नवीन लेखन...

पुराभिलेख आणि नाणकशास्त्र तज्ज्ञ डॉ. शोभना गोखले

पुराभिलेख आणि नाणकशास्त्र तज्ज्ञ डॉ. शोभना गोखले यांचा जन्म २६ फेब्रुवारी १९२८ रोजी सांगली येथे झाला.

शोभना गोखले या पूर्वाश्रमीच्या कुमुद बापट. त्यांचे वडील वामनराव अमरावतीत वकिली व्यवसाय करीत होते. त्यामुळे त्यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण अमरावती येथे झाले. त्या किंग एडवर्ड कॉलेज १९५०साली मधून संस्कृत व मराठी विषयांत बी. ए. झाल्या. संस्कृतचे शिक्षण घेत असताना त्यांना प्राच्यविद्यासंशोधक वा. वि. मिराशी यांचे मार्गदर्शन मिळाले. पुढेही त्यांच्या संशोधनाला मिराशी यांनी प्रोत्साहन दिले. पदवीनंतर त्यांनी काही काळ अमरावतीच्या नूतन कन्या शाळेत अध्यापन केले. त्यांचा विवाह १९५२ साली केसरीतील उपसंपादक, पत्रकार लक्ष्मण नारायण गोखले यांच्याशी झाल्यानंतर त्या पुण्यात स्थायिक झाल्या.

विवाहानंतर पुणे विद्यापीठात प्राचीन भारतीय संस्कृती या विषयात एम. ए. करीत असताना त्यांनी भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर येथील ग्रंथालयात अर्धवेळ नोकरी केली.

त्यांना पी एच्.डी.साठी किंग एडवर्ड मेमोरिअल शिष्यवृत्ती मिळाली आणि १९६० साली ज्येष्ठ पुरातत्त्वज्ञ हसमुख धीरजलाल सांकलिया यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ‘हिस्टॉरिकल जिऑग्रफी अँड इथ्नॉग्रफी ऑफ मध्य प्रदेशʼ या विषयावर पीएच्. डी. केली. पुढील संशोधनासाठी त्यांना त्यांचे काका, बौद्ध धर्माचे जागतिक कीर्तीचे संशोधक पु. वि. बापट यांचे मार्गदर्शन लाभले. या वेळी त्यांनी कान्हेरी येथील प्राचीन अभिलेख, तेथील बौद्ध लेणी यांच्या अनुषंगाने बौद्ध धर्माचा सखोल अभ्यास केला. पुढे त्यांनी डेक्कन कॉलेज, पुणे येथील १९६० ते १९८८ या काळात पुरातत्त्व विभागात पुराभिलेखशास्त्र आणि नाणकशास्त्र या विषयाच्या प्राध्यापिका म्हणून उल्लेखनीय काम केले, तसेच पुणे येथील भारत इतिहास संशोधक मंडळ या संस्थेचे सन्मान्य अध्यक्षपद त्यांनी भूषविले.

शोभना गोखले यांनी विदर्भातील वाशिम (प्राचीन वत्सगुल्म) जवळील हिस्सेबोराळा येथे वाकाटक राजवंशातील देवसेनाच्या ब्राह्मी लिपीतील लेखाचा शोध लावून त्यामध्ये शक ३८० हा उल्लेख असल्याचे निदर्शनास आणले. त्यामुळे वाकाटककालीन इतिहासाच्या अभ्यासात या लेखाने मोलाची भर घातली. तसेच जुन्नर येथील नाणेघाटातील लेण्यामधील सातवाहन सम्राज्ञी नागनिका हिच्या ब्राह्मी लिपीतील लेखावर संशोधन करून लेखातील २८९ हा आकडा आणि त्याचे वाजपेय यज्ञातील महत्त्व अधोरेखित केले. मुंबईच्या बोरीवली या उपनगरापासून दहा किमी. अंतरावर असलेल्या कान्हेरीच्या १०४ बौद्ध गुंफांच्या समूहातील स्मशान गुंफेतील सव्वीस शिलालेखांचा त्यांनी प्रथमच शोध लावला. या शिलालेखांत गुणशाली बौद्ध भिक्षूंची नावे असल्यामुळे कान्हेरी हे बौद्ध शैक्षणिक केंद्र होते, हे सिद्ध केले (१९७३). पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील तुळईवरच्या शिलालेखाचे नव्याने वाचन करून कर्नाटकाचा होयसळ राजा सोमेश्वर याने शके ११५१ मध्ये (इ. स. सुमारे १२२९) मकरसंक्रांतीला कर्नाटकातील आसंदीनाड येथील हिरियगरज हे गाव श्री विठ्ठलाच्या रंगभोग-अंगभोगासाठी दान दिल्याचा तपशील या शिलालेखातून प्रकाशात आणला. गुजरातमधील कच्छजवळील अंधौ येथे शके ११ हा कालनिर्देश असलेल्या सर्वांत प्राचीन आणि महत्त्वाच्या शिलालेखाचा उर्वरित भाग शोधत असताना त्यांना क्षत्रपकालीन तळे, नाणी आणि खापराचे तुकडे शोधण्यात यश मिळाले. शिलालेखांच्या अभ्यासाप्रमाणे त्यांनी प्राचीन नाण्यांचेही संशोधन केले. पुण्याजवळील रांजणगाव येथे क्षत्रप राजांची १५०० नाणी शोधून त्यांचे वाचन केले, तसेच महाराष्ट्रातील आद्य राजवंश सातवाहन घराण्यातील राजांची प्रतिमायुक्त नाणी त्यांनी शोधली.

शोभना गोखले यांचे सव्वाशेहून अधिक शोधनिबंध प्रसिद्ध असून त्यांनी अनेक अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहिले. त्यांतील काही महत्त्वाचे ग्रंथ असे : इंडियन न्युमरल्स (१९६४), पुराभिलेखविद्या (१९७५), कान्हेरी इन्स्क्रिप्शन्स (१९९१), Lord of Dakshinapatha (२००९), भारताचे संस्कृती वैभव (२००९) इत्यादी. तसेच मराठी विश्वकोशातही त्यांनी लिपिशास्त्रविषयक अनेक नोंदींचे लेखन केले. ‘ललाटलेख’ या नावाने त्यांचे आत्मवृत्तही प्रसिद्ध आहे.

सातवाहनकालीन नाण्याच्या अभ्यासाबद्दल सर बिडुल्फ पारितोषिक, वाराणसी (१९८५); अध्यक्ष, अखिल भारतीय नाणकशास्त्र परिषद, धारवाड (१९८५); अध्यक्ष, जागतिक नाणकशास्त्र परिषद, भारतीय विभाग, ब्रूसेल्स, बेल्जियम (१९९१); अध्यक्ष, अखिल भारतीय पुराभिलेख परिषद, तिरुचिरापल्ली (१९९३); बन्सीलाल रामनाथ अग्रवाल ट्रस्टतर्फे आदिशक्ती पुरस्कार, पुणे (२००३), परमेश्वरीलाल गुप्ता पारितोषिक (२००८), गार्गी पुरस्कार (२००८), महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक पारितोषिक (२०१२) व संविद्या सांस्कृतिक अध्ययन संस्था, पुणे या न्यासातर्फे मानद सभासदत्व (२०१३).
त्यांना असे अनेक मानसन्मान लाभले.

शोभना गोखले यांचे २२ जून २०१३ रोजी निधन झाले.

— संजीव वेलणकर. 

९४२२३०१७३३

संदर्भ. इंटरनेट/ कल्पना रायरीकर

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..