इतिहासाचा शोध घेताना त्यासंबंधीच्या प्रत्येक वस्तूला महत्त्व द्यावं लागतं. कारण, ती वस्तू म्हणजे भूतकाळ आणि भविष्यकाळ यांना जोडणारा दुवा असते. एका संशोधकाला, चोवीस शतकांपूर्वीच्या इतिहासाशी नातं सांगणारा एक दुवा सापडला आहे. हा दुवा म्हणजे चक्क एक थडगं आहे. पण हे थडगं सामान्य व्यक्तीचं नाही. हे थडगं आहे ते पुरातन काळच्या ग्रीक साम्राज्यातल्या ॲथेन्सचा प्रख्यात तत्त्वज्ञ ॲरिस्टोटल याचं! ॲरिस्टोटल म्हणजे प्लॅटोचा शिष्य. तर मॅसिडॉनिआचा राजा असणाऱ्या सम्राट अलेक्झांडरचा गुरू. सुमारे अठरा शतकं याच ॲरिस्टोटलचे शब्द हे विज्ञानातलं अंतिम सत्य मानलं गेलं होतं. याच ॲरिस्टोटलचं थडगं सापडल्याचा दावा आता एका ग्रीक संशोधकांनं केला आहे.
ॲरिस्टोटलचं थडगं शोधून काढल्याचा दावा करणाऱ्या संशोधकाचं नाव आहे कॉन्स्टॅन्टिनॉस सिसमॅनिडीस आणि हे थडगं सापडलं आहे ते स्टॅगिरा या पुरातन ग्रीक शहरात. ॲरिस्टोटलचा जन्म याच शहरात झाला होता आणि आपल्या आयुष्याचा मोठा काळही ॲरिस्टोटलनं याच शहरात व्यतीत केला. ॲरिस्टोटलच्या थडग्याची जागा म्हणजे एक छोटीशी इमारत असून या इमारतीची जमीन संगमरवरी आहे. या इमारतीत एक चौथरा आहे. या इमारतीला लागूनच एक मोठी अर्धवर्तुळाकार इमारतही आहे. कदाचित, ही मोठी इमारत त्या काळी लोक कार्यक्रमांसाठी सभागृह म्हणून वापरत असावेत.
ॲरिस्टोटलचा मृत्यू हा इ.स.पूर्व ३२२ साली योबोइआ या बेटावर झाल्याच्या नोंदी आढळतात. टॉलेमी या ग्रीक घराण्यातील एका इतिहासकाराच्या लिखाणाच्या अरबी प्रतीत, ॲरिस्टोटलचा मृत्यू जरी योबोइआ बेटावर झाला असला, तरी त्याची रक्षा मात्र स्टॅगिरा शहरात आणून ती मुद्दाम बांधलेल्या एका इमारतीत सन्मानानं पुरल्याचा उल्लेख आढळतो.
कॉन्स्टॅन्टिनॉस सिसमॅनिडीसनं गेली वीस वर्षं केलेल्या इथल्या उत्खननावरूनच, याच जागी ॲरिस्टोटलची रक्षा पुरली असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. मात्र, त्याचा हा दावा परिस्थितीजन्य पुराव्यावर आधारलेला आहे. कारण, या इमारतीवर या संदर्भातील निश्चित स्वरूपाची कसलीही कोरलेली नोंद आढळलेली नाही वा इथं त्याला ॲरिस्टोटलशी संबंध दर्शवणारे कोणतेही मानवी अवशेष सापडले नाहीत.
अनेक इतिहाससंशोधक कॉन्स्टॅन्टिनॉस सिसमॅनिडीसनं केलेल्या दाव्याबद्दल अतिशय साशंक आहेत. याचं कारण म्हणजे खुद्द अलेक्झांडरच्या थडग्याबद्दल झालेला वाद. इ.स. २०१४ साली ॲम्फिपोलिस इथं अलेक्झांडरचं थडगं सापडल्याचा दावा केला गेला होता. परतु, ते थडगं हेफेस्टिअन या अलेक्झांडरच्याच सैन्यात उच्चपदावर अधिकारी असणाऱ्या अलेक्झांडरच्या मित्राचं असल्याचं स्पष्ट झालं. या उदाहरणामुळं जोपर्यंत ॲरिस्टोटलच्या या थडग्यात काही लिखित पुरावा किंवा मानवी अवशेष सापडत नाही, तोपर्यंत सिसमॅनिडीसचा दावा स्वीकारता येणार नाही, असं आर. अँगस स्मिथ या कॅनडातील ऑन्टोरिओ विद्यापीठात पुरातत्त्व विभागात प्राध्यापक असणाऱ्या संशोधकाला वाटतं. इतकंच काय, ॲरिस्टोटलच्या चोवीसशेव्या जयंतीच्या वेळीच हा दावा केलं जाणं, हा मुद्दाम जुळवून आणलेला योगायोग तर नाही ना, अशी शंकाही एका संशोधिकेकडून व्यक्त केली गेली आहे.
परंतु सिसमॅनिडीसला काही समर्थकही लाभले आहेत. टॉलेमीच्या लिखाणानुसार ॲरिस्टोटलच्या थडग्याच्या बाजूची मोठी इमारत मोठ्या कार्यक्रमांसाठी वापरली जायची. या इमारतीच्या बांधकामाचा खर्च मॅसिडोनिआच्या राजघराण्यातून केला गेला असावा. स्टॅगिरा शहरातल्या कार्यक्रमांसाठी ही एक महत्त्वाची जागा झाली होती. आता सापडलेल्या इमारतीच्या छताच्या फरश्यांवर कोरलेली अक्षरं ही, या फरश्या पेल्ला या मॅसिडोनिआच्या राजधानीतील राजघराण्याच्या कार्यशाळेत घडवल्या असल्याची साक्ष देतात. सिसमॅनिडीसनं ॲरिस्टोटलच्या थडग्याबाबतचा दावा करताना याच गोष्टीचा आधार घेतला आहे. ॲरिस्टोटलच्या तथाकथित थडग्यालगत सापडलेली अर्धवर्तुळाकार इमारत ही, कार्यक्रमांसाठी वापरली जाणारी तीच इमारत असण्याची शक्यता एलिझाबेथ कॉस्मेटेटॉव या अमेरिकेतील इलिनॉय विद्यापीठातील प्राध्यापिकेनं व्यक्त केली आहे. एलिझाबेथ कॉस्मेटॅटॉव पुढं म्हणते की, ‘टॉलेमीचं लिखाण फक्त अरबी भाषेतच उपलब्ध आहे, याचा अर्थ असा नाही की ते चुकीचंच असावं!’
ॲरिस्टोटलचं थडगं शोधल्याचा दावा करणारा सिसमॅनिडीस हा काही पहिलाच तज्ज्ञ नाही. याअगोदर सव्वाशे वर्षांपूर्वी म्हणजे १८९१-९२ साली चार्ल्स वाल्डस्टाइन यानंही ॲरिस्टोटलचंच थडगं सापडल्याचा दावा केला होता. हे थडगं इरेट्रिआ या शहरात सापडलं होतं. खरं तर, या थडग्याची जागा ॲरिस्टोटलच्या मृत्यूच्या ठिकाणाहून खूपच जवळ होती. त्या थडग्यावर ‘बायोट, ॲरिस्टोटलची कन्या’ असा उल्लेखही होता. परंतु, इतिहासकारांनी तो पुरावा ग्राह्य धरला नाही.
एकूणच काय, तर कॉन्स्टॅन्टिनॉस सिसमॅनिडीसला सापडलेलं थडगं हे ॲरिस्टोटलचंच आहे हे वादातीतपणे सिद्ध झालेलं नाही. खुद्द ग्रीक सांस्कृतिक खात्यानं या शोधाबद्दल आनंद व्यक्त केला असला, तरी यासाठी सबळ पुराव्याचीही अपेक्षा केली आहे. आणि खरोखरच जर हे ॲरिस्टोटलचं थडगं असलं, तर हा शोध इतिहासाचा मागोवा घेण्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. आणि म्हणूनच अशा शोधास समर्थन देणारा पुरावाही तितकाच भक्कम असावयास हवा. कारण, अलेक्झांडरच्या थडग्याच्या बाबतीत जो गोंधळ निर्माण झाला होता, त्याची पुनरावृत्ती टाळणं हे गरजेचं आहे.
-छायाचित्र सौजन्य : Dimitris Siskopoulos / Wikimedia
(मूळ प्रसिद्धीः मराठी विज्ञान परिषद पत्रिका – सप्टेंबर २०१६)
Leave a Reply