पुण्यातील स्वरानंद ही संस्था ७ नोव्हेंबर १९७० रोजी स्थापन झाली आणि १९९५ साली तिचे नाव स्वरानंद प्रतिष्ठान असे झाले. १९७० सालात पुण्यातील विश्वनाथ ओक व हरीश देसाई यांनी ‘आपली आवड’ या शीर्षकाखाली प्रथमच मराठी वाद्यवृन्दाचा कार्यक्रम केला. त्याला त्या काळी प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्याच बरोबर अरुण नूलकर , सुधीर दातार, अजित सोमण, सुहास तांबे, सुरेश करंदीकर, प्रकाश भोंडे या मित्रांनी सक्रिय सहभाग घेतला. पुढे विविध संकल्पनांवर आधारित कार्यक्रम होतच गेले. त्यातूनच स्वरानंद ही संस्था स्थापन झाली. केवळ मराठी सुगम संगीताचे रंगमंचीय कार्यक्रम करणारी ‘स्वरानंद प्रतिष्ठान’ ही तसे करणारी आद्य संस्था म्हणून ओळखली जाते.
‘स्वरानंद’ ही संस्था नेहमीच रसिक श्रोता हा केंद्रबिंदू मानत आली आहे व कार्यक्रमांची आखणी व बांधणी केली आहे. अडीच-तीन तास रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी लोकप्रिय भावगीते, चित्रगीते, अभंग, लावणी, नाट्यगीते, कोळीगीते, लोकसंगीत आदी गानप्रकारांची गाणी स्वरानंदाच्या कार्यक्रमांत सादर होतात.
स्वरानंदचा उद्देश हा भारतीय अभिजात आणि ललित संगीताची अभिरुची जनात वाढविणे, त्याचा प्रसार करणे राहिला आहे.संगीतविषयक प्रशिक्षण, मार्गदर्शनपर उपक्रम राबविणे तसेच तशा प्रकारच्या इतरांच्या उपक्रमांचे आयोजन करणे. नवीन कलाकारांना योग्य त्या संधी देणे. दृक्श्राव्य माध्यमांद्वारे संगीताची अभिरुची वाढवणे, प्रचार करणे अगर अशा उपक्रमांना सक्रिय सहाय्य देणे, संगीताबद्दल संशोधनात्मक कार्य करणे.
बालकलाकार, युवा कलाकार यांना योग्य प्रकारे उत्तेजन मिळेल असे सांस्कृतिक, संगीत विषयक उपक्रम राबविणे, संगीतविषयक साहित्याचे ना नफा ना तोटा पद्धतीने प्रकाशन करणे तसेच अशा प्रकाशनास उत्तेजन देणे.
फक्त रंगमंचीय कार्यक्रम करणे हा संकुचित हेतू न ठेवता मराठी सुगम संगीतातील बुजुर्ग कवी, संगीतकार, गायक, वादक यांचे कृतज्ञतादर्शक सोहोळेही स्वरानंदतर्फे होत असतात. स्वरानंद ही संस्था संगीत विषयक कार्यशाळा, व्याख्याने, दृक्-श्राव्य कार्यक्रम वगैरे आयोजित करते. संस्थेचे सुसज्ज ग्रंथालय आहे आणि त्यांच्याकडे ध्वनिफितींचा मोठा संग्रहही आहे. मराठी भावगीतांचा इतिहास हा महत्त्वाचा प्रकल्प स्वरानंद प्रतिष्ठानने हाती घेतला आहे.
स्वरानंद प्रतिष्ठान ही संस्था संगीत क्षेत्रातील कलावंतांना नियमितपणे काही पुरस्कार देते. पुरस्काराचे स्वरूप पाच हजार रुपये रोख आणि सन्मान चिन्ह असे आहे.
पुरस्काराची नावे :-
वादकाला विजयाबाई गदगकर पुरस्कार, शास्त्रीय किंवा सुगम संगीत गायकाला माणिक वर्मा पुरस्कार, संगीत रचनाकाराला केशवराव भोळे पुरस्कार, सुगम संगीत गायकाला देण्यात येणारा उषा अत्रे (उषा वाघ) पुरस्कार, २०१० सालापासून ‘स्वरानंद प्रतिष्ठान’चे मानद अध्यक्ष काव्यगायक गजाननराव वाटवे यांच्या नावाने सुरू केलेला एक स्वतंत्र पुरस्कार. पहिला पुरस्कार भावगीत गायक अरुण दाते यांना दिला गेला.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply