नवीन लेखन...

अशाच एका रात्री…

नुकतीच सूर्यकिरणांनी रजा घेतली होती. अजूनही आकाशात त्याचा पुसटसा अंश दिसत होता. वातावरण एकदम आल्हाददायक होतं. पक्षी आपापल्या घरट्यात परतण्याचा मार्गावर होते. रस्त्यावरची वर्दळ एकदम कमी झाली होती. सगळीकडे सुखद शीतल वारा सुटला होता आणि अशाच वातावरणात एक चारचाकी रस्त्यावरून डाव्या बाजूला वळत एका बंगल्याजवळ येऊन उभी रहाते. चारचाकीच्या आतून, त्या बंगल्याला आणि चारचाकीला शोभेल असं तरुण व्यक्तिमत्व खाली उतरतं. खाली उतरल्यावर एकदम स्टाईलने ते खिशातून लायटर काढत तोंडात असलेल्या सिगरेटला शिलगावते आणि गाडीला टेकून सिगरेटचा एक कश घेत त्याची वलयं हवेत सोडतं. सिगरेट तोंडात तशीच ठेवत ते बंगल्याच्या फाटकातून आत प्रवेश करते. आत गेल्यावर ते बंगल्यात प्रवेश करणार इतक्यात त्याचं लक्ष नावाच्या पाटीवर जातं आणि एकदम जोरात ओरडत ते म्हणतं, ” काका! इथे पाटीवर धूळ कशी? साफसफाई केलेली दिसत नाही. ” त्याचा वरच्या सुरातला आवाज ऐकून आतून एक ५० – ५५ वर्षं उलटून गेलेली व्यक्ती हातात कपडा घेऊन लगबगीनं येऊन, ती पाटी पुसते. त्या पाटीवर नाव असतं ” आदित्य सरपोतदार. ” पाटी पुसून होईपर्यंत आदित्य तिथेच उभा रहातो. पाटी पुसून झाल्यावर तो पटकन खिशात हात घालून काकांसमोर २००₹ ची नोट धरतो आणि हसत म्हणतो, ” काका! तुम्हांला माहीत आहे ना की, मी माझ्या नावाला किती जपतो? पुन्हा कधी असं होऊ देऊ नका. ” काकादेखील खुशीने २०० ₹ ची नोट घेऊन, हसत हसत आत प्रवेश करतात. पाठोपाठ आदित्यही बंगल्यात प्रवेश करतो.
आदित्य सरपोतदार हा एक नामांकित अभिनेता असतो. त्याचं एक S2 (एस स्क्वेअर) नावाचं प्रोडक्शन हाऊस देखील असतं, जे तो आणि त्याचे काही मित्र मिळून चालवत असतात.

आदित्य आज खूप खुशीत असतो आणि त्याचं कारणही तसंच असतं. आज त्याच्या प्रोडक्शनला खूप मोठा चित्रपट करण्याची संधी मिळालेली असते आणि त्यात तो lead artist म्हणून select झालेला असतो. तो त्या धुंदीतच असतो. सगळ्या मित्रांना conference मध्ये घेऊन तो एका पार्टीची व्यवस्था करतो. सगळे एकमताने दुसऱ्या दिवशी रात्री पार्टी करायची ठरवतात. सगळी चर्चा संपवून आदित्य टेबलावर काकांनी मांडून ठेवलेल्या डिशमध्ये त्याला हव्या असलेल्या गोष्टी वाढून घेतो. सोबत रॅकमध्ये ठेवलेली स्कॉचची बॉटल व ग्लास घेऊन, मंद प्रकाशात सॉफ्ट म्युझिक लावून तो मन लावून जेवू लागतो.

हलकसं जेवून तो आपला मोर्चा स्कॉच कडे वळवतो. बाहेर वातावरणात कमालीचा गारवा, त्यात हातात स्कॉचचा ग्लास आणि त्याला सॉफ्ट म्युझिक आणि मंद प्रकाशाची साथ अशा काहीशा धुंद वातावरणात आदित्य वेळ आणि आपली स्वतःचीच साथ enjoy करत असतो. २-३ पेग्स संपवून आदित्य, सिगरेट शिलगावतो. डोक्यात कसलेतरी विचार सुरू असतात. कदाचित पुढच्या सगळ्या गोष्टींचा तो विचार करीत असतो आणि विचारांबरोबरच सिगरेटच्या धुराची वलयं हवेत मिसळत असतात. इतक्यात मोबाईलवर मेसेज आल्याची रिंग किणकिणते. विचारातून बाहेर पडत, सिगरेटचे झुरके घेत तो मोबाईलमध्ये बघतो. त्यात त्याला सृष्टीचा मेसेज दिसतो. Message : hey aadi! काय करतोयस? उत्तरादाखल आदित्य तिला “आपण उद्या बोलू.” एवढंच बोलतो. आदित्य एकदम मूडी आहे हे सृष्टीला चांगलंच ठाऊक असल्याने ती ” okay ” एवढं बोलून मेसेज करणं थांबवते. आदित्य सिगरेट संपवून, टेबलावरच्या एॕश ट्रे मध्ये टाकून झोपायला जातो. काही क्षणातच त्याला गाढ झोप लागते.

मध्यरात्रीनंतर त्याला कसल्याशा आवाजाने जाग येते. तो आवाज कसला हे जाणून घेण्यासाठी तो उठतो आणि इतक्यात त्याला कोणीतरी त्याच्या बेडरूमच्या दरवाजातून हळूच डोकावून बघतंय असं दिसतं. तो, ते कोण आहे हे पहाण्यासाठी जातो इतक्यात ते तिथून अदृश्य होतं. अदृश्य होण्यापूर्वी त्याला पुसटशी पांढरी आकृती दिसते. आदित्य चटकन उठून दरवाजाबाहेर पडतो आणि बाहेरच्या खोलीत येतो. त्या खोलीत त्याला एक विचित्रच शांतता जाणवते. इतक्यात घड्याळाचा टोल वाजतो आणि त्यामुळे आदित्य दचकतो. काही क्षणातच पुन्हा त्याला, त्याच्या आरामखुर्ची हलण्याचा आवाज येतो. इतक्यात थंडीतही आदित्यच्या कानामागून घाम ओघळू लागतो. आदित्य हळूहळू आरामखुर्चीच्या दिशेने निघतो आणि समोर जे काही बघतो, ते बघून त्याची पाचावर धारण बसते. ती पुसटशी पांढरी आकृती त्याला खुर्चीत आरामात बसलेली दिसते आणि अचानक ती आकृती त्याच्या गळ्याच्या दिशेने आपला हात पुढे घेण्यास सुरुवात करते. ते बघून आदित्य पळण्याचा निष्फळ प्रयत्न करतो. त्या आकृतीचा हात गळा आवळणार इतक्यात आदित्य जोरात ओरडतो आणि काकांनी आणलेला चहाचा ट्रे, चहाच्या कपासकट खाली पडतो. आदित्य पूर्णपणे घामाने थबथबलेला असतो. काका आदित्यला जोरजोरात हलवत काळजीच्या स्वरात म्हणतात, “आदित्य बाबा, काय झालं?” त्यांच्या आवाजाने आदित्य भानावर येतो आणि आसपास बघतो तर त्याला सकाळ झाल्याचं लक्षात येतं. काका पुन्हा त्याला विचारतात, ” काय झालं बाबा? एवढे घाबरलेले का दिसत आहात? काही वाईट स्वप्न पाहिलं का? ” घाम पुसत आदित्य म्हणतो, ” काही नाही काका. तुम्ही माझा नाश्ता टेबलवर लावून ठेवा. मी फ्रेश होऊन येतोच.” “बरं” असं म्हणत काका पडलेल्या वस्तू उचलून बेडरूम मधून बाहेर पडतात. ते गेल्यानंतर आदित्य स्वतःशीच हसत पुटपुटतो, ” आयला! स्वप्न होतं. पण असं स्वप्न का पडलं मला? हां, आजकाल आपण भयकथा जास्त वाचत आहोत आणि आपल्याला मिळालेलं प्रोजेक्टसुद्धा horror चं आहे त्यामुळेच असं स्वप्न पडलं आपल्याला.” स्वतःला टपलीत मारत आदित्य फ्रेश होण्यासाठी निघतो. फ्रेश होऊन, आपला नाश्ता करून आदित्य प्रोडक्शनमध्ये जातो.

प्रोडक्शनमध्ये दिवसभर सगळी काम करून, सगळी गँग पार्टीसाठी निघते. आदित्यची सगळी गँग तशी एकदम बिनधास्त! पण ती कामच्यावेळी काम आणि मस्तीच्या वेळेस मस्ती करायची. सगळ्यांचा पार्टी mode एकदम ऑन असतो. सृष्टी, आदित्य, सॅम (समीर), ज्यो (ज्योती) व श्यांकी (शंकर) एका गाडीत तर केके (किरण काळे), विकी, आस्था आणि वरुण एका गाडीत, असे सगळे पार्टीसाठी निघतात. रस्त्यावर गाड्या समांतर जात असतात दोन्ही गाडांमध्ये music system जोरात वाजत असते. woofer चा आवाज आणि गाड्यांचा look बघून लोक वळून वळून त्यांच्याकडे पहात असतात. हसत खिदळत सगळे जण पार्टीच्या स्थळी पोहोचतात. सगळेजण गाडीतून उतरतात आणि एका चकचकीत हॉटेलमध्ये प्रवेश करतात. सृष्टीचं लक्ष मात्र वेगळीकडेच असतं. सगळे उतरून पुढे जात असताना सृष्टी आदित्यला काहीतरी सांगायचा प्रयत्न करते पण आदित्य तिला बोलतो, ” यार सृष्टी! आता पहिले पार्टी. मग तू, तुला काय सांगायचे आहे ते सांग. चल लवकर.” असं म्हणत आदित्य तिचा हात धरत तिला आत घेऊन जातो. आदित्यच्या झालेल्या स्पर्शामुळे ती खुश होते कारण तिला आदित्य मनापासून आवडत असतो. तिला ही गोष्ट केव्हापासून त्याला सांगायची असते, पण आतापर्यंत वेळ काही जुळून आलेली नसते. पण पार्टीच्या दिवशी काही करून आदित्यला मनातलं सगळं काही सांगून टाकायचं हे तिनं मनाशी पक्कं ठरवलं असतं. हळूहळू पार्टीचा रंग चढत जातो. बराच वेळ झाल्यावर सृष्टी आदित्यला एका बाजूला घेऊन जाते आणि मनातली गोष्ट त्याला सांगते. थोडा विचार करून आदित्य, सृष्टीच्या प्रेमाचा स्वीकार करतो. सृष्टीला खूप आनंद होतो आणि दोघेही पुन्हा पार्टीत मिसळतात. पार्टी खूप उशीरा संपते.

सगळेजण पहिल्यासारखेच गाडीत बसून निघतात. सगळ्यांना सोडत सोडत आदित्य आणि सृष्टी पुढे निघतात. आदित्य सृष्टीला घरी सोडून आपल्या बंगल्याच्या दिशेने गाडी फिरवतो. घरी जात असताना एक बाई आदित्यच्या गाडीला हात दाखवते. तिच्या कडेवर एक लहान मुल असतं. आदित्य गाडी थांबवतो. आदित्य आपल्या गाडीची काच खाली घेतो. ती बाई आदित्यला तिच्या पत्त्यावर सोडण्यासाठी खूप गयावया करते. अखेरीस आदित्य तिला गाडीत बसण्याची परवानगी देतो आणि बाईला विचारतो, ” कुठे जायचंय तुम्हांला? ” उत्तरादाखल बाई बोलते, ” सरकार मी सांगते रस्ता तुम्हांला. ” तिच्या ह्या उत्तराने आदित्यला काहीसं विचित्र feel होतं. पण तो त्या बाईशी जास्त न बोलता, ती सांगेल त्या मार्गाने गाडी चालवू लागतो. इथे सृष्टी घरी पोहोचुन झोपायच्या तयारीला लागते. इतक्यात मोबाईलवर इतर सगळे घरी पोहोचल्याचा मेसेज येतो. ते बघून सृष्टी ती पण घरी पोहोचल्याचा मेसेज टाकते आणि आदित्यला ” घरी पोहोचल्यावर मेसेज कर ” असा private message करते. सृष्टीला पार्टी जास्त रंगतदार झाल्याने लगेच झोप लागते. इकडे आदित्य काहीही न बोलता गाडी चालवत असतो. इतक्यात सृष्टीला आदित्यचा अपघात झाल्याचं स्वप्न पडत आणि ती घाबरून उठते. ती उठल्या उठल्या पहिले आदित्यला कॉल करते, पण आदित्यचा फोन discharge होऊन switched off झालेला असतो. सृष्टी आणखीन काळजीत पडते. ती जास्त विचार न करता देवासमोर जाते आणि कालिकेच्या तसबीरीपुढे हात जोडत म्हणते, ” हे आई! माझा आदि सुखरूप असू दे. त्याच्यावर काही संकट आलं असलं तर त्यातून त्याला वाचव.” इकडे आदित्यला ती बाई गाडी थांबवायला सांगते. आदित्य गाडी थांबवून मागे बघतो तर ती बाई त्याला तिथे दिसत नाही. गाडीत बसून आदित्य चौफेर नजर फिरवतो तर त्याला जवळच स्मशान दिसतं. आदित्य घाबरून गाडी तशीच मागे घेऊन स्पीड मध्ये बंगल्याच्या दिशेने निघतो. वाटेत कुठेही न थांबता थेट बंगल्याजवळ येऊन गाडी पार्क करून घाईघाईत घरात शिरतो. सृष्टीला घडलेला प्रकार सांगण्यासाठी तो फोन काढतो तर तो switched off असल्याचं त्याच्या लक्षात येतं. तो फोन ऑन करतो battery 2% आहे हे दिसतं. तो घाईगडबडीत तो व्यवस्थित घरी पोहोचल्याचा मेसेज आणि उद्या बोलू type करून सृष्टीला पाठवतो. आदित्य फोन चार्जिंगला लावून झोपायला जातो, पण त्याला झोप लागत नाही. त्याला सारखा काल घडलेला प्रसंग म्हणजेच त्याला पडलेलं स्वप्न आणि आता घडलेला प्रसंग आठवत रहातो. खूप प्रयत्नांनी त्याला झोप लागते.

दुसऱ्या दिवशी आदित्य सृष्टीला घडलेला सगळा प्रकार सांगतो. ते ऐकून सृष्टी चिंतेत पडते. सृष्टी आदित्यला रोज रात्री झोपताना कुंजिका स्तोत्र वाचण्याचा सल्ला देते. आदित्य तो सल्ला मानतो आणि आदित्य आणि सृष्टी पुन्हा कामाला सुरुवात करतात. त्या दिवसापासून आदित्य शक्यतो न चुकता कुंजिका स्तोत्र झोपण्यापूर्वी वाचू लागतो. त्यामुळे त्याला होणारे सगळे त्रास बंद होतात.

दिवसांमागून दिवस जात असतात. फिल्म चित्रिकरणापूर्वी असणारी कामं जवळजवळ संपत आलेली असतात. आता फक्त उरतं ते location hunting चं काम. सगळेजण त्यासाठी search करत असतात. एक दिवस search करता करता त्यांना एक location मिळतं. सगळेजण मिळून त्या location वर शिक्कामोर्तब करतात. तिथे केव्हा आणि कसं जायचं ह्याचं planning होतं आणि location hunting ला जायचा दिवस उजाडतो. सगळेजण लोकेशनच्या दिशेने निघतात. तिकडे पोहोचून सगळेजण पहिले रहाण्याची आणि खाण्याची सोय करतात. लोकेशन पहाण्यासाठी आदित्य, सृष्टी, श्यांकी आणि ज्यो निघतात. त्यांना लोकेशन दाखवणारा एक मार्गदर्शक (Guide) त्यांच्यासोबत असतो. अखेरीस सगळेजण लोकेशनजवळ पोहोचतात. तो भग्नावस्थेत असलेला किल्ला पाहून आदित्य, सृष्टी, श्यांकी आणि ज्यो खुश होतात ; कारण त्यांना शूटींगसाठी जसं लोकेशन हवं असतं, अगदी तसंच ते असतं. किल्ल्याजवळच काही अंतर राखून आणखीन एक गढी असते. Guide सगळी वरवरची माहिती देत असतो. श्यांकी ती माहिती लक्षपूर्वक ऐकत असतो. तोपर्यंत ज्यो वेगवेगळ्या angles ने फोटो काढत असते. सृष्टीला त्या किल्ल्याबद्दल एक अनाहूत जवळीक वाटत असते म्हणून ती आदित्यला तसं सांगते. आदित्य आणि सृष्टी तिथेच थांबतात आणि guide, श्यांकी आणि ज्यो पुढे, त्या गढीजवळ जातात. त्या गढीजवळ त्यांना एक विचित्र शांतता, काळोख आणि पहिल्या वातावरणापेक्षा अधिक गारवा जाणवतो. एखादं गूढ दडलंय असं जाणवतं. श्यांकी, ज्यो आणि guide फक्त गढी बाहेर उभे राहूनच बोलत असतात. ज्यो ला काही फोटो काढायचे असतात म्हणून ती guide आणि श्यांकीला तसं सांगते. पण guide काही तयार होत नाही. त्या दोघांना उद्देशून तो फक्त एवढंच म्हणतो की, ” काही गोष्टी लपलेल्याच चांगल्या असतात. उगाच त्यांना उकरून काढून, विषाची परीक्षा कोण घेणार?” पुढे guide फक्त ती गढी का आणि कोणासाठी बांधली गेली होती एवढंच सांगतो. पण ती माहिती पण तो खूप तुटकपणे सांगतो. त्याच्या अशा वागण्याने श्यांकी आणि ज्यो घाबरतात. जास्त वेळ न थांबता, सरळ किल्ल्याजवळ येतात.

तो पर्यंत इथे आदित्य आणि सृष्टी संपूर्ण किल्ला आतून फिरून, कुठे कुठे आपल्याला शूट करता येईल ते तपासून घेतात. इतक्यात श्यांकी, ज्यो आणि guide किल्ल्याजवळ येतात. आदित्य, श्यांकी आणि ज्योला झालेली चर्चा सांगतो. नंतर सगळे तिथून निघतात. वाटेत आदित्य, guide ला त्याने सांगितलेल्या ठिकाणी उतरवतो. त्याला त्याचे पैसे देतो आणि हॉटेलकडे निघतो. हॉटेलवर जाण्यापूर्वी श्यांकी त्याला गढीजवळ घडलेला सगळा प्रकार सांगतो. आदित्य सगळ्यांना ह्या विषयावर न बोलण्याची सक्त ताकीद देतो. गाडी हॉटेलजवळ येते. सगळेजण उतरतात आणि खोलीत जातात. सगळे एकत्र जमून फोटो बघतात आणि उरलेली चर्चा संध्याकाळी करण्याचे ठरवून जेवायला जातात. जेवणं आटोपून सगळे मस्त ताणून देतात (झोपतात). संध्याकाळी चहा पिऊन सगळे पुन्हा एकत्र जमतात. पुढची सगळी चर्चा सुरू होते. एकमताने ज्या गोष्टी ठरतात त्या finalised करून सगळे थोडे रिलॅक्स होतात. थोड्यावेळाने रात्रीची जेवणं आटोपून सगळे आपापल्या रूममध्ये परततात. आदित्य आणि सृष्टी सोडून सगळेजण बिअर पिण्याचा प्लॅन करतात. हीच संधी साधून आदित्य आणि सृष्टी बाहेर पडतात. वास्तविक त्यांनी रात्री पुन्हा गढीवर जाण्याची योजना दुपारच्या जेवणानंतरच बनवलेली असते. त्यानिमित्ताने त्यांना privacy पण मिळणार असते. आदित्य kk, श्यांकी, विकी, वरूण आणि सॅमला बाहेर long drive साठी जात असल्याचे सांगून आणि सृष्टी ती आदित्य सोबत long drive ला चालली आहे असं सांगून बाहेर पडतात. हॉटेल ते गढी ह्या मधील अंतर साधारणतः ३ ते ४ किलोमीटर असते.

आदित्य आणि सृष्टी एकदम रोमँटिक मूड मध्ये असतात. आदित्य गाडी, साधारणतः २० ते ३० च्या वेगाने चालवत असतो. गाडीत सॉफ्ट रोमँटिक म्युझिक हळू आवाजात सुरू असतं. दोघेही ऐकमेकांशी भविष्यात काय करायचं ह्या गप्पा मारण्यात रंगलेले असतात. गाडी हळूहळू गावचा रस्ता सोडून आडवाटेला लागते जी वाट किल्ला आणि गढीजवळ जाणारी असते. थोडं पुढे गेल्यावर रस्त्यात एक मोठं वडाचं झाड त्यांना लागतं आणि नेमकी तिथेच एक फांदी गाडीवर पडता-पडता रहाते आणि गाडीच्या पुढ्यातच पडते. आदित्य आणि सृष्टी अचानक पडलेल्या फांदीमुळे दचकतात आणि त्याच परिस्थितीत आदित्य पटकन गाडीला ब्रेक मारतो. गाडी अगदी फांदीच्या जवळ येऊन थांबते. सगळीकडे किर्र काळोख आणि भयाण शांतता पसरलेली असते. इतक्यात एक टिटवीचा आवाज ती भयाण शांतता चिरत नाहीसा होतो. आदित्य आणि सृष्टी थोडे शांत होऊन ऐकमेकांना धीर देत पुढचा प्रवास सुरू करतात. पण घडलेल्या प्रसंगामुळे दोघेही शांत बसतात. आदित्य जास्त लक्ष देऊन गाडी चालवू लागतो. सृष्टी खिडकीबाहेर पहात विचार करू लागते. थोडे अंतर कापल्यावर सृष्टी खिडकीबाहेर बघत असताना अचानक एक बाई तिला गाडीच्या समांतर, गाडीच्या वेगात धावताना दिसते. ते बघून सृष्टी घाबरून आदित्यला गाडीचा वेग वाढवायला सांगते. आदित्यलाही ती बाई दिसते. आदित्य घाबरून चक्क accelerator वर उभा रहातो तरीही ती बाई त्या वेगात गाडीला समांतर धावत रहाते. ती बोलते, ” कितीवेळा माझ्या तावडीतून सुटाल सरकार! आता काही मी तुम्हाला सोडणार नाही. करा, जेवढा वाचण्याचा प्रयत्न करता येईल तेवढा करा. तुमचा मृत्यूच प्रत्यक्ष तुमचा पाठलाग करत आहे.” ती बाई जोरजोरात हसू लागते. तिच्या त्या विकट हास्याने सगळा परिसर दणाणून निघत असतो. अचानक ती बाई तिथून गायब होते आणि आदित्य, सृष्टी सुटकेचा निःश्वास सोडतात. गाडीने बऱ्यापैकी वेग धरलेला असताना अचानक झाडाझुडुपांमधून एक ससा पळत पळत गाडीच्या चाकाखाली आला आहे असं आदित्यला दिसतं. तो चालू गाडीतून मान बाहेर काढून बघतो तर त्याला एकाचे दोन ससे, दोनाचे चार ससे, असे ससे वाढून गाडीच्या चाकाखाली येत असल्याचे दिसतं. आदित्य गाडी तिथेच सोडून सृष्टीसोबत पळू लागतो. एव्हाना ते दोघं किल्ल्याजवळ पोहोचलेलेच असतात. ते आसपास न बघता तडक गढीच्या दिशेने धावू लागतात. गढीच्या मुख्य दरवाजा जवळ धापा टाकत ते उभे रहातात. त्यांना पायऱ्या दिसतात. ते भग्न पण भक्कम लाकडी दरवाजाकडे पाठ करून त्या पायऱ्यांवर बसतात. इतक्यात त्यांना गढीमधून नाच गाण्याचा आवाज ऐकू येऊ लागतो. आदित्य सृष्टी घाबरून उठून पळणार, इतक्यात दरवाजातून एक हात आदित्यच्या खांद्यावर पडतो आणि आदित्य त्या हातासकट गढीच्या आत खेचला जातो. ते बघून सृष्टीची हातापायातली शक्तीच नाहीशी होते आणि सृष्टी तिथेच गुडघ्यावर बसून रडू लागते. ती आदित्यला आवाज देऊ लागते. पण काही एक फायदा होत नाही. तिला आता फक्त आतून बाईच्या बोलण्याचा आणि आदित्यच्या ओरडण्याचा आवाज ऐकू येत असतो. आदित्य त्या बाईच्या हाता पाया पडत असतो. ती बाई बीभत्सपणे हसत असते आणि अचानकपणे सगळे आवाज येणं बंद होते. सृष्टीचे हातपाय थंड पडतात. सृष्टी आत जाण्याचा खूप प्रयत्न करते, पण सगळे प्रयत्न निष्फळ ठरतात. तिला पुन्हा फक्त बाईचा आवाज ऐकू येऊ लागतो. बाई म्हणते, ” सरकार अखेरीस सापडलातच माझ्या तावडीत. ह्या सरकारच्या गढीत, अहो म्हणजे तुमच्याच गढीत तुम्हाला मारण्याची शपथ घेतली होती मी. काय कमी होती हो माझ्यामध्ये राणी सरकारांपेक्षा? फक्त एकच गोष्ट कमी होती त्या घरंदाज होत्या आणि मी एक तमासगिरीण! मला वाटलं की तुमचं त्यांच्यापेक्षा माझ्यावरच जास्त प्रेम असेल म्हणून मी माझं तन आणि मन दोन्हीही तुमच्या हवाली केलं. राणी सरकारांच्या ही गोष्ट ध्यानात आल्यावर त्यांनी किल्ल्यावर (महालात) येण्याची बंदी केली आणि तुम्ही ही गढी माझ्यासाठी बांधून दिली. मी बाळंतीण असताना तुमच्याकडे फक्त राणीचा मान आणि राज्याचा हिस्साच मागितला होता. तुम्ही हे प्रकरण जास्त अंगाशी येईल अशा अविचाराने माझा खून करून ह्याच गढीत मला पुरलं होतं आणि हा किल्ला, राज्य सोडून दुसऱ्या ठिकाणी स्थायिक झालात. तुमचं दैव बलवत्तर म्हणून तुम्ही त्या जन्मात माझ्या हातून वाचलात पण ह्या जन्मात? ह्या जन्मात मी माझा सूड घेऊनच रहाणार. बघूया तुम्हांला आता कोण वाचवतंय.” हे सगळं ऐकून सृष्टीच्या मेंदूला मुंग्या येतात आता काय करावं हेच तिला सुचत नसतं.

इतक्यात तिला “कुंजिका स्तोत्र म्हण” असा तिच्या अंतर्मनाचा आवाज येतो. ती क्षणाचाही विलंब न लावता कुंजिका स्तोत्र म्हणू लागते. तिच्यात आता एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण झालेला असतो. ती बाहेरूनच तिला आवाहन करते. गढी पुन्हा भयानक आवाजाने दुमदुमून उठते आणि ती बाई आता सृष्टीकडे आपला मोर्चा वळवते. सृष्टीला ती दरवाजातून बाहेर आलेली दिसते. सृष्टी आत्मविश्वासाने त्या आत्म्याच्या दिशेने झेपावते. बरीच हातापायी झाल्यावर सृष्टी तिला घट्ट पकडून कुंजिका स्तोत्र म्हणू लागते. तो आत्मा प्रयत्नपूर्वक तिच्या पासून सुटण्याचा प्रयत्न करू लागतो. अखेरीस दैवी शक्तीपुढे त्या बाईचा आत्मा हरतो आणि त्याला मुक्ती मिळते.

सृष्टी लागलीच वेळ न दवडता गढीच्या दरवाजाला ढकलून आत प्रवेश करते आणि आदित्यला आवाज देऊ लागते. इतक्या वेळ बेशुद्ध पडलेला आदित्य, सृष्टीच्या आवाजाने शुद्धीवर येतो आणि सृष्टीला प्रतिसाद देतो. आदित्य जखमी झालेला असल्याने त्याच्या अंगात स्वतः उठून चालण्याची ताकद नसते. सृष्टी आदित्यजवळ पोहोचते आणि रडत रडत त्याला घट्ट मिठी मारते. बराच काळ ऐकमेकांच्या कुशीत गेल्यावर सृष्टी आदित्यला आधार देत उठवते आणि त्याला सावरत दरवाजातून बाहेर आणते. बाहेर येऊन सृष्टी आस्थाला कॉल करून गाडी गढीजवळ घेऊन यायला सांगते. फोन ठेवल्यावर सृष्टीच्या लक्षात येतं की, पूर्व दिशेला सूर्यदेवांचे आगमन होत आहे. ती मनोमन स्मितहास्य करून डोळे मिटून त्यांना नमस्कार करते.

— आदित्य दि. संभूस.

(अभिनेता, दिग्दर्शक, लेखक)

Avatar
About आदित्य संभूस 78 Articles
मराठी नाट्य चित्रपट कलाकार, दिग्दर्शक, लेखक...

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..