नवीन लेखन...

असाही एक प्रवास

आपण अनेक मोठमोठ्या लेखकांनी लिहिलेली प्रवास वर्णने वाचली असतील व त्याचा मनसोक्त आनंदही घेतला असेल. त्यामुळे माझ्यासारख्या एका सामान्य नवशिक्या लेखकाने प्रवासवर्णन लिहावे हे थोडेसे धाडसच होतंय याची मलाही जाणीव आहे. पण एखादा प्रवास किती मजेशीर होऊ शकतो याची एक झलक म्हणून हा लेखनप्रपंच. या प्रवासातील सर्व घटनाच इतक्या मजेशीर होत्या की आज जवळजवळ सव्वीस सत्तावीस वर्षे झाली तरी त्यातील प्रत्येक प्रसंग माझ्या पूर्ण आठवणीत आहे.

हि घटना घडली त्यावेळी मी युनायटेड वेस्टर्न बँकेच्या ( सध्याची आयडीबीआय बॅंक ) सातारा जिल्ह्यातील मसूर या एका ग्रामीण शाखेत अधिकारी म्हणून कार्यरत होतो. त्याकाळी लहान ग्रामीण शाखेत फक्त एकच अधिकारी दिला जात असे व त्यानेच मॅनेजर म्हणून काम पहायचे. मसूर शाखेत मॅनेजर वितीरिक्त जादा अधिकारी हा अन्य ठिकाणी कोणी मॅनेजर रजेवर गेल्यास तिथे डेप्युटेशनवर पाठवणेसाठी दिला होता. त्यामुळे मला बऱ्याच वेळा म्हासुर्णे ,कुंभारगाव या शाखेकडे जावे लागे.

हि घटना घडली ती मे १९९१ मधे. म्हासुर्णे शाखेचे मॅनेजर हे रजेवर जाणार असलेने मला म्हासुर्णे शाखेत काम करण्याची अॉर्डर मिळाली व मी त्या नुसार म्हासुर्णे शाखेत काम पहायला सुरुवात केली. मसूर ते म्हासुर्णे हे अंतर साधारण ३५ ते ४० कि.मी.असावे. मसूरहून सकाळी ९ वाजता एस.टी. होती त्या बसने पुसेसावळी येथे जाऊन तिथून दुसरी बस पकडून म्हासुर्णेला जायचो. १०:३० वाजता तिथे पोहोचायचो. दिवसभर तेथे काम करून संध्याकाळी ५:३० ची मायणी ते सातारा बस पकडून पुसेसावळी येथे यायचे. पुसेसावळी येथे पोहोचायला ६:३० वेळ व्हायची. त्यावेळी तेथून मसूरला बस नसायची (अंतर साधारण २२ ते २५ कि.मी. ) काही वेळा एखादा टेंपो किंवा ट्रक भेटायचा. पण बहुतेक वेळी पुसेसावळी येथून कराडला जाणे ( अंतर २५ कि.मी. ) व कराड येथून मसूरला जाणे असा द्राविडी प्रवास करावा लागत असे. व अशा रितीने ५:३० ला म्हासुर्णे सोडल्यावर मसूरला पोहोचायला रात्रीचे ८:३० वाजत.

एके दिवशी बँकेत फार गर्दी नव्हती व माझे कामही आवरत आले होते.  नेहमी प्रमाणे ५:३० ची बस मिळेल याची खात्री होती. दुपारी दोन नंतर एकदम वातावरण बदलले आभाळ भरून आले. जोरदार पाऊस येण्याची शक्यता वाटत होती. त्याप्रमाणे दुपारी ४ नंतर विजांचा कडकडाट होवून जोरदार वादळी पावसास सुरुवात झाली. पाऊस व गारांचा जोरदाव वर्षाव होत होता. पाच वाजून गेले तरी पावसाचा जोर कमी होत नव्हता. मला बसची काळजी लागली होती. मायणीहून येणारी बस ही जर सातारहून मायणीला गेली असेल तरच यायची.साडेपाचला पावसाचा जोर कमी झाल्यवर तिथल्याच एका सहकाऱ्याने मला स्टँडवर सोडले. स्टँड म्हणजे छोटीशी पिक अप शेड होती. तिथे १५ / २० प्रवासी थांबले होते. पण एकूण चर्चेचा सूर बस येणार नाही असाच होता. व तसेच घडले ६:३० झाले तरी बस आली नाही. तेथील बँकेतील सहकारी आजचा दिवस साहेब येथेच माझ्या घरी मुक्काम करा असे सांगत होता. पण कोणत्याही परिस्थितीत मला घरी जाणे आवश्यक होते. कारण परिस्थितीच तशी होती. माझी पत्नी माझ्या मुलीच्या वेळी गर्भावस्थेत होती. मुलगा ३ वर्षाचा होता. मसूरसारखे खेडेगाव पत्नीची अशी अवघड अवस्था, लहान मुलगा, घरात वडील वय वर्षे ८४ आई वय वर्षे ७०. रात्री अपरात्री काही अडचण आली तर काय होईल हा विचार मला अस्वस्थ करत होता. एवढ्यात मायणीकडून एक माल वहातुक करणारा टेंपो येताना दिसला व जिवात जीव आला. बस तर येणार नव्हती त्यामुळे सर्व प्रवाशांनी त्याला पुसेसावळी पर्यंत सोडण्याची विनंती केली व टेपोच्या हौद्यात ऊभे राहून माझ्या प्रवासाला सुरुवात झाली.

