हसते बोलते बाबा
अचानक शांत झोपले
नियतीची क्रूर चेष्टा ती…
मी त्या विधात्याला कोसले
आठवणींचे मडके
हाती जड झाले होते
सिद्धार्थाचे दूःख तेंव्हा
पहिल्यांदा समजले होते
जिवंतपणी विचारलं नाही
ते हवे नको बघत होते
प्रेमाचे अगदी जवळचे
घरचे कार्य समजत होते
सर्वजण धीर देत होते
माझे डोळे पुसत होते
माझे जड डोके मात्र
बाबांचा खांदा शोधत होते
धुराच्या आडोश्यात
मूद्दामच उभा राहिलो
न थांबणाऱ्या आसवांना
पापण्यात लपवू लागलो
एका मरणाचा सोहळा तो
सर्व जण पूजत होते
जिवनाचा थारोळा बघण्यास
मन माझे धजत नव्हते
चितेभोवती फिरत होतो
फूटके मडके सांडवत होतो
मूक्या भावनांचे सांत्वन
माझे मीच करत होतो
उघड्या माझ्या अंगावरून
पाणी घळघळत होते
दूःखाने जणू माझे
काळीजच भळभळत होते
निरंकार अश्या दृष्टीने
चितेकडे पहात होतो
संपत चालले होते ते मरण
आणि मी मात्र जळत होतो.
डॉ. सुभाष कटकदौंड