निसर्गसृष्टीमध्ये अनादीकालापासून मानवामध्ये तसेच प्राणिमात्रामध्ये अनुकरण करण्याची प्रथा दिसून येते. लहान मुलं असो किंवा प्राणी असो ते थोरांच्या वागण्याचे, हालचालींचे व रहाणीमानाचे निरीक्षण करून त्या पध्दतीने अनुकरण करताना दिसतात. अनुकरण करणे यामध्ये आक्षेपार्ह किंवा अयोग्य असं काही नाही. तो एक निसर्ग नियम आहे. अनुकरण करणे हा एक समाज व्यवस्थेचा भाग आहे. तो पूर्वापार चालू आहे. अनुकरण हे पुढेही चालूच रहाणार आहे कारण अनुकरण करणे ही समाजाची गरज आहे.
सामाजिक संस्कृती, रिती रिवाज किंवा समाजामधील चालू असलेले व्यवहार हे अनुकरणामधून विकसित होतात. त्याचबरोबर समाजातील संस्कृती रितीरिवाज हे कायम टिकून राहतात. ह्या अनुकरणामधूनच समाजाची, लोकांची जडण-घडण होताना दिसते. सामाजिक व्यवस्था ही बऱ्याच प्रमाणात अनुकरणांवर अवलंबून असते. समाजामध्ये काही बाबीमध्ये अनुकरण केल्यास ते कृत्य समाजविरोधी किंवा समाजविघातक होताना दिसून येतं.
‘अनुकरण’ ह्या शब्दावर किंवा त्या शब्दाचा अर्थ काढून त्यावर आपणाला समाजामध्ये वाद-विवाद घालायचा नाही किंवा त्यावरती बाष्कळ चर्चासुध्दा करण्याची आवश्यकता नाही. पण ह्या अनुकरणांमधून समाजामध्ये किंवा संस्कृतीमध्ये किती घातक परिणाम होताना दिसतात, त्यासाठी हा सर्व लिखाण प्रपंच करावा लागत आहे.
कोणी कोणाचे किंवा कोणत्या पध्दतीने अनुकरण करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. परंतु काही ठिकाणी चुकीच्या अनुकरणानं मूळ संस्कृती बिघडत असेल तर अशा ठिकाणी समाजातील सर्व घटकांनी आपआपल्या परिने त्याला प्रतिबंध करणं गरजेचं आहे. ह्या आक्षेपार्ह अशा अनुकरणाला आपण सुध्दा वेळीच प्रतिबंध नाही केला तर समाज व्यवस्थेमध्ये अनेक अनुचित घटना घडतील धुमाकुळ घालून कलीयुगातील मातलेला कली पुन्हा अधिकच मातला जाईल. त्यामुळे सामाजिक प्रतिष्ठा, संस्कृतीला सुरुंग लागून आपल्या डोळ्यादेखत समाजव्यवस्था रसातळाला गेलेली पहावी लागेल.
अनुकरण कोणत्या गोष्टीचं करावं याला सुध्दा काही नियम, तर काही अपवाद आहेत. सध्याच्या परिस्थितीत समाजामध्ये काही अनिष्ठ प्रथांचा पायंडा पडलेला दिसत आहे. ज्या अनुकरणानं समाजाचं हित किंवा प्रगती होईल त्याबद्दल आक्षेप असण्याचं काहीही कारण नाही. आज आपल्या देशात बहुतांशी मोठ्या शहरात पाश्चिमात्य संस्कृतीनं शिरकाव केला आहे. प्रत्येकजण पाश्चिमात्य संस्कृतीचं भोंगळ प्रदर्शन करून आम्ही भारतीय संस्कृतीपेक्षा काहीतरी वेगळं करत असल्याचं दाखवितात आणि त्यामुळं भारतीय संस्कृती हळूहळू लोप पावू लागली आहे.
अशा ह्या भारताच्या भुमीवर पदोपदी असे अनुकरण करणारे दिसतात. आजची पिढी ही त्याला अपवाद नाही.
पहाटेची भुपाळी काळाच्या पडद्याआड गेली असून सांजचे वेळची “शुभं करोती’’ रात्रीच्या अंधारात गुप्त झाली आहे.
“ना पहाटेची जात्यावरील ओवी, ना वासुदेवाची वाणी’, कानावर पडत.
आधुनिकीकरणाच्या विळख्यात भारतीय संस्कृती आणि परंपरा ऊसाच्या चरख्यात घातलेल्या ऊसाच्या चिपाडासारखी झाली आहे. ना त्याला चव ना आकार अशी आमच्या संस्कृतीची अवस्था झाली आहे.
घरा-घरामध्ये, समाजामध्ये जे थोर लोक, वडिलधारे लोक अनुकरण करतात तेच अनुकरण पुढील पिढी करते. त्यात त्या नविन पिढीचा काय दोष? हा दोष नष्ट करायचा असेल तर समाजातील प्रत्येक घटकांतील व्यक्तीनं स्वत: प्रथम बदलून त्याबद्दल सर्वांना समाजप्रबोधन करणं गरजेचं आहे.
‘अनुकरण’ हा पाच अक्षरी शब्द पण ह्या शब्दात किती ताकद लपली आहे. ती ताकद पूर्ण समाजाची जडण-घडण बदलते. ह्या समाजात अनेक शासकिय, निमशासकिय संस्था सरकारच्या वतीने काम करत असतात. चांगल्या पध्दती, रितीरिवाज बिघडू नयेत यासाठी चाकोरीबध्द नियम करून त्या नियमांची अंमलबजावणी ह्या संस्था करीत असतात. अशाच शासकीय संस्थापैकी एक संस्था म्हणजे ‘पोलीस दल’. हे शासनाच्या वतीने समाजातील कानाकोपऱ्यापर्यंत जनतेमध्ये राहून त्यांच्या सेवेसाठी सदैव काम करत असते. हा विभाग चोवीस तास अहोरात्र डोळ्यात तेल घालून समाज व्यवस्था अबाधित राखण्यासाठी जीवाचं रान करत असतो.
पोलीस विभागातील अधिकारी व अंमलदार यांना एक ना अनेक प्रसंगाला सामोरं जावं लागतं. कधी ताठर भुमिका घेउन तर कधी समाजप्रबोधनाच्या माध्यमातून काम करून समतोल राखावा लागतो.
पोलिसांना सतत आणि जास्तीत जास्त काळ हा समाजातील सर्व घटकांमधील लोकांबरोबर व्यतीत करावा लागतो. अनेक वेळा अनेक प्रसंग, घटना ह्या अनुकरणामधून घडलेल्या दिसतात. अशा वेळी कायदेशीर कारवाई करत असताना पोलिसांना अनेकांचा विरोध मोडून नि:ष्पक्षपातीपणे कारवाई करणे आवश्यक असते. अनेक वेळा ह्या अनुकरणामुळे लहान मुलं किंवा मुली व्यसनाधिन होतात किंवा एखाद्या गंभीर अशा अपराधामध्ये अडकतात.
काही वेळेस अनेक मुलं, मुली अनुकरण करण्याच्या नादामध्ये एखाद्या गुन्हेगारी टोळीमध्ये ओढली जातात किंवा अजाणतेपणी अडकली जातात. अशा वेळी गुन्हेगार अशा बेघर मुलांचा किंवा मुलींचा गुन्हे करण्यासाठी वापर करतात.
लहान मुलांच्या बाबतीत शासन व मा. न्यायालयाने कठोर असे कायदे पारित केले असून अशा मुलांना वेळीच मुक्त करून संबंधितांवर कडक कारवाई करणेबाबत आदेश दिलेले आहेत. पोलिसांना लहान मुलांच्या बाबतीत कारवाई करताना अनेक अडचणी येतात. त्या अडचणींमधून मार्ग काढून कधी कायदेशीर तर कधी अशा मुलांना प्रबोधन करून कारवाई करावी लागते.
‘अनुकरण’ कशा प्रकारे होते ह्याचा एक प्रसंग माझ्या पहाण्यात आला होता. तो प्रसंग तसा गंभीर नव्हता. परंतु मनाला खोलवर विचार करणे मला भाग पडले.
चार-सहा महिने झाले असतील मी व माझे बरोबरील स्टाफ असे आम्ही संघटीत गुन्हेगारीच्या विरोधात कारवाई करीत होतो. ह्या कारवाईमध्ये अनेक वेळा झोपडपट्टी परिसरात फिरून घर न घर तपासून गुंडाचा शोध घेत होतो.
पावसाचा मोसम चालू होता. संध्याकाळची वेळ होती, अंधार पडू लागला होता. एका शाळेच्या जवळून आम्ही पायी जात होतो. अगदी सहा/ सात वर्षापासून ते दहावीपर्यंतची मुले/ मुली शाळेच्या गणवेषात पाठीवर दप्तराचं ओझं घेवून चालत होती. आपसात दंगामस्ती करीत होती, एकमेकांच्या खोड्या काढत बालपणीच्या आनंदाचा मनमुराद स्वाद घेत होते.
क्षणभर माझं मन भुतकाळात गेलं, आम्ही ज्या शाळेत जात होतो, ती शाळा आणि गावांमध्ये सुमारे ३ कि. मी. चे अंतर होते. अशीच दंगामस्ती करणं, खोड्या काढणं ह्या गोष्टी माझ्या डोळ्यांसमोरून तरळत होत्या. माझे पाय चालत होते आणि मन भुतकाळाच्या आठवणीत मग्न झालेलं होतं. आम्ही सर्वजण त्या झोपडपट्टीमधून चालत आता शाळेपासून बरेच दूर आलो होतो.
एका वळणदार मुख्य रस्त्यावर जाण्यासाठी आठ दहा पायऱ्या होत्या. त्या पायऱ्या चढून मुख्य रस्त्यालगत असलेल्या फुटपाथवर मी उभा राहून कोणी एखादा गुंड दिसतो का ते पहात होतो.
मी ज्या ठिकाणी उभा होतो त्याच्या बाजूला एक पानटपरी होती. पानटपरीच्या बाजूला दोन मुलं अंदाजे १२/१३ वर्षे वयाची शाळेच्या गणवेषात उभी होती. त्यापैकी एका मुलाकडे माझे लक्ष गेले. मी त्याच्या मागे जाऊन त्याला चाहूल लागणार नाही अशा बेताने उभा राहून त्याचे निरीक्षण करीत होतो. तो शाळकरी मुलगा डाव्या हाताच्या तळहातामध्ये उजव्या हाताच्या अंगठ्याने काहीतरी मळत होता.
तो कदाचित तंबाखु मळत असावा असे वाटले म्हणून मी त्याच्यामागे उभा राहून पहात होतो. त्या मुलाची हाताची हालचाल व त्याच्या तोंडावरील हावभाव पाहून माझी खात्री झाली की तो मुलगा तंबाखु मळत आहे. क्षणात माझ्या मनात चलबिचल सुरु झाली. मी जरी पोलीस असलो तरी वर्दीच्या आत सामान्य माणूस होतो. त्याला पुढे जावून जाब विचारावा म्हणून एक पाऊल पुढं टाकलं परंतु मी पुढे न जाता तिथेच थांबुन तो मुलगा काय करतो हे पहात असताना, त्या मुलानं अगदी एखाद्या तंबाखु खाण्यात तरबेज असलेला माणसांसारखं दोन्ही तळहात एकमेकांवर चोळुन, एका हातातुन दुसऱ्या हातात घेऊन पुन्हा एका हाताने दुसऱ्या तळहातावर हात मारुन उजव्या हाताचा अंगठा आणि एका बोटाच्या चिमटीत तो चुरा घेतला.
मला कुतुहलाबरोबर त्या मुलांबद्दल तिरस्कार वाटू लागला. एवढ्या लहान वयात हा मुलगा तंबाखू खात असेल तर ह्याच्या भविष्यात काय लिहून ठेवले आहे? याचा मी विचार करत होतो. त्या मुलाने उजव्या हाताचे दोन्ही बोटाची चिमट तोंडात ठेवण्यासाठी वर करीत असताना त्या मुलाचे बरोबर असलेल्या मुलाने त्याच्या हातावर एका हाताने फटका मारला व म्हणाला,
“ए ! शहाण्या, बंद कर तुझी एक्टींग”.
त्यावेळी तो पहिला मुलगा दुसऱ्या मुलाच्या हातावर टाळी देत म्हणाला, ‘काय, कशी वाटली माझी ऍक्टींग? अशीच मळतात ना तंबाखू? ‘ असे विचारुन दोघेही हसू लागले.
आता मला रहावेना, मी पुढे होउन त्या दोन्ही मुलांना त्यांचे नांव विचारले. मी अचानक त्यांच्यासमोर जाऊन प्रश्न विचारल्याने ती दोन्ही मुलं घाबरली. त्यांच्या चेहऱ्यावरील भाव एका क्षणात बदलले. मी साध्या वेशात असून सुध्दा त्या मुलांनी मला बहुतेक ओळखले असावे. त्या दोन्ही मुलांपैकी ऍक्टींग करणारा जरा जास्तच भेदरलेला दिसत होता.
“काका, माझ्या हातात तंबाखु नव्हती, शप्पथ…. काका, ” तो स्वत:च्या गळ्याला हात लावत म्हणाला.
“मग तू हातात काय मळत होतास?” मी थोड्या करड्या आवाजात विचारले.
‘नाही काका, तंबाखू नव्हती एक झाडाचं सुकलेलं थोडं ओलसर पान होतं, ते मी हातानं चोळत होतो”. तो म्हणाला.
‘काय रे, हा म्हणतोय ते खरं का? ‘ मी त्या दुसऱ्या मुलांकडे पहात विचारलं.
“नाही काका, तो तंबाखू नव्हता मळत’. तो दुसरा मुलगा अगदी काकुळतीला येऊन म्हणाला.
‘मग तो अशी नक्कल का करीत होता? आणि कोणी शिकवलं त्याला? ‘ मी विचारलं.
“काका, माझे बाबा खातात तंबाखू, मी रोज बघतो घरात त्यांना तंबाखू खाताना’. तो मुलगा म्हणाला.
“कुठे असतात तुझे बाबा आणि काय काम करतात? ” मी विचारलं. तंबाखू मळणारा मुलगा आता एकदम शांतपणे माझ्याकडे पहात होता, त्याचे डेळे पाण्याने भरले होते.
‘काका, त्याचे बाबा एका ट्रकवर ड्रायव्हर म्हणून काम करतात”. दुसरा मुलगा म्हणाला.
माझ्या मनात विचारचक्र सुरु झाले. तो ड्रायव्हर म्हणून काम करत होता आणि आम्ही पोलीस असे चोवीस तास रस्त्यावर उभं रहातो. रात्र न दिवस सारखाच. मग झोप टाळण्यासाठी तोंडात तंबाखू ठेवायची आणि काम करत रहायचं. आमच्या पोलीस खात्यात सुध्दा बहुतेक अधिकारी व अंमलदार तंबाखू खातात.
“अनुकरण” काय काय घडवू शकतं याचं जिवंत उदाहरण मी अनुभवत होतो.
‘काय दोष होता त्या मुलाचा आणि त्याच्या वडिलांचा? माझं मन मला स्वत:लाच प्रश्न विचारत होतं.
मी पोलीस आहे हे विसरून त्या दोन मुलांशी बोलत होतो. त्यांना ह्या व्यसनांमुळे काय होतं, किती नुकसान होतं हे त्यांना पटवून सांगत होतो.
त्या दोन्ही मुलांनी स्वत: स्वत: चे दोन्ही हातांनी कान पकडून एक उठक-बैठक काढत म्हणाले “काका, पुन्हा अशी कधी नक्कल करणार नाही आणि व्यसन तर अजिबात करणार नाही.”
मी त्यांना जवळ घेतले व म्हणालो, “बाळांनो, चुका तर सर्वांकडून होतातच, तुम्ही अजून लहान आहात, पुन्हा अशी नक्कल किंवा चुकीचे अनुकरण करु नका, अनुकरण करा पण ते चांगल्या गोष्टीचं करा, स्वत:ला, समाजाला प्रगतीकडं घेऊन जाणाऱ्या गोष्टींचं अनुकरण करा”.
मी त्यांना सांगत होतो आणि दोन्ही मुले माझ्याकडं पहात शांतपणे ऐकत होती. तेवढ्यात माझ्या मागून माझ्या स्टाफचा बोलण्याचा आवाज आला. माझ्या स्टाफच्या एखाद दुसऱ्याच्या हातात काठी पाहून तो मुलगा मला म्हणाला, “काका, तुम्ही पोलीस आहात? ”
“होय बेटा, आम्ही पोलीस आहोत, क्राईम ब्रन्चमध्ये काम करतो, मी त्यांना सांगितले.
तंबाखू मळण्याची नक्कल करणाऱ्या मुलाची आता भीती कमी झाली होती. “काका, चलाना माझ्या घरी, इथं जवळच माझं घर आहे”. तो म्हणाला.
“नाही बेटा, आता उशीर झाला आहे, तुम्ही जा तुमच्या घरी ” मी म्हणालो.
“काका, प्लीज – दोन मिनिटं चला ना, माझे बाबा आले असतील घरी तो मुलगा आता हट्टच करू लागला.
“सर, चला हो, कुठं ह्या पोरांच्या नादी लागता तुम्ही”? स्टाफपैकी एकजण म्हणाला.
“चला रे, एवढा आग्रह करतोय तर जाऊया दोन मिनिटं त्याच्या घरी “. मी म्हणालो.
ती दोन्ही मुले पुढं चालत होती, त्यांच्या मागे मी आणि माझ्या मागे माझा स्टाफ असे आम्ही चार दोन चाळी पार करून एका घराजवळ आलो. तो मुलगा, “काका, हे माझं घर”, असं म्हणून त्यानं बाहेरूनच. “आई-बाबा, हे बघा कोण आलयं आपल्या घरी”. असा आवाज दिला.
एक मध्यम वयाची साधी, सोज्वळ बाई कपाळावर मोठं कुंकू लावलेली बाहेर आली.
“कोण आलय रे बाळा? तिनं आमचेकडे प्रश्नार्थक मुद्रेनं पहात विचारलं.
‘आई, बाबा आले का ग? हे पोलीस आहेत’. त्या मुलानं सांगितलं.
त्या मुलाच्या बोलण्यातून पोलीस हा शब्द ऐकल्यामुळे त्याचे वडील ज्यांनी कमरेला टॉवेल गुंडाळलेला, अंगात जुन्या टाईपचे पोटावर खिसा असलेली बनियन घातलेलं, गळ्यात तुळशी माळ, कपाळावर गंध, गालफडावर दाढीचे खुंट वाढलेले, साधारण पन्नास पंच्चावन्न वर्ष वयाचे एका हातात तंबाखू घेउन दुसऱ्या हातानं मळत बाहेर आले.
“काय रे मन्या, काय झालं? पोलीस का आलेत? काय लफडं बिफडं केलंस काय? ” त्यांनी बाहेर येवून प्रश्नांची सरबत्ती सुरु केली.
माझ्याकडे त्या गृहस्थानं थोडं आश्चर्यानं पहात विचारलं, “साहेब, रामराम, काय गडबड नाही ना? ”
मी त्यांना नमस्कार करून काही भानगड नाही, लफडं नाही आणि गडबड देखील नसल्याचं सांगितलं.
‘मग एवढे पोलीस आमच्या घराकडं कस कायं आलात बुवा? ‘ त्यांनी हातातील तंबाखू मळत मला पुन्हा विचारलं.
“बाबा, काही लफडं नाही झालं’. तो मुलगा म्हणाला.
मी त्या गृहस्थाला आणि त्या बाईला तो मुलगा तंबाखू खाण्याची कशी नक्कल करत होता ते सांगितलं.
“काय रे मन्या, तू तंबाखू खायला शिकलास काय? आणि कोणी शिकवलं तुला तंबाखू खायला”. ते गृहस्थ रागाने म्हणाले.
“अहो भाऊ, तो तंबाखू खात नाही, तर तंबाखू कशी मळतात ती मळून लोक म्हणजे तुमच्या सारखी माणसं कशी तंबाखू खातात ती ही मुलं पाहतात आणि त्याचे अनुकरण करता करता मग ती स्वत: व्यसनाधीन कशी होतात हे कळत सुध्दा नाही. आणि ज्यावेळी ते आपणांला कळलेलं असतं त्यावेळी परिस्थिती हाताबाहेर गेलेली असते.” मी त्यांना म्हणालो.
“साहेब, तो तंबाखू खात नाही असं तुम्ही म्हणता मग एवढे पोलीस घेऊन माझ्या घरी का आलात? ” त्या गृहस्थानं त्याच्या मनातील शंका बोलून दाखवली.
आमचं हे बोलणं चालू असताना चाळीतील आजुबाजुच्या बघे लोकांनी गर्दी केली. पंधरा-वीस महिला व पुरुषवर्ग जमा झाला होता. त्या गृहस्थाचं म्हणणं ही खरं होतं. पोलीस घरी आले म्हणजे नक्की काहीतरी भानगड असणार, हा समज आमच्या समाजात पक्का झाला आहे. (‘काय भानगड’ या विषयावर मी सविस्तर एक लेख लिहिणार आहेच, त्यावेळी ‘भानगड’ ह्या शब्दाचा उहापोह करणार आहे.)
मी त्या ठिकाणी जमलेल्या सर्व मंडळींना समजावून सांगितले.
‘आपण मोठी माणसं कसे वागतो, कसं काम करतो, एकमेकांशी कसं बोलतो याचं अनुकरण ही लहान मुले करत असतात. मग त्या आपल्या नित्य दैनंदिनक्रमात आपली कामं, व्यसनं, बोलीभाषा याचा अंतर्भाव असतो. कधी आपण सहज बोलता बोलता एका वाक्यात एखादी शिवी किंवा अश्लील शब्द वापरतो. तेच शब्द व आपल्या हालचालीचं ही लहान मुलं निरीक्षण करता करता अनुकरण करतात. अनुकरण करणं हे चुकीचं आहे असं मी म्हणत नाही, तर आपल्या कोणत्या वागणुकीमुळं, कृत्यामुळं समाजात चुकीचा संदेश जातो हे महत्वाचं आहे. आपण एखादी गोष्ट करतो उदा. मोठ्यांचा संसार पाहून आई स्वयंपाक करते, ते पाहून लहान मुली भातुकलीचा खेळ खेळतात. छोटी भांडी मांडुन स्वयंपाक करतात. तो ह्या अनुकरणाचाच एक भाग आहे. मुलं लुटुपुटुची लढाई करतात हे सुध्दा अनुकरण आहे. हे अनुकरण समाजोपयोगी आणि आपली संस्कृती जपणारं आहे. परंतु तेच जर आमची ही मुलं एखाद्या अयोग्य गोष्टीचं अनुकरण करतील तर आमच्या देशाचं भविष्यात काय होईल हे मी सांगण्याची गरज नाही.
मी माझं बोलणं थांबवून त्या गृहस्थांना विचारलं.
“तुमच्या हातात तंबाखू आहे का? ”
“होय साहेब, मी तंबाखू मळत होतो’, असं म्हणून त्यानं तळहात उघडून दाखविला.
“तुम्ही हे जे करता त्याच बाबींचं ही मुलं अनुकरण करतात आणि त्या मधुन हळुहळु ते कधी व्यसनाधिन होतात हे त्यांना सुध्दा कळत नाही.” मी म्हणालो.
त्या गृहस्थाच्या चेहऱ्यावर पश्चातापाचे भाव दिसत होते. त्यांना आता त्यांचं कृत्य अपराधीपणाचं वाटत होतं. त्यांनी एका क्षणात हातातील तंबाखु खाली झटकून बनियनच्या पोटाकडील खिशातील तंबाखुचा बटवा बाहेर काढून समोरील गटारात फेकून दिला.