पुसेसावळीच्या दिशेने टेंपोचा व त्याबरोबर माझा प्रवास सुरु होता. पुसेसावळी गावात शिरताना अलीकडे एक ओढा लागला व टेंपो थांबला. पाऊस थांबला होता पण ओढ्याला मोठा पूर आला होता. त्यामुळे पूर ओसरेपर्यंत किती वेळ थांबावे लागेल याची काहीच खात्री नव्हती. सर्व प्रवासी खाली ऊतरुन पूर कमी होण्याची वाट पहात थांबले होते.ईतक्यात समोरून पुसेसावळी कडून एक टेंपो पुराच्या पाण्यातून जोरदार वेगात ओढा ओलांडून आला. आमच्या टेंपोच्या ड्रायव्हरने पाण्याला ओढ किती आहे व पलीकडे जाता येईल काय अशी विचारणा केली. त्यावर त्याने पाण्याला खूप वेग असून टेंपो पाण्यात घालणार असाल तर पहिल्या गेअरमधे व जोरात रेस करून जाता येईल पण मधेच जर मोशन कमी होऊन वेग कमी झाला तर गाडी पलटी होईल म्हणून सांगितले. त्यावर आमच्या टेंपोच्या ड्रायव्हरने टेंपो पाण्यात घालण्याचे ठरवले व सर्वांना सांगितले की ज्याला यायचे त्यांनी आपल्या जबाबदारीवर यावे कमी जास्त झाल्यास मी जबाबदार नाही. त्यावर पाच सहा प्रवासी तयार झाले व मी सुद्धा देवाचे नाव घेऊन टेंपोत बसलो. ड्रायव्हरने कौशल्याने टेंपो ओढ्याच्या पलीकडे नेला व मी सुटकेचा श्र्वास सोडला. तिथून पाच मिनीटावर एस.टी.स्टँड होते. टेंपोने पुसेसावळी स्टँडवर ऊतरलो. एव्हाना सायंकाळचे ७:१५ झाले होते. ७ ची वडूज कराड बस ओढ्यवरील पुरामुळे अद्याप आली नव्हती. ७:३० वाजता बस आली पावसाने गर्दीही फारशी नव्हती त्यामुळे बसमधे आरामशीर बसायला जागा मिळाली व माझा कराडच्या दिशेने प्रवास सुरु झाला.

