साधारणपणे वीस बावीस वर्षांपूर्वी विजय लहान असताना दर रविवारी आम्ही तिघेही मंडईला जायचो. शनिपारच्या बसस्टाॅपवर उतरलं की, रस्ता ओलांडायचा व पलीकडे जनता सहकारी बँकेकडून कडेकडेने चालू लागायचं. वाटेत गोविंद दाजी जोशी आणि कंपनी यांचे लकडे सुगंधी हे दुकान लागायचं. उदबत्ती, चंदन, कापूर, धूप यांचा संमिश्र वास नाकात शिरायचा. त्याच्यापुढे गेलं की, कोपऱ्यावर मुरलीधर रसवंती गृह. बाहेर चरकातून बाहेर येणाऱ्या उसांच्या चिपाडांचा घमघमाट जाणवायचा. रस्त्याच्या कडेला बसलेल्या भाजीवाल्यांना चुकवत पुढे जावे लागे. गोरे आणि मंडळी यांच्या दुकानापुढून पुढे गेलं की, ए. व्ही. काळे यांचं पूजा सामानाचं दुकान दिसायचं. त्यांच्या बरोबर समोर, रस्त्याच्या पलीकडे माणसांची ‘ही गर्दी’ दिसायची.
बायका, माणसा मुलांची ती गर्दी असायची ‘अनोखा केंद्र’ स्वीट मार्टच्या दुकानासमोरची! ते दुकान होतं दोन मोठ्या गाळ्यांचं. दुकानांच्या उजव्या बाजूला रस्त्याला लागून डोसा आणि उत्तप्पा करण्यासाठी दोन मोठे लोखंडी जाड पत्रे लावलेले असायचे. पत्र्याच्या पलीकडे दोन बनियनमधली तरुण मुलं स्टीलच्या पिंपातून मोठ्या वाटीने डोशाचे मिश्रण घेऊन त्या लोखंडी तव्यावर डोसे करायचे असतील तर भरभर फिरवून सव्वा एक फुटाचे एकावेळी सहा ते आठ गोल करायचे. उत्तप्पा करायचा असेल तर दहा अकरा इंचाचा जाडसर गोल करायचे. त्याच उत्तप्पावर लागलीच कांदा, मिरची, कोथिंबीर शिंपडून त्यावर पातेल्यातून उलथान्याने तेल सोडले जायचे. तिकडे डोसे खरपूस भाजले जात असताना स्टीलच्या मोठ्या डब्यातून बटाट्याची भाजी उलथान्याने काढून डोशाच्या मथ्यभागी घालून चलाखीने डोसा दोन्ही बाजूंनी मुडपून तसेच ते डिशमध्ये उलटे टाकले जात असत. त्याच डिशच्या कडेला घट्ट खोबऱ्याची चटणी घातली की, मी माझ्याकडचे कुपन देऊन ती डिश घेऊन विजूच्या आईकडे देत असे.
संध्याकाळी पाचपासून रात्री नऊपर्यंत डोशाची दोन चार पिंप भराभर संपून जात असत. डोसा, उत्तप्पा, सामोसा, इडली, बटाटेवडा अशा पाच प्रकारच्या रंगीत कुपनांसाठी ताटकळत उभे रहावे लागे. कुपन हातात आल्यावर निम्मी लढाई जिंकल्याचा आनंद होत असे. मग ते कुपन घेऊन डोसा करणाऱ्यांच्या पुढे उभं रहावं लागे. तो कुपन घेणारा माणूस तयार होणाऱ्या डोशांचा विचार करुन कुपनं स्वीकारत असे. एकीकडे इडली, सामोरे, वडेवाले लगेच डिश घेऊन मोकळे होत असत.
बहुधा सर्वजण हातात डिश घेऊन उभ्यानेच खाणे पसंत करीत असत. काही स्त्रिया आपल्या लहान मुलांना दुकानांच्या फरशीवरच बसून त्यांना खाऊ घालत. कोपऱ्यात बेसिनला स्टीलचा ग्लास टांगलेला असे. तिथंच पाणी पिणाऱ्यांची व हात धुणाऱ्यांची गर्दी असे. त्यातूनच डिशेस धुणारा तिथे आल्यावर सर्वांना ताटकळत उभे रहावे लागे.
रात्री नऊनंतर गर्दी कमी झाल्यावर काउंटरवर बसलेल्या गुजराथी मालकाला थोडी उसंत मिळत असे. मग तो गल्यातील नोटा मोजायला घेत असे. इतर फरसाण, स्वीटच्या विक्रीपेक्षा हा गल्ला जास्त जमा झालेला असे.
वर्षातील तिन्ही ऋतूत तिथे अशीच गर्दी मी पाहिलेली आहे. पावसाळ्यात आडोसा मिळतो आहे, म्हणून खाणाऱ्यांची गर्दी वाढत असे. पाऊस उघडेपर्यंत सर्वजण खाणं झालं तरी अंग चोरुन उभे रहात असत. हिवाळ्यात भूक जास्त लागते, त्यामुळे डोसा खाणे आणि तो खाऊन होईपर्यंत त्या भट्टीजवळच उभे राहून उब घेणे काही जणांनाच जमायचे.
दहा पंधरा वर्षांनंतर अनोखा केंद्रची गर्दी स्पर्धेमुळे कमी होऊ लागली. दक्षिण दावणगिरी डोशाच्या गाड्या चौकाचौकात दिसू लागल्या. माणसांची उभं राहून खाण्याची मानसिकता कमी होऊ लागली. डोसा, उत्तप्पा करणारे कामगार गिऱ्हाईकाची वाट पाहून कंटाळू लागले. दोन भट्ट्यांपैकी एक भट्टी कमी केली. तरीदेखील गिऱ्हाईक काही येईना.
गेल्या रविवारी मी त्या बाजूला गेलो होतो, तेव्हा माझ्या डोळ्यांवर माझा विश्वासच बसला नाही. आता त्या दुकानाची ‘अनोखा केंद्र’ ही पाटीही अस्तित्वात नाहीये. निम्मी जागा त्या मालकानं रेडीमेड कपडेवाल्याला दिलेली आहे. उरलेल्या जागेत थोडंफार मिठाईचे फर्निचर व कॅश काऊंटर शिल्लक आहे. काऊंटरपुढे ‘दक्षिण दावणगिरी डोसा’ अशी पाटी लावलेली आहे. एकेकाळच्या गर्दीचा मागमूसही आता नाही. पूर्वी दोघं भाऊ दुकान चालवायचे. आता एकजणच खुर्चीत बसलेला दिसला.
कालाय तस्मै नमः हे खरंच आहे. जे काल होतं ते उद्या राहिलंच याची खात्री कोणीही देऊ शकत नाही… शेवटी एवढंच म्हणू शकतो, अन्नदाता सुखी भवः! एकेकाळी याच माणसानं कित्येकांची क्षुधाशांती केलेली आहे, त्याचे कल्याण होवो!!
© – सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
११-१०-२०.
Leave a Reply