नवीन लेखन...

केसरी वृत्तपत्राचा वर्धापनदिन

केसरी वृत्तपत्राची स्थापना ४ जानेवारी १८८१ रोजी झाली.

केसरीच्या प्रकाशनापूर्वी त्याविषयीचे जाहिरातवजा निवेदन निबंधमालेत व नेटिव्ह ओपिनियनमध्ये प्रसिध्द झाले होते. त्याखाली विष्णुशास्त्री चिपळूणकर, बा. ग टिळक, गो. ग. आगरकर, वामनराव आपटे, महादेव बल्लाळ नामजोशी आणि गणेश कृष्ण गर्दे अशा सहाजणांच्या स्वाक्षऱ्या होते. त्या निवेदन म्हणले होते: “ वरील केसरी नावाचे वर्तमानपत्र निव्वळ महाराष्ट्र भाषेत येत्या १८८१ सालच्या आरंभापासून दर मंगळवारी काढण्याचा विचार खालील मंडळीने केला आहे. या पत्रात एरवीच्या वर्तमानपत्राप्रमाणे बातम्या, राजकीय प्रकरणे, व्यापारासंबंधी माहिती वगैरे नेहमीचे विषय तर येतीलच; पण याखेरीज लोकस्थितीवर निबंध, नवीन ग्रंथांवर टीका वगैरे विषयांचाही त्यात समावेश केला जाईल. तसेच विलायतेत ज्या राज्यप्रकरणांची वाटाघाट होते ती इकडील लोकांस समजणे अवश्य असल्यामुळे त्याचाही सारांशरुपाने यात संग्रह करण्याचा बेत केला आहे. आजपर्यंत वरील तीन विषयांवर- म्हणजे देशस्थिती, देशभाषेतील ग्रंथ व विलायतेतील राजकारण- या विषयांच्या संबंधाने जसे यथास्थित उद्‌घाटन व्हावयास पाहिजे होते तसे कोणत्याही वर्तमान- पत्रात झाले नाही, असे म्हणण्यास हरकत नाही. तर ही मोठी उणीव नाहीशी करुन टाकण्याचे आम्ही मनात आणले आहे.”

केसरीच्या पहिल्या अंकाच्या पहिल्या पानावरील निवेदनही बोलके आहे. त्यातील काही भाग असा: “तर सरकारी अधिकारी आपापली कामे कोणकोणत्या तऱ्हेने बजावतात याविषयी केवळ निःपक्षपात बुध्दीने व कोणाची भीड न बाळगता मजकूर लिहिण्याचा आमचा इरादा आहे. अमुक अमुक गोष्ट केली तर तिजवर चर्चा केली असता सरकारची मर्जी जात राहील वगैरे क्षुद्र विचारास आम्ही कधी थारा देणार नाही. वर्तमानपत्रकर्ते हे रयतेचे कोतवाल व वकील होत. तर हे दोन्ही अधिकार होईल तितक्या दक्षतेने बजावण्याचा आम्ही संकल्प केला आहे.”

पहिली सात वर्षे आगरकर हे केसरीचे संपादक होते. कोल्हापूर गादीच्या प्रकरणात टिळक व आगरकर या दोघांना चार महिने तुरुंगवासाची शिक्षा झाली. १८८४ पासून उभयतांतील मतभेद वाढत गेले. हे मतभेद राजकीय-सामाजिक प्रश्नांप्रमाणेच काही अंशी व्यक्तिगत पातळीवरीलही होते. केसरी- मराठा संस्था आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी अशा दोन्ही ठिकाणी मतभेद वाढत गेल्यामुळे टिळकांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटी सोडली, तर आगरकरांनी केसरीच्या संपादकपदाचा त्याग केला. जहाल राष्ट्रवादी चळवळीचे मुखपत्र म्हणून मा,लोकमान्य टिळक यांनी केसरीला आकार दिला.

