सार्या बातम्या सांगताहेत की ‘दिल्लीला संपूर्ण स्टेटहुड मिळावें’ म्हणून अरविंद केजरीवाल १ मार्चपासून बेमुदत, प्राणांतिक उपोषण करणार आहे. Wow !
• ( पुढे जाण्यांपूर्वी अरविंद केजरीवाल याच्या एकेरी उल्लेखाबद्दल सांगणें आवश्यक आहे. कारण तसा उल्लेख त्याचा अधिक्षेप करण्यांसाठी नाहीं. माझी व अरविंद केजरीवाल याची व्यक्तिगत ओळखही नाहीं, आणि कुठल्याही क्षेत्रात मी त्याचा विरोधी म्हणुन उभा नाहीं.
मात्र, माझें व केजरीवालचें alma mater एकच आहे (The same) , आणि तो मला चौदाएक वर्षें ज्यूनियर आहे. त्यामुळे, त्याचा एकेरी उल्लेख करणें मला सयुक्तिक वाटतें, गैर वाटत नाहीं. ).
केजरीवाल –
• ‘दिल्ली स्टेटहुडसाठी आमरण उपवास’ या विषयाबद्दल, आपल्याला केजरीवाल याच्या हल्लीच्या बॅकग्राउंडकडे पहाणें आवश्यक आहे.
• अरविंद केजरीवाल हा एक चळचळ्या गृहस्थ आहे. इथें चळवळ्या म्हणजे ‘चळवळी करणारा’ असा अर्थ अभिप्रेत आहे.
• केजरीवाल याला २००६ मध्ये मॅगसेसे अवॉर्ड मिळालें हें खरें. पण आपल्याला तेंव्हांची नाहीं, तर गेल्या कांहीं वर्षांची, परिस्थिती पहायची आहे. थोडक्यात सांगायचें तर, २००६ चा केजरीवाल आणि २०१६ नंतरचा केजरीवाल या दोघांमध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे.
• केजरीवाल हा खरें तर एका NGO चा संस्थापक. ( आजही तो ती NGO चालवत असेल). त्यानें स्वत:ला आण्णा हजारेंच्या चळवळीशी जोडून घेतलें. त्यानंतर कांहीं काळानें त्यानें राजकारणात येण्याचें ठरवलें. कां , तर, त्याला चालूं राजकारणापेक्षा वेगळें, क्लीन राजकारण करायचें होतें. त्यामुळे, बरेच इंटलेक्चुअल्स् त्यानें सुरूं केलेल्या ‘आम आदमी पार्टी’शी जोडले गेले, बर्याच अपेक्षा ठेवून. (त्यांतला एक मी नव्हे ; कारण मला मतें असली तरी मूलत: मी apolitical आहे) .
अर्थातच, इंटलेक्चुअल्स्.च्या त्या अपेक्षा फलद्रूप झाल्या नाहींत, हें नंतर दिसून आलेच !
• दिल्लीच्या इलेक्शनमध्ये त्याच्या पार्टीचे कांहीं MLA निवडून आले. नंतर पुन्हां झालेल्या निवडणुकीत त्याच्या पार्टीला फाऽर मोठें बहुमत मिळालें. तो CM बनला.
केजरीवाल : CM अणि पार्टीचा प्रमुख –
• खरें तर, आपल्या पार्टीला एवढेंऽ मोठें थोरलें बहुमत मिळेल आणि आपण CM बनूं , असें केजरीवाल याला स्वप्नातही अपेक्षित नसणार. त्यामुळे, झालें काय की, तो मुख्यमंत्री बनला खरा, पण त्याचा ‘चळवळी करण्यांचा Role’ तो आजही विसरूं शकलेला नाहीं. म्हणूनच, तो साऽरखा चळवळी करतच रहातो.
• माझें असें मत आहे की, एवढें मोठें बहुमत मिळून एकदम CM बनण्यांपेक्षा, जर केजरीवाल विरोधी पक्षात बसला असता , ( किंवा, at best, विरोधी पक्षनेता बनला असता ) , तर तें अधिक चांगलें झालें असतें, कारण त्यामुळें त्याला राजकारणाचा अनुभव मिळून तो अधिक परिकक्व झाला असता. पण तसें घडलें नाहीं. ( हें कोणाचें दुर्दैव म्हणावें ? )
• राजकारणात आल्यानंतर आणि महत्वाच्या पदावर आसीन झाल्यानंतरही केजरीवालनें चळवळी सोडल्या नाहींत. मग तें इंडिया गेट जवळ भर-रस्त्यावर रात्रभर ठिय्या देणें असो, किंवा लेफ्टनंट-गव्हर्नरच्या वेटिंग रूम मध्ये चारदोन दिवस ठाण मांडून बसणें असो, किंवा आत्तांची ही आमरण उपोषणाची घोषणा असो. (त्यामुळे, हेंच कां तें त्याला अभिप्रेत ‘वेगळ्या प्रकारचें राजकारण’ , असा प्रश्न साहजिकच मनात उठतो).
• नंतर असें दिसतें की, केजरीवाल याच्या महत्वाकांक्षा वाढायला लागल्या. अर्थात् , त्यात गैर कांहींच नाहीं. मात्र, त्यामुळे, विविध बाबतीत तो जसा वागला आणि वागतोहे, तें काळजीचें कारण आहे.
• ‘आम आदमी पार्टी’च्या संदर्भात त्याची डिक्टेटोरियल वृत्ती स्पष्ट दिसून आली. प्रशांत भूषण व योगेंद्र यादव या आपल्या ज्येष्ठ सहकार्यांना त्यानें कशा अपमानास्पद रीतीनें ‘लाथेनें’ पक्षाबाहेर घालवलें, तें सर्वांनीच पाहिलें आहे. (मी अमक्यातमक्याच्या बाजूचा आहे असा गैरसमज हा उल्लेख वाचून कोणांचा होण्यांची शक्यता आहे. पण तसें अजिबात नाहीं. मला त्या दोघांच्या कांहीं गोष्टी अजिबात पटत नाहींत. मात्र, त्यांची केजरीवालनें जशी हकालपट्टी केली, त्याबद्दल त्रयस्थपणें मत नोंदवणे मला आवश्यक वाटतें, एवढेंच).
• ज्या इंटलेक्चुअलस्.नी सुरुवातीला , अनेक अपेक्षा ठेवून, आम आदमी पार्टी जॉइन केली होती, त्यांतील बरेच जण या प्रकरणानंतर बाहेर पडले. अगदी सुरुवातीच्या काळातच या पार्टीत सामील होणारे, संस्थापक-सदस्य, मयांक गांधी , जे महाराष्ट्राचे त्या पार्टीचे प्रमुख होते, त्यांनी भ्रमनिरास होऊन ती पार्टी सोडली, व ते सोशल वर्कमध्ये कार्यरत राहिले. एकदा अगदी योगायोगानें माझी-त्यांची एका प्रायव्हेट कार्यक्रमात गाठ पडली होती, व मी त्यांच्याकडे याबद्दल पृच्छा केली असतां, मला त्यांचें मत समजलें.
• एवढेच नव्हे, तर नंतरही, कांहीं अन्य संस्थापक-सदस्य व अगदी-सुरुवातीच्या-काळात-सामील-झालेले-ज्येष्ठ-लोक, पार्टी सोडतांना आपल्याला दिसताहेत, वा त्यांची नाराजी स्पष्ट दिसताहे. पार्टीच्या सुरुवातीच्या दिवसांतच जॉइन होणार्या पत्रकार आशुतोष यांनी पार्टी सोडली ; डॉ. कुमार विश्वास हे संस्थापक-सदस्य नाराज आहेत व इलेक्शनच्या वेळी पार्टी सोडणार अशी वदंता आहे.
आपल्या जुन्या सहकार्यांना alinate करण्यांची केजरीवाल याची एक्सपर्टीज् प्रशंसनीय आहे ! ( ‘मी म्हणेन ती पूर्वदिशा’ असा कांहीं प्रकार असल्यास नकळे ).
• राजकारणाच्या क्षेत्रात काय घडतें आहे ? दिल्लीत जम बासण्यांआधीच केजरीवाल याला पंजाब-हरियाणा-महाराष्ट्र-गोवा वगैरेंचे वेध लागले. आतां तर विरोधी पक्षांच्या गठबंधनामध्ये महत्वपूर्ण भूमिका निभावण्यांचा आणि अखिल-भारतीय-स्तरावर आपलें नेतृत्व नेण्यांचा त्याचा इरादा व प्रयत्न आहे.
• या सार्या पार्श्वभूमीवर , केजरीवाल याचें प्रपोज्ड् आमरण उपोषण पहायला हवें.
दिल्ली –
• दिल्ली ही भारताची राजधानी आहे. त्यामुळे दिल्लीची सुरक्षाव्यवस्था आणि अनुशासन मध्यवर्ती सरकारकडेच रहाणें आवश्यक आहे.
• -जसें , जियोपोलिटिकल कारणांमुळे अदमान-निकोबार द्वीपसमूह हा मध्यवर्ती सरकारच्याच अखत्यारीत रहाणें गरजेचें आहे ; तसेंच, खरें तर, जियोपोलिटिकल कारणांमुळें दिल्ली ही ‘सेंट्रली गव्हर्नड् टेरीटरी’च रहायला हवी होती.
-पण, कांहीं वर्षांपूर्वी, कोठल्याही कारणानें कां होईना, दिल्लीला स्टेटहुड दिलें गेलें. मात्र, तत्कालीन मध्यवर्ती सरकारलाही हें भान होतेंच , की, दिल्लीची सुरक्षा व अनुशासन मात्र मध्यवर्ती सरकारच्याच अखत्यारीत रहाणें गरजेचें आहे. त्यामुळे, सरकारनें दिल्लीला ‘स्वतंत्र राज्य’ बनवतांना त्याप्रकारची तरतूदच केली. पोलिसांबरोबरच, दिल्लीत मध्यवर्ती सिव्हिल सर्व्हिसचे जे लोक पोस्ट् केले जातात, त्या लोकांवरही कंट्रोल ठेवणें अनुशासनाच्या दृष्टीनें सरकारला आवश्यक वाटलें. आणि, तें किती योग्य आहे , हें केजरीवालच्या लटपटी-खटपटींवरून सर्वांना पटलें असेलच.
-सध्याच्या मध्यवर्ती सरकारलाही हा मुद्दा पटलेला असल्यानें त्यानेही तोच क्रम चालूं ठेवला.
-थोडक्यात काय, तर मध्यवर्ती सरकारें भिन्नभिन्न असली तरी दिल्लीची सुरक्षा व अनुशासन यांबद्दल त्यांचें एकच (the same) मत आहे.
• पण दिल्ली ही भारताची राजधानी असल्यानें, दिल्लीतील कांहीं activities मध्यवर्ती सरकाच्या आधीन असणें, हें केजरीवाल याला कसें पटणार ? त्याला दिल्लीवर ‘टोटल कंट्रोल ’ हवा आहे. आपल्या कृत्यानें , successive मध्यवर्ती सरकारांच्या दिल्लीच्या सुरक्षाविषयक , अनुशासन व अन्य प्रकारच्या काळज्यांना आपण आपल्या वर्तनानें पुष्टीच देत आहोत, याचें भान केजरीवाल याला कां नाहीं, कुणास ठाऊक ?
• या बाबतीत केसही करून झाली, अन् सुप्रीम कोर्टानें केजरीवालच्या विरुद्ध निकालही दिला !
• बरें, सुप्रीम कोर्टाचा निकाल honourably स्वीकारावा की नाहीं ? पण, तसें न करतां, आतां हा ‘आमरण’ उपवास !
• जे अधिकार दिल्ली सरकारला प्राप्त आहेत, त्यांच्या अंतर्गत, त्या त्या क्षेत्रांत काय तें करायचें तें कर की रे बाबा ! पण दिल्लीचे administration डेप्युटी सी. एम्. मनीष सिसोदियावर सोपवून केजरीवाल मात्र आमरण उपवासाच्या धमक्या देण्यांत गर्क आहे ! चळवळ्या माणूस चळवळी विसरत नाहीं, हेंच खरें.
• तुकाराम महाराज म्हणतात,
‘आधी होता वाघ्या दैवयोगें झाला पाग्या
त्याचा येळकोट राहीना, मूळ स्वभाव जाईना ।।’
हें केजरीवाल याला किती चपखल लागू पडतें, नाहीं ? केजरीवाल हा, CM असूनही आपली NGO काळातली चळवळी वृत्ती सोडायला तयारच नाहीं. ‘मूळ स्वभाव जाईना’ !
आतां काय ?
• ‘गरज सरो वैद्य मरो’ या उक्तीनुसार, ज्यानें , आपला हेतू साध्य होतांच, आण्णा हजारेंना बाजूला सारलें, त्या आण्णांचीच कॉपी आज केजरीवाल करूं पहात आहे. पण, बंधो, तूं कांहीं आण्णा हजारे नाहींस !
• केजरीवाल याच्या ‘उपवासबाजी’ला मध्यवर्ती सरकार भीक घालेल असें वाटत नाहीं, आणि, घालूंही नये. कारण तें देशासाठी हितकर नाहीं ही गोष्ट शेंबडें पोरही सांगूं शकेल. तर मग या ‘आमरण’ उपोषणाचें अखेर काय होणार, कोण जाणे !
• सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतरही केजरीवालचा हट्ट कायमच आहे. त्यामुळें, न जाणो, सुप्रीम-कोर्टात- अनेकानेक-कारणांवरून-केसेस्-फाइल-करणारे-वकील प्रशांत भूषण हे , आत्तां , सुप्रीम कोर्टाची बेअदबी केल्याबद्दल केजरीवालवर केस करण्यांचा बेत करतही असतील. किंवा कदाचित् सुप्रीम कोर्ट स्वत:च suo moto दखल घेईल . तसें झाल्यास, हल्लीहल्लीच जशी अरुण जॅटली यांची बिनशर्त माफी मागायची केजरीवाल याच्यावर पाळी आली होती, तशीच, न जाणो, यावेळी सुप्रीम कोर्टाची बिनशर्त माफी मागायची पाळी केजरीवाल याच्यावर येईल काय, हें पाहणें मनोरंजक ठरेल. त्यांतूनही, सुप्रीम कोर्टानें हेंही हल्लीच नमूद केलें आहे की, अशी माफी मागून सजा चुकणार नाहीं. त्यालाही केजरीवाल तयार असेल काय, हा आतां प्रश्न आहे.
पण मग, केजरीवाल हें सर्व करतोय् कां ? –
-आपला जनाधार कमी होत चालल्याची जाणीव केजरीवालला झाली असेल, व ती वाढवण्याचा हा प्रयत्न असूं शकेल .
-आपल्या ‘दिल्ली-राज्य-सरकार’चा जो कांहीं ‘नॉन्-परफॉरमन्स्’ असेल, त्यासाठी एक्सक्यूज् म्हणून ; त्याच्याकडील लोकांचें लक्ष इतरत्र डायव्हर्ट व्हावें म्हणून, हा खटाटोप असूं शकतो.
-या उपोषणामुळे आपण भारताच्या राजकीय पटावर अधिक महत्व मिळवूं शकूं , असें केजरीवाल याला वाटत असेल.
-लवकरच होणार्या लोकसभा निवडणुकीत, आपल्या ‘आम आदमी पार्टी’च्या लोकांना निवडून यायला , या उपोषणामुळें मदत होईल, असा त्याचा समज असावा.
• कारण कोणतें कां असेना, ही एक ‘ स्ट्रॅटेजिक मूव्ह ’ आहे निश्चित. ती कितपत सफळ होईल, तें लवकरच कळेल. घोडामैदान जवळच आहे.
समारोप –
• दिल्ली ही देशाची राजधानी आहे. त्यामुळे, सुरक्षेसाठी , सुरळीत administration साठी, अनुशासनासाठी, ज्या कांहीं activities मध्यवर्ती सरकारनें स्वत:च्या ताब्यात ठेवणें आवश्यक आहे, त्याबद्दल सरकारनें कुठल्याही इमोशनल ब्लॅकमेलला बळी पडूं नये , कोणताही काँप्रोमाईज् करूं नये.
आणि, सरकार तेंच करणार, यात शंका नाहीं.
• म्हणून, कुठली तरी पळवाट काढून हें ‘आमरण’ उपोषण मागे घेण्यांची तयारी केजरीवालनें आधीच योजून ठेवावी, हेंच बरें.
अंतत: –
-मी राजकारणी नाहीं, केजरीवाल याच्याबद्दल लिहावें असाही कधी माझा विचार नव्हता. पण दिल्लीची सुरक्षा व अनुशासन हा असा अति-महत्वाचा विषय आहे की, एक सुजान नागरिक म्हणून यावर मतप्रदर्शन करणें मला अत्यावश्यक वाटलें, पोटतिडिकेनें वाटलें, त्यामुळें हा खटाटोप.
-अरविंद केजरीवाल याच्या या ‘दुराग्रही अट्टाहासा’मुळे होणारे माझे क्लेश, त्याचे-माझें alma mater एकच असल्याकारणानें अनेक पटींनी वाढताहेत, शतगुणित होताहेत ; पण त्याला ‘बिचारा’ अरविंद केजरीवाल काय करणार !
-केजरीवालच्या पाठीराख्यांनो, सत्य कटुच असतें हो ! तरीही या खरें बोलण्यांचा राग आला असला तर माफ करा ; कारण अखेरीस, अरविंद केजरीवालचे अन् माझें alma mater एकच आहे ना !
— सुभाष स. नाईक
२३.०२.१९
Leave a Reply