मानवाने पाहिले की
त्याच्या चारी बाजूंना
मुंग्या पसरलेल्या होत्या,
मुंग्याच मुंग्या.
मानवाने कुतूहलानें पाहिले,
आश्चर्याने पाहिले. १
कांहीं वेळानंतर
मुंग्या मानवाला चावू लागल्या.
मानव बिथरला.
त्याने मुंग्यांच्या वारुळाला
लाथा मारल्या, धक्के मारले.
जमिनीला भेगा पडल्या.
मानवाने मुंग्यांवर पाणीच पाणी फेकले,
इतके पाणी, जसा कांही प्रलयच.
मुंग्यांचे वारूळ
मुळापासून हादरून गेले,
मुंग्या समूळ नष्ट होऊ लागल्या.
मानव पहात राहिला,
निर्विकार. २
*
या धरणीवर
आपण माणसेसुद्धा
पसरलेलो आहोत मुंग्यांसारखेच.
आपणही
पृथ्वीला त्रास देतो आहोत,
तिचे चावे घेतो आहोत,
वारंवार, पुन्हापुन्हा.
आपणही
धरणीला क्रोधित करत आहोत.
म्हणून तर
मोठाले धरणीकंप होत आहेत,
उंचउंच त्सुनामी येत आहेत.
कुठवर
धरणीच्या प्रकोपापासून
माणूस वाचेल ?
कुठवर ? ३
*
जर मुंग्या चावल्या नाहींत,
मुंग्यांनी जर त्रास दिला नाहीं,
तर मानव विनाकारण
त्यांचा विध्वंस करत नाहीं.
माणसानेसुद्धा
पृथ्वीला, निसर्गाला, पर्यावरणाला
त्रास देऊ नये, त्यांचे चावे घेऊ नयेत.
तरच मानव सुरक्षित राहील.
जमेल ना हें आपल्याला ?
जमायलाच हवें ! ४
(स्वत:च्या हिंदी कवितेचें मुक्त भाषांतर)
– सुभाष स. नाईक
M- 9869002126
Leave a Reply