हल्लीच्या दोन तरुणांचे संवाद ऐकले आहे का तुम्ही? म्हणजे त्याला संवाद म्हणण्यापेक्षा फक्त शब्दांची देवाण-घेवाण म्हणूया हवंतर कारण त्यात संवाद कौशल्य तर काहीच नसतं, अगदी फार व्यकरणाच्या नादी न लागता, नुसतंच भाषा म्हणून शब्द जरी ऐकले तरी, घाबरायला होतं. एकवाक्य समजा ४-५ शब्दांचे असेल तर त्यातील २-३ शब्द हे अपशब्द आणि शिव्या असतात आणि त्यासुद्धा अगदी अर्वाच्य. अरे एखादे वाक्य तर सरळ बोला, चांगले बोला अशी टास्क द्यायची वेळ येऊन ठेपली आहे. बरं हीच गती आमच्या सिनेमांची आणि हल्लीच्या ‘नेट सिरीज’ ची. जितके जास्त अपशब्द तेवढे तुम्ही ‘मॉडर्न’ ‘कूल’ असा समज झाला आहे.
माझा एक मावसभाऊ होता. त्याचा त्याकाळी ट्रक चा व्यवसाय होता. मी फार लहान असतांना आम्ही त्याच्याकडे गेलो होतो, तेंव्हावआई सहज त्याला म्हणाली, “अरे शशी, काय रे ही तुझी भाषा?’, त्यावर त्याचं म्हणणं असं होतं, ‘की मावशी ज्याला जी भाषा समजते त्याच्याशी त्याच भाषेत बोलावे’. म्हणजे त्याचं अगदी ट्रक वाल्यांची लाईन, म्हणून अगदी टोकाचे उदाहरण झाले, पण मग आपल्या मुलांचा आणि सिनेमवाल्याचा, नेट सिरीज वाल्यांचा समज असा झाला आहे का, की आपल्याला, आपल्या समाजाला हीच भाषा मान्य आहे आणि हीच भाषा समजते?
प्रत्येक शब्दाबरोबर त्याचे एक वलय असते. ते वलय, अर्थातच त्याची कंपने जशी समोरच्या व्यक्तीवर आघात करतात, तशीच ती जो व्यक्ती ते शब्द उच्चारते त्याच्यावरही आघात करतच असतात. आपण म्हणतो की राग मावळायला त्यामुळे मदत मिळते, पण खरंच ती मदत होते, की त्यामुळे अजून काही नुकसान होते, ह्याचा कधी विचार केला का? आपल्या मानसिक शक्तीवर ह्या अपशब्दांचा काय असर होतो, ह्याची जाणीव आहे का? बोली भाषा फार साहित्यिक नसावी पण म्हणून ती अशी असावी???
बरं हे सगळं उच्चारण फक्त रागातच असतं असं आहे का? तर नाही हो, हल्ली ही गमतीची भाषा पण आहे. मग आता गमतीत अपशब्द उच्चारल्यावर काय आंनद मिळतो? विनोदाचा दर्जा इतका खालचा??
भाषेचं सामर्थ्य त्याच्या उच्चारलेल्या शब्दांपेक्षा न उच्चारलेल्या शब्दात जास्त आहे. चांगल्या शब्दात राग किंव्हा आनंद व्यक्त करायला तुमचा तेवढा त्या भाषेचा अभ्यास लागतो.
उगाच तुकोबा लिहून नाही गेले
आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने |
शब्दांचीच वस्त्रे यत्ने करु ||
शब्दचि आमुच्या जीवीचे जीवन |
शब्द वाटे धन जनलोका ||
तुका म्हणे पहा शब्दचि हा देव |
शब्देचि गौरव पूजा करु ||
— © सोनाली तेलंग
०२/१०/२०१८
Leave a Reply