नवीन लेखन...

अंतर–ज्ञानी

सध्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या शब्दकोशात अचानक एक नवीन शब्द रुजू झाला आहे, तो म्हणजे Social Distancing. हा सगळा प्रकार नवीन वाटत असला तरी वेगवेगळ्या मार्गे आपण अनेकदा हे Social Distancing करत असतोच. “अंतर” ठेवणे हा आपल्या दैनंदिन आयुष्याचा एक भागच आहे.

वाहन चालवताना रस्त्यावर बरेचदा आपण “सुरक्षित अंतर ठेवा “ अशी सूचना वाचतो. गाड्या जास्त जवळून चालवल्याने अपघात होऊ नये म्हणून हे Social Distancing पाळतोच की.

“दुसरे मुल केव्हा…… पहिले बालवाडीत जाईल तेव्हा “ ही अशी जाहिरात पूर्वी tv वर, बसच्या मागे, वगैरे दिसायची. हा देखील त्यातलाच प्रकार. इकडे Distancing private असलं तरी हेतू मात्र Social आहे ना ?…

या व्यतिरिक्त जर आजूबाजूला दृष्टीक्षेप टाकला तर लक्षात येईल की सगळीकडेच “अंतर” फार महत्वाची भूमिका बजावत असतं. आपल्या दोन “श्वासात” आणि “हृदयाच्या ठोक्यात” सुद्धा “अंतर” असतंच आणि ते नसतं तर काय झालं असतं याचा अंदाज आपल्याला साधी धाप लागली तरी येतो. वृक्षावरोपण करताना दोन झाडांमध्ये अंतर ठेवावं लागतं नाहीतर झाडं वाढल्यावर मातीत त्यांची मुळं एकमेकांत गुंतून त्यांना वाढायला जागा पुरत नाही आणि झाड बहरल्यावर बुंधे देखील मोकळे राहू शकत नाहीत. रस्त्यावरच्या दिव्यांचे खांब जर अंतर सोडून लावले नाहीत तर संपूर्ण परिसर कसा बरं उजळून निघेल?

काहीही लिहायला घेतलं की सुरवातीला आपण थोडं अंतर सोडतोच. दोन शब्दात अंतर नसेल तर बरेचदा अर्थही बदलतो. दररोजच्या संभाषणात, वादात किंवा मोठ्या मोठ्या भाषणात, अगदी शास्त्रीय संगीतापासून ते पाश्चिमात्य गाण्यापर्यंत सर्वच ठिकाणी शब्दातल्या अंतराला, pauses ना खूप महत्व आहे.

याशिवाय कधीकधी अप्रत्यक्षपणे देखील हे “अंतर” आपलं काम बजावत असतं.

शाळेत शिकवलेला श्लोक अजूनही आठवतोय

अतिपरिचयादवज्ञा संतत गमनादनादरो भवति ।
मलये भिल्लपुरन्ध्री चन्दनतरु काष्ठ मिन्धनं कुरुते ॥

त्यात लिहिल्या प्रमाणे एखाद्याकडे सतत जाण्याने तुम्हाला महत्व रहात नाही, किंमत रहात नाही. आपण आपल्याचं शहरातल्या मित्र किंवा आप्तेष्टाकडे रोज किंवा वारंवार जातो त्यापेक्षा परगावी असणाऱ्या एखाद्या नातेवाईकांकडे ४-६ महिन्यानंतर गेलो तर नक्कीच जास्त आदरातिथ्य होणार….. आणि यात वावगं काहीच नाही… ही आपण दोन भेटीत ठेवलेल्या अंतराची किमया आहे.

क्रिकेट विश्वचषक ४ वर्षातून एकदा म्हणजे “एवढं अंतर ठेवून” खेळवतात म्हणून त्याला महत्व…. जर वर्षातून दोनदा खेळवलं तर नक्कीच तेव्हढं कौतुक राहणार नाही…. १००० एपिसोड होणाऱ्या डेली सोप पेक्षा आठवड्यातून एकदा लागणाऱ्या किंवा “अरेरे….इतक्यात का संपली” अशी हुरहूर वाटणाऱ्या प्रपंच, झोका सारख्या जुन्या मालिका जास्त लक्षात राहतात…. अमीर – शाहरुख वर्षातून एखादाच सिनेमा करतात म्हणून लोकं वाट बघत असतात. एकेकाळी मी रामगोपाल वर्मा यांचा जबरदस्त पंखा होतो कारण ठराविक पण दर्जेदार चित्रपटच ते करत… पण त्यांनी RGVs factory चालू करून घाऊक भावात सिनेमे काढले आणि मग मात्र प्रत्येक चित्रपटाला “डरना जरुरी है “ असं वाटू लागलं…. या सगळ्यात अप्रत्यक्षपणे कारणीभूत आहे ते त्यातलं “अंतर”

आमच्या इकडे एक पॉट आईस्क्रीमचं दुकान होतं… खूप मागणी होती… गर्दी खूप असायची पण ते नेहमी ठराविक पॉटच तयार करायचे… कधी कधी तर संध्याकाळी ७-७.३० लाच दुकान बंद करायचे आणि आईस्क्रीम संपलं म्हणून अनेक जण नाखुशीने परत जायचे. न राहवून मी एकदा त्या काकांना विचारलं की एवढी मागणी आहे तर तुम्ही जास्त पॉट का नाही तयार करत… रात्री उशिरापर्यंत येतील की लोकं…. तेव्हा त्यांनी हेच सांगितलं की मी कधीही कुठेही उपलब्ध केलं तर लोकं आवर्जुन येणं कमी होईल…. आज लवकर संपलं म्हणून उद्या खास माझ्या आईस्क्रीमसाठी नक्की येतील…. दोन supply मध्ये “अंतर” आहे म्हणून त्याला किंमत आहे……… आता व्यावसायिक दृष्टीने हे गणित आणि तत्व कदाचित अयोग्य असेल पण त्यांचा brand मात्र त्यामुळे बळकट झाला हे नक्की….

अगदी आजकालच्या तरुणाईच्या सोप्या भाषेत सांगायचं तर तुम्ही जर रोज instagram वर उगाच फोटो किंवा FB आणि WhatsApp वर उगाच नियम असल्यासारखं रोज post टाकाल तर कदाचित मित्रमंडळी direct स्क्रोल करून ढकलतील किंवा त्यांच्या नजरेतून तरी सुटेल…….. पण ठराविक अंतरानी टाकलीत तर आवर्जून बघतील… असंच काहीसं…

एकंदरीत “अंतर” हा आपल्या दैनंदिन आयुष्यातला एक महत्वाचा भाग आहे. आपण एकमेकांशी बोलताना,वागताना सुद्धा व्यक्तीपरत्वे त्याच्याशी किती “अंतर ठेवायचं”, कोणाला “अंतर द्यायचं” नाही तर कोणापासून कायम कसं “अंतर राखून” असायचं ह्याचा हिशोब आपल्या “अंतर-मनात” आपण “निरंतर” करत असतो…. आणि सद्य परिस्थितीत तर योग्य ते “सामाजिक अंतर” ठेवणंचं फायदेशीर आहे याचा “अंतर्मुख” होऊन विचार करण्याची गरज आहे.
शेवटी आपण “आज” ठेवलेल्या “अंतरात” आपला उज्ज्वल “उद्या” उदयास येणार आहे हे आपण आपल्या “अंतरात” पक्कं केलं पाहिजे…
भविष्याचा वेध घेण्यासाठी म्हणजेच “अंतर्ज्ञानी” होण्यासाठी आधी “अंतर-ज्ञानी” होण्याची आवश्यक्ता आहे हे खरं…..

— क्षितिज दाते.

ठाणे.

Avatar
About क्षितिज दाते , ठाणे 79 Articles
केवळ एक हौस म्हणून लिखाण सुरू केलं . वेगवेगळ्या विषयांवर पण साध्या सोप्या भाषेत लेखन . आकाशवाणीवरील कार्यक्रमात काही लेखांचं प्रसारण झालं आहे .काही लेख/कथा पॉडकास्ट स्वरूपात देखील प्रसारित झाल्या आहेत . Snovel या वेबसाईट / App वर "सहज सुचलं म्हणून" या शीर्षकाखाली तुम्ही ते पॉडकास्ट ऐकू शकता.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..