नवीन लेखन...

आपण आपल्याशी

साधनाच्या अधीन असलेल्या प्रत्येक सुखाला भारतीय संस्कृतीने कमी महत्त्वाचं मानलं. कारण सुखाचं साधन जवळ असल्याचं सुख जेवढं मोठं, तेवढंच ते साधन नष्ट झाल्याचं, हरवल्याचं दुःखही मोठं ! टी. व्ही., रेडिओ, कॅसेट प्लेअर, व्हिडिओ अशी असंख्य करमणुकीची साधनं आज आपल्या आयुष्याचा अविभाज्य अंग बनलीत आणि त्यात फारसं गैर काही नाही. उलट काही प्रमाणात ते अपरिहार्यच आहे. रोजचं जीवन दिवसेंदिवस अधिकाधिक धकाधकीचं, चिंतेचं बनतं आहे.

ज्यांच्याशी मनातलं सारं खुशाल बोलावं अशी माणसं कमी होत आहेत. एकमेकांमधले संबंध दुरावत आहेत. अशावेळी आवडतं संगीत, चांगला चित्रपट अशा करमणुकीची मनाला गरज असते. रोजचं काहीसं कंटाळवाणं, क्वचित रटाळ वाटणारं रुटीन अशा करमणुकीमुळे अर्थपूर्ण, रसपूर्ण वाटू लागतं. माफक प्रमाणात यामधला आनंद आपल्या संस्कृतीनं मान्यही केला. म्हणूनच नृत्य, संगीत, काव्य, नाटक यांचा विकास आणि अभ्यासही भारतात फार प्राचीन कालापासून झाला.

पण या संस्कृतीनं माणसाला दिलेली आणखी एक देणगी जी आजकाल विसरली जाते आहे ती म्हणजे एकांतामध्ये स्वस्थ बसून राहणं, हे स्वस्थ बसणं म्हणजे आळशीपणा, निष्क्रियपणा नाही. उलट या एकांतामध्ये मन खूप काही काम करू शकतं. स्वतःच्या जीवनाकडे गंभीरपणे पाहता येतं. आपल्या गुणदोषाचं परीक्षण केलं जातं. वाचलेले किंवा ऐकलेले चांगले विचार पुन्हा आठवून त्यांचा आनंद घेता येतो किंवा त्यांचं चिंतन करता येतं.

तसं सतत डोळ्यापुढे असणारं पण रोजच्या धावपळीत आपण ज्याच्याकडे धड पाहातही नाही असं आभाळ एकटेच असताना घराच्या खिडकीतून, बाल्कनीतून त्याच्याकडे पाहताना त्याची भव्यता, त्यांच्या रंगांचं सौंदर्य कळतं. एरवी न जाणवणारी चिमण्याची चिवचिव जाणवते, वृक्षांची सळसळ जाणवते, हवेचा स्पर्श जाणवतो आणि पाहता पाहता निसर्ग आपल्याशी बोलू लागतो. आपण एकटे उरतच नाही. भारतीय संस्कृतीनं मानवी जीवनाचं जे अंतिम उद्दिष्ट मानलं आहे, मी कोण? ‘ याचा शोध घेणे ते अशा एकांतामध्येच समजू शकतं. निदान तो प्रश्न पडण्याइतकं मन अंर्तमुख तरी होतं. पहाटेच्या शांतवेळी डोळे मिटून साऱ्या बाह्य जगापासून दूर करून मन आतमध्ये ओढून घेणं हे ज्ञान भारतीय संस्कृतीत विद्यार्थीदशेतच दिलं जायचं. म्हणूनच राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, भाषाशास्त्र, गणित, विज्ञान अशा बाह्य विषयांच्या ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांच्या व्यक्तित्वामध्ये चिंतनशीलता, अंतुर्मखता यायची. करमणुकीच्या विविध प्रकारांचा आस्वाद घेण्याची रसिकता, मर्मज्ञता त्याच्याजवळ असली तरी तो त्यांचा गुलाम व्हायचा नाही.

स्वतःशी रमण्याच्या या शक्तीमुळं, क्षमतेमुळं स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक यांच्यासारख्या नेत्यांनी तुरुंगातला सक्तीचा एकांतवास सहज पेलला. एवढंच नव्हे तर त्याच काळात आपल्या मधल्या चिंतनशीलतेनं मोठे ग्रंथ, खंडकाव्ये लिहिली. राम गणेश गडकरी एकदा स्वतःविषयी म्हणाले होते, “मी जेव्हा काहीच करत नसतो तेव्हाच मी खूप काही करत असतो.’ आजकाल आपल्याला मुळात रिकामा वेळच फार कमी मिळतो. ‘आता सगळी कामं संपली’ असे क्षण आपल्या आयुष्यात फार कमी. त्यातही जे क्षण मिळतात. तेव्हा मन रोजच्या रूटीनमुळे थकलेले, कंटाळलेलं असतं. अशा मनाला उल्हसित करायला बाह्य करमणूक गरजेचीच.

पण कधी कधी मात्र आपण या साधनांच्या पार आहारी जातो. वेगवेगळ्या चॅनल्सच्या माध्यमातून रोज एक-दोन सिनेमे पाहणं हे आपलं नित्याचं काम वाटतं. सतत कानाशी रेडिओ सुरू नसेल तर काहींना चैन पडत नाही. मित्र-मैत्रिणींशी सतत काहीतरी बडबडल्याशिवाय काहीजण राहू शकत नाहीत. आपल्या मनाला आपण मुळी रिकामं राहूच देत नाही. मग चिंतन, मनन या गोष्टी आपल्या आयुष्यात येणार कुठून? एवढंच कशाला, रोजच्या गर्दीपासून गजबजत्या आयुष्यातून दूर म्हणून आपण एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी सहलीला जातो. तिथेही एरवी न दिसणारा तो निसर्ग, ती शांतता डोळ्यात, मनात साठवून न घेता आपण पत्ते खेळत बसतो. गाण्याच्या भेंड्या लावत बसतो किंवा कॅसेट प्लेअर ऑन करतो.

खाणं-पिणं, हसणं-खिदळणं आणि उडत्या गाण्यांवर तसंच उडतं नाचणं याविना रिकाम्या क्षणी आपण अस्वस्थ होत असू तर तो आपल्या व्यक्तिमत्त्वाचा उथळपणाच नाही का? भारतीय संस्कृती जगात टिकून राहिली ती शस्त्राच्या बळावर नव्हे. तिच्यामधले अजरामर विचार ही तिची शक्ती आहे. म्हणूनच असंख्य घाव साहूनही अक्षय राहिली. आता मात्र पाश्चात्त्य देश आपल्यावर सांस्कृतिक आक्रमण करताहेत.

प्रसारमाध्यमातून, वस्तूंच्या बाजारपेठेतूनच नव्हे; तर कधी कधी वैचारिक वाङ्मयातूनही आपल्या संस्कृतीवर आक्रमण होत आहे. आपण त्याला बळी पडत आहोतचं. ही प्रक्रिया किती वेगानं होते आहे, एवढाच आता प्रश्न आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..