टिळकांनी पत्रकारिता त्यांचा राजकीय नेतृत्वाचा आणि व्यक्तिमत्वाचाच एक अविभाज्य भाग होती. हिंदु-मुस्लिम दंगली, दुष्क़ाळ, प्लेगची साथ, वंगभंगाची चळवळ अशा महत्वाच्या घटनाप्रसंगी टिळकांनी केलेले लेखन मराठी वृत्तपत्रांच्या इतिहासात अजरामर ठरले आहे. आक्रमक व धारदार शैलीतील त्यांचे अग्रलेख राजकीय जागृतीचे साधनच बनले होते.

‘शिवाजीचे उद्‌गार’ या १५ जून १८९७ रोजी प्रसिध्द झालेल्या कवितेमुळे लोकमान्य टिळकांना राजद्रोहाच्या आरोपाखाली दीड वर्ष कारावासाची शिक्षा झाली. १९०४ मध्ये राष्ट्रीय चळवळीचा जोर वाढत गेल्यावर टिळकांचे लेखनही अधिक आक्रमक व जहाल बनले. २४ जून १९०८ रोजी टिळकांना राजद्रोहाच्या आरोपाखाली पुन्हा शिक्षा झाली. ही शिक्षा सहा वर्षांची होती. ती मंडाले येथे भोगावी लागली. केसरीत प्रसिध्द झालेले हे लेखन कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचे होते. परंतु टिळकांनी त्याची जबाबदारी संपादक या नात्याने स्वतःकडे घेतली.

१९०८ ते १९१० पर्यंत खाडिलकर व १९१० ते १९१८ पर्यंत केळकर यांनी संपादकाची जबाबदारी सांभाळली. १९१८ ते १९२० या काळात टिळक व केळकर विलायतेस गेल्यामुळे खाडिलकरांनीच संपादकपदाची जबाबदारी सांभाळली. १९२० मध्ये खाडीलकरांनी केसरी सोडला. १९२१ मध्ये ते लोकमान्य या मुंबईतील वृत्तपत्राचे संपादक झाले. १९२३ साली त्यांनी स्वतःचे नवाकाळ हे वृत्तपत्र काढले.

१९२० नंतरची केसरीची संपादकीय परंपरा अशी ; न. चिं. ऊर्फ तात्यासाहेब केळकर (१९१० ते १९३२), वा. कृ. भावे (१९३२-३३), जनार्दन सखाराम करंदीकर (१९३३-४६), दा. वि. ऊर्फ बाबूराव गोखले (१९४६-४७), ग. वि. केतकर (१९४७-५०), जयंतराव टिळक (१९५०-८०), त्यानंतर चंद्रकांत घोरपडे व डॉ. शरच्चंद्र गोखले, अरविंद व्यं. गोखले हे केसरीचे संपादक झाले. केसरी १९२९ साली द्विसाप्ताहिक झाला.

२ जून १९५० रोजी लोकमान्यांचे नातू जयंतराव टिळक केसरीचे संपादक झाले. त्यांनी केसरीची रविवार आवृत्ती सुरु केली, त्यामुळे त्याचे रुपांतर त्रिसाप्ताहिक झाले. ८ ऑक्टोबर १९६२ रोजी केसरीचे दैनिकात रुपांतर झाले. जयंतराव टिळक १९८० पर्यंत संपादकीय होते.

केसरीने सोलापूर, सांगली व अहमदनगर येथून स्वतंत्र आवृत्त्या प्रकाशित करण्यास आरंभ केला आहे. सोलापूर येथून प्रसिद्ध होणाऱ्या आवृत्तीचे नाव केसरी गर्जने (केसरीची गर्जना) असे आहे, तर सांगलीहून प्रसिध्द होणाऱ्या आवृत्तीचे दक्षिण महाराष्ट्र केसरी असे नामकरण करण्यात आले आहे. केसरीने १९९८ पासून चिपळूणहून आवृत्ती प्रकाशित करण्यास प्रारंभ केला आहे.

केसरीने शंभराहून अधिक वर्षांच्या वाटचालीत राष्ट्रवादाची आपली भूमिका कायम ठेवली आहे.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..