मनुष्याला जन्मताच ज्ञानेंद्रिया आणि कर्मेंद्रिया मिळाली. त्या द्वारे तो पाच तत्वानी बनलेल्या अनेक वस्तु, पदार्थ,.. ह्यांचा आनंद घेत असतो. पण मानवाला बाह्य सुखांची अशी सवय लागली आहे की आज ह्या सुखांच्या पाठीच त्याची धाव आहे. मृगतृष्णा समान जीवन झाले आहे. पाहणे, ऐकणे, खाणे, गंध आणि स्पर्श एक एक इंद्रियानी जितके आणि जसे सुख घेता येईल तसे मिळवण्याचा प्रयत्न चालू आहे. परंतु बाह्य सुखापेक्षा आंतरिक सुख किती मूल्यवान आहे ह्याची जाण आजच्या मनुष्याला नाही. म्हणून म्हटले आहे ‘अंतर्मुखी सदा सुखी.’
अंतर्मुखी अर्थात चेहऱ्यावर (मुखावर) ज्या इंद्रिया आहेत नाक, कान, डोळे, मुख हे अंतरविश्वा मध्ये जितके रमण करतील तितके ते सुखी राहतील. डोळे सतत बाह्य विश्वातल्या व्यक्ति, वस्तु, पदार्थ.. ह्यांना बघण्यात व्यस्त आहे. जे आपण बघतो त्याचा प्रभाव आपल्या मनावर होतो. अजाणतेपणे एखादी व्यक्ति, वस्तु आपण बघितली तर ती स्वप्नामध्ये येऊन जाते तेव्हा जाणीव होते की त्याची मनावर छाप पडली आहे. सांगण्याचा भाव हा की डोळ्या द्वारे अनेक चांगल्या-वाईट गोष्टी मनामध्ये उतरतात. म्हणून सूरदास ने आपले डोळेच फोडले. बघितलेच नाही तर वाईट विचार येणार नाहीत हा त्यापाठीमागचा भाव होता. पण टेक ह्या डोळ्याचे कार्य काही वेळासाठी थांबवून पूर्ण लक्ष आपल्या अंतरविश्वाला बघण्यासाठी दिला तर नक्कीच झालेल्या चुका दुरुस्त करण्याचा मार्ग व शक्ति मिळेल.
आपले कां हे तर सतत काही ना काही ऐकण्याचा आनंद घेत असतात. जगभरच्या बातम्या, आजूबाजूच्या पंचायती.. ह्यांचा रस तर काही वेगळंच. वर्तमानात अशी अनेक साधने ही उपलब्ध झाली आहेत जी आपल्याला बघण्या व ऐकण्याची सामग्री पुरवत राहतात. आजचा मानव त्याच्यात किती व्यस्त झाला आहे. जे कामाचे आहे ते ऐकण्यापेक्षा वायफळ गोष्टी ऐकण्याचा आनंद घेत आहे. पण ह्या सर्व गोष्टी अंतर्मनावर किती दुष्परिणाम करत आहेत ह्याची जाणीव मनुष्याला नाही. हेच जर स्वतःच्या मनाचा आवाज ऐकण्यासाठी काढला तर किती बर होईल?
‘वाचलता लाभम नाशम’ म्हटले आहे. जितके हे मुख वाचाळ होईल तितका नाश अर्थात स्वतःचे नुकणस होईल. मनुष्य बोलल्याशिवाय राहू शकत नाही. कधीतरी स्वतःला चेक करून पहा की न बोलता आपण किती तास राहू शकतो. ‘मौन’ चा अभ्यास किती करू शकतो. कधी कधी एखाद्यावर रागावलो की बोलणं सोडून देतो, ती वेगळी गोष्ट. पण जितके मुख बंद तितके मन आपले काम चालू करते. जे मुखाने बोलायचे आहे ते संकल्पा द्वारे बोलायला सुरुवात होते. पण तेच मन आणि मुख शांतीचा अनुभव करत असेल तर तितकेच आपण सुखी होऊ.
डोळे, कान आणि मुख ह्यांचा वापर बाह्य जगासाठी न करता अंतरजगावर लक्ष केंद्रित केले तर व्यक्ति, वस्तु, पदार्थाच्या पाठीमागे धावणे बंद होऊन आंतरिक सुख शांतीचा अनुभव करण्यात मन रंगेल. व तितकीच आत्म्याची शक्ति ही वाढेल. हर्तमद्धे अनेक योगी होऊन गेले. त्यांची धाव अंतर जगाकडे होती म्हणून कधीच बाहेरच्या सुखावर त्याची नजर नव्हती. तसेच जीवनाची अनेक गुपिते त्यांनी जाणली, अनुभवली म्हणून निर्भय जीवन जगू शकले. आजचा मनुष्य सतत भयभीत होतो की जे मी कमावले ते माझ्यापासून कोणी हिसकावून तर नाही ना घेणार? पण जे मिळवले ते नष्ट तर होणारच आहे हा नियम आहे. तरीही चुकीच्या मार्गावर धाव का?
आज कोरोंनाच्या महामारितून आपल्याला खूप काही शिकायचे आहे. जे डोळ्यासमोर घडतंय त्या सत्याचा स्वीकार करायचंय. मृत्यू अटळ आहे. परिस्थिती चा परिणाम निश्चित आहेत. जर स्वतःला आंतरिक शक्तींनी संपन्न केले असेल तर वाईट परिस्थिती मध्ये ही सुखी समाधानी शांत असल्याचा अनुभव करू शकू. म्हणून ह्या कर्मेंद्रियानी बाह्य जगाला बघा पण अंतर जगामध्ये त्याची छाप काय पडते त्याचे ही परीक्षण करा. जे चांगले आहे तेच आत्मसात करायचे आहे ही विचारांची गाळणी सतत वापरा. अनावश्यक बाबींना फेकून देण्याची सवय लावा. तरच ह्या मनुष्य जीवनाचा आनंद घेऊ शकू.
— ब्रह्माकुमारी नीता.
Leave a Reply