तब्बल साठहून अधिक वर्षांच्या तपश्चर्येतून संवादिनी या वाद्याला प्रतिष्ठा मिळवून देणारे आणि अनेक दिग्गज गायक-वादकांना आपल्या अलौकिक प्रतिभेने समर्थ साथ देऊन मैफली रंगविणारे ज्येष्ठ संवादिनीवादक अप्पा जळगावकर यांचा जन्म १ जानेवारी १९२२ रोजी जालना येथे झाला. श्रुतीप्रधान भारतीय संगीतात मिंडयुक्त स्वर आणि श्रुती केवळ सारंगीसारख्या तंतुवाद्यातूनच मिळू शकतात, या कल्पनेने संवादिनीला दुय्यम वागणूक देण्यात येत असताना संवादिनीमधून स्वरविकास करून या वाद्याला प्रतिष्ठा मिळवून देण्याचे मोलाचे काम जळगावकर यांनी केले आणि त्यामुळेच संगीत नाटक अकादमीचा मानाचा पुरस्कार मिळविणारे ते पहिलेच संवादिनीवादक ठरले. अप्पा जळगावकर सुरूवातीला हे ध्रुपद गायकी करायचे.
मुळात अप्पांची आवड म्हणजे धृपद गायकी. धृपद गायकीच्या मैफलीमध्ये त्यांचे मन रमायचे, पण कर्मधर्म संयोगाने अप्पा संवादिनीवादन करू लागले. त्यांनी बाळकृष्ण चिखलेकर आणि उस्ताद छब्बू खॉं यांच्याकडून संगीताचे शिक्षण घेतले, पण संवादिनी वादनाचे कोणाकडून प्रशिक्षण घेतले नाही. एकलव्याप्रमाणे कठोर रियाज करीत संवादिनी वादनात त्यांनी प्राविण्य प्राप्त केले. अशा स्थितीतच अप्पांनी संवादिनीवादनात स्वतःचे असे अढळ स्थान प्रस्थापित केले. ५० वर्षांपूर्वी ते पुण्यात आले आणि पुणेकरच होवून गेले.
पुण्यात आल्यावर त्यांची ओळख स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांच्याशी झाली. इथेच त्यांच्या जीवनाला नवी कलाटणी मिळाली. तो जणू काही “स्वर आणि सूरां’चा मिलाफ होता. त्यानंतर पंडितजींच्या बहुतांशी मैफलीत अप्पांनी आपल्या बहारदार हार्मोनिअम वादनाने रंग भरले. पंडित भीमसेन जोशींच्या बहुतांशी मैफलीत ते आपल्या बहारदार हार्मोनियम वादनाने सप्तरंग भरत होते. अप्पा जळगांवकरांनी उस्ताद बडे गुलाम अली खॉं, पंडित कुमार गंधर्व, पं. वसंतराव देशपांडे, पंडित भीमसेन जोशी, जसराज, रोशनआरा बेगम, माणिक वर्मा, किशोरी आमोणकर, ओंकारनाथ ठाकूर, गंगुबाई हनगळपासून ते आताच्या पिढीतील पं. मुकुल शिवपुत्र कोमकळ्ळीमठ, राहुल देशपांडे अशा दिग्गज गायकांना अप्पांनी संवादिनीची सुरेल साथ केली होती. तसेच रोहिणी भाटे यांच्यासारख्या नृत्यांगनांनाही जळगावकर यांनी तितकीच तोलामोलाची साथ दिली. पं. कुमार गंधर्व यांचे चिरंजीव, व सुप्रसिद्ध गायक पंडित मुकुल शिवपुत्र कोमकळ्ळीमठ हे अप्पा जळगांवकरांचे जावई.
हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीबद्दल संगीत नाटक अकादमी, आय.टी.सी. संगीत रिसर्च अकादमी यांसारख्या ख्यातनाम संस्थांनी पुरस्कार देऊन अप्पा जळगांवकर यांचा यथोचित गौरव केला आहे. तसेच ‘स्वरविभूषण’ आणि ’स्वर-लय-ताल रत्न पुरस्कारा’नेही त्यांना सन्मानित करण्यात आले होते. अप्पांनी भारतात जवळ जवळ सर्व ठिकाणी आपली कला सादर केली होती, तसेच अमेरिका, युरोप, श्रीलंका, बांगला देश असे अनेक परदेश दौरेही त्यांनी केले होते. त्यांच्या हार्मोनियम वादनाच्या ध्वनिफिती, सी.डी देखील प्रकाशित झालेल्या आहेत.
अप्पा जळगावकर यांचे १६ सप्टेंबर २००९ रोजी निधन झाले.
अप्पा जळगावकर यांचे संवादिनीवादन.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट