नवीन लेखन...

आरवाईन ते फ्रीमाँट : एक प्रवास

सर्वसामान्य भारतीयांना असते तसे अमेरिकेचे आकर्षण मलाही होते. पण आजवरचा सारा प्रवास विमानाने झालेला होता. आंतरराष्ट्रीय प्रवास करणारी विमाने सर्वसाधारणपणे जमिनीपासून तेहतीस ते छत्तीस हजार फूट उंचीवरून जात असतात. त्यामुळे ‘टेकऑफ’ किंवा ‘लँडिंग’ करताना काही मिनिटे खालचा, आजुबाजूचा निसर्ग आणि परिसर काय तो आपल्याला दिसतो. डोमेस्टिक ओअर लाईनने अमेरिकेतील दोन शहरांमध्ये प्रवास केला तर हे विमान जमिनीपासून बारा ते सोळा हजार फूट उंचीवरून जाते. अशा वेळी खिडकी जवळची जागा मिळाली असल्यास खालील अपूर्व निसर्गसौंदर्याचा आपल्याला आनंद घेता येतो. ‘साऊथ वेस्ट अअर लाईन’ने मी सॅन्टा ॲना (हे लॉस एजंसीच्या जवळ आहे.) ते ओकलंड (हे सॅन फॉन्सिस्कोच्या जवळ आहे.) असा दीड तासांचा म्हणजे जवळजवळ चारशे मैलांचा प्रवास मी केला. विमानाचा हा मार्ग समुद्र किनारपट्टीजवळून जातो. तेव्हा विमान काहीवेळा जमिनीवरून तर काहीवेळा समुद्रावरून पुढे सरकत असते. आकाश निरभ्र असेल आणि हवा शांत, स्वच्छ असेल तर किनारपट्टीवरील काही खुजे डोंगर, त्यांच्या घळईतील हिरवीगार वृक्षराजी, सपाट, विस्तीर्ण मैदाने, भूमितीच्या चौकोन, आयतासारखी सरळ रेषेतील विविध रंगच्छटा ल्यालेली शेते. सरळ रेषेत जाणारे हायवेज, फ्रीवेज, अतिशय आखीव-रेखीव घरे किंवा गृहसंकुले, कारखाने इत्यादी स्पष्ट दिसतात. तर निळाशार समुद्र, त्यावरील मुंग्यांच्या आकाराची अनेक जहाजे, नागमोडी वळणांचे समुद्रकिनारे आणि किनाऱ्यालगतच्या पिवळसर पांढऱ्या रंगांच्या वाळूचे आकर्षक पट्टे सारेच विलोभनीय असते. अनेकदा धूसर ढगांच्या विरळ वा दाट पडद्यांतून विमान जाते किंवा हवेचा थर घट्ट किंवा विरळ झाल्यास ते हेलकावेही खाते.

मात्र अमेरिकन शहरी वा ग्रामीण जीवनाचे समीपदर्शन घ्यायचे असल्यास त्या करिता मोटारने वा आगगाडीने प्रवास करणे अधिक चांगले. त्यातही मोटार- ती ही खाजगी कार असल्यास- छान. कारण इथल्या रस्त्यांवरून हा प्रवासही अत्यंत सुखकर होतो. अमेरिकेत रस्ते इतके असंख्य आणि उत्तम स्थितीतले, शिवाय रस्त्यांवरील सामान्य माणसांचा प्रवास सुखकर व्हावा या करिता बांधण्यात आलेले पूल, त्यांची गणनाच करता येणार नाही.

त्यामुळे आरवाईन ते फ्रीमॉन्ट हा चारशे मैलांचा प्रवास सुमारे सहा तासांचा आहे. आरवाईन हे लॉस एजंलीसच्या दक्षिणेस मैलांवर असून त्याच्या लगत ऐशी मैलांवर सॅन डिएगो नावाचे अप्रतीम शहर वसले आहे; शिवाय आरवाइनच्या अगदी जवळ पंधरा मैलांवर ‘डिस्नेलँड’ आहे. या अतिशय स्वच्छ, आखीव-रेखीव शहरापासून उत्तरेकडे लॉस एन्जलीस शहर येते. इथेच हॉलिवूड वसले आहे. ही सारी अमेरिकेची पश्चिम किनारपट्टी आहे आणि इथे रस्त्यांची असंख्य जाळी विणली गेली आहेत. सॅन डिएगो ते सेक्रेमेंटो असा जाणारा ‘पाच’ हा रस्ता आम्ही प्रवास करिता निवडला होता. अर्थात आणखी एक रस्ता अगदी समुद्रकिनाऱ्यालगत समांतर जाणाराही उपलब्ध असला तरी तो घेतला असता तर आमचे अंतर दीड-दोन तासांनी वाढणार होते. त्यामुळे त्याचा विचार आम्ही १७५ केला नाही.

कॅलिफोर्निया राज्याला पॅसिफिक महासागराची किनार लाभली आहे. हा सारा भाग भूकंप होणारा आहे. इथले डोंगर फारसे उंच नाहीत. ते आपल्याकडील काळ्या पथ्थरांसारखे नाहीत. ही खडकाळ, चुनखडी, फॉस्फरस असल्यासारखी ठिसूळ मातीने तयार झालेली किनारपट्टी आहे. या भागात काही जलाशये आहेत हे खरे, तरी पाण्याची कमतरता असावी. डोंगरांवर आपल्याकडे जशी भिन्न भिन्न जातींची वृक्षराजी वाढते तसे इथे नाही. अनेक ठिकाणी झुडपे दिसतात, पण ती पाण्याअभावी खुरटलेली, काळवंडलेली दिसतात. अमेरिकन सरकारने १९५० च्या दरम्यान इथे जसे रस्ते, पुल्स बांधले तसेच पाणी वाचवणारा व त्याचे वितरण करणारा प्रकल्प राबलेला आहे. त्यामुळे पाण्याचे योग्य वाटप इथे होते.

हा सारा परिसर सपाट पठाराचा आहे. मैलो न मैल सपाट पठारे दिसून येतात आणि त्यामधून जाणारा हा सरळ रस्ता. इथली जमीन मात्र विलक्षण कसदार आहे. त्यामुळे संत्री, सफरचंद, आक्रोड, बदाम यांची फार मोठ्या प्रमाणात लागवड इथे केली जाते. जगाच्या एकूण उत्पन्नाच्या नव्वद टक्के बदामाचे उत्पादन इथे होते. या शिवाय या भागात द्राक्षांचीही निर्मिती मोठ्या प्रमाणात केली जाते. स्वाभाविकच या भागात द्राक्षापासून दारू तयार करणाऱ्या वायनऱ्यांचे प्रमाण ही खूप आहे.

वेगवेगळ्या पिकांची शेती इथे प्रायः यंत्राद्वारे केली जाते. झाडांवरली नटस्ही इथे यंत्राद्वारे काढली जातात. इथे लागवड करताना दोन झाडांमध्ये पाच ते आठ फुटांचे अंतर ठेवले जाते आणि ती एका सरळ रेषेत लावलेली असतात. अशा लागवडींच्या ठिकाणी पाणी उपलब्ध करून दिलेले असते. तिथे डोळ्यांना सुखवणारी हिरवळ जाणवते. काही ठिकाणी ओसाड शेती दिसली, काही ठिकाणी यंत्राने झाडे समूळ उपटली आहेत असे दिसले. विशिष्ट जातीचे वा प्रकारचे उत्पादन घेतले की शेतीचा कस टिकावा म्हणून आपल्याकडे शेतकरी एक वर्ष जमीन पडीक ठेवतो तसा हा प्रकार असावा असे वाटले. जिथे सफरचंदांची अथवा संत्र्यांची लागवड करण्यात आली होती तिथे झाडे त्या फळांनी लगडलेली दिसत होती. रस्त्याच्या दुतर्फा काही ठिकाणी एकरच्या एकर परिसरात हजारो काळ्या-पांढऱ्या ठिपक्यांच्या पुष्ठ परंतु खुज्या गाई आढळल्या. ‘काऊ स्लॉटरिंग’ हा प्रकार इथे आढळतो. म्हणजे इकडील बहुसंख्य माणसे मांसाहारी असतात आणि त्यांच्यासाठी चिकन्स, टर्की, डक्स या पक्षांप्रमाणेच लँब, गोट, पोर्क (डुक्कर) आणि बीफ (गोमांस) यांचा समावेश असतो. गोमांसाठी गाई (बैलांचे) असे कळपच्या कळप उत्तम प्रकारचा खूराक देऊन पोसलेले असतात. त्यांना मैलोन्मैल पसरलेल्या जमिनीवर मोकळे सोडलेले असते. त्यामुळे या भागात हे प्राणी मारणे, त्यांचे विविध अवयव, त्यांचे मांस छोट्या मोठ्या भागात तुकडे करून वेगवेगळ्या आवरणांमध्ये भरून विविध शहरांमधील मॉल्समध्ये विक्रीकरिता पाठवणे ही सारी व्यवस्था पाहणाऱ्या काही संस्था असतात. त्यांचे कत्तलखानेही या प्रदेशात आढळतात. त्यामुळे त्याच्याजवळून आपला रस्ता जात असेल तर तिथली दुर्गंधी आपले डोके उठविते.

अशाच कुरणांपैकी काहींवर असंख्य बकऱ्या, मेंढ्या, शेळ्या आढळल्या. त्यांच्यासोबत त्यांना झालेली कोकरे अथवा पाडसंही त्यांच्या मागून धावत दिसली.

आपल्याकडे ठिकठिकाणी ‘चार घरांची गावे’ जशी दिसतात तसे इथे नाही. मैलोन मैल शेती वा काही ठिकाणी डोंगरच्या डोंगर. त्यांच्या रचनाही वेगवेगळ्या त्या मात्र मन वेधून घेणाऱ्या, एखाद्या चित्रपटाच्या बाह्य चित्रीकरणासाठी अत्यंत सौंदर्यात्म वा कलात्म दिसल्या. एखाददुसरा कृत्रिम जलाशय अथवा सरोवर. रस्त्यांवर रात्रीच्या वेळी प्रकाशाची उधळण करणारे विजेचे दिवे नाहीत. आपल्याकडे खेडोपाडी लोडशेडिंगच्या नावाने बहुसंख्य वेळ वीज नसते आणि शहरांमध्ये रात्री (आणि दिवसादेखील) प्रखर दिवे असतात. अमेरिकेत विजेचा वापर कसा करतात हे कळले. या काळात दिवस चार वाजताच संपतो. अंधार पडू लागतो आणि गाडीच्या काचांमधून दूरवर वस्ती असेल तिथे फक्त दिवे किलकिलताना दिसतात. हो एकमात्र होते. आमच्या रस्त्याच्या पलिकडे दहा-पंधरा फुटांवरून समोरून येणाऱ्या वाहनांचा (एक दिशा) मार्ग होता. हे दिवस ‘थँक्स गिव्हिंग’चे त्यामुळे शुक्रवार-शनिवार-रविवार अशा सुट्ट्यांचे. आज शनिवार तरी देखील दोन्ही रस्त्यांवर प्रचंड गर्दी. याला ट्रॅफिक जाम म्हणतात. गाडी चालकांसाठी सूचना देणाऱ्या विजेच्या फलकांवर ‘थँक्सगिव्हिंगमुळे उशीराबद्दल क्षमस्व’ असे दाखवण्यात येणारे संदेश. हा रस्ता काही ठिकाणी डाऊनटाऊन लगत, तर काही ठिकाणी डोंगराळ भागातून, काही ठिकाणी. विस्तीर्ण शेतांमधून लांबवर जाणारा. दीड-दीड तास प्रवास केल्यावर रेस्टरूम्स आढळल्या. तिथे एखाददुसरे हॉटेल. टॅकोबेल, पिझ्झाहट, बर्गरकिंग या प्रकारातील ही हॉटेलं. तीही प्राय: जिथे रेस्टरूम्स आणि गॅस स्टेशन्स (म्हणजे पेट्रोलपंप्स) होती तिथे. तीही फ्रीवेपासून एक्झीटरोडने गेल्यावर असलेल्या बाजूच्या जागांवर सोयीने बांधलेली. ही गॅसस्टेशन्स एखाद्या शहराच्या नजीक असतील तिथे मोटेल्स आढळली. अशी मोटेल्स प्राय: आपल्याकडील पंजाबी वा गुजराथी (पटेल) यांची असतात.

अमेरिकेत कुठेही जात जगभराच्या भिन्न भिन्न संस्कृतीची माणसं इथे आलेली असतात. तुम्ही न्यूयॉर्कला स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपाशी असा वा लॉस एजंलीसला ‘फोर्ड थिएटर’ वा ‘युनिव्हर्सल स्टुडिओ’पाशी, किंवा ‘सॅन फ्रॉन्सिस्को’ ला फेरीमधून प्रवास करीत असा, किंवा ‘नायगरा’ चे दर्शन घेत असा तुमच्या आसपास भिन्नधर्मीय आणि संस्कृतीतील लोकांचा समुदाय असतो. त्याचाच प्रत्यय अशा रेस्टरूमपाशी असलेल्या टॅकोबेल मध्ये येतो. इथे (मोठ्या आकाराचे) कावळे, क्वचित चिमण्या, कावळ्यांसारखे दिसणारे परंतु बुलबुलं पेक्षा मोठे आणि धीट पक्षी आढळतात. कधी कधी आकाशातून ‘बगळ्यांची माळ’ ही विहरत जाताना दिसते.

एकदम चमत्कार झाल्यासारखे वाटले. आजूबाजूला काळोख पसरू लागला होता. पश्चिमेकडे ढगांनी व्यापलेल्या आकाशात फिकट सूर्यप्रकाश दिसत राहिला आणि ढगांच्या मधून छोटा का होईना सप्तरंगी इंद्रधनुष्याचा पट्टा अल्हादायक  वाटत होता. पावसाचा थेंबही पडत नसताना ते इंद्रधनुष्य आमच्या कुतूहलाचा विषय झाले होते. मागच्याच आठवड्यात एकदा ते दिसले, तेव्हा आम्ही पटापट कॅमेरे काढून फोटो काढले. पण आमचा हा आनंद पाच मिनिटांपलिकडे टिकला नाही. कारण ते लगेच दिसेनासे झाले. इथे मात्र ते चांगले अर्धा तास तरी आमच्या बरोबर राहिले.

फ्रीमाँटला पोहोचण्याची वेळ चांगली दीड तास पुढे गेल्याचे जीपीएसवरून कळत होते. पासष्ट मैल तास या वेगाने गर्दी पुढे सरकत होती आणि सॅनहोजेजवळ येत आहे तोच पावसाला सुरुवात झाली. इकडचा पाऊस आपल्याकडे पडतो तसा धोऽऽ धो पडत नाही; नुसती मंद मंद बरसात. पण आता मात्र त्याचा जोर आणि वेग वाटला होता.

-सहा तासात संपणारा आमचा प्रवास आज चांगला दीड तास लांबला. पण अमेरिकन प्रदेशाची जवळून ओळख झाल्याने आमच्या आनंदाला पारावार उरला नाही.

— डॉ. अनंत देशमुख

(अनघा प्रकाशन ने प्रकाशित केलेल्या ओ अमेरिका ह्या पुस्तकामधून)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..