“साहेब, हे बघा, आज आणि ह्या क्षणापासून मी तंबाखू खाणं सोडून देतो. पुन्हा आयुष्यात तंबाखुला हात लावणार नाही, देवा शपथ सांगतो’! असं म्हणून त्यांनी गळ्यातील तुळशी माळेवर हात ठेवला.
त्यांना त्यांची चूक लक्षात आली होती. एखाद्या लहानशा बाबीचं मुलं कसं अनुकरण करतात हे जिवंत उदाहरण डोळ्यासमोर दिसत होतं. ते गृहस्थ त्यांच्या मुलाला थोडं चढ्या आवाजात रागवत असताना मी मध्येच हस्तक्षेप करून त्यांना थांबवलं.
‘नको भाऊ, त्याच्यावर रागावू नका, त्या मुलानं आपली चूक मान्य केली आहे, शिवाय तो तंबाखू खातच नाही तर त्याला रागवायचंच कशासाठी? राग गिळुन टाका, त्यांना समजावून सांगायचं हेच वय आहे. आपण मोठी माणसं अनुभवी असुन सुध्दा चुका करतो, तर त्या मुलांना आपण कोणत्या अधिकारानं सांगु शकतो !”
मी त्यांना दोन समजुतीच्या गोष्टी सांगुन म्हणालो, ‘चला, निघतो आता, खूप उशीर झाला आहे.’ असे म्हणून मी चालू लागलो.
माझ्याबरोबर असलेला स्टाफ आज वैतागला होता, एकतर ज्या कामासाठी आम्ही गेलो होतो ते काम झालं नव्हतं, उलट तास-दिड तास असाच वाया गेल्याचं त्यांच्या बोलण्यावरून वाटत होतं. रात्र झाली की प्राणी, पक्षी दिवसभर स्वच्छंदपणे हवेत फिरून आपआपल्या घरट्याकडं जाण्यासाठी धडपड करीत असतात. इतर खात्यातील लोक, व्यापारी आपआपल्या घरी अगदी वेळेत पोहोचतात. फक्त अपवाद पोलीस खात्याचा असतो. कधी काय काम लागेल आणि त्या कामात किती वेळ लागेल याची शाश्वती नसते. मग घरी लवकर जाणं सोडा कधी कधी घरीच जाता येत नाही.
त्या दिवशी माझंही असंच झालं होतं. मी काहीतरी कामानिमित्त घरी पत्नीला लवकर घरी येईन असे सांगून आलो होतो. परंतु ह्या घटनेमुळं मला वेळेत घरी जाता आलं नव्हतं.
मी ज्या गुन्हेगाराला शोधायला गेलो होतो तो आम्हाला मिळाला नव्हता. ही सल मनाला टोचत होती. पण एका गोष्टीचं खूप समाधान वाटलं होतं, त्या गृहस्थानं हातातील तंबाखू तडकाफडकी झटकुन तंबाखुचं व्यसन सोडण्याची शपथ घेतली होती. तो गुन्हेगार त्यावेळी मिळाला नाही परंतु मी समाजातील एका चुकीच्या मार्गावर जाणाऱ्या मुलाला वेळीच जागृत करून चांगल्या मार्गावर जाण्यासाठी भाग पाडले होते.
अशाच प्रकारच्या घटना किंवा असे काही प्रसंग पोलिसांसमोर येतात. काही कारण नसताना किंवा काही अनुचित प्रकार घडलेला नसताना सुध्दा पोलिसांना काम करावं लागतं. अशा वेळी तो पोलीस आपलं घर, कुटुंबिय हरवून समाजहिताच्या कामात स्वतःला झोकून देतो. परंतु पोलिसांच्या ‘अमूर्त’ स्वरुपाच्या कामाचं श्रेय त्याला कोणी देत नाही आणि त्याच्या कामाचं कोणी मूल्यमापन करत नाही. हे आमच्या समाजाचं आणि पोलिसांचं दुर्भाग्य म्हणावं लागेल.
–व्यंकट पाटील
व्यंकट पाटील यांच्या ‘घर हरवलेला पोलीस’ या लेखसंग्रहातील हा लेख.
Leave a Reply