अपेक्षा तेथे परम दुःख म्हणतात. पण नातेसंबंधांच्या बाबतीत अयोग्य अपेक्षा तेथे परम दुःख असा अनुभव येतो. आयुष्यात अनेक व्यक्ती भेटत असतात. प्रत्येक व्यक्ती विषयी आपण आपली एक समजूत करून घेतो. त्या व्यक्तीविषयी आलेल्या अनुभवातून, तिच्या स्वभावाला बघून आणि कधीकधी आपल्या जुन्या अनुभवांतून त्या व्यक्तीविषयी विशिष्ट अशी प्रतिमा पक्की करतो. त्या प्रतिमेच्या चौकटीतून त्या व्यक्तीला कायम बघत असतो.
उदाहरणार्थ आपली एखादी मैत्रीण खूप चांगली, जीवास जीव देणारी असली की आपण दुसरी एखादी मैत्रीण थोडीफार चांगली वाटली की लगेच आपण तिला जिवलग मैत्रिणी सारखे समजू लागतो. पण कधीकधी अचानक त्या व्यक्तीविषयी वेगळे अनुभव येतात. ते आपल्या चौकटीत अजिबातच बसत नाहीत. मग आपण त्या व्यक्तीला दोष देतो. आपल्याला वाटते अरे ही व्यक्ती अशी आहे??? ही व्यक्ती माझ्याशी अशी का वागली?? पण ह्या विचारांमागे नकळत त्या व्यक्तीने असंच वागलं पाहिजे असा आग्रह धरतो. म्हणजे कुठेतरी त्या व्यक्तीला गृहीत धरतो. वास्तविक चुक त्या व्यक्तीची नसते. तर आपण बांधलेल्या चौकटीत आपण तिला बंदिस्त करायला जातो. त्यामुळे ती व्यक्ती त्या चौकटीत बसणारच नसते. अशावेळी आपल्या कुठल्या प्रतिमेच्या चौकटीची त्वरित डागडुजी केली तर (म्हणजेच ती व्यक्ती अशीसुद्धा आहे हे पटकन मान्य करणे) होणारा त्रास नक्कीच कमी होतो.
या दुनियेत कोणीच आपल्याला सुखी किंवा दुःखी करू शकत नाही. त्यामुळे ज्यावेळी आपण सुखात असतो तेव्हा त्याला जबाबदार आपण असतो आणि दुःखात असतो त्यालाही जबाबदार आपणच असतो. जास्तीत जास्त सुखात राहण्यासाठी योग्य अपेक्षा ठेवण्याचा अभ्यास केला पाहिजे. एखाद्या विषयी चुकीचा अनुभव आला तर आपल्या त्या व्यक्तीच्या बद्दल असलेल्या अपेक्षांमध्ये सुधारणा केली तर कोणत्याही व्यक्तीमुळे आपण दुखावले जाणार नाही. तसेच नातेसंबंध दृढ होण्यास नक्कीच मदत होईल. मग मात्र योग्य अपेक्षा तेथे परमसुखाचा अनुभव येईल.
@ मंजुषा देशपांडे, पुणे.