आंतर्दर्शीचा ( एण्डोस्कोपी ) शोध लागण्याआधी रोगाच्या बाह्य लक्षणांवरून रोगाचे निदान केले जाई आणि त्यावरून रोगावर उपचार केले जात असत . त्यामुळे रोग निदानात तितकीशी अचूकता नसे . पण आज आंतर्दर्शीच्या शोधामुळे माणसाच्या शरीराच्या आतील भागाचे प्रत्यक्ष निरीक्षण शक्य झाले , रोग निदानामध्ये अचूकता आली आणि अर्थातच त्यामुळे उपचार नेमके काय करायचे हे समजले . इतकेच नाही तर आंतर्दशींच्या साहाय्याने एखाद्या अवयवातील ऊती कॅन्सरच्या तपासणीसाठी शरीराच्या बाहेर आणायची सोय झाली आहे .
सुधारित आंतर्दर्शीच्या साहाय्याने छोटी छोटी शल्यकर्मेही थोड्या वेळात करणे शक्य झाले आहे . यात पित्ताशय काढणे फॅलोजिअन ट्यूब शिवणे , ट्यूमरची छोटी गाठ बाहेर काढणे किंवा एखादा बाहेरचा कण शरीरात अडकून राहिला असल्यास तो काढून टाकणे इत्यादींचा समावेश होतो .
आंतर्दर्शी याचा अर्थ आतील भाग पाहणे ( एण्डो – आतील , स्कोप – पाहणे ) औद्योगिक क्षेत्रात आंतर्दर्शीचा उपयोग होत असला तरी सर्वसाधारणपणे शरीराच्या आतील भागाचे निरीक्षण करण्यासाठी आंतर्दर्शीचा वापर केला जातो . आंतर्दर्शीचा शोध खऱ्या अर्थाने १८०६ मध्ये जर्मन डॉक्टर फिलीप बोझिनी यांनी लावला . मूत्राशय वा मूत्रवाहिनीतील भागाचे निरीक्षण करण्यासाठी त्यांनी मूत्रवाहिनीत जातील अशा लहान व्यासाच्या नळ्या वापरल्या होत्या व आतील भाग प्रकाशित करण्यासाठी मेणबत्तीचा वापर केला होता . परंतु वापरायला तितकासा सोपा नसल्याने त्याचा फारसा प्रचार झाला नाही . पुढे इलेक्ट्रिक बल्बचा शोध लागल्यावर मेणबत्तीची जागा बल्बने घेतली . लहान आकाराचे बल्ब उपलब्ध झाल्यावर बल्ब शरीराच्या आत घालणे शक्य झाले . आंतर्दर्शीमध्ये अशा एकेक सुधारणा होत होत आजमितीला व्हिडिओ आंतर्दर्शी , कॅपसूल आंतर्दर्शी आले आहेत . संसर्ग टाळण्यासाठी एकदा वापरून टाकून देता येतील ( डिस्पोझेबल ) अशा आंतर्दर्शीवर संशोधन सध्या सुरू आहे .
एखाद्या रुग्णाच्या पचनसंस्थेत , श्वसनसंस्थेत , विसर्जनसंस्थेत अगर शरीरातील इतर भागांमध्ये झालेल्या बिघाडामुळे रक्तस्राव होत असेल , गिळायला त्रास होत असेल आणि एम . आर . आय . , एक्स रे , सीटी स्कॅन इ . तपासण्या करूनही रोगाचे निदान होत नसेल , तर डॉक्टर आंतर्दर्शी करायला सांगतात . अत्याधुनिक आंतर्दर्शीच्या साहाय्याने आता शरीरातील जवळ – जवळ सर्व अवयव आतून पाहणे शक्य झाले आहे .
आंतर्दर्शीची रचना
आंतर्दर्शीमध्ये प्रामुख्याने तीन विभाग असतात
१ ) जोडणी विभाग ( कनेक्टर सेक्शन )
२ ) नियंत्रण विभाग ( कन्ट्रोल सेक्शन )
३ ) शरीराच्या आत घालण्यासाठी जोडणी लांब नळी ( इन्सरशन ट्युब )
१ ) जोडणी विभाग – जोडणी विभागात आंतर्दर्शीला ऊर्जा पुरविण्यासाठी विद्युत प्रणाली , शरीराचा आतील भाग प्रकाशित करण्यासाठी प्रखर तेजाचा दिवा ( झेनॉन आर्क लॅम्प ) , शरीरात जरूर तेथे हवा , पाणी अगर औषध प्रविष्ट करण्यासाठी तसेच शरीरात नको असलेले द्रव अथवा तपासणीसाठी लागणारे द्रव शरीराच्या बाहेर काढण्यासाठी लागणारी यंत्रणा ( चॅनेल्स् ) यांचा समावेश होतो.
२ ) नियंत्रण विभाग – यात डॉक्टरांना आंतर्दर्शीचे काम म्हणजेच तो चालू किंवा बंद करणे . आवश्यकतेनुसार त्याचा कोन बदलणे , एखाद्या भागाचे निरीक्षण करण्यासाठी अथवा छोट्याशा शल्यकर्मासाठी आंतर्दर्शी विशिष्ट ठिकाणी स्थिर करणे इत्यादी क्रियांवर नियंत्रण ठेवण्यासाठी लागणाऱ्या विविध बटणांचा समावेश होतो .
३ ) शरीराच्या आत आंतर्दर्शी घालण्यासाठी लांब नळी – ही नळी वॉटरप्रुफ (जलनिरोधक ) असते कारण या नळीमध्ये विद्युतवाहक नलिका असतात . रोग्याच्या आतील भागातील द्रवांशी त्यांचा संपर्क येऊ नये म्हणून नळी वॉटरप्रुफ असते . नळीच्या टोकाला मायक्रोचीप बसविलेली असते . तसेच निरनिराळ्या चॅनेल्ससाठी ओपनिंग्ज ठेवलेली असतात . शिवाय फायबर ऑप्टिक लाईट गाईडला कव्हर करणारे भिंग बसविलेले असते . या नळीच्या टोकाच्या आधीचा थोडा भाग वक्र असून लवचिक असतो . त्यामुळे आंतर्दर्शी शरीरातील भागाप्रमाणे वाकविणे शक्य होते .
ऑप्टिकल फायबर
आंतर्दर्शीमध्ये ऑप्टिकल फायबरचे अतिशय लहान ( १ मिमीपेक्षा कमी जाडीचे ) दोन जुडगे असतात . एकेका जुडग्यात फायबर ऑप्टिक्सचे लक्षा वधी तंतू असतात . एक जुडगा शरी रातील पाहिजे तो अवयव प्रकाशित करतो तर दुसरा जुडगा त्या अवयवाची प्रतिमा शरीराबाहेर आणून पोहोचवितो . या प्रतिमेचे कॅमेऱ्याने छायाचित्र घेतले जाते . व्हिडिओ आंतर्दर्शीमध्ये फायबर ऑप्टिक आंतर्दर्शीमधील प्रतिमा तयार करणाऱ्या जुडग्याची जागा अतिसूक्ष्म अशा सी .सी . डी . चार्जेड कपल डिव्हाइस ( charged couple device ) व्हिडिओ कॅमेऱ्यांनी घेतली आहे . कॅमेऱ्याद्वारे वायरमधून प्रतिमा प्रक्षेपित केल्या जातात . त्या मॉनिटरवर बघता येतात .
कॅप्सूल
पचनसंस्थेतील बिघाड जाणून घेण्यासाठी कॅप्सूल आंतर्दर्शी सध्या वापरले जातात . त्यात कॅप्सूलमध्ये कॅमेरा बनविलेला असतो . आपण औषधाची कॅप्सूल गिळतो तशीच ही आंतर्दर्शीची कॅप्सूल रोग्याला गिळायला सांगतात . कॅप्सूल पचनसंस्थेतून जात असताना कॅमेरा प्रत्येक ठिकाणची चित्रे टिपतो . बिनतारी यंत्रणेद्वारे ती बाहेर पाठविली जातात . रोग्यावर बाहेरून अडकविलेल्या पट्ट्यात कॅप्सूलकडून येणारी चित्रे ग्रहण करण्याची व्यवस्था असते . ही चित्रे नंतर संगणकाद्वारे बघितली जातात व त्यावरून रोगाचे अचूक निदान केले जाते . कॅप्सूल आंतर्दर्शी रोग्याला गिळायला सांगतात पण इतर आंतर्दर्शी वापरताना तो डॉक्टर स्वतः हाताळतात . बहुतेक वेळा आंतर्दर्शी शरीराच्या गुद्द्वार , मूत्रमार्ग , घसा अशा नैसर्गिक खुल्या जागांमधून आत घातले जातात पण काही वेळा आंतर्दर्शी आत घालण्यासाठी त्वचेला छेद द्यावा लागतो .
शल्यकर्म करण्यासाठी लागणारी उपकरणे आंतर्दर्शीमध्ये बसविणे शक्य झाल्यामुळे शरीरांतर्गत वाढलेल्या त्रासदायक छोट्या गाठी , पित्ताशयाचे खडे त्याद्वारे काढता येऊ लागले आहेत . शरीरातील विविध अवयवांच्या तपासणीसाठी विशिष्ट आंतर्दर्शी वापरले जातात . आंतर्दर्शीची लांबी त्याच्या उपयोगाप्रमाणे ३० सेंटीमीटरपासून १२० सेंटीमीटरपर्यंत आढळते . श्वसनमार्ग – फुप्फुसांच्या तपासणीसाठी ब्रॉन्कोस्कोप , मोठ्या आतड्यांच्या तपासणीसाठी – कोलोनोस्कोप , लहान आतडी , जठर आणि अन्ननलिका यासाठी गॅस्ट्रोस्कोप , सांध्याच्या तपासणीसाठी – अॅन्थ्रोस्कोप , गर्भाशयाच्या तपासणीसाठी हिस्टेरोक्सोप तर मूत्राशयाच्या सिस्टोस्कोप असे तपासणीसाठी विशिष्ट आंतर्दर्शी विकसित करण्यात आलेले आहेत . मानवाने आपल्या बुद्धिचातुर्याने असे निरनिराळे आंतदर्शी तयार करून आज शरीराच्या आतील भाग प्रकाशित केला आहे . न जाणो उद्या माइण्ड आंतर्दर्शीचा शोध मानव लावेल आणि मनही उजळून जाईल . मनातील खळबळ बाहेर पडेल आणि त्याचा उपयोग करून मनोरुग्णही बरे होऊ शकतील अशी आशा करायला हरकत नाही .
मेघना अ . परांजपे
(सृष्टीज्ञान’वरून )
Leave a Reply