डी. ए. पानवलकर यांच्या ‘सूर्य या कथेवर आधारित ‘अर्धसत्य’ची पटकथा विजय तेंडुलकरांनी लिहिली आणि दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांची ‘चक्रव्यूह में घुसने से पहले’ ही कविता यात थीम म्हणून वापरण्यात आली होती. वसंत देव यांनी या चित्रपटाचे संवाद लिहिले होते,व या चित्रपटाचे दिग्दर्शक होते गोविंद निहलानी.
पोलिस, राजकारणी आणि माफियांच्या चक्रव्यूहात अडकलेल्या एका कर्तव्यदक्ष पोलिस अधिका-याची कशी ससेहोलपट होते याचे वास्तव दर्शन घडवणा-या ‘अर्धसत्य’ या चित्रपटाने १९८३ मध्ये चांगलीच खळबळ माजवली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शक गोविंद निहलानी यांच्या ‘अर्धसत्य’ या सिनेमाला तेव्हा समीक्षकांच्या कौतुकासह व्यावसायिक यशही मिळाले होते.
ओम पुरी, अमरीश पुरी, स्मिता पाटील, नसिरुद्दीन शाह, सदाशिव अमरापूरकर, शफी इनामदार यांच्या त्यात मुख्य भूमिका होत्या. उत्तम अभिनय आणि कसदार दिग्दर्शन या ‘अर्धसत्य’च्या जमेच्या बाजू. विवेकबुद्धीने काम करू इच्छिणा-या पोलिस अधिका-याची मुख्य भूमिका ओम पुरी यांनी रंगवली होती. माफिया रामा शेट्टीचा खून करून अनंत वेलणकर (ओम पुरी) हा पोलिस अधिकारी तुरुंगात जातो असा पहिल्या चित्रपटाचा शेवट होता.
पोलिस दलाच्या कार्यपद्धतीवर बेतलेला भारतातील सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सिनेमाच्या इतिहासातील मैलाचा दगड म्हणून ‘अर्धसत्य’ ओळखला जातो. या चित्रपटाला त्या वेळी अनेक पुरस्कारही मिळाले होते.
दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांच्या ‘चक्रव्यूह में घुसने से पहले’ या कवितेची शेवटची ओळ अशी होती ‘एक पलड़े में नपुंसकता, एक पलड़े में पौरुष और ठीक तराजू के काँटे पर अर्ध सत्य’.
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply