नवीन लेखन...

अंतरंग – भगवद्गीता – सांख्ययोग

Bhagavad Gita

सांख्ययोग 

नासदासीन्नो सदासीत्तदानीं नासीद्रजो नो व्योमा परो यत् । किमावरीवः कुह कस्य शर्मन्नम्भः किमासीद्गहनं गभीरम् ॥ऋग्वेद १०-१२९॥

नासदीयसूक्त………

असं म्हणतात की ऋग्वेदाच्या १० व्या मंडलातील या सुक्तात सृष्टीच्या उत्त्पत्तीच्या वेळचे जे वर्णन आले आहे ते बरेचसे Big Bang Theory (TV serial नव्हे!) या सिद्धांताशी मिळते जुळते आहे. तत्त्वज्ञ आणि शास्त्रज्ञ या भिन्न मार्गांनी जाणा-या विचारवंताच्या तर्कामधील हे साम्य विस्मयकारक आहे. तत्त्वज्ञाने तर्काने जे मांडावे तेच पुढे एखाद्या शास्त्रज्ञाने कसोटीने सिद्ध करावे हे विस्मयकारक असले तरी तथ्य आहे. काय असु शकेल याचं कारण? थोडं खोलात गेलं तर दोघांतली साम्यस्थळं दिसायला लागतात. दोघेही बुद्धीजीवी. दोघेही जण एकाच ध्येयाच्या वाटेवर असतात. शास्त्रज्ञ भौतिक प्रगतीच्या माध्यमातून शाश्वत सुखाचा शोध घेतो तर तत्त्वज्ञ अध्यात्मिक किंवा तात्त्विक प्रगतीच्या माध्यमातून…

वर्षानुवर्षे होणारी शास्त्रीय प्रगती माणसाला अधिकाधीक सुखी बनवते पण शास्त्रज्ञाला अधिकच कोड्यात टाकते. इतकी भौतिक सुखाची साधने निर्माण करूनही मानव खरोखर सुखी होतोय का? याचं उत्तर हो असं नक्कीच नाही. कारण तसं असतं तर अधिक सुखाची साधनं उभी करायला लागलीच नसती. तत्त्वचिंतकही याच कोड्यात हरवतो. नवनवीन साधनांमुळे मानव सुखी होतो, पण अल्पकाळच. मग कायम सुखी ठेवणारे साधन कोणते? खरोखर सुख साधनातच असते की त्याचा शोध दुसरीकडे कुठे घ्यावा?

अर्जुनही याच द्विधा मनस्थितीत पडतो. युद्ध जिंकल्यावर राज्य मिळणार, सुखाची सर्व साधने मिळणार पण स्वतःच्याच नातेवाईकांना मारण्याचे दुःख भोगावे लागणार. बरं युद्ध न करावे तर संहाराचे दुःख जाणार पण पळपुटेपणाची अवहेलना वाट्याला येणार. म्हणजे कोणतेच सुख पूर्णत्वाने वाट्याला येणार नाही त्याला दुःखाची किनार असणारच. त्यालाही असंच सुख हवंय जे कायम टिकेल आणि दुःखरहीत असेल. अर्जुन अतिशय गोंधळून जातो. त्याची विचारशक्ती कुंठीत होते आणि युद्ध करायलाच नको असा काहीसा अनिश्चित निर्णय घेऊन तो कृष्णाकडे वळतो.

आता कृष्णापुढे काम आलं एका गोंधळलेल्या परंतु अभ्यासु विद्वानाला समजावण्याचं. हे काम निश्चित सोपं नाही. कारण जो विचार कृष्ण मांडणार आहे तो अर्जुनाला पटवून द्यायचा आहे. त्यासंदर्भात त्याला ज्या शंका असतील त्यांचं निरसन करायचं आहे. उगीच काहीतरी सांगून वेळ मारून न्यायला तो बाबांना खाऊ मागणारा लहान मुलगा नाहीये!!

मोठ्या कौशल्याने कृष्ण अर्जुनाला युद्ध का करावे हे पटवून देतो. केवळ तेवढेच नव्हे तर शरीराचे आणि आत्म्याचे स्वरुप, कर्माचे महत्त्व, बुद्धीचे स्थैर्य आणि या सगळ्यांच्या ज्ञानाने येणारी स्थितप्रज्ञ वृत्ती असे विषय अनुक्रमे मांडून शाश्वत सुखाचा मार्ग त्याच्यापुढे उभा करतो.

नासदीयसूक्त … सांख्ययोग….

असं मानतात की नासदीयसुक्तातच सांख्य तत्त्वाची बीजेही आढळतात. सांख्य….. तत्त्वज्ञानातील एक सिद्धांत… ऋग्वेदीय ऋषींपासून कपिल मुनींपर्यंत अनेक तत्त्वज्ञांना भुरळ पाडणारा. बौद्ध, जैन अशा अनेक तत्त्वप्रणालीत स्थान मिळविणारा विचार.

सांख्य तत्त्वाचा संदर्भ किंवा विवेचन ऋग्वेदासह श्वेताश्वतर, तैत्तिरीय, ऐतरेय, बृहदारण्यक अशी उपनिषदे, बौधायनाचे गृह्यसुत्र, पतंजलीचे योगसुत्र आणि चरकसंहीता इतकेच काय पण परमार्थाच्या चिनी भाषांतरातही आढळतात. एक वेगळा ग्रंथ लिहीता येईल इतकी सामग्री सांख्य या एका शब्दात आहे. पण तूर्तास आपण केवळ भगवद्गीतेच्या दुस-या अध्यायाच्या संदर्भात आलेला सांख्य विषयच पाहू यात.

जसं संगणकाचं संपूर्ण विश्व हे बायनरी म्हणजे ० आणि १ एक या दोन तत्त्वांनी बनलंय तसंच सांख्य तत्त्वाच्या मते विश्व हे दोन तत्त्वांनी बनलंय. एक अविनाशी तत्व ‘पुरुष’आणि दुसरं विनाशी/विकारी तत्त्व ‘प्रकृती’. प्रकृती या तत्त्वात नश्वर अशा सर्व गोष्टी येतात तर पुरुष म्हणजे अविनाशी चैतन्य/आत्मा. या दोनहीच्या संयोगाने सृष्टीचे सर्जन होते. जेव्हा नश्वर शरीर विकाराच्या माध्यमातून नष्ट पावते तेव्हा आत्मा मुक्त होऊन प्रकृतीच्या दुस-या तत्त्वात सामावतो. असा सर्वसाधारण विचार सांख्य मांडतो.

आता गीतेकडे पाहू.. अर्जुनाच्या प्रश्नांचे तीन भाग पाडून प्रत्येक भागाला सांख्य सिद्धांताच्या आधारे कृष्ण उत्तर देतो.

पहीला भाग अर्थातच ‘नातेवाईकांच्या संहाराचा’. दुसरा भाग या कृतीतील ‘धर्म अधर्माचा’ आणि तिसरा भाग ‘मानसिक स्थैर्याचा’ कारण तेच ढळल्याने अर्जुन शस्त्र उचलणार नाहीये.

एका कुशल समुपदेशकाप्रमाणे प्रथम गोंधळलेल्या अर्जुनाचे लक्ष वेधुन घेण्यासाठी कृष्ण त्याला रागावतो. ऐन युद्धाच्या वेळी हे असले नपुंसकासारखे, पुरुषार्थाला बाधा आणणारे वर्तन करणे वीर अर्जुनाला अशोभनीय आहे हे तो परखडपणे सांगतो. सैरभैर झालेल्या अर्जुनाच्या बोलण्यातील विसंगतीवर तो बोट ठेवतो. परखड टीका झाल्याने सहाजिकच आता अर्जुनाचे लक्ष कृष्णाच्या विवेचनाकडे केंद्रित झाले आहे.

शरीर आणि आत्मा या दोन घटकांपासून जीवाचे अस्तीत्त्व बनते. यातील शरीर हे विकारी म्हणजेच नाश पावणारे आहे तर आत्मा हा अविकारी म्हणजे चिरंतन आहे. ज्या नातेवाईकांचे शरीर तू आपल्या बाणांनी विदीर्ण करणार आहेस ते शरीर नाश पावणारच आहे. तू नष्ट केलेस तरी आणि नाही केलेस तरी. याचा अर्थ काय? तर जे निश्चित नाश पावणार आहे त्यावर दुःख करणे आणि त्याविषयी युक्तीवाद करणे हे तर मुर्खपणाचे लक्षण आहे. मुठीत पकडलेली वाळू कितीही प्रयत्न केला तरी निसटुनच जाते म्हणून कोणी त्याचे दुःख करत नाही. तुझे नातेवाईकच काय पण तू , मी आणि हे इतर राजे महाराजे सुद्धा आज आहेत उद्या नसतील मग कोणाचा, किती आणि का शोक करायचा? बरं, शोक करून ते टिकणार थोडेच आहेत. उद्या तेही जाणारच आहेत.जे जे जन्म घेते त्याचा मृत्यू अटळ आहे हा सृष्टीचा नियम आहे.

अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे । गतासूनगतासूंश्च नानुशोचन्ति पण्डिताः।।२।।११।। न त्वेवाहं जातु नासं न त्वं नेमे जनाधिपाः ।न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम् ।।२।।।।१२।।

सर्व विनाशी तत्त्वांची उदाहरणे देऊन कृष्ण अर्जुनला समजावतो की गेलेल्याचे किंवा जाणा-याचे दुःख करणे अयोग्य आहेच वर ते जाणे आपल्या हातून घडतेय याचे वैषम्य वाटणेही गैर आहे.

ज्ञानेश्वर महाराजही दोनच ओव्यात अर्जुनाची अवस्थेचे मार्मिक वर्णन करतात. त्यांच्या मते अर्जुनाची अवस्था ही जन्माने अंध असाण-या व्यक्ती सारखी आहे. नकळत दरवाजा समजून भिंतीवर डोके आपटावे तसे अर्जुनही नकळत चुकीच्या तत्त्वावर युक्तीवादाचे डोके आपटत आहे. त्याला स्वतःचे शरीर आणि आत्मा यांचे पुरेसे ज्ञान नाही आणि तो कौरवांचे शरीर नष्ट करण्याचा शोक करतोय.

जात्यंधा लागले पिसें। मग तैं सैरा धांवे जैसे।। तुझे सिहाणेपण तैसे। दिसतसे ।।२।।९३।।

प्रकृतीचे नश्वरत्वही ज्ञानदेव एका ओवीत सांगतात. जे जे जन्म घेते ते ते नाश पावते. ते ते काय तर अर्थातच बाह्य इंद्रियांचे विषय….

हे उपजे आणि नाशे । ते मायावशें दिसे ।।

हा झाला सांख्ययोगाचा अर्धा भाग ज्यात प्रकृती तत्त्वाचे विनाशीत्व प्रकट होते. हे केवळ शरीराच्या बाबतच खरे नसून सृष्टीतील प्रत्येक तत्त्व जे बाह्य इंद्रियांच्या माध्यमातून जाणवते ते सर्वच नश्वर असते असेही कृष्ण सांगतो. बाह्य इंद्रिये कोणती? तर डोळे, कान, नाक, त्वचा. म्हणजेच काय तर जे डोळ्यांना दिसते ते चांगले/वाईट दृष्य, कानाला ऐकू येणारे बरेवाईट आवाज/बोलणे, नाकाला येणारे विविध वास आणि शीतोष्ण स्पर्श सगळे काही नश्वर म्हणजे अल्पजीवी आहे. आत्ता असेल नंतर नसेल, उद्या असेल परवा नष्ट होईल. भाडेकरूला जसे घर बदलण्याचे दुःख करून चालत नाही तसेच प्रकृतीतील नश्वर तत्त्वांच्या गमावण्याचे दुःखही निरर्थकच आहे.

एकुण काय तर नातेवाईकांचे किंवा कोणाचेही शरीर हे नश्वर आहे. आज ना उद्या ते नष्ट होणारच आहे. त्यामुळे युद्धप्रसंग उभा असताना अर्जुनाने ते नष्ट करण्यात अयोग्य असे काहीच नाही. हे झाले अर्जुनाच्या पहील्या शंकेचे उत्तर.

पण मग जर प्रकृती नश्वर तत्त्व आहे आणि त्याचा ध्यास अयोग्य आहे तर शाश्वत काय आहे? ध्यास कोणत्या तत्त्वाचा घ्यायचा?…. आत्मतत्त्व…..

शाश्वत सुख हवे तर शाश्वत तत्त्व काय हे जाणले पाहीजे आणि ते जाणायचे तर तशी मानसिकता हवी म्हणजेच काय तर प्रथम आत्मतत्त्वाची ओळख मग त्याचे स्वरूप जाणणा-या मानसिकतेची ओळख आणि मग ती जाणणा-या स्थितप्रज्ञाची ओळख…..

ही ओळखपरेड करुयात पुढच्या भागात……..

तळटीपा

१) परमार्थ – इ.स. ५ व्या शतकातील एक बौद्ध भिक्षु. इ.स. ४९९ मध्ये उज्जैनला जन्मलेल्या परमार्थाने बौद्ध धर्माचा स्वीकार केल्यानंतर कंबोडीयासह दक्षिण चीनमध्ये बौद्ध धर्माचा प्रचार केला. अनेक बौद्ध ग्रंथाच्या चीनी भाषांतराबद्दल त्याला ओळखण्यात येते. उदा. अभिधर्मकोष, सुवर्णप्रभाससुत्र. पंचशिखा आणि ईश्वरकृष्णाच्या सांख्य सिद्धांताचेही भाषांतर परमार्थाने केले. चीनमध्येच इ.स. ५६९ मध्ये त्याचा मृत्यु झाला.

Copyright sheetaluwach.com 2020 © #sheetaluwach

Avatar
About शीतल उवाच 5 Articles
एका देशात जन्म, दुस-या देशाचा नागरीक, तिस-याच देशात स्थायिक, २० वर्षांचे करीअर, ४ देशात नोकरी, १० हून अधिक देशात मुसाफीरी, ४ भाषांची ओळख. शिक्षक, व्यवसायिक, भाषांतरकार, हौशी गाईड, वाचक, श्रोता, वाचाळ, खादाड… मी एक अनेक…शीतल रानडे sheetaluwach.com
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..