख पदी आले (१९४७-५०). त्यांनी देशात व परदेशांत कला व कारागिरीशी निगडित शिक्षण घेतले होते. स्वतंत्र भारतात प्रयोगशील कलानिर्मितीसोबतच कलेच्या इतर क्षेत्रांतील कौशल्यावर अधिष्ठित असलेल्या कलेच्या गरजेचे महत्त्व ते जाणून होते. त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न करण्यास सुरूवात केली. त्यानंतर ज. द. गोंधळेकर हे बहुश्रूत व्यक्तिमत्त्वाचे चित्रकार जे. जे.चे अधिष्ठाता (डीन, १९५३-५९) झाले. उत्तम चित्रकार, कलेतिहास व सौंदर्यशास्त्र यांचे अभ्यासक असणाऱ्या गोंधळेकरांच्या काळात, संस्थेत कलाविषयक अनेक उपक्रम राबविले गेले. पूर्वीच्या शिकविण्याच्या पद्धतीत त्यांनी प्रयत्नपूर्वक काही बदल घडवून आणले. चित्रकार ज. द. गोंधळेकर हे जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे अधिष्ठाता असताना त्यांच्या कारकीर्दीत सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टची शताब्दी १९५७ मध्ये साजरी झाली. याचवेळी स्टोरी ऑफ सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट हे सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टचा इतिहास कथन करणारे अभ्यासपूर्ण पुस्तक जे. जे.चे माजी विदयार्थी व चित्रकार नी. म. केळकर यांनी लिहिले. यातून जे. जे. स्कूलची शंभर वर्षांची वाटचाल दिसून येते.
वास्तुकला व उपयोजित कला हे विभाग सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट या मातृसंस्थेपासून विलग होऊन स्वतंत्र झाले (१९५८). या संस्था पुढे विकसित होऊन महाविदयालयाच्या दर्जाला पोहोचल्या आणि ‘सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट’, ‘सर जे. जे. इन्स्टिटयूट ऑफ ॲप्लाइड आर्ट’ व ‘सर जे. जे. कॉलेज ऑफ आर्किटेक्चर’ या तीन स्वतंत्र संस्था महाविदयालयांच्या स्वरूपात आजतागायत कार्यरत राहिल्या आहेत. १९६० मध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतरच्या काळात इतर सर्व विषयांसोबतच कलेच्या विकासासंबंधीही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. दृक्कलेच्या विकासासाठी महाराष्ट्राचे कलासंचालनालय राज्यशासनातर्फे स्थापन करण्यात आले (१९६५). यानंतरच्या काळात महाराष्ट्र शासनाचे कलाविषयक निर्णय हे कलासंचालकांमार्फत घेण्यात येऊ लागले व सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे अधिष्ठाता हे केवळ संस्थाप्रमुख म्हणून कार्य करू लागले. तेव्हापासून ते आजपर्यंत अनेकांनी संस्थाप्रमुखपदाची जबाबदारी प्रभारी अधिष्ठाता किंवा कायमस्वरूपी अधिष्ठाता म्हणून सांभाळली. त्यांतील प्रल्हाद अनंत धोंड (कार. १९५९-६८), एस्. बी. पळशीकर (कार. १९६८-७५) यांची कारकीर्द संस्मरणीय व उल्लेखनीय ठरली. कलाशिक्षणाचा पुनर्विचार करण्यासाठी कलासंचालनालयातर्फे एक समिती स्थापन करण्यात आली (१९६५). त्यात कलाशिक्षणतज्ञ व्ही. आर्. आंबेरकर, चित्रकार माधव सातवळेकर (१९१५-२००६), वि. ना. आडारकर व प्र. अ. धोंड यांचा समावेश होता. या समितीच्या शिफारशींनुसार तत्कालीन परिस्थितीला अनुरूप असा नवा मूलभूत कलाशिक्षणविषयक अभ्यासक्रम तयार करण्यात आला व कलासंचालक माधव सातवळेकर यांच्या कारकीर्दीत (कार. १९६९-७५) महाराष्ट्रभर राबविण्यात आला. त्यानुसार सौंदर्यशास्त्र व कलेतिहास हे नवीन विषय चित्रकलेच्या इतर विषयांसोबतच नव्या अभ्यासकमात अंतर्भूत झाले.
सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट व सर जे. जे. इन्स्टिटयूट ऑफ ॲप्लाइड आर्ट या दोन्ही संस्था मुंबई विदयापीठाशी संलग्न होऊन (१९८१) चित्र-शिल्प व उपयोजित कला या विषयांमध्ये ‘जी.डी. आर्ट’ या पदविकेऐवजी ‘बी. एफ्. ए’ ही पदवी विदयार्थ्यांना मिळू लागली. लवकरच ललित कला (फाइन आर्ट) या विषयातील पदव्युत्तर शिक्षणाचीही सोय होऊन सध्या चित्रकला, व्यक्तिचित्रण, भित्तिचित्रण व मुद्रानिर्मिती (प्रिंट मेकिंग)या विषयांतील‘एम्.एफ्.ए’ या पदवीपर्यंतचे शिक्षण सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट या संस्थेत दिले जाते. १९८२ मध्ये या कलाशिक्षणसंस्थेस १२५ वर्षे पूर्ण झाली व त्यानिमित्ताने या संस्थेच्या संग्रहातील ऐतिहासिकदृष्टया महत्त्वाच्या व मौल्यवान अशा चित्रशिल्पसंग्रहाचे प्रदर्शन संस्थेच्याच इमारतीत भरविण्यात आले होते. २ मार्च २००७ रोजी या संस्थेस १५० वर्षे पूर्ण झाली व दि. १ मार्च ते १२ मार्च २००८ या काळात संस्थेच्या १५० वर्षांच्या वाटचालीतील निवडक कलाकृतींचे प्रदर्शन भरविले गेले.
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply