कायस्थ विकासच्या दिवाळी अंक 2023 मध्ये प्रकाशित झालेला सौ. अलका वढावकर यांचा हा लेख.
मला आजही लख्खं आठवतंय, आजीचं एक पालूपद …. तुला “अनुभव” येईल नं तेव्हां कळेल. मी म्हणायची, ‘आजी कुठून ग येईल तो अनुभव ?’
‘अगं, तो काही असा सांगून येत नाही वेडाबाई. तुझं तुलाच जाणवेल हो.’
आणि खरंच की आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर ‘तो’ येतच राहिला. आज पंचाहत्तरीला अनुभवांचा भलामोठा खजिना आहे माझ्यापाशी. मी तर म्हणेन की अनुभव हा “गुरुच” आहे. जीवनात कसं वागावं आणि कसं वागू नये ह्याचे तसेच चांगल्या वाईटाचे धडे देणारा गुरु. जे ज्ञान पुस्तकं देऊ शकत नाहीत तेव्हा अनुभवातून आपण सारेजणं खूप शिकतो आणि नकळत घडत जातो. तुकाराम महाराज म्हणूनच गेलेत …. “आमी बी घडलो”….”तुमी बी घडाना”..…
आज फार दिवसांनी वाटलं आपल्या अनुभवांचा खजिना उघडावा आणि वेचावी त्यातली कांही अनमोल रत्न. खुल जा सिम सिम ….. म्हणताच आधी मला काय दिसलं माहित आहे? एकत्र कुटुंबात वाढलेलं माझं ‘बालपण’. घरातली वाड्यातली पोरं टोरं घेऊन आमच्या बंगल्याच्या व्हरांड्यात लाकडी बुडकुली आणि ती ‘ठकी’ घेऊन भातुकली मांडायची मला भारी हौस! अगदी लुटूपुटीचा संसारच म्हणाना. घरातून मिळालेला गुळ, चणे, दाणे, चरमुरे इ. खाऊ घेऊन मी निगुतीने त्या बुडकुल्यात स्वयंपाक करायची आणि सगळ्या फटावळीला जेवायला वाढायची. एक तीळ सात जणांनी वाटून खावा तसं. माझ्या ठकीचीही काळजी घ्यायची मी आईसारखी. कित्ती भाबडा आणि निरागस अनुभव होता तो.. असं मोठी झाल्यावर जाणवलं. मला वाटतं sharing आणि caring चे धडे त्याच अनुभवातून मला नकळत मिळाले असावेत.
माझ्या अनुभवांच्या खजिन्यात अल्प समाधानात तृप्त असलेलं, सुशिक्षित आणि सुसंस्कारित असं माझं घर प्राधान्याने आहे. आजी आजोबा, आई बाबा, भाऊ बहिणी, काका आत्या, मावशी मामा हा सगळा गोतावळा आहे. त्यांच्या जिव्हाळ्याच्या नात्यांसोबत आलेल्या अनुभवातूनच तर मी घडत गेले. त्यांनी मला दिली आदर्श कुटुंबाची शिकवण. तीच तर समाजात वावरताना उपयोगी पडते.
मे महिन्याच्या सुट्टीत मामाच्या गावाला जाण्यातला आमच्या पिढीचा आनंद आजच्या मुलांच्या फॉरेन ट्रिपच्या कैकपट अधिक होता. माझे मामा तर ना तालेवार होते ना ऐसपैस घरवाले. ते होते मुंबईत बैठ्या चाळीत राहणारे. आम्ही भावंडं मामाकडे राहायला गेलो की ट्रामनी दादर चौपाटीवर जाऊन भेळपुरी, कुल्फी खाऊन पायावर लाटा घेणं म्हणजे कोण पर्वणी! आल्यावर मामीच्या हातचं खिमट, साजूक तुपाची धार अन् भाजलेला पापड…अहाहा: कायम स्मरणात रेंगाळणारा गोड अनुभव ! खरंच छोट्या गोष्टीत मोठ्ठा आनंद मिळवण्याचा कित्ता मी मामाकडे गिरवला होता का?
पुढे जरा शिंग फुटल्यावर कॉलेजमधले अनुभव वेगळे. जवानीकी जोशमे स्वातंत्र्याच्या नशेत अवचित केलेला वेडेपणा… आज मैं उपर. .आसमां निचे… आज मैं आगे…जमाना है पिछे…असं वाटणारा रोमांचक अनुभव मात्र फार काळ उपभोगता आला नाही. कारण वास्तवाचं भान येऊन स्वतःलाच सावरणं आणि अभ्यासात लक्षं घालून पदवीधर होणं ही त्याकाळची माझी झापडं लावल्यासारखी Achievement होती. (१९६५-१९६६)
त्यानंतरचं चाकोरीबद्ध आयुष्य आमच्या काळातल्या मुलींचं थोड्याफार फरकाने सारखंच होतं. नोकरी, लग्न, मुलंबाळं, त्यांची शिक्षणं, घरसंसार, जबाबदाऱ्या आणि थोडी तडजोड ही तारेवरची कसरत लिलया पेलायचो आम्ही मुली. अर्थात जोडीदाराच्या उत्तम साथीनी. त्यात आलेले यशापयशाचे अनुभव हे खचून न जाता जीवनात शहाणपण देणारे ठरले हे नक्कीच ! आजच्या बदलत्या काळातल्या पिढीचं तिथेच तर घोडं पेंड खातंय. ह्याचं एकमेव कारण म्हणजे personal space ची फोफावणारी लाट. जी सर्वांसाठी आमच्या पिढीच्या फक्त मोठ्या मनात होती, आहे आणि असणार आहे.
अरेच्चा पण मी इथेच काय अडकून पडलेय? ओ: खजिन्यातलं हे काय बरं लागलं हाताला ? अगबाई माझं ज्येष्ठत्व की काय? हो हो तेच ! सगळ्या जवाबदाऱ्या संपल्या, मुलं मार्गी लागली, त्यांचे संसारही मार्गस्थ झाले…..
‘आता आली आयुष्याची रम्यशी सायंकाळ’
“निसटलेले क्षण” जगण्यासी निवांत असा हा सुकाळ.
बस…ठरलं. म्हटलं बॅग भरो और निकल पडो. आणि एका नामांकित कंपनी बरोबर खरंच निघाले पर्यटनाला एकटी. प्रवासाची मला भारी हौस.
तसं मुलीचं आणि सुनेचं बाळंतपण करायला नंतर बेबी सिटींगसाठी माझ्या अमेरिकेत सतत फेऱ्या व्हायच्या. तो देशही खूप फिरले. १९९६ ला जेव्हां मी प्रथम अमेरिकेला गेले तेव्हां जणूं स्वप्ननगरीत आलेय असंच वाटलं. आहेच तसा तो देश ! डोळे दिपवणारा, श्रीमंत आणि विकसित. वेगळी लोकं, वेगळी संस्कृती, खानपान, राहणीमान, सामाजिक,आर्थिक, राजकीय स्तर, निसर्ग, तंत्रज्ञान…एक वेगळं जग मला अनुभवायला मिळालं. पुढे मुलांबरोबर अमेरिकाच काय युरोप आणि अन्य देशही फिरु लागले तसा जगाकडे पाहण्याचा एक वेगळा विचार माझ्यात रुजला. ज्ञानात थोडी भर पडली. गैरसमजुतींना फाटा बसला. नाही म्हटलं तरी एक मध्यमवर्गीय आणि मध्यमवयीन मी थोडी समृध्द झाले विचारांनी. परदेश अनुभवाची ही जमेची बाजू वाटते मला. असो.
आता मेरा भारत महान…प्रवासात भेटलेल्या माणसांपासून ते विविध प्रांतातील विविधता अजमावतांना आलेले अनुभव मला जसे सुखद अनुभूती देऊन गेले, तसे काळजाला हात घालणारे पण वाटले काही अनुभव. विशेष करून लेह लडाख, काश्मिर येथील संवेदनशील स्थळांना भेटी दिल्यावर. वाटलं ज्यांना स्वतःच्या जगण्याची शाश्वती नाही त्यांच्या जीवावर आपण किती निश्चिंत जीवन जगतोय. सलाम ह्या भारत पुत्रांना.
माझ्या अनुभवांच्या खजिन्यातलं एक लखलखतं रत्न म्हणजे …माझी “लेखन कला “.माझा छंदच तो. माझ्या इष्टाप्तेष्टांच्या कौतुकपर प्रोत्साहनाने मला प्रेरणा मिळत गेली अन् माझ्यापरीने मी लेखनकला विकसित करत गेले, खुलवत गेले. काव्य, लेख, कथा, निबंध, स्किटस्, नाटुकल्या इ. विविध साहित्य प्रकार हाताळण्यातून मला जो अनुभव मिळतोय त्याचं वर्णन करणं शब्दातीत आहे. एवढंच सांगेन की…
अनुभवांचे शब्द जाहले
झरझर बोटातूनी झरले…
आज वयाच्या पंचाहत्तरीला मी एक परिपूर्ण आयुष्य जगते आहे. थोडी खंत आहे की मी समाजकार्य फार करु शकले नाही. हं आता माझ्या सिकेपी मंडळातर्फे आणि ज्येष्ठ नागरीक संघातर्फे, सामाजिक कार्याचे जे छोटेमोठे उपक्रम राबविले जातात त्यात माझा सक्रीय सहभाग असतो. त्या खारीच्या वाट्यात तूर्तास समाधान मानून घेते. तिथे येणारे काही अनुभव ह्रदय हेलावणारे असतात. पण शेवटी काय ह्याला जीवन ऐसे नांव…..
एक महत्त्वाचा मुद्दा सांगावासा वाटतो, माझ्या 75 वर्षांच्या आयुष्यात काही कटू, दुःखदायी, निराशाजनक, पश्चात्तापाची टोचणी लागणारे असे अनुभवही आले. आणि प्रत्येकाला ते यायलाच पाहिजेत. त्यातूनही काहीतरी बोध घेण्यासारखं असतं. प्रतिकूल परिस्थितीला तोंड देणं, थोडं खंबीर राहणं, माणसं ओळखता येणं इ. मी तर ते वाईट अनुभव मनातून delete करुन टाकण्याच्या प्रयत्नातच असते. भूतकाळ आठवून वर्तमान का खराब करा नाही का ?
जाता जाता माझ्या अनुभवांच्या खजिन्यातलं ‘आत्मविश्वास’ नावाचं माणिक तुम्हाला दाखवल्या शिवाय हा लेख पूर्ण होऊच शकत नाही. त्याचं झालं असं की…..अनेक फीचर्स असलेले फोन बाजारात येऊन बराच काळ लोटला होता पण स्मार्टफोन हाताळणं ज्येष्ठांना अजून आव्हानच होतं. 4G, 5G एकेक आवृत्त्या निघत होत्या पण मी मात्रं ‘नाय जी’ च म्हणत होते. मुलांच्या आणि ह्यांच्या मोबाईल स्क्रीनला टच करायचं धाडस होत नव्हतं मला. पण …माझ्या एका बेसावध क्षणी मुलानी आणलेच त्या 4G ला घरी आणि जुजबी धडे देऊन तो अमेरिकेला निघून गेला.
आता अडथळ्यांची शर्यत मलाच पार करायची होती. आमच्या वरती राहणाऱ्या 18 वर्षाच्या एका मुलीला केलं गुरु आणि झाला माझा स्मार्टफोन अभ्यास सुरू. ती जे शिकवायची त्यांच्या चक्क नोटस् काढायची मी. त्या बरहुकूम फोनवरील Apps मला जमूं लागली. पुढे माझं स्मार्टफोन सिलॅबस वरच्या लेव्हलवर गेलं. आणि मी ते लिलया पेललं. माझं स्वत:चं You Tube Channel सुध्दां आहे. तिथे मी माझे कार्यक्रम upload करत असते. आता बोला ! हा तांत्रिक शिक्षणाचा “अनुभव” तोही सत्तरीनंतर मला विलक्षण आत्मविश्वास आणि आनंद देऊन गेला. गंमत म्हणजे आता मी आहे माझ्या वयातल्यांची स्मार्ट गुरु !
एक सांगू कां ?
“अनुभव” गुरुविना नाही दुजा आधार..
आम्हां ज्येष्ठांची तर त्यावरच मदार…
सौ. अलका वढावकर
98693 74503
alkavadhavkar7@gmail.com
Leave a Reply