आता काही काळजी नव्हती नऊ साडेनऊ पर्यंत मसूरला पोहोचण्याची खात्री होती म्हणून निवांत सिटवर डोके टेकून एक डुलकी काढावी म्हणून डोके टेंकवले छानपैकी मस्त झोप लागली. सव्वा आठपर्यंत कराडला पोहोचणार होतो. ईतक्यात वाटेत बस थांबली व माझी झोप मोडून मी जागा झालो. लोकांचा गलका ऐकू येत होता. बघीतले तर ओगलेवाडीच्या अलीकडील ओढ्याला पूर आला होता व फरशी पुलावरून पाणी वहात होते. एस.टी. महामंडळाची बस त्यामुळे कायदा कानून व प्रशासन त्यामुळे ड्रायव्हरने जाहीर केले की पुलावरील पाणी कमी झाल्यावरच बस पुढे जाईल. काही पर्याय नसल्याने निवांत बसून राहिलो. पंधरा मिनिटात पाणी ओसरले व बस पुढे सरकली. मसूरला जाणारी बस वाटेतच पकडावी म्हणून मी कराड स्टँडवर न जाता कराड नाक्यावर दातार हॉस्पिटल जवळ ऊतरलो कराडहून मसूरला जाणाऱ्या बसची वाट बघत थांबलो. पाऊस आता थांबला होता पण बऱ्याच नदी नाल्यांना पूर आलेने बस वेळेवर येत नव्हत्या. त्यामुळे किती वेळ थांबावे लागेल याची काहीच खात्री नव्हती. ८:३० वाजून गेले होते. त्याचवेळी एक अँबेसेडर कार येऊन थांबली व त्याच्या ड्रायव्हरने मसूरला रस्ता कोठून जातो अशी विचारणा केली. मनात म्हणले चला देव पावला व त्याला म्हणले मी मसूरला चाललोय मला मसूरला सोडता का. वाटाड्या मिळाल्याने तोही खुष झाला व मी त्याच्या शेजारी बसून मसूरला निघालो. जाताना तोही गप्पा मारत होता. त्याला ऊंब्रजला जायचे होते पण पाऊस जोरात झाल्याने व गाडी नुकतीच दुरुस्ती करुन घेतली असल्याने त्याला कोणीतरी मसूरमार्गे जाण्याचा सल्ला दिला होता. कार मिळाल्याने पंधरा विस मिनिटात मसूरला पोहोचणार म्हणून मीही खुष होतो. पण माझी सत्वपरीक्षा अद्याप संपली नाही हे थोड्याच वेळात माझ्या लक्षात आले. कार कोपर्डे येथे आली आणी बघीतले तर कोपर्डेच्या अलीकडे पुलावरून पुराचे पाणी वहात होते व वहातुक दोन्ही बाजूने बंद होती. पंधरा विस मिनिटे वाट बघीतली पण पुराचे पाणी काही कमी होण्याची चिन्हे दिसत नव्हती. शेवटी कारच्या ड्रायव्हरने परत कराडला जाऊन हायवेने ऊंब्रजला जायचा निर्णय घेतला. व येथे रात्रीच्या वेळी थांबण्यापेक्षा मी तुम्हाला कराड स्टँडवर सोडतो असे सुचवले. पण परत ऊलट कराडला जाण्यापेक्षा मी तेथेच ऊतरणे पसंत केले. पाणी अजूनही पुलावर होते व वहातुक ठप्प झाली होती. आता ९:३० वाजून गेले होते, तेवढ्यात तिथे एक ट्रॅक्टर आला. त्याला विचारले तर तो कोपर्डे गावात रहाणारा होता त्याला विनंती करुन ट्रॅक्टर ट्रॉलीत बसून ओढा ओलांडून पलीकडे जाऊन उतरलो. आता अन्य वहानाची वाट पहाणे एवढेच हातात होते. थोड्या वेळानंतर तेथे एक युवक मोटारसायकलवर आला त्याला कोठे जाणार अशी विचारणा केली असता तो सह्याद्री साखर कारखान्या पर्यंत जाणार असल्याचे समजले.त्याला विनंती करुन सह्याद्री कारखान्या पर्यंत आलो. तो पर्यंत रात्रीचे साडेदहा वाजले होते. वाहनांची वाट बघण्या शिवाय काही पर्याय नव्हता. थोडा वेळ वाट पाहिल्यावर कराडहून एक एस.टी. बस आली व त्या बसमधून मसूरला पोहोचलो. घरी जाई पर्यंत रात्रीचे ११ वाजून गेले होते. घरी आई वडील व पत्नी वाट पहात होते. मला पाहिल्यावर त्यांच्या जिवात जीव आला.

वरील सर्व घटना या स्वप्नवत होत्या. कोणाला सांगूनही खरे वाटणार नाही अशीच परिस्थिती होती. कोणाला पटणार नाही पण २६/२७ वर्षापूर्वी जेव्हा मोबाईल काय साधा लँडलाईन फोन लागणे हे एक दिव्य होते त्या काळात मी घरी सुखरुप येईपर्यंत घरच्या लोकांची काय अवस्था झाली असेल याची नुसती कल्पनाही करु शकत नाही. माझ्या आई वडिलांची पुण्याई व परमेश्र्वराची साथ यामुळेच त्या दिवशी मी सुखरूप घरी पोहोचलो असेच म्हणावे लागेल.

— सुरेश काळे
मो. ९८६०३०७७५२
सातारा
६ एप्रिल २०१८

सुरेश गोपाळ काळे
About सुरेश गोपाळ काळे 48 Articles
मी आयडीबीआय या बँकेच्या सेवेतून अधिकारी म्हणून जुन २०१७ मधे निवृत्त झालो. महाविद्यालयीन जीवनापासून काव्य लेखनाची आवड होती. नोकरीतील व्यापामुळे मधील काही वर्ष लेखन कमी होते. निवृत्तीनंतर त्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. विविध विषयांवर वैचारिक लेख लिहून ठेवले आहेत. परंतु लेख लिहिण्यापेक्षा कविता लिहिण्यामागे जास्त कल आहे. जुन २०१७ मधे "शब्दसूर" हा काव्यसंग्रह प्रकाशित.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..