माणसाला ना, जे मिळत नाही तेच हवं असतं, अप्रूप असतं..
सरळ केस असतील तर कुरळे छान वाटतात, जाड असेल तर बारीक लोकांचं कौतुक असतं ( दाखवलं नाही तरी ) , आणि ज्यांना भयंकर फिरायला आवडतं त्यांना कधी फारसं बाहेर पडायला होत नाही ..
यालाच जीवन ऐसे नाव !
आता संसार हा दोन चाकी रथ आहे, दोन्ही चाकं एकाच दिशेत, एकाच वेगात चालली पाहिजेत,बरोबर ना ?
पण मग जोड्या जमतात त्या मात्र एकदम विरूद्ध स्वभावधर्माच्या ! आणि असेच संसार यशस्वी होतात…
बायको खूप हौशी असेल तर नवरा जरा पडेल असतो, नवरा सोशल असेल तर बायको अतिशय मर्यादित असते, बायको बडबडी तर नवरा अबोल, नवरा भटकंती स्पेशल तर बायको घरकोंबडी , बायकोला रात्री लॉंग ड्राईव आवडतो तर नवरा टीवी पाहणं पसंत करतो, त्याला खूप मित्र तर हिला लोकांची अँलर्जी, ती उत्सव प्रिय तर त्याला अजिबात आवड नाही, फिरायला जायचं तर त्याला निवांत समुद्र किनारा आणि तिला जंगल किंवा भरपूर स्थलदर्शन आवडतं, त्याला एकदम मॉडर्न राहायला आवडतं तर ती एकदम साधी, ती अतिशय सडेतोड तर तो एकदम भिडस्त , हॉटेलमधे तिला कॉंटिनेंटल तर त्याला थाळी आवडते, ती फ्रिकाऊट तर तो एकदम शांत….
असंच असतं सहसा, नाही का ?
पण मग तरीही अशाच जोड्या अतिशय छान संसार करतात – का बरं ? म्हणतात ना, opposite poles attract –
विजोड जोड्या नाही म्हणायचं .. उलट भिन्न स्वभावधर्माच्या जोड्या असतील तर संसारात मजा आणि थोडा खमंगपणा असतो..
दोघंही जर शांत असतील तर मग घरात बोलणार कोण ? दोघंही मित्र मंडळीत रमणारे असतील तर घर बघणार कोण ? दोघंही भटके असतील तर घराला घरपण आणणार कोण ? आणि दोघंही परफेक्शनिस्ट असतील तर चुका काढणार कोण ?
आणि दोघंही समान पातळीवर असतील तर समतोल साधायला काहीच उरणार नाही..
थोडं पुढे – मागे, अधिक – उणं झाल्याशिवाय मजाच नाही ना ! सारं कसं शांत – शांत ! मग ते घर नाही, संन्याशाची मठी वाटेल.
एकमेकांना समजून घेण्यात, एकमेकांच्या आवडी-निवडी जपण्यात, आणि एकमेकांना आहे तसं स्वीकारतानाच आपले मीपण जपण्यात खरी मजा आहे – जगण्याची – नाही का ?
म्हणून तर म्हणायचं –
घर दोघांचं असतं दोघांनी सावरायचं असतं,
एकानी पसरलं तरी दुसरयानी आवरायचं असतं
— व.पु.
Leave a Reply