नवीन लेखन...

ॲंटोन चेकॉव्ह याची चरीत्र-कथा

ॲंटोन पावलोविक चेकॉव्ह हा सुप्रसिध्द रशियन लेखक जगभर एक नाटककार व कथाकार म्हणून ओळखला जातो.
त्याचा जन्म २८ जानेवारी १८६० मधे झाला.
त्याचे वडील किराणा दुकान चालवत व त्याला आणखी पांच भावंडे होती.
त्याचे वडिल कर्मठ ख्रिश्चन, चर्चच्या वाद्यवृंदाचे प्रमुख आणि अत्यंत मारकुटे होते.
चेकॉव्हच्या कथांत दिसून येणाऱ्या बंडखोरीचा उगम आईला व मुलांना त्यांच्याकडून मिळणारी हिंसक वागणूक यामधे असावा, असा एक तर्क कांही समीक्षक लावतात. चेकॉव्ह डॉक्टर होता व तो मजेत म्हणत असे, “वैद्यकी ही माझी कायदेशीर पत्नी आहे तर साहित्य हे माझे बाहेरचे “प्रकरण” आहे.”
चेकॉव्हच्या आईने लहानपणी तिच्या कापडविक्रेत्या वडीलांबरोबर संपूर्ण रशियाभर फिरती केली होती.
त्यामुळे तिच्याकडे खूप कथांचा साठा होता व ती कथा खूप रंगवून सांगत असे.
चेकॉव्ह म्हणतो, “आम्हाला वडीलांकडून बुध्दी मिळाली पण आईने आम्हाला आत्मा दिला.”
मोठेपणी जेव्हा त्याचा एक भाऊ पत्नीला त्रास देत असे, त्याला तो म्हणाला, “आठव ते दिवस, जेव्हां आपले वडील आईला मारहाण करत व आपण भेदरून लपत असूं.
त्या काळाची आठवण काढणं सुध्दा नको वाटतं. तू तेंच करू नकोस.”
चेकॉव्ह व भावंडाना त्यांचे वडील जबरदस्तीने सनातनी ग्रीक चर्चमधे गायला लावत.
इतर पालकांना ह्या मुलांचा हेवा वाटें तर मधोमध उभे राहून गाणाऱ्या चेकॉव्हला आपण गुलाम आहोत असे वाटे.
१८७६मधे घर बांधत असतांना एका कंत्राटदाराने फसवल्यामुळे चेकॉव्हच्या वडिलांना दिवाळखोरी जाहिर करावी लागली.
तुरूंगवास चुकविण्यासाठी ते मॉस्कोला पळून गेले व तिथे रहात असलेल्या चेकॉव्हच्या दोन मोठ्या भावांबरोबर राहू लागले.
मागे राहिलेल्या चेकॉव्हला स्वत:च्या शिक्षणासाठी स्वत: कमाई करावी लागली.
स्फुट लिखाण व इतर अनेक लहानमोठी कामं करून तो आपला खर्च भागवत असे.
त्यांतलाही वाचवतां येण्यासारखा प्रत्येक रूबल वाचवून तो मॉस्कोला आपल्या कुटुंबाला पाठवत असे.
ह्या काळात त्याने खूप वाचन केलं.
जुन्या रशियन लेखकांबरोबर शॉपेनहॉवर ह्या जर्मन तत्त्वज्ञान्याची पुस्तके वाचली.
मग त्याने “फादरलेस” नावाचे एक संपूर्ण लांबीचे विनोदी नाटक लिहिले परंतु त्याच्या मोठ्या भावाने त्याची “अज्ञानांतून घडलेली अक्षम्य कृती” म्हणून बोळवण केली.
त्याच काळात चेकॉव्हची छोटी छोटी प्रेमप्रकरणं झाली.
त्यातलं एक तर टीचरच्या पत्नीशीच होतं.
१८७९ला शालेय शिक्षण पूर्ण करून चेकॉव्ह वैद्यकीय शिक्षण घ्यायला मॉस्कोला आपल्या कुटुंबात आला.
१८८४मधे तो फीजीशीयन झाला.
त्या पांच वर्षांत कुटुंब त्यात्यावरच अवलंबून असल्यामुळे तो एका प्रकाशकासाठी उपहासात्मक छोटी छोटी विनोदी शब्दचित्रे लिहू लागला.
ती तो टोपणनांवाने लिहित असे.
त्याने नंतर लिहिलेल्या लिखाणाहूनही ही शब्दचित्रे फार बोंचरी असत.
त्या शब्दचित्रांचे विषय मॉस्कोच्या रस्त्यावरचे असत.
हे लिखाण बरेच लोकप्रिय झाले.
१८८४ मधे तो डॉक्टर म्हणून प्रॅक्टीस करू लागला व तोच आपला मुख्य व्यवसाय म्हणत असे.
परंतु त्याचे बहुतांश ऋग्ण गरीब असत व त्यांना तो मोफत सल्ला व औषधे देई.
त्यामुळे त्याची डॉक्टर म्हणून कमाई कमीच होती.
१९८५ मधे त्याला आढळून आलं की त्याच्या कफामधून रक्त जातंय पण आपल्याला क्षयाची बाधा झाल्याचे त्याने कुटुंबीयांपासून व मित्रांपासूनही लपवून ठेवले.
मात्र अनेक साप्ताहिकांसाठी लेखन करत पैसे मिळवत राहिला व त्याने कुटुंबाला चांगल्या घरांत हलविले.
१८८८मधे सुवोरीन नांवाच्या एका मोठ्या पेपरच्या श्रीमंत संपादक मालकाने चेकॉव्हला आपल्या प्रसिध्द “न्यू टाईम्स” नावाच्या पेपरांत लिहिण्यासाठी बोलावले व खूपच उत्तम मानधन देऊ केले.
चेकॉव्हने ते आमंत्रण स्वीकारले.
पुढे सुवोरीनची व चेकॉव्हची मैत्री अखेरपर्यंत टिकली.
लवकरच चेकॉव्हची लोकप्रियता वाढू लागली व त्याच्या लेखनाने साहित्यिकांचे लक्ष वेधून घेतले.
त्या काळच्या एका वृध्द व प्रसिध्द लेखकाने म्हणजे आयव्हॅन ग्रेगोव्हीक ह्याने चेकॉव्हला पत्र लिहून सांगितले, “नव्या पिढीतील लेखकांचा अग्रणी होण्याइतकी तुझी प्रतिभा आहे. जरा कमी लिही व दर्जावर लक्ष दे.”
चेकॉव्हने त्याला कळवले, “आपल्या पत्राने माझ्यावर वीजेसारखा आघात केला.
खरंच मी लिहितांना ना कधी वाचकांचा विचार केला की माझा.
माझे लिखाण थोडे वार्ताहरासारखे होते.”
खरं तर चेकॉव्ह आधीही लेखनावर मेहनत घेत असे पण नंतर तो जास्तच मेहनत घेऊ लागला.
१८८८मधे ग्रेगोव्हीकने चेकॉव्हच्या “ॲट डस्क” ह्या कथासंग्रहाला प्रतिष्ठेचे समजले जाणारे व उत्तम साहित्यिक कृतीला दिले जाणारे “पुष्कीन प्राईझ” मिळावे म्हणून थोडी खटपट केली व चेकॉव्हला ते देण्यांत आले.
१८८७मधे प्रकृती सुधारण्यासाठी चेकॉव्ह स्टेप्पी ह्या निसर्गरम्य ठिकाणी येऊन राहिला व खरंच त्याने खुलला.
तिथे त्याने ही आगळ्या वेगळ्या धर्तीची दीर्घकथा लिहिली.
ती एका कुटुंबापासून दूर पाठवल्या गेलेल्या मुलाची व त्याच्या मोठ्या मित्रांची स्टेप्पीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंतच्या प्रवासाची कथा आहे.
ती काव्यात्म म्हणूनही ओळखली जाते.
ती नॉर्दर्न हेराल्डमधे प्रसिध्द झाली, त्यामुळे ती सर्वांपर्यंत साहित्यकृती म्हणून पोहोचली.
१८८७च्या हिंवाळ्यांत कोर्श नांवाच्या एका थिअेटर मालकाने चेकॉव्हकडे नाटकाची मागणी केली.
चेकॉव्हने पंधरा दिवसांत “आयव्हॅनॉव्ह” हे पुढे खूप प्रसिध्द झालेले नाटक लिहून दिले.
त्या नाटकाच्या निर्मितीबद्दल चेकॉव्ह समाधानी नव्हता व त्याने आपल्या मोठ्या भावाला पत्रांत लिहिले की निर्मिती म्हणजे गोंधळच आहे.
पण प्रत्यक्षांत नाटक खूप चालले.
“अभिनव” प्रयोग म्हणून त्याची खूप स्तुती झाली.
चेकॉव्हच्या लक्षांत आले नव्हते की त्याची नाटकातली पात्रे ही रंगमंचावर जशी वागत होती, बोलत होती, तशीच वास्तवातील माणसे वागतात, बोलतात आणि त्यामुळे त्यांचा प्रतिसाद येत आहे.
चेकॉव्हचा भाऊ मिखाईल म्हणतो की ह्या पहिल्या नाटकाने ॲंटोन चेकॉव्हच्या साहित्यिक कारकिर्दीला योग्य वळण दिलं व तीच खरी सुरूवात होती.
“सीगल” (१८९५), “अंकल वान्या” (१८९७), थ्री सिस्टर्स (१९००), चेरी आर्चर्ड (१९०३) ही नंतर लिहिलेली नाटकेही ह्या अभिनव व वास्तवाकडे नेणाऱ्या बदलाची पाया ठरली.
सर्वच नाटकांना रंगमंचावर भरपूर यशही मिळाले.
नाट्यनिर्मितीच्या दंडकामधे चेकॉव्हच्या नावावर ओळखला जाणारा दंडक म्हणजे “चेकॉव्हज् गन”.
तो म्हणे “ज्याचा नाटकांत कांहीही उपयोग केला जाणार नाही, ती वस्तू रंगमंचावरून काढून टाका.
जर पहिल्या अंकात दिवाणखान्यात भितीवर बंदूक लटकताना दाखवली तर ती दुसऱ्या किंवा तिसऱ्या अंकात वापरलीच पाहिजे.
नाहीतर ती काढून टाका.”
त्यानंतर धाकटा भाऊ निकोलाय ह्याचा क्षयाने अंत झाल्यावर चेकॉव्हने “ड्रीअरी स्टोरी” लिहिली. त्यांतील मृत्यू समीप आल्यावर “आपण आयुष्यात कांहीच केलं नाही” हा विचार येऊन व्यथित होणारी व्यक्ती ही भावावरूनच घेतली आहे.
मिखाईल चेकॉव्हने म्हटले आहे की ॲंटोन चेकॉव्ह तेव्हा फारच अस्वस्थ आणि मानसिक दडपणाखाली होता.
मिखाईल तेव्हा कामाचा भाग म्हणून तुरुंगांची पहाणी करत होता पण पुढे ॲंटोन चेकॉव्हने तुरूंग सुधारणेच्या कामांत मरेपर्यंत लक्ष घातलं.
साखालीन हे बेट रशियाच्या उत्तर-पश्चिमेला जपानजवळ आहे.
त्यांचे अंदमान. साखालीन बेटातील कैद्यांच्या छावण्यांना चेकॉव्हने १८९० मधे भेट दिली.
रेल्वे प्रवास दीर्घ व त्रासदायक होता.
तिथे तो तीन महिने राहिला.
तिथली कैद्यांची अवस्था, त्यांना होणारी मारझोड, स्त्रियांना सक्तीने वेश्याव्यवसाय करायला लावणे, कैद्यांसाठी असणाऱ्या पुरवठ्याचा अपहार, मुलांना दिली जाणारी हीन वागणूक पाहून तो व्यथित झाला.
चेकॉव्ह म्हणतो, “कांही वेळा मला वाटे की माणसाला वागवण्याची अती नीच पातळी इथे गांठली जात आहे.”
पुढे चेकॉव्हने आपली निरीक्षणे नोंदवलेलं पुस्तक प्रसिध्द केलं.
त्यांत तो म्हणतो, “दया हे ह्याचं उत्तर नाही. कैद्यांना ठरलेल्या गोष्टी पाठवणं व त्या त्यांना मिळतात की नाही, हे पहाणं, हे सरकारचं कर्तव्य आहे.”
पुढे एका कथेत त्याने साखलीनचा नरक असे नांव देऊन त्याचा उल्लेख व उपयोग कथेतही केला आहे.
१८९७मधे पुन्हा त्याला क्षयाची बाधा झालेली आढळली.
डॉक्टरांनी जीवनक्रमांत बदल सूचवला पण तो अंमलात आला नाही.
१८९८मधे चेकॉव्हचे वडील निधन पावले.
चेकॉव्हचा औषधांवर खूप खर्च होई व तसाच प्रवासावरही होई.
गरीब ऋग्णांना तपासायला तो स्वखर्चाने दूर दूर प्रवास करत असे.
त्यातच त्याने थिअेटरच्या मागणी प्रमाणे नाटके लिहिली.
कांही वेळा ती नाटके पहिल्या प्रयोगाला अयशस्वी ठरली व तिथे हजर असलेल्या चेकॉव्हला “हुर्यो” ऐकावी लागली परंतु त्याचे कारण निर्मात्याला नाटकाचा आशय पोहोचवतां न येणं हे होतं.
त्यांनी तीच नाटकं नव्याने दिग्दर्शित करून लोकांच्या पर्यंत पोहोचवली व प्रेक्षकांनी ती डोक्यावर घेतली.
वडिलांच्या मृत्यूनंतर त्याने याल्टाला नवं घर बांधलं व कुटुंबीयांना तिथे हलवलं.
तिथे असतांना त्याने दोन नाटके लिहिली.
१९०१मधे त्याने ओल्गा नीप्पर ह्या त्याच्या नाटकात काम करणाऱ्या नटीशी गाजावाजा न करतां विवाह केला.
तो विवाहबंधनात रहायला फार उत्सुक नव्हता.
त्याला वाटत होते तसेच ओल्गा कायम मॉस्कोत असे तर तो याल्टामधे.
मात्र दोघांचा पत्रव्यवहार त्यांतील नाटकांविषयीच्या सुंदर चर्चेमुळे पुढे मार्गदर्शक ठरला.
१९०४मधे चेकॉव्ह क्षयाच्या अंतिम टप्प्यावर पोहोचला.
हवाबदलासाठी तो जर्मनीतील एका गांवी जाऊन राहिला परंतु कांही दिवसांनी त्याचा मृत्यू झाला.
मृत्यूच्या वेळी तो उत्तेजीत होऊन म्हणाला,”मी आता मरत आहे.”
डॉक्टरांनी त्याला शांत केले.
डॉक्टरनी परवानगी दिल्यावर ओल्गाने त्याला एक ग्लास शॅम्पेन दिली.
ती घेऊन तो म्हणाला, “किती वर्षांनंतर मी शॅम्पेन घेतोय.”
ग्लास संपवून तो सोफ्यावरच झोपला तो गेलाच.
तो एखाद्या मुलासारखा शांत झोंपला होता.
चेकॉव्हच्या लेखनाचा राजकारण्यांवर प्रभाव पडला.
झारच्या काळांतील अनागोंदी कारभार, दडपशाही व ही व्यवस्था ह्या दुर्दशेला कारणीभूत आहे, हे विचार चेकॉव्हच्या कथांनी दृढ झाले.
रेमंड टॅलीस ह्या लेखकाने म्हटले आहे की लेनिन म्हणत असे, “मी चेकॉव्हच्या कथा वाचून क्रांतिकारी झालो.”
लेनिनने एके ठिकाणी म्हटले आहे, “मी ‘वॉर्ड नं सिक्स’ ही कथा वाचली आणि मला वाटले मलाच वॉर्ड नं. सहात बंद केले आहे.”
लिओ टॉलस्टॉय ह्या लेखकाने प्रथम ॲंटोन चेकॉव्हच्या लेखनाची स्तुति केली व ते संग्रहीत करून प्रकाशित करण्यात पुढाकार घेतला.
इंग्लड, अमेरिकेत प्रथम त्याच्या लेखनाला प्रतिसाद मिळाला नाही.
पुढे जॉर्ज बर्नाड शॉ ह्याने चेकॉव्हच्या नाटकाची व विशेषत: कथांची स्तुति केली.
त्यानंतर तो हळू हळू लोकप्रिय झाला.
अँटोन चेकॉव्हने कथांचे रूढ विषय आणि रूढ रचना दोन्ही बदलली होती.
अनेकांची तक्रार ही असे की कथेला स्पष्ट शेवट नाही.
त्याच्या बऱ्याच कथा विचार करायला लावण्याऱ्या आहेत.
निखळ मनोरंजन हा त्या कथांचा हेतु नाही.
तसं असतं तर त्या पूर्वीच्या राजा-राणीच्या कथांसारख्या किंवा ठराविक साच्याच्या झाल्या असत्या.
सामाजिक स्थिती, राजकीय व्यवस्था ह्यात भरडल्या जाणाऱ्या माणसांच्या, त्यांच्या प्रश्नांच्या त्या कथा आहेत.
पुढे त्याच्या नाटकांचेही पश्चिमेकडे स्वागत झाले.
ती वरवर कॉमेडी वाटत असली तरी त्यांतून काय सांगायचे आहे, ह्याचे आकलन होऊ लागले.
त्याच्या कथा नाटके चंदेरी पडद्यावरही आली.
लॉरेन्स ऑलिव्हीयरने त्याचा दिग्दर्शित केलेला शेवटचा चित्रपट “थ्री सिस्टर्स” ह्या नाटकावर आधारीत होता.
नंतरही अनेक चित्रपट त्याच्या लेखनावर आले.
ॲंटोन चेकॉव्ह मृत्यू पूर्वी एकदा सुवोरीनला म्हणाला होता, “माझ्यानंतर फार तर सात वर्षे लोक मी लिहिलेलं वाचतील.”
सुवोरीन म्हणाला, “असं कसं म्हणतोस तू ?”
तर चेकॉव्ह म्हणाला, “मग फार तर साडे सात वर्षे !”
परंतु प्रत्यक्षात गेली सव्वाशेहून अधिक वर्षे ते वाचले जातेच आहे.
हेच त्याच्या लेखनाचे मोठे यश आहे.

— अरविंद खानोलकर.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..