“मी आयुर्वेद खूप फॉलो करते. युट्युबवर एका व्हिडिओत सांगितलं होतं आयुर्वेदानुसार तांब्याच्या भांड्यातून पाणी पिणं हे बेस्ट असतं. मग त्यात सांगितल्याप्रमाणे रात्री उकळलेलं पाणी तांब्याच्या भांड्यात भरून रोज सकाळी ते अनोश्या पोटी मी घेते. खूप मस्त वाटतं.” एक IT क्षेत्रातली रुग्णा तिचे ‘आयुर्वेदप्रेम’ मला पटवून देण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती. तांब्याच्या भांड्यात रात्रभर ठेवलेलं पाणी सर्वोत्तम असा संदर्भ आयुर्वेदात नेमका कुठे आलाय बरं? साहजिकच मला हा प्रश्न सतावू लागला आणि मग याविषयी संदर्भ काढायला सुरुवात केली. याबाबत काही ज्येष्ठ वैद्यांशीही चर्चा केली. या सगळ्या प्रक्रियेचा सारांश इथे देत आहे.
भावप्रकाश आणि योगरत्नाकर या दोन्ही ग्रंथांत पाणी पिण्यास तांब्याचे भांडे सर्वोत्तम अशा प्रकारचा प्रकारचा संदर्भ आला आहे. मात्र दोन्हीकडे शब्दशः एकच सूत्र वापरले गेले असून ही बाब बुचकळ्यात टाकणारी आहे. साधारणपणे दोन वेगळ्या ग्रंथांत असे शब्दन् शब्द समान असणारे सूत्र आले असले की ते एक तर एका ग्रंथातून दुसरीकडे घेतलेले किंवा दोन्ही ग्रंथांत प्रक्षिप्त केलेले म्हणजे मागाहून कोणीतरी टाकलेले असते असे हस्तलिखित शास्त्रातील तज्ज्ञांचे मत आहे. शिवाय या ग्रंथामध्येच अन्य काही संदर्भ पाहता; तांबे हा विषारी धातू आहे; आयुर्वेदात सांगितलेल्या पद्धतीने शुद्ध केल्याशिवाय त्याचा औषधांत वापर करू नये असे संदर्भही सापडतात. हीच प्रक्रिया ताम्रभस्म बनवतानादेखील वापरली जाते. ही पार्श्वभूमी लक्षात घेता तांब्याचे पात्र पाणी पिण्यास सर्वोत्तम असे विधान धाडसीपणचे ठरेल. आयुर्वेदातील प्रमुख ग्रंथ असलेल्या सुश्रुतसंहितेत भोजनासाठी कोणता पदार्थ कोणत्या पात्रात वाढावा याचे वर्णन आले आहे. त्यात पाणी हे मातीच्या किंवा काचेचा पात्रातून द्यावे असे आचार्य सुश्रुत सांगतात. आयुर्वेद महोदधी नामक अन्य एका ग्रंथात तांब्याच्या भांड्यातील पाणी हे वात- पित्त वाढवणारे आणि मलमूत्र यांना अवरोध निर्माण करणारे आहे असा संदर्भ मिळतो. त्यातील विविध पात्रांचे गुणधर्म पाहता सोने, चांदी, माती व काच यांतून पाणी पिणे श्रेयस्कर असल्याचे संदर्भ मिळतात. नेमके असेच मत क्षेमकुतूहल, भोजनकुतूहल यांसारख्या आहारशास्त्राच्या ग्रंथांतही आढळते.
असे असताना केवळ एखादा ग्रंथ वाचून थेट ‘सर्वांकरता सर्वकाळ तांब्याचेच पात्र पाणी पिण्यास सर्वोत्तम’ असा निष्कर्ष कोणीतरी काढून तो आयुर्वेदाच्या नावे खपवणे हे अयोग्य वाटते. शिवाय रात्रीला पाणी उकळून ते रात्रभर ठेवून सकाळी पिणे ही पद्धतही आयुर्वेदाला मान्य होणारी नाही. अशा पाण्याला आयुर्वेदाने ‘पर्युषित’ म्हणजे शिळे पाणी म्हटले असून ते तिन्ही दोष प्रकोपित करते असे आयुर्वेदाचे मत आहे.
सकाळच्या वेळी इतक्या अधिक मात्रेत पाणी पिणेदेखील आयुर्वेदाला अपेक्षित नाही. थोड्क्यात रात्रीला उकळून ठेवलेले पाणी सकाळी प्यावे हे मत आयुर्वेदाचे निश्चितपणे नाही. मग तांब्याच्या भांड्यातून पाणी पिवूच नये का? तर तसेही नाही. त्यात तारतम्य हवे. म्हणजे ज्या व्यक्ती स्थूल आहेत, सतत बैठं काम करतात, फारसा शारीरिक व्यायाम नाही, पचनक्षमता फार चांगली नाही तसेच ज्यांची कफ प्रकृती आहे अशा व्यक्तींनी नियमितपणे तांब्याच्या पात्रातून पाणी पिण्यास हरकत नाही. मात्र हे पात्र दररोज घासून स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. अन्यथा त्यात विषार तयार होतात हे नक्की; कित्येकदा तर पाणीदेखील कळकते. शिवाय हे पाणी रात्रभर ठेवून सकाळी पिणे ही पद्धत मुळीच अवलंबू नये.
वरील मापदंडात ज्या व्यक्ती बसत नाहीत त्यांनी मात्र तांब्याच्या पात्राचा वापर टाळणे इष्ट. इतरांनी शक्य असल्यास चांदीच्या पात्रांचा वापर करावा; विशेषतः वृद्ध आणि बालके यांना हा धातू अधिक लाभदायक आहे. ज्यांना चांदी परवडत नाही अशा व्यक्तींनी काच किंवा मातीची भांडी वापरावीत. गावाकडे कित्येक ठिकाणी आजही मातीच्याच पात्रांचा जेवण बनवण्यासही उपयोग होतो. त्यातील जेवणाचा स्वाद तो वर्णावा? मातीच्या कुल्हडमधला चहा आठवून बघा; मी काय म्हणतोय ते सहज लक्षात येईल. त्यामुळे यापुढे ‘तांब्याच्या भांड्यात उकळलेले पाणी रात्रभर ठेवून ते सकाळी प्यावे असे आयुर्वेद सांगतो’ या अपसमजाला तिलांजली द्या!
— वैद्य परीक्षित शेवडे
Leave a Reply