” गहरी चाल ” अशा आकर्षक नावाच्या चित्रपटाने फसवणूक झालेला मी रिकाम्या हातांनी बाहेर पडल्यामुळे चिडलो होतो पण भुसावळच्या वसंत टॉकीज मध्ये “जंजीर” पाहताना दचकून ताठ बसलो – ” ये पुलिस स्टेशन हैं, तुम्हारे बाप का घर नहीं ! ” पडद्यावर प्राणही तितकाच दचकला असावा. आणि आज तो /जया सोडले तर त्या अंगारांचे साक्षीदार (प्राण, इफ्तेकार, ओम प्रकाश, अजीत, प्रकाश मेहरा) निघून गेले आहेत.
गेली पन्नास वर्षे आमचा वादा आहे- त्याने चित्रपट गृहापर्यंत यायचे -तोहफे घेऊन, मी चित्रपट गृहापर्यंत जायचे उत्सुकता घेऊन आणि पुढील दोन-तीन तास आमची पडद्यावर अंधारी भेट !
सहज त्याच्या चित्रपटांची यादी गूगल केली आणि माझा स्ट्राईक रेट ९० च्या पुढे आहे हे नव्याने कळले- फार्फार तर त्याचे ७-८ चित्रपट मी पाहिलेले नाहीत. पण काही चित्रपट अगणित वेळा पाहिले आहेत.
लताचा आवाज ऐकला, सचिनची खेळी पाहिली पण माझ्या या तिसऱ्या रोल मॉडेल ला ऐकलंही आणि पडद्यावर पाहिलेही ! तो माझ्या इवल्याशा डोळ्यांत मावतो, पण पडद्याचे ३५ एम एम ५५ करा की ७०, तो पडदा फाडून बाहेर येतो. सोलापूरला मीना टॉकीज मध्ये “शोले” साठी पडद्याला दोन्ही बाजूंनी पांढरा जोड दिला होता पण हा त्या स्टिचेस मध्येही मावला नव्हता. त्याचा खर्ज घुमत असतो भिंतींवर,कानांवर,मनांवर !
त्याच्यासाठी कित्येक गावांच्या कित्येक टॉकीज ची वाट मी धरलीय. अगदी मधुचंद्रासाठी गोव्याला गेलो असताना,त्या आठ दिवसांमध्ये जोडीने ” शोले ” आणि “मि. नटवरलाल” पाहण्याचा अगोचरपणाही केलाय.
त्याने मला खूपदा चकीत केलंय -दरवेळी पोतडीतून काहीतरी नवं काढून. “ब्लॅक”, ” पा “, ” दोन सरकार राज ! ” पुस्तकांइतकेच त्याच्या चेहेऱ्याकडून मी शिकलोय. आणि आजकाल तर तो फक्त डोळ्यांनीच बोलतो.
आज आमचं त्रिकुट मस्त पन्नाशीत प्रवेश करतंय.
एवढीच इच्छा आहे – त्याने एखादे नाटक करावे म्हणजे त्याला जवळून निरखता येईल. आणि हो, जमलंच तर एखाद्या मऱ्हाटी सिनेमात पूर्ण लांबीची भूमिका करावी. तसा तो विक्रम बरोबर “ABआणि CD ” मध्ये दोन मिनिटे जरूर येऊन गेला, पण “दिल अभी भरा नहीं ”
इतकंच (स्वार्थी) मागणं – या सहस्त्र दर्शनाच्या प्रसंगी !
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply