MENU
नवीन लेखन...

मराठीतील रुबाबदार नायक अरुण सरनाईक

हिंदी चित्रपटसृष्टी प्रमाणे आपल्याकडे रुबाबदार नायक अपवादानेच उदयास आले, असा टीकेचा सूरही आळविला जातो. त्यांचा जन्म ४ ऑक्टोबर १९३५ रोजी झाला. या टीकेवर उत्तर म्हणजे अरुण शंकरराव सरनाईक हे नाव. एका परिपूर्ण अभिनेत्याकडे ज्या काही गोष्टी लागतात, त्या सर्वांचा अंतर्भाव सरनाईक यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये पाहायला मिळाला होता.

अरुण सरनाईक यांचे वडील शंकरराव सरनाईक हे संगीतज्ज्ञ होते तर त्याचे काका निवृत्तीबुवा सरनाईक हे प्रख्यात शास्त्रीय गायक. गाण्याचं हे अंग त्यांना या जोडीकडूनच मिळालं. त्यामुळे अभिनयात नावारूपास येण्यापूर्वीच त्यांनी पेटी, तबल्यात मातब्बरी मिळवली होती. मो. ग. रांगणेकर हे “भटाला दिली ओसरी’ हे नाटक बसवीत होते. या नाटकात अरुणनं काम केलं. याच वेळी एक उत्कृष्ट संधी अरुणपुढे चालून आली. विख्यात दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्या डोक्याात “शाहीर प्रभाकर’ हा चित्रपट करण्याचं घोळत होतं. यातील शीर्षक व्यक्तिरेखा अरुण सरनाईक यांनी साकारावी, असं त्यांच्या मनात होतं. परंतु, हा चित्रपट काही कारणांमुळे बनला नाही आणि अरुण सरनाईक यांचे चित्रपटसृष्टीतील पदार्पण काही काळ लांबलं.

प्रख्यात लेखक-दिग्दर्शक अनंत माने यांनी “शाहीर परशुराम’ चित्रपटात अरुण सरनाईक यांना एक दुय्यम भूमिका दिली. “रंगल्या रात्री अशा’ या चित्रपटानं किमया केली आणि अरुण सरनाईक यांचा अरुणोदय झाला. या चित्रपटानं सरनाईकांना मोठा “फॅन फॉलोअर’ मिळाला. आजच्या पिढीला कदाचित अरुण सरनाईक हे नाव तेवढे अवगत नसेल पण ७०-८० च्या दशकात अरुण सरनाईक हे मराठीतील सुपरस्टार होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे त्यांचे या काळातले मोठे चाहते ठरले. या चित्रपटासाठी प्रख्यात तबलावादक उस्ताद अल्लारखॉं यांनी तबलावादन केलं होतं. प्रत्यक्ष चित्रपटात तबल्यावरील सरनाईकांची सफाई पाहून अल्लारखॉंनी त्यांचं कौतुक केलं होतं. त्यापुढं जात शिवसेनाप्रमुखांनी या कलावंताचा भविष्यकाळ उज्ज्वल असल्याचं भाकीत केलं आणि नंतर ते खरं ठरलं. बुलंद आवाज, अभिनय आणि संवादफेकीच्या जोरावर हा कलावंत बघताबघता इतरांच्या पुढं गेला.

त्या काळातला चित्रपट हा ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही प्रकारच्या कथानकांच्या उंबरठ्यावर होता. सरनाईकांनी या दोन्ही प्रकारांमध्ये मातब्बरी मिळवली. सुरुवातीच्या काळातच त्यांनी भूमिकांची प्रयोगशीलता जपली. राजा ठाकूर दिग्दर्शित “पाहू रे किती वाट’ या चित्रपटात ते डॉ. चारुदत्त या नायकाच्या व्यक्तिरेखेत झलकले तर “सुभद्राहरण’ या चित्रपटात त्यांनी थेट दुर्योधनाचा खलनायक साकारला. सरनाईकांची कारकीर्द उंचावली जाण्यास कारणीभूत ठरलेले चित्रपट म्हणजे “एक गाव बारा भानगडी’, “केला इशारा जाता जाता’, “सवाल माझा ऐका’, “सिंहासन’ आदी चित्रपट. “सवाल माझा ऐका’मधील त्यांचा ढोलकीवाला जयवंत आजही रसिकांच्या लक्षात आहे. असाच ढोलकीवाला त्यांनी “केला इशारा जाता जाता’ या चित्रपटातही साकारला होता.

“पाच नाजूक बोटे’ या चित्रपटात सरनाईकांनी सज्जन आणि दुर्जन भावांची दुहेरी भूमिका मोठ्या ताकदीनं सादर केली. “मुंबईचा जावई’मधील सरनाईकांचा नाट्यवेडा अविनाश लक्षणीय ठरला. डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित “सिंहासन’ मधील मुख्यमंत्र्याच्या व्यक्तिमत्त्वासाठी आवश्यनक असलेले भावदर्शन सरनाईकांनी या व्यक्तिरेखेत एकवटले होते. सरनाईकांमधील संगीताचा आविष्कार पडद्यावर आणण्यास कारणीभूत ठरले ते संगीतकार राम कदम. “डोंगरची मैना’ आणि “गणगौळण’ या दोन चित्रपटात कदम यांनी सरनाईकांना पार्श्वेगायनाची संधी दिली. “घरकुल’ या चित्रपटासाठी सी. रामचंद्र यांनी त्यांच्याकडून “पप्पा सांगा कुणाचे’ हे अजरामर गीत गाऊन घेतलं. त्यानंतर काही वर्षांनी आलेल्या “चंदनाची चोळी अंग अंग जाळी’ या चित्रपटामधील “एक लाजरा न साजरा मुखडा चंद्रावाणी फुलला गं…’ हे गाणंही सरनाईकांमधील श्रेष्ठ गायकावर शिक्कामोर्तब करणारं ठरलं. चित्रीकरणातून वेळ मिळाला की कुष्ठरुग्णांसाठी काम करणाऱ्या “आनंदग्राम’मध्ये ते स्वतःला झोकून द्यायचे. अरुण सरनाईक यांचे २१ जून १९८४ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ :- मंदार जोशी / इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..