शिवरायांच्या स्वराज्याच्या हाकेने प्रेरित झालेले मावळातले महादेव कोळी वीर खेमा नाईकाच्या नेतृत्वात मुघल सत्तेविरुद्ध दंड थोपटते झाले. शिवनेरी सकट आपले सारे किल्ले त्यांनी जिंकून घेतले. दख्खन पादाक्रांत करण्यासाठी तेव्हा शहजादा असलेला औरंगजेब लाखोंचे सैन्य घेऊन आला होता. त्याने एका मुघल सरदारास हजारोंची फौज देऊन हे महादेव कोळ्यांचे बंद मोडून काढण्यास पाठविले. एवढ्या प्रचंड फौजेपुढे मावळे टिकले नाहीत. कित्येक मारले गेले आणि खेमा नाईकासमवेत दीड हजार बंदी बनविण्यात आले.मुघलांची दहशत बसावी म्हणून नाईकाच्या रक्तसंबंधातले तमाम लोक पकडून आणून कापले गेले. नाईकास निर्वंश केले आणि सगळ्या दीड हजार बंदी केलेल्यांची शीरे कापली गेली. त्या शिरांच्या ढीगावरच एक चबुतरा बांधण्यात आला. हाच तो कोळी चौथरा जो आजही शिवनेरीवर पाहायला मिळतो. इतिहासाच्या कुठल्याच नोंदीत त्या वीरांची नावे उपलब्ध नाहीत. नाईकाचे खरे नाव, गाव आदी काहीच उपलब्ध नाही. खेमा/खेमू नाईक असा त्या नेत्याचा उल्लेख फक्त काही ठिकाणी आढळतो.
महादेव कोळ्यांचा शिवनेरीवर संहार
पुणे परिसरातील शिवरायांच्या कारवाया आदिलशाहीला खुपत होत्या. मुघलांना जरी त्या ठाऊक असल्या तरी अजून त्यांना त्यांचा थेट उपसर्ग होत नव्हता. योगोयोग म्हणावा का ते माहित नाही पण त्याच सुमाराला काही महादेव कोळी लोकांनी मुघलांविरुद्ध आघाडी उघडून जुन्नर व शिवनेरीचा ताबा घेतला.
ह्यापूर्वी हा भाग निजामशाहीकडे होता. निजामशाही पडल्यानंतर सीमाभागाकडे आदिलशाहीचे व मुघलांचे थोडे दुर्लक्ष होत होते. कदाचित ह्याचा फायदा घेऊन ह्या महादेव कोळ्यांनी त्या प्रांतावर अधिकार स्थापित केला. मुघलांनी ह्यावर लगेच उपाययोजना करण्यासाठी व महादेव कोळ्यांना पस्त करण्यासाठी एक भली मोठी फौज पाठवली.
शिवनेरीला वेढा पडला व लवकरच महादेव कोळ्यांच्या नवख्या सैन्याने बलाढ्या मुघल सैन्यापुढे नांगी टाकली. सुमारे १५०० महादेव कोळ्यांना जेरबंद करण्यात आले. त्यांचे अतोनात हाल करून नंतर माथ्यावरच्या एका चौथऱ्यावर त्यांचा शिरच्छेद करण्यात आला. ह्या नरसंहाराची आठवण म्हणून आज त्या चौथऱ्याला कोळी चौथरा नावाने संबोधिले जाते. नंतर त्या चौथऱ्यावर एक घुमटी बांधली गेली व त्यावर फारसीमधे दोन शिलालेखदेखिल आहेत.
दुर्दैवाने आज त्या महादेव कोळ्यांची किंवा त्यांच्या म्होरक्याची नावे उपलब्ध नाहीत. इस्लामी राज्यकर्त्यांनी त्यावेळी केलेल्या अनेक नरसंहारांपैकी एक म्हणून ही घटना गणली जाईल.
संदर्भग्रंथ
• श्री राजा शिवछत्रपती खंड १, पृष्ठ ६९९-७११
• शिवनेरी, नाणेघाट, हरिश्चंद्रगड व परिसर, पृष्ठ ४३-४४
© *शिवकालीन सत्य इतिहास ग्रुप*
०४.१२.१६
नमस्कार.
फारच सुदर व अपरिचित अशी माहिती तुम्ही पुरवलीत. अशा अनेक known-unknown वीरांच्या बलिदानावरच आपण आज उभे आहोत. याची जाणीव सर्वांनाच असायला हवी. आणि, ती तुमच्या या लेखामुळे पुनर्जागृत होईल, यात शंका नाहीं.
सस्नेह,
सुभाष नाईक