गजानन वामनाचार्य, मुंबई.
सजीवांचे शरीर अचेतन झाले म्हणजे निसर्ग त्याची विल्हेवाट लावायला सुरूवात करतो. सूक्ष्म जीवाणूंमुळे मांस पेशींचेविघटन होऊ लागते आणि त्या कुजायला किंवा सडायला लागतात. हे कुजलेले मांस देखील गिधाडे, कावळे वगैरे पक्षी, काही विशिष्ट प्रकारच्या अळ्या आणि किडे यांचे अन्न असते. सजीवांच्या कलेवरांची विल्हेवाट लावण्याची निसर्गाची ही पध्दत आहे. काही सूक्ष्म जीवाणूंमुळे कुजलेल्या मांसाला, मानवाला सहन न होणारी दुर्गंधी सुटते. परंतू ते, कुजलेले मांस ज्यांच अन्न आहे त्या पक्ष्यांना आणि कीटकांना, कलेवराच्या अस्तित्वाची सूचना असते. ही निसर्गाचीच योजना आणि किमया आहे.
निसर्गाने, कोट्यवधी वर्षापासून आतापर्यंत, वाळलेल्या वनस्पती आणि सजीवांची कलेवरे यांची योग्य तर्हेने विल्हेवाट लावून त्यांच्या वस्तूद्रव्याचा पुनर्वापर केलेला आहे. निर्जीव शरीर कुजते परंतु कुजलेल मांस खाऊनही उपजीविका करणारे प्राणी निसर्गात निर्माण झाले. त्या निसर्गाच्याच पद्धतीचे आपण अनुकरण करून सजीवांच्या पार्थिवांची विल्हेवाट लावली पाहिजे. अनेक बाबतीत, निसर्ग हा मानवाचा गुरू आहे आणि मानवाने तसे मानले पाहिजे.
पृथ्वीवरील सर्व वनस्पती आणि सजीव प्राणी, हायड्रोजन, कार्बन, ऑक्सीजन, कॅल्शियम, फॉस्फरस वगैरेंच्या विशिष्ट पकारे झालेल्या संयोगाने बनलेले आहेत. त्यामुळे मृत वनस्पती आणि प्राणी यांची विल्हेवाट लागली म्हणजे ही मूलद्रव्ये मुक्त होऊन वातावरणात मिसळतात. पुढे यांच्या संयोगानेच नवीन वनस्पती आणि प्राणी निर्माण होतात. हे चक्र अव्याहत चालू आहे. पृथ्वीवरील वस्तूद्रव्ये, तिच्या निर्मितीपासून येथेच अस्तित्वात आहेत.
वेगवेगळ्या धर्मात, अंत्यसंस्कारांच्या वेगवेगळया पद्धती आहेत. त्यानुसार पार्थिवांची विल्हेवाट लावली जाते. सर्व धर्माचरणांच्या पद्धतींचा खोलवर अभ्यास केल्यास असे आढळते की, त्या पद्धतीस विज्ञानाचा आधार आहे. अंत्यसंस्कारही अपवाद नाहीत. म्हणूनच, विज्ञानीय दृष्टिकोनातून विचार करून अंत्यसंस्काराची सर्व धर्मांसाठी नवीन पद्धत अवलंबिणे आवश्यक वाटते.
पार्थिव जमिनीत पुरून त्याची जीवजंतूंकडून योग्य तर्हेने विल्हेवाट लावणे हीच पद्धत चांगली होईल. निसर्गही तेच करतो. स्मशानातील ठराविक जागात सहा महीने ते एक वर्षभर तरी प्रेते विशिष्ट अंतर ठेऊन पुरीत जावे. प्रेतांसाठी शवपेटीका नवापरता, देह केवळ सुती कापडात गुंडाळून पुरावा. नायलॉन, टेरिलीन सारखे कृत्रिम धाग्यांचे कपडे नको. कारण ते जैव अविनाशी आहेत. ते कुजून मातीत मिसळत नाहीत. नंतर ही जागा वर्षभर तशीच पडू द्यावी. म्हणजे जीवाणू, अळ्या आणि किटक त्यादेहाची योग्य तर्हेने विल्हेवाट लावतील. या पद्धतीने लाकूड, वीज, डिझेल वगैरे न वापरता म्हणजे दहन पध्दती न वापरता, प्रेतांची विल्हेवाट लावता येईल. तसेच ठराविक क्षेत्र असलेली दफन स्मशानभूमी वर्षानुवर्षे वापरता येईल.
विज्ञानीय दृष्टीकोनातून पाहता अचेतन शरीर हे दगड, माती किंवा तोडलेले लाकूड ह्या पेक्षा वेगळे नाही. सर्व धर्मातील अंत्यसंस्काराच्या पध्दतींना विज्ञानाचा आधार आहे. परंतु कालमानानुसार, धर्मसंस्कारात अंधश्रध्दांचा प्रवेश झाला. आत्म्याला मुक्ती, मोक्ष, पिशाच्य योनी, श्राध्दपक्ष वगैरे संकल्पना रूढ झाल्या आणि खरे विज्ञान झाकले गेले. आता आपण डोळसपणे विचार करून विज्ञानाधिष्ठीत पध्दतींचा वापर केला पाहिजे.
गजानन वामनाचार्य
180/4931, पंतनगर घाटकोपर, मुंबई – 400075.
022-25012897, 9819341841.
Leave a Reply