कायस्थ विकासच्या दिवाळी अंक 2023 मध्ये प्रकाशित झालेला वास्तुतज्ज्ञ उल्हास प्रधान यांचा हा लेख.
व्यवसायातले अनुभव म्हणजे एक प्रकारचे शिक्षणच आहे. म्हणतात ना, अनुभवातून माणूस शिकतो, सावरतो, कधी शहाणपण येते तर कधी सर्किटही बनतो, मात्र संवेदना जागृत होऊन सिंहावलोकन ही करता येते आयुष्याचे..
माझ्या आर्किटेक्ट व्यवसायातील माझी कारकीर्द असेल साधारण 52 वर्षांची. सर्वसाधारणपणे सर्वच क्षेत्रात प्रत्येकाला चांगले वाईट अनुभव येत असतात. त्याप्रमाणे मलाही आलेले काही अनुभव……
• एक लहानसा प्रसंग…. तो काळ साधारण 1970-1972 चा, आम्ही आर्किटेक्ट म्हणून सर्व्हेची कामे करीत असू. पूर्वी भुखंडाचा सर्व्हे करताना खूप अडचणी यायच्या. एकदा वासींदला एक जागा मोजायची होती. त्यावेळी वासींद म्हणजे एक खेडेगावच होते (1972 चा काळ). आम्ही सकाळी 8 वाजता हजर झालो. आमच्याबरोबर आमची 3 माणसे होती. सुरूवात केली मापे घ्यायला. टेबल लावलं, टेप लावली आणि समोरुन 4-5 गावकरी आले ना कोयते घेऊन मारायला!! त्यांना वाटले की आपली जागा – शेतच बळकावत आहेत.
बरोबरचे जागेचे मालक तर पळून गेले आणि माझ्या दोन्ही माणसांना त्यांनी धरुन ठेवले. प्रसंग कठीण होता. माझ्यावर कोयता उगारणार तेंव्हा चटकन खाली बसून मी न घाबरता नमस्कार करुन त्यांना समजावून सांगितलं की आम्ही सरकारी अधिकारी आहोत आणि तुमची जागा शेजारच्या मालकाने बळकावू नये म्हणून आम्ही जागेची मोजणी करतोय. तुमच्या शेताला काही होणार नाही. त्यांना शांत केले, माझ्या माणसाला त्यांना थर्मासमधला चहा द्यायला सांगितला तेव्हा त्यांनी दोन गावच्या शिव्या दिल्याच पण मोजणी करु दिली. काळ आला होता पण वेळ आली नव्हती.
ते दिवस साधारण 1978-79 या काळातील असतील. कसारा येथे जाताना वासिंद गाव लागते. ते शहापूर येथूनही जवळ आहे. ट्रेन आणि नाशिक रोडने देखील जाता येते. त्यावेळी ‘मलबारी’ या नावाचे अत्यंत देखणे असे एक गृहस्थ माझ्या छोट्या ऑफीसमध्ये (Reggis Corner) येथे यायचे. वासिंद येथे त्यांच्या खूप properties होत्या. लेआउटस् आणि बंगल्यांची Designs करण्यासाठी ते आर्किटेक्ट म्हणून मला Approch झाले होते. सर्व मंजुऱ्या Collector Office मधून आणावयाच्या होत्या. मी ते काम करू म्हणून होकार दिला. त्यावेळी त्यांची आणि त्यांच्या जवळचे असे एक तात्या (पूर्वी तलाठीला तात्या म्हणत) – ‘जगे’ यांची ओळख झाली. तसेच ‘गुरुनाथ किस्मतराव’ एक सरकारी अधिकारी व्यक्तीही सानिध्यात आली.
त्यांच्याकडूनही आलेली बरीच कामे पूर्ण केल्यावर मुख्यतः वासिंद येथील ग्रामपंचायत कार्यालयाचे काम करण्यासाठी तेथील सरपंचांनी माझी नेमणूक केली. स्टेशनजवळ त्यांचा भूखंड होता. व त्या ठिकाणी temporary sheds मध्ये दुकाने होती व छोटेसे ग्रामपंचायत कार्यालय होते. जिल्हा परिषदेकडून त्यांची मंजुरी मिळते, तसे माझे हे वेगळेच काम होते.
मी संपूर्ण आराखडा तयार करून सर्व जुन्या दुकानदारांची सोय करून एक मजल्याची इमारत व त्यामध्ये सर्व सुख सोयीनुसार ग्रामपंचायत कार्यालयाची इमारत बांधली. आजही मुहूर्ताच्यावेळी बसविलेल्या पाटीवर माझे नाव आहे. त्यावेळी एवढी मोठी इमारत त्या गावात प्रथमच बांधली असावी.
नंतर गावकऱ्यांनी वासिंदला माझे ऑफीस असावे, म्हणून विनंती केली. तेव्हा मला स्टेशनजवळ श्री.मलबारी यांनी एक गाळा कमी भाडयाने घेऊन दिला होता. दर गुरुवारी 10 वाजता मी तेथे जात असे. त्यामुळे तेथील रहिवाश्यांना माझ्या ज्ञानाचा खूप फायदा देऊन बांधकाम क्षेत्रातील अडचणींबाबत मोफत सल्लाही देत असे. एक मुख्य म्हणजे बऱ्याच वेळा तेथील गावकरी व मित्र मला मोठे मासे, तांदूळ, भाज्या आणि मुख्यतः नदीचे खेकडे प्रेमाने आणून देत असत, आणि मलाही त्यातच आनंद होता कारण मिळणाऱ्या फी पेक्षा प्रेम व आदर जास्त मोलाचा होता. अर्थात ठाण्याला माझा व्याप वाढल्यावर मला जाणे जमत नसे. म्हणून माझ्या तेथील Clients ना विनंती करून माझे तेथील छोटे office बंद केले. तेथील clients आता माझ्या मोठ्या office मध्ये येत असतात.
• ठाण्यातील “रुणवाल इस्टेट” प्रोजेक्ट सुरु करण्यापूर्वी मी आणि श्री. सुभाषजी रुणवाल हे मानपाडा गावाच्या अगोदर त्यांची नियोजित कॉम्लेक्सची जागा पहायला गेलो होतो (साधारण 1990 कालावधी असेल.) सगळीकडे औद्योगिक इमारतीच होत्या. त्यांच्या जागेवर जायला योग्य असा रस्ताच नव्हता, त्यामुळे जाणार कसे? जागेच्या बाजूला नाला होता, चिखलही खूप होता, नाल्यातून बरेच सर्प जाताना दिसत होते. सुभाषजी म्हणाले, ‘प्रधान साहेब आता काय करायचे? जागा तर पाहायची आहे आणि आजच, कारण जमीन मालकाला मोठी रक्कम द्यायची होती आणि plans देखील करायचे होते.’ अखेर मी म्हणालो, ‘साहेब मी तुमचा हात धरतो, माझ्याबरोबर नाल्यातून सावकाश चला.’ ते तयार झाले. मी घाबरलो नसल्याने पायाखालून काय काय गेले ते मला समजले ही नाही. एक दोन वेळा ते ओरडले पण आम्ही मुख्य जागेवर जाऊ शकलो.
जागेवरची परिस्थिती भयंकर होती. तेथे भुताटकी आहे असेही तेथील कंपनीमध्ये काम करणाऱ्यांनी सांगितले. पण तरीही रुणवालसाहेबांनी ती जागा घेतली व मी Plans तयार करुन दिले. आज तेथे आठ इमारतींचे कॉम्प्लेक्स तयार आहे व त्याच्या पुढे रुणवाल मॉल देखील आहे.
असे अनेक प्रसंग पूर्वी येत असत. कारण ठाणे हे तलावांचे आणि औद्येगिक शहर ओळखले जाई. आणि तेव्हा विकसित झालेले नव्हते. विकासकांबरोबर वास्तुविशारदांचे (आर्किटेक्ट) कामही सुरुवातीस खूप जोखमीचे होते.
H.P.C.L एक अनुभव
पूर्वीपासून ठाण्यात तीन पेट्रोलपंप म्हणून एक कॉर्नर प्रख्यात आहे. त्याठिकाणी जवळ जवळ तीन पेट्रोल पंप तीन मालकांचे होते. त्यापैकी 2 पेट्रोल पंप हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांचे नावे असून ते चालविणारे श्री. धीरजभाई व श्री. बाळशेठ मुंदडा असे व्यावसायिक होते. माझ्या अत्यंत जवळचे व परिचयाचे असल्याने जुन्या पेट्रोलपंपाचे नूतनीकरण करण्यासाठी वास्तूविशारद (आर्किटेक्ट) म्हणून नेमणूक करण्यासाठी त्यांनी H.P.C.L. कंपनीला सांगितले. कंपनीने Tenders काढून माझी प्रथम नेमणूक केली. मी नूतनीकरण करण्याचे काम सुंदर रीतीने व समाधानकारक केले. आणि तेव्हापासून मी H.P.C.L. कंपनीचा Regular Architect म्हणून त्यांचे Panel वर आलो, तो काळ 2005 चा होता. त्यानंतर भाईंदर, भिवंडी, पालघर, डहाणू अशा अनेक ठिकाणी पेट्रोल पंपाची कामे केली. Design, Lisoning etc. अशा प्रकारची ती कामे होती. ती कामे पाहून मुंबईला H.P.C.L. च्या एका मोठया कार्यालयात माझा interview झाला. Interview देण्याची माझी पहिलीच वेळ होती. त्यात माझे Selection ही झाले. मला एक prestigious काम करण्याची संधी मिळाली. खूप आनंद झाला. ते काम म्हणजे पुण्याला हायवेने जाताना, खोपोलीच्या पुढे मोठा टोलनाका आहे. त्याच्यानंतर लगेचच डावीकडे H.P.C.L. कंपनीने मोठी जागा M.S.R.D.C कडून घेतलेली होती. नवीन हायवे असल्याने तेथे Retail outlet, Hotel, Toilet Blocks etc. etc. असा मोठा Complex करावयाचा होता व त्यामधून कंपनीला जास्तीत जास्त फायदा कसा होईल? याचाही विचार करणे आवश्यक होते.
सदर काम वाशी, नवी मुंबई यांचे अखत्यारीत असल्याने व त्याचवेळी त्या ऑफीसचे interior व नूतनीकरणाचे काम माझ्याकडेच असल्याने मला तेथे जावे लागत असे. तेथील म्हणजे वाशी येथील मोठ्या कार्यालयाचे काम चांगल्यारीतीने केल्यामुळे माझ्यावर कंपनीचा व त्यांच्या अधिकाऱ्यांचा विश्वास होता. अर्थात या सर्व कामात माझ्या ऑफीस स्टाफचा खूपच सहभाग होता.
H.P.C.L Complex चा भूखंड Exactly कोठे आहे याची कंपनीलाही proper माहिती नव्हती. आजूबाजूला काही वस्ती नव्हती, M.S.R.D.C. ने फक्त रस्ता बांधला पण लोकांना रस्त्यालगत कोणत्याही सुविधा नव्हत्या. निर्मनुष्य… फक्त मोकळी जागा, अशा अवस्थेत सर्व्हेपासून काम करायला मिळाले हे विशेष. मी ठाण्याहून सर्व्हेअर्स घेऊन खूप मोठी मोजणी केली व योग्य तो भूखंड व त्याची हद्द M.S.R.D.C. चे अधिकाऱ्यांसमक्ष कायम करून घेतली. H.P.C.L. चे अधिकारीही खुश झाले.
त्यानंतर मी व माझ्या आर्किटेक्टस् स्टाफ यांनी संपूर्ण complex ची drawings मुख्य कार्यालयामध्ये submit केली. खूप चर्चा झाली. मात्र काही मामुली बदल करून वाशी ऑफीसचे General Manager यांनी मान्यता दिल्यावर कामास सुरुवात झाली. मला खूप वेळा जावे लागत असे. M.S.R.D.C चे एक अधिकारी त्यावेळी 12 बंगल्यात रहात असत. ते या कामाशी संबंधित होते व त्यांनीच नकाशास मंजुरी दिल्याने त्यांचेही खूप सहकार्य लाभले. मात्र सर्व मंजुऱ्या मिळविण्यासाठी माझ्या ऑफीसमधील स्टाफची खूपच मदत झाली. एकूण संपूर्ण काम-पेट्रोल पंपासहित पूर्ण होण्यासाठी 2 वर्षांचा कालावधी लागला. त्याच्या मुहूर्तावेळी काही फॉरेनर्सही पहायला आले होते. त्यांना विशेषत: Toilets चे काम व एकूण Design आवडले व त्यांनी खूप कौतुक केले. H.P.C.L. चे अधिकाऱ्याने कौतुकाने लिहीलेले चार शब्द आजही मी जपून ठेवलेले आहते. त्यानंतर गुजरात साईडला आणि इतरत्रही मला अशाप्रकारे काम करण्यासाठी H.P.C.L. ने बोलावले होते. पण मी नकार दिला. मात्र द्रोणागिरी – नवी मुंबई – 3 येथे (उरणजवळ) H.P.C.L. चे एक असेच Complex केले आहे. एकूण काय H.P.C.L. कंपनीचे खूप काम केले व वेगळ्या कामाचा खूप अनुभव मिळाला. आज H.P.C.L. कंपनीला त्या Outlet मधून खूपच नफा मिळत आहे.
उल्हास प्रधान
98200 84389
ulhas pradhan@redif mail.com
Leave a Reply