मूत्रपिंडातील क्रियाशील वृक्काणू (नेफ्रॉन) यांच्या क्रियेत बाधा आल्यास मूत्र तयार होणे बंद होते. याला मूत्रविपरक्तता किंवा अॅन्युरिया असे म्हणतात. २४ तासात ३०० मि.लि.पर्यंत मूत्र तयार झाल्यास त्याला लघवी कमी होणे (ऑलिम्युरिया) असे समजतात. परंतु त्यापेक्षाही मूत्र कमी तयार झाल्यास लघवी बंद झाल्याची लक्षणे दिसतात. मूत्र तयार करण्याचे मूत्रपिंडाचे कार्य दोन गोष्टींवर अवलंबून असते. एक म्हणजे मूत्रपिंडातील वृक्काणू पूर्णपणे कार्यशील असावे लागतात म्हणजे त्यांचे लघवी गाळण्याचे कार्य व्यवस्थित असावे लागते. तसेच रक्तातील प्राणवायूचा (ऑक्सिजन) साठा पुरेसा असावा लागतो. असे न झाल्यास मूत्रपिंड एकाएकी निकामी होऊ शकते. उदा. रक्तदाब मर्यादेबाहेर वाढला किंवा फुफ्फुसांना पुरेसा ऑक्सिजन मिळाला नाही तर अशावेळी मूत्रपिंडावर ताण येतो.
पाणी खूप कमी पिणे, सतत उलट्या व जुलाब होणे गंभीररित्या भाजणे, हवेतील धगधगणारी उष्णता, भरपूर घाम येणे या सर्व कारणांनी शरीरातील पाणी प्रमाणाबाहेर कमी होते. खूपसा रक्तस्त्राव झाल्यास उदा. बाळंतपणात किंवा एखाद्या अपघातामुळे अथवा कठीण शस्त्रक्रियेनंतर बराच रक्तस्राव होतो. अशावेळी शरीरातील पाणी एकदम कमी होते. अशीच परिस्थिती सर्वांगीण जंतुआघात (सेप्टिसिमीया), क्वचित प्रसंगी बधिरीकरणानंतर झालेला आघात तीव्र हृदरोग किंवा सतत होणारा दमा, न्युमोनिया यामुळे फुफ्फुसात ऑक्सिजनची कमतरता भासते. हा ताण शरीराला सहन न होऊन त्याचा परिणाम मूत्रपिंडावर होतो. काही औषधे, विषप्राशन, गरोदरपणी विशिष्ट परिस्थितीत येणारी आकडी, रक्त देताना दात्याचे रक्त न जुळल्यास हे सर्व मूत्रपिंडाला अपायकारक ठरते. या सर्व परिस्थितीत मूत्रपिंडाचे कार्य थांबू शकते. असाच परिणाम मोठी अश्मरी किंवा ओटीपोटातील कर्करोग यामुळे बंद झालेल्या मूत्रनलिकेमुळे होतो. अशा अनेक कारणांमुळे चिंताजनक नत्रवायूचे चयापचय (नायट्रोजन पुग्तूहल मेटॅबोलिझम) वाढून त्याचा शरीरावर अनिष्ट परिणाम होतो. रोग्याची स्थिती खालावते, उलट्या होतात, स्नायू थरथरतात, रक्तदाब अवास्तवरित्या वाढतो आणि हळूहळू शुद्ध हरपते.
अशावेळी मूत्रपिंडाचे अपोहन (डायालिसिस) करण्याची वेळ येते. रुग्णाची स्थिती सुधारल्यानंतरसुद्धा मूत्रपिंडाचे कार्य सुधारले नाही तर वरचेवर डायालिसिस करावे लागते. इतके करूनही ज्यावेळी डायालिसिसचा उपयोग होत नाही तेव्हा मूत्रपिंडाचे अवरोपण (किडनी ट्रान्सप्लान्ट) हाच एकमेव मार्ग ठरतो.
डॉ. विनोदिनी प्रधान
मराठी विज्ञान परिषद
Leave a Reply