ज्या काँक्रीटमध्ये पोलादी सळ्या वापरतात, त्याला ‘सलोह काँक्रीट’ अथवा ‘आरसीसी’ म्हणतात. काँक्रीट ठरावीक मर्यादेपर्यंतचा दाब सहन करू शकते. इमारतीसाठी वापरले जाणारे काँक्रीट दर चौरस सेंटीमीटरला साधारणपणे २०० किलोग्रॅम वजनाचा दाब सहन करू शकते, पण काँक्रीटची कांडी बनवून तिला दोन्ही टोकाकडून ताण दिला तर ती दर चौरस सेंटीमीटरला ५ किलोग्रॅमएवढ्या वजनालाही तुटू शकते. म्हणजेच काँक्रीटमध्ये दाब सहन करायची ताकद चांगली आहे, पण ताण सहन करायची ताकद नाही. म्हणून काँक्रीटमध्ये जेथे ताण पडायची शक्यता असते, तेथे पोलादी सळ्या वापरतात. पोलादात प्रचंड ताण सहन करायची क्षमता असते. इमारतीचा सांगाडा, पाया, खांब, तुळई, स्लॅब, बाल्कनी सलोह काँक्रीटचे बनविलेले असतात. यात काँक्रीटची दाब आणि ताण क्षमता वाढविण्यासाठी योग्य प्रकारे व योग्य प्रमाणात पोलादी सळ्या वापरलेल्या दिसतात. पूल, धरणे, जमिनीवरील पाण्याच्या उंच टाक्या इत्यादी बांधकामात काँक्रीटचा वापर केला जातो.
बांधकामाच्या दृष्टीने याचे अनेक फायदे आहेत: १) काँक्रीटची अंगभूत वजन सहन करण्याची क्षमता कोणत्याही मर्यादेपर्यंत वाढविता येते. २) पोलाद व काँक्रीटमधील सीमेंट यांचा मजबूत जोड होऊन दोघांची क्रिया एकसंध व बरोबरीने होते. ३) काँक्रीट व पोलाद यांचे कमी-जास्त तापमानातही प्रसरण आणि आकुंचनाचे प्रमाण सारखे झाल्याने काँक्रीटला भेगा पडत नाहीत. ४) खांब, तुळई यांचा आकार व आकारमान उपलब्ध जागेनुसार कमी-जास्त करता येते. ५) काँक्रीटवर कितीही व कोणत्याही दिशेने वजनाचा भार आला तरी त्यात कोठेही भेगा पडू नयेत म्हणून पोलादी सळ्यांचा वापर योग्य प्रमाणात व योग्य ठिकाणी करणे शक्य होते. ६) सलोह काँक्रीटमुळे अति इंच इमारती, प्रचंड मोठी धरणे, टाक्या, पूल बांधणे सुलभ होते. ७) आटोपशीर जागेतही सलोह काँक्रीटचे बांधकाम करता येते. याउलट दगडी किंवा विटांच्या भिंतींच्या बांधकामात जागा जास्त लागते. ८) भूकंपरोधक बांधकाम सलोह काँक्रीटमुळे शक्य होते.
Leave a Reply