अब्दुल अझीझ रायबा यांचा जन्म २० जुलै १९२२ रोजी मुबंईत टेमकर स्ट्रीट मुबई सेंट्रल येथे झाला. तो विभागात कोकणी मुसलमानाची वस्ती म्हणून ओळखला जायचा. त्यांची भाषा मराठीच असायची. रायबा यांचे वडील टेलरींगचे काम करायचे , त्यांनी आपले शिक्षण गुजराथी माध्यम असलेल्या शाळेतून केले आणि त्या शाळेत प्रथम भाषा होती मराठी. त्यानंतर त्यांनी अंजुमन-ए -इस्लाम शाळेत जायला सुरवात केली. ते उत्तम उर्दू बोलत असत. त्यामुळे त्यांच्या शिक्षकांनी त्यांना सांगितले तू लेखक हो. त्यांनी लिहिण्यास सुरवात केली आणि त्यांनी मुहंमद इकबाल यांच्या साहित्याचे भाषांतर इंग्रजीमध्ये सुरु करायला सुरवात केली. रायबा अरेबिक कॅलिग्राफी शिकले , त्यांच्या शिक्षकानी त्यांची कॅलिग्राफी पाहिली आणि सांगितले तू तुझ्या हुशारीचा योग्य वापर कर. रायबा यांनी सुरवातीला दंडवतीमठ यांच्याकडे शिक्षण घेतले.
रायबा यांनी १९४२ ते १९४६ या काळात जे.जे. स्कुल ऑफ आर्टमध्ये शिकतानाच स्वतंत्र विचारांनी आणि वेगळ्या पद्धतीने काम करण्यास सुरवात केली. चित्र काढताना आपल्या चित्रात भारतीय अस्सलपणा कसा राहील हा विचार त्यांच्यावर त्यांचे शिक्षक जगन्नाथ अहिवासी यांनी मनात भरला , आणि तो विचार त्यांच्या मनात कायमचा ठसला.
लग्नानंतर काम करणे गरजेचे असल्यामुळे त्यांना एम. एफ. हुसेन यांनी सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक के. असिफ यांच्याकडे नेले ते त्यांच्या स्टुडिओमध्ये आर्ट डायरेक्टर म्ह्णून काम करू लागले परंतु ते ग्लॅमरच्या क्षेत्रात रमले नाहीत. मग हुसेन यांनी आणि त्यांनी मुबंईला लॅमिंग्टन रोडला एक घरी फर्निचर डिझाईनचे काम केले. तेथेच प्रोग्रेसिव्ह आर्टस्मध्ये येण्याचे आरा आणि हुसेन यांनी निमंत्रण दिले. रायबा काही काळ प्रोग्रेसिव्ह मध्ये होते त्यांच्या १९५३ साली झालेल्या प्रदर्शनात त्यांची चित्रेही होती परंतु त्यांच्यात काही वैचारिक मतभेद झाल्यामुळे ते प्रोग्रेसिव्ह ग्रुपमधून वेगळे झाले.परंतु त्या आधीपासूनच त्यांची चित्रे ‘ इलस्ट्रेड वीकली ‘ मधून छापून यायची.
रायबा यांना १९४७ आणि १९५१ साली बॉंबे आर्ट सोसायटीचे रौप्य पदक आणि १९५६ मध्ये बॉंबे आर्ट सोसायटीचे सुवर्णपदक मिळाले. १९६२ मध्ये देशातील १० निवडक चित्रकारातील एक चित्रकार म्ह्णून दिल्ली येथील ‘ ललित कला अकादमी ‘ तर्फे त्यांचा सन्मान करण्यात आला. देशाच्या विविध भागांत जाऊन आपल्या चित्रनिर्मितीला पोषक ठरेल से निरीक्षण आणि अभ्यास करीत त्या भटकंतीच्या वेळी ते चित्रे काढत , चित्रे रंगवत .
रायबा यांची जुन्या मुबईचे चित्रण असलेली चित्रमालिका खूप लोकप्रिय झाली. त्यांनी कॅनवासच्या ऐवजी ज्यूट म्हणजे पोत्याचा वापर केला. त्यांनी काहीसे भडक रंग वापरून ती चित्रे रंगवली होती. त्यातून मुबईचे बहुरंगी स्वरूप प्रकट होत असे. ज्यूट आणि कॅनव्हासवर चित्रे काढता काढता त्यांनी म्युरल्स म्हणजे काचेवरील चित्रे काढायला सुरवात केली. त्यांची अनेक म्युरल्स एअर इंडिया , सिडनी विमातळावर , अशा अनेक ठिकाणी आहेत . इजिप्तच्या म्युझियममध्ये रायबांची चित्रे जशी पाहायला मिळतात तशी ती नवी दिल्लीच्या राष्ट्रीय आधुनिक संग्रहालयात आणि महाराष्ट्रात नागपूर येथेही आहेत.
रायबा यांची मुंबई आणि अनेक ठिकाणी प्रदर्शने झाली आहेत. रोम येथील बिनाले , यू .ए .ई ., रशिया , पॅरिस , रिओ दि जानेरो आणि आफ्रिका , नैरोबी येथे प्रदर्शने झालेली आहेत.
रायबाची चित्रे आणि म्युरल्स मुबंईला जहांगीर आर्ट गॅलरी येथे पहिली होती परंतु त्यांची भेट झाली नाही कारण वृद्धपकाळामुळे ते तेथे येऊ शकले नव्हते म्हणून त्यांना पत्र लिहिले त्याचे उत्तर म्हणून त्यांनी स्वाक्षरी केलेला फोटो आणि त्यांच्या माहितीचा कागद स्वाक्षरी करून पाठवला होता. महाराष्ट्र शासनाने त्यांचा ‘ महाराष्ट्र गौरव पुरस्कार ‘ देऊन त्यांचा सन्मान केला होता.
आज रायबा किती जणांना ठाऊक आहेत कुणास ठाऊक कारण सतत काम करत रहाणे हा त्यांचा स्वभाव होता. त्यांनी कधी स्वतःचे स्तोम माजवले नाही.
अशा भारतातील श्रेष्ठ चित्रकार रायबा यांचे १५ एप्रिल २०१६ रोजी ९३ व्या वर्षी मुबई येथे निधन झाले .
— सतीश चाफेकर
Leave a Reply