‘पाकिस्तानबरोबर व्यापार’ हा दिनांक ६ ऑगस्ट, २०१२ रोजी दैनिक प्रत्यक्षमध्ये श्री.अनुप दळी यांनी लिहिलेल्या अग्रलेखाने केंद्रातील सरकारचे असंगाशी संगाचे राजकारण कसे चुकीचे आहे आणि त्याचे देशावर दुरगामी काय परिणाम होऊ शकतात याचे चांगले मार्गदर्शन या अग्रलेखातून वाचायला मिळाले. भारताचे पाकिस्तानबरोबर नव्याने होऊ घातलेले अनर्थाचे अर्थकारणही भविष्यात देशाला आणि जनतेला कसे गोत्यात आणू शकतात हे अग्रलेखातील ठळक मुद्यांवरून समजले आणि अंतर्मुख होऊन भविष्यात आपल्याला काय निर्णय घ्यावे लागतील याची कल्पना आली. अग्रलेखाबद्दल धन्यवाद आणि आभार!
भारत सरकारची सध्याची स्थिती काहीशी गोंधळलेली, बावरलेली, एकमेकांवरील विश्वास गमावलेली, हायकमांडच्या मागे मागे धावून धावून दमलेली, इच्छाशक्ती गमावलेली आणि अविश्वनीय झाली आहे. त्याचबरोबर पाकिस्तान सरकारची स्थित ही “घरका ना घाटका” अशी झाली आहे. असो.
अग्रलेखाच्या पहिल्याच परिच्छेदात असे वाक्य आहे की “चारच दिवसांपूर्वी भारत सरकारने पाकिस्तानी कंपन्या आणि वित्तसंस्थांना भारतात थेट गुंतवणूक करण्यास परवानगी दिली. याचा कुठेही फरसा गाजावाजा झाला नाही” म्हणजे कोणाच्या दबावाखाली कटू निर्णय घेण्यावाचून गत्यंतर नव्हते ! अश्या काही घटना घडल्या ज्या जनतेला माहित नाहीत? किंवा त्या करून देण्यात देशहीत आडवे येईल? संशयाला जागा आहे! अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री आणि बराक ओबामासुद्धा एक सारखे भारतात रिटेल गुंतवणुकीसाठी आपले वजन वापरत आहेत. नाहीतरी सध्या अमेरिकेने सर्वच क्षेत्रात सगळ्यांचा ठेका घेताला आहे! आणि ठेकेदाराची भूमिका उत्तमरित्या निभावत आहेत हे त्यांच्या कृतीतून दिसून येते. विशेष म्हणजे विरोधीपक्षांनीही या निर्णयावर आगपाखड केली नाही याचे नवल वाटते.
भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश एकमेकांचे पारंपारिक शत्रू आहेत असे पाकिस्तानला वाटते तरीही आपण एवढे रेड कारपेट स्वागत, उद्योग आणि व्यापारात थेट गुंतवणुकीच्या निर्णयाने का करतो आहोत? एकीकडे सिमावादासारखे प्रश्न चिघळत ठेऊन पाकिस्तानातील राजकीय आणि दहशतवादी संघटनांनी आपले उखळ पांढरे करून घेतले आहेच तरीही कोणाच्या समाधानासाठी हे सगळे चालले आहे? कारण कारगील युद्धा आगोदर काही दिवस माजी पंतप्रधान श्री अटलबिहारी वाजपई यांनीही पाकिस्तान बरोबर व्यापार खुला करण्याचा प्रस्ताव ठेऊन वाघाहद्द खुली केली होती आणि त्यानंतर काय झाले हे सर्वश्रुतच आहे आणि हा कटू अनुभव गाठीशी असताना असा धाडसी यासाठी की इतर बॉम्बस्फोटात आणि २६/११च्या मुंबई हल्यात पाकिस्तानी लष्कर आणि गुप्तचर संस्था सहभागी होत्या असे अतिरेकी अबू जुंदाल चौकशीत सांगत आहे, त्याला कसाबने ओळखले आहे आणि एवढी पार्श्वभूमी माहित असूनही असा “असंगी” निर्णय भारत सरकारला का घ्यावा लागला? शेजार धर्म पाळला पाहिजे हे मान्य आहे पण कोणासाठी शत्रुसाठी का मित्रासाठी? हे खरच न उलगडणारे कोडे आहे! हे फक्त तो एकटा नियंताच जाणे!
अंतर्गत हिंसाचार आणि अस्थिरतेच्या कारणांमुळे परकीय गुंतवणूकदार पाकिस्तानात गुंतवणूक करण्यास फारसे उत्सुक नाहीत आणि त्यामुळे पाकिस्तानी अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. पाकिस्तानातील औद्योजक आणि व्यापारी भारताबरोबर व्यापार वाढविण्याच्या बाजूचे आहेत त्यांना मदत करणे हे आपला शेजार धर्म म्हणून कर्तव्यच आहे पण कोणाला जे आपले हीत जपतात, चांगल्या अर्थाने शेजारधर्म पाळतात, आपत्ती आणि अडीअडचणीला धावून येतात, पण येथे सुद्धा त्यांच्या स्वभाव आणि सवईसारखे सर्वच उलटे! अस्तीनका चिराग! असे असतांना आपल्या देशातील जनतेचा जीव धोक्यात घालून का त्यांच्यासाठी मदत करायची?
मागे वृत्तपत्रात असे वाचण्यात आले की पाकिस्तानला आपण वीजेचा पुरवठाही करणार आहोत. आपल्यालाच वीज पुरत नाही. चार दिवसापूर्वी २२ राज्यांची विजेची मागणी वाढल्याने किंवा जास्त वीज खेचल्याने ३ ग्रीड्स बंद झाली होती. मागणी आणि पुरवठ्याचे गणित जुळत नाही तर आंम्ही चाललो आहोत शेजारच्या राष्ट्राला वीज द्यायला! कधी कधी इतके हास्यास्पद निर्णय घेतले जातात की खरचं या राजकारणी लोकांना आम्हीं यासाठी निवडून दिले आहे का? मागे अशीच आर्थिक मदत देण्यासाठी धाव घेतली होती! काय चालले आहे?
भारतीय राजकारणात कौटिल्याच्या कुटनीतीचा अभ्यास करणारे मुसद्दी आणि अर्थशास्त्राचे विचारवंत असतांना असे आतताई निर्णय भारत सरकार घेऊच कसे शकते ह्याचेच आश्चर्य आणि कुतूहल वाटते! भारताला नुसती अश्यावासने द्यायची, खोटे बोलायचे, विश्वासघात करायचा, पाठीत खंजीर खुपसायचा, वेळ पडल्यास छुपे युद्ध करायचे, आणि वर ‘गिरा तोभी टांग उपर’ असे वागायचे आणि आपल्या मागण्या पदरात पाडून घ्यावयाच्या याचे हे बोलके उदाहरण आहे. काळ सोकावला आहे ब्रिटिशही व्यापारानिमित्त भारतात आले आणि ऐकेकाळी भारतदेशाची सर्व जगाला असलेले ओळख “सुवर्णभूमी, सोन्याचा धूर निघणारा भारत!” ती त्यांनी त्यांच्या ‘डिव्हाइड अन्डॅ रुल” या अमानवी कौशल्याने पुसून टाकली कारण त्याला आपणच बळी पडलो. परंतू आता सरकारने केलेली असंगाच्या संगाची जनतेने काळजी घेऊन पुढील काळाची पाऊले ओळखायला पाहिजेत! नाहीतर इतिहासाची पुनरावृत्ती होईल.
— जगदीश पटवर्धन
Leave a